प्रोडक्ट / टेबलटॉप फोटोग्राफी

छायाचित्रण कला किंवा व्यवसाय ही दिसते तेवढी साधी-सोपी गोष्ट नाही. हातात जरी तंत्रज्ञानाने अद्ययावत कॅमेरा असेल तरी त्यातून उत्तम चित्र काढणे ही छायाचित्रकाराचीच कमाल असते.

हा छायाचित्रणातील सगळ्यात कठीण प्रकार मानला जातो. यामध्ये छायाचित्रातून एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये जीव आणण्याचे काम करावे लागते. कोणतीही वस्तू फक्त पांढऱ्या कागदावर ठेवून तिचे फोटो काढणे, इतकेच हे मर्यादित नसते. यात अनेक गोष्टींचाही समावेश असतो. अगदी उदाहरणच सांगायचे झाले तर, गाडीच्या चाकाचे चित्र घेणे, ही सर्वात कठीण गोष्ट असते. चाकाचा प्रकार, आवरण हे द्रवपदार्थाने भरावे लागते. त्याचेही योग्य तंत्र असते. तेव्हाच ते चाक अधिक आकर्षक दिसते. अनेक तांत्रिक गोष्टींचा विचार या प्रकारात करावा लागतो. टेबलटॉप छायाचित्रणामध्ये अनेक प्रोडक्ट लागतात. एखाद्या पावडरच्या डब्याचे जर शूट करायचे असेल तर प्रत्येक छायाचित्रकाराला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ, पावडरच्या डब्याचे लेबल फारच चमकणारे असेल किंवा स्टुडिओमध्ये वापरण्यात आलेला प्रकाशही जास्त असेल तर त्या डब्यावरील अक्षरेच दिसत नाहीत. अशा वेळी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित राहतो. काच, स्टील यांमधल्या गोष्टींसाठी प्रकाशाची रचना पूर्णत: वेगळी करावी लागते. एखाद्या उत्पादनावर चुकीच्या दिशेने थोडी जरी प्रकाशाची तिरीप पडली तरी हवे तसे छायाचित्र मिळणार नाही. या अशा अनेक गोष्टींचा मेळ घालून एक उत्तम छायाचित्र तयार होत असते. एखादी जरी उणीव राहिली तरी आपल्याला हवे तसे छायाचित्र मिळत नाही. चांगल्या संस्थांमध्ये हे सगळे बारकावे चांगल्या पद्धतीने शिकवले जातात.

प्रोडक्ट शॉट हे अधिकतर कॅटलॉग, संकेतस्थळांच्या जाहिराती, पोस्टर्स यांसाठी वापरले जातात. तुमच्या कधी हे लक्षात आले आहे का, की जाहिरातीतल्या प्रत्येक घडय़ाळावर १०.१० हीच वेळ दाखवलेली असते? याचे कारण म्हणजे रोलेक्स या कंपनीने फार दशकांपूर्वीच हे असे पहिल्यांदा केले होते. १०.१० शेप दोन्ही हातांच्या मनगटांवर समान दिसतो. त्यामुळे ही वेळ कायम ठेवण्यात आली. आता इतर कंपन्याही हीच वेळ दाखवतात. एखाद्या दागिन्याचे किंवा कलाकृतीचे टेबलटॉप छायाचित्रण करणार असाल तर तिथे कलादिग्दर्शक असणे फार आवश्यक असते. छायाचित्रकाराचे काम हे योग्य प्रकाश, योग्य रचना आहे की नाही हे बघणे असते. ज्या उत्पादनाचे फोटो काढले जाणार आहेत, त्यातले रंग एकमेकांमध्ये मिसळायला नको, तसे ते स्पष्टही दिसले पाहिजे, त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक गोष्टी बघण्याचे काम छायाचित्रकाराचेच असते. सोनेरी दागिना हा सोनेरीच दिसायला हवा. पिण्याच्या पाण्याचे काचेचे पेलेही स्पष्ट दिसावे लागतात. महिलांच्या पर्स, क्लचेस यांची छायाचित्रे जास्तीत जास्त आकर्षक आणि सुंदर कशी होतील, हे पाहावे लागते.

ज्या उत्पादनाचे फोटो काढणार आहात त्याचे नेमके महत्त्व काय? त्यातील खास बाब कोणती, हे जाणून घ्यायला हवे. त्यानुसार आपला कॅमेरा, लेन्स, प्रकाश, रचना करून छायाचित्रण करायला हवे. हे नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या अवतीभोवती जे काही आहे, म्हणजे शूज, मिक्सर, टोस्टर, ओवन, साबण उशांची कव्हरे या सगळ्याची त्यांच्या प्रसिद्धीसाठी छायाचित्रे काढलेली असतात. जेवढे आकर्षक छायाचित्र असेल, तेवढेच ग्राहक त्या उत्पादनाकडे आकर्षित होऊन ते खरेदी करायला जातात. त्यामुळे ग्राहकांना ते उत्पादन विकत घेण्यासाठी त्याचे छायाचित्रही चांगले येणेही तेवढेच महत्त्वाचे असते. केवळ एका चित्रामधून ते उत्पादन किती उत्तम आहे हे सांगता येणे हेच छायाचित्रकाराचे खरे यश आहे.

संस्था-

शारी अकॅडमी http://www.shariacademy.com

फोकसएनआयपी http://www.focusnip.com/focusnip

एसएसपी http://www.ssp.ac.in/

उडान  http://www.udaan.org.in/

दिलीप यंदे dilipyande@gmail.com

संकलन – मधुरा नेरुरकर