पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये ‘नारायण’ नावाच्या एका वल्लीबद्दल तुम्ही वाचलेच असेल. लग्नामध्ये कार्य सिद्धीस जाण्यासाठी र्सवकष धडपडणारा माणूस म्हणजे नारायण. कंपनीमधील तोच नारायण म्हणजे कार्यसिद्धी व्यवस्थापन करणारा विभाग. प्रचलित शब्द – ऑपरेशन्स व्यवस्थापन – उत्पादनाचे कार्य ठरल्याबरहुकूम सिद्धीस नेणारा! त्याला आपण कार्य व्यवस्थापन म्हणू. हा विभाग म्हणजे कंपनीचे हृदयच. हे बंद पडले की कंपनी बंद पडलीच म्हणून समजा. या विभागाची कार्ये पाहिली तरी  जबाबदाऱ्यांच्या जंजाळाची कल्पना येईल.

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा – कारखान्यासाठी लागणाऱ्या मोठय़ा इमारती बांधून त्यामध्ये आवश्यक यंत्रे बसविणे, उत्पादनांसाठी लागणारी वीज, पाणी, वाफ, दूरसंचार, इंटरनेट इ. सुविधांचे आयोजन आणि अंमलबजावणी करणे.

गुणवत्ता नियंत्रण व हमी – कच्च्या मालाचे तसेच पूर्ण उत्पादित वस्तूंचे ठरलेल्या मापदंडाप्रमाणे गुणवत्ता परीक्षण करणे.

पुरवठा साखळी व्यवस्थापन – उत्पादन विभागाला कच्च्या मालाचा व बाजारात पूर्ण उत्पादित वस्तूंचा अखंडित पुरवठा कसा होईल याचे आयोजन व अंमलबजावणी करणे. इंग्रजीमध्ये हे कार्य Supply Chain Management (SCM) म्हणून माहिती आहे.

सुविधा व्यवस्थापन – कंपनीच्या दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा अखंडित चालू ठेवण्यासाठी आयोजन व अंमलबजावणी करणे.

व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनांचे नियोजन – व्यवसायातील विविध घटकांचा समन्वय साधून त्यांच्याकडून सगळ्यात उत्तम काम, वेळेच्या मर्यादेत करून घेणे. इंग्रजीमध्ये हे कार्य Enterprise Resource Planning (ERP)  म्हणून नावाजलेले आहे.

संशोधन, विकास व आरेखन – हे तर कुठल्याही कार्य व्यवस्थापन विभागाचे मूलभूत कार्य. भविष्यात उत्पादन करणार असलेल्या वस्तूंबद्दल संशोधन करून त्याचे उत्पादनयोग्य प्रारूप आरेखित करणे व तसेच सध्या उत्पादन होत असलेल्या वस्तूंमध्ये चांगले बदल करणे.

यंत्रांची निगराणी – कंपनीतील सर्व यंत्रांची वेळोवेळी तपासणी करणे व ती त्यांच्या योग्य वापरासाठी सदैव सज्ज ठेवणे.

कच्च्या मालाची खरेदी व साठवण – वस्तूंच्या अखंडित उत्पादनासाठी गरजेप्रमाणे योग्य किमतीत, योग्य संख्येत व वेळेवर कच्च्या मालाची खरेदी करून त्याची साठवण करणे.

विक्रेत्यांची छाननी व नोंदणी – बाजारातून गुणवत्तापूर्ण उत्तमोत्तम माल खरेदी करता यावा म्हणून कच्चा माल व यंत्रांच्या उत्पादकांची व विक्रेत्यांच्या कुवतीची छाननी करणे, त्यांची नोंदणी करून त्यांच्याबरोबर मालपुरवठय़ासाठी दीर्घ मुदतीचे करार करणे.

सेवा व्यवस्थापन – उत्पादन क्षेत्राप्रमाणे या सेवा क्षेत्रात काहीही वस्तूंचे उत्पादन होत नाही. माणसे, प्रक्रिया व प्रत्यक्ष अनुभव यावर सेवा क्षेत्र अवलंबून असते. त्यामुळे सेवा क्षेत्रात सध्या मोठय़ा प्रमाणावर मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण सेवा वेळेवर देण्यासाठी कार्य व्यवस्थापनाचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे संस्थेमधील १०० कर्मचाऱ्यांमागे मार्केटिंग व्यवस्थापनाप्रमाणेच कार्य व्यवस्थापनाचे ३० ते ५० कर्मचारी/ अधिकारी असतात.

कार्य व्यवस्थापनाचे शिक्षण – उत्पादन क्षेत्रातील कार्य व्यवस्थापन हे तांत्रिकतेकडे झुकणारे आहे. त्यामुळे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका/ पदवी किंवा शास्त्र शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी आपल्याकडे असणे आवश्यक ठरते. या मूळ पात्रतेनंतर कार्य व्यवस्थापनाची एम.बी.ए. पदवी घेता येते. सेवा क्षेत्रातील ऑपरेशन्स व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्यासाठी तांत्रिक किंवा शास्त्र शाखेतील पदवीधर असायची गरज असतेच असे नाही. उदाहरणार्थ, आदरातिथ्य व्यवस्थापन, रुग्णालय व्यवस्थापन, विमान कंपन्यातील प्रवाशांचे व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन इत्यादी. तथापि सेवा क्षेत्रातील कार्य व्यवस्थापनासाठी अनुभवाबरोबर त्या त्या सेवा क्षेत्रातील विशेष पदविका/ पदवी असल्यास जास्त फायदा होतो. कार्य व्यवस्थापनामध्ये आता संगणक प्रणालींचा मोठा सहभाग आहे. माहिती गोळा करून त्याचे स्वयंचलित पद्धतीने विश्लेषण करून या प्रणाली त्वरित निर्णय घेण्यासाठी विविध दृष्टिकोन आपल्याला दाखवितात. त्यामुळेच कार्य व्यवस्थापनाशी निगडित संगणक प्रणालींचे शिक्षण घेणे अत्यावश्यक ठरते.

नोकरीच्या संधी – सामान्यत: कार्य व्यवस्थापन क्षेत्रात खालच्या स्तरापासून नोकरीची सुरुवात करावी लागते. जसजसा अनुभव व कौशल्य वाढत जाईल तशीतशी जबाबदारीच्या पदांवर बढती मिळते. सर्व अभियांत्रिकी किंवा शास्त्र शाखेशी संबंधित उत्पादन/ सेवा कंपन्यांमध्ये कार्य व्यवस्थापनाच्या भरपूर संधी आहेत. गेल्या दशकापासून सुरू झालेल्या सेवा क्षेत्राच्या वाढीपासून कार्य व्यवस्थापन क्षेत्रातील नोकरीच्या संधीसुद्धा अनेक पटींनी वाढल्या आहेत. खरे तर कार्य व्यवस्थापनाच्या वर दिलेल्या प्रत्येक कार्याबद्दल व त्यातील संधींबद्दल सखोल लिहिता येईल; परंतु विस्तारभयास्तव आता इतकेच पुरे. कार्य व्यवस्थापनामध्ये केवळ १०% ते २०% यंत्रांशी संबंध येतो; बाकी सर्व काम सहकारी कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यायचे असते. त्यामुळे तुमच्याकडे सद्य परिस्थितीच्या त्वरित आकलनाची व उत्तम विश्लेषणात्मक निर्णयक्षमता, उत्तम संवाद आणि नेतृत्वगुण, अडचणींवर मात करावयाची वृत्ती, प्रामाणिकपणा व नवनवीन ज्ञान प्राप्त करावयाची इच्छा असेल तर तुम्हीही कार्य व्यवस्थापनामध्ये एक छान करिअर करू शकता.

dr.jayant.panse@gmail.com