विद्यार्थी मित्रांनो, या लेखातून आपण विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाच्या अभ्यासस्रोतांची निवड कशी करायची हे पाहू आणि त्यांचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहू या.

संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. शासनाद्वारे प्रकाशित केले गेलेले संदर्भग्रंथ आणि शासनाच्या संकेतस्थळांवरून मिळणारी माहिती ही या परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे स्रोत आहेत; परंतु हे स्रोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नसल्यामुळे आपण अभ्यास करताना त्यामधून नेमका कोणता मुद्दा उचलायचा आणि कोणता सोडून द्यायचा हे आपल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून ठरविणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्येक विषयाच्या प्रश्नांमध्ये समाविष्ट होणारे प्रमुख घटक आणि त्याचे अभ्यासस्रोत पुढीलप्रमाणे. ’  चालू घडामोडी-जागतिक तसेच

भारतातील – हा घटक पूर्व तसेच मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी आहे. हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या अगोदर किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टपूर्ण कामगिरी यांचा समावेश होतो. या घटकावर साधारणपणे १५ ते २० प्रश्नांचा समावेश होतो.

  • अभ्यासस्रोत – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

नागरिकशास्त्र

या विभागांतर्गत भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास तसेच ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यामधील मूलभूत संकल्पनांच्या आकलनावरील प्रश्न विचारल्याचे दिसून येते. साधारणपणे ८ ते १२ प्रश्न या घटकावर विचारले जातात.

  • अभ्यासस्रोत – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता ६वी ते १०वी पर्यंतची नागरिकशास्त्र आणि ११वी, १२ वीची राज्यशास्त्राची पुस्तके.

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास  –

या विभागांतर्गत भारतातील स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राचे योगदान, ब्रिटिशांची धोरणे, कायदे, राष्ट्रीय सभा आणि अधिवेशने, सामाजिक-धार्मिक सुधारणा, महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर भर असतो. या विभागावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारण्यात येतात.

  • अभ्यासस्रोत-महाराष्ट्र बोर्डाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, त्याचबरोबर बिपिन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हे पुस्तक.

भूगोलमहाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह

या विभागांतर्गत भुरूपे, वारे, पर्यटनस्थळे, मानवी भूगोल, आदिवासी जमाती, अक्षांश, रेखांश, बंदरे, पर्वत, उद्योगधंदे या घटकांवर अधिक भर असून अभ्यासक्रमातील इतर घटक म्हणजे ते महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, पृथ्वी, जगातील हवामान विभाग या घटकांवर देखील भर देणे अपेक्षित आहे. या विभागावर साधारणपणे १२ ते १४ प्रश्न विचारले जातात.

  • अभ्यासस्रोत-चौथी ते १२वी पर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ऑक्सफर्ड व नवनीत स्कूल एॅटलास, नववी ते १२ वी एनसीईआरटीची पुस्तके.

अर्थव्यवस्था

या विभागांतर्गत पंचवार्षकि योजना, चलनव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक उद्योगांची सद्य:स्थिती, विविध समित्या सरकारी धोरणे, वित्त आयोग व शिफारसी, परकीय गुंतवणुकीचे प्रवाह, बेरोजगारी मापनाचे निकष, मानव विकास निर्देशांक, जीडीपी कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास अशा मुद्दय़ांवर भर दिला जातो. या विभागावर साधारणपणे १०ते १४ प्रश्न विचारण्यात येतात.

  • अभ्यासस्रोत – भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त आणि सुंदरम यांचे पुस्तक.

सामान्य विज्ञान

यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र यातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या घटकावर साधारणपणे १२ ते १६ प्रश्न येतात.

बुद्धिमापन चाचणी अंकगणित

या विभागामध्ये दहावीच्या स्तरापर्यंतची गणिते आणि बुद्धिमापनविषयक प्रश्न विचारले जातात. यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे. या विभागावर साधारणपणे  १३ ते १५ प्रश्न विचारले जातात.

  • अभ्यासस्रोत – वा. ना. दांडेकर यांची गणित

आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची एमटीएसची पुस्तके आणि १०वीची एनटीएसची पुस्तके.

हे झाले अभ्यास कोणता करायचा या संदर्भात, पण खरी कसोटी असते ती एका तासात १०० प्रश्न सोडविण्याची. यासाठी केलेल्या अभ्यासाची उजळणी, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव आणि ऋणात्मक गुणपद्धतीचा सामना करण्यासाठी अचूकतेवर भर देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अभ्यास, सराव आणि उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत निश्चितच पोहोचू शकतो.