मी इंजिनीअरिंग केलं आहे. पण त्यात मला फारशी रुची नाही.मला व्यवसाय करायचा आहे. मी एमबीए करू की आणखी दुसरा अभ्यासक्रम करू? मला संगणक क्षेत्रातही रस आहे. – धीरज पारवे

धीरज, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे की इतरांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन (एमबीए)? जर एमबीए करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत घेतली जाणारी एमएच-सीईटी परीक्षा द्यावी लागेल. त्यात उत्तम गुण मिळाल्यासच नामवंत व दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. कारण अशा संस्थांतून मिळवलेल्या पदव्याच चांगल्या  करिअरची संधी मिळवून देतात. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमार्फत घेण्यात येणारी कॅट, झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी झेविअर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (झ्ॉट), नरसी मोनाजी मॅनेजमेंट या संस्थेसाठी घेतली जाणारी एनमॅट (नरसी मोनाजी अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट), सिम्बॉयसिस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आदी परीक्षा देऊन देशातील नामवंत शासकीय आणि खासगी व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. तुम्हाला यावर लक्ष केंद्रित करायचे आहे की संगणकाच्या कामावर, हे ठरवावे लागेल. संगणकीय ज्ञानाच्या विविध पैलू आणि विषयांशी निगडित वेगवेगळ्या कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम सी-डॅक या संस्थेने सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम तुमची संगणकावर काम करण्याची आवड भागवू शकतात. शिवाय यात प्रावीण्य प्राप्त केल्यास चांगले करिअर शक्य होऊ  शकते. संपर्क- http://cdac.in/index.aspx?id=edu_acts_pgdadmissionbooklet

मी कला शाखेत पदवी मिळवली आहे. पण मला नोकरी करण्याची इच्छा नाही. मला उद्योजक  व्हायचे आहे. त्याकरिता शासनाच्या काही योजना आहेत का?      – बापूकाका विठ्ठलराव आहेर, आहेरखेडे, ता. चांदवड, जिल्हा- नाशिक

प्रत्येक जिल्ह्य़ाच्या मुख्यालयात जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना शासनाने केली आहे. या केंद्रांद्वारे शासनाच्या साहाय्याने उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, तसेच सल्लाही दिला जातो. पंतप्रधान रोजगार योजनेची अंमलबजावणी याच केंद्रामार्फत केली जाते. या संदर्भातील माहिती http://dcmsme.gov.in/schemes/pmry.html  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एम.पी.एस्सी.मार्फत घेतल्या जाणाऱ्या साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेला मेकॅनिकलमधून बीई केलेला विद्यार्थी बसू शकतो का? या परीक्षेसाठी अर्हता व अटी काय आहेत?    –  राहुल धनावडे

या परीक्षेला मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल विषयातील पदविकाधारक बसू शकतात. वयोमर्यादा किमान १९ आणि कमाल ३३ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट आहे. इच्छुक उमेदवाराकडे मोटारसायकल, हलके मोटार वाहन, जड वाहतूक वाहन, जडप्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचे कायमस्वरूपी लायसन्स या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी असणे आवश्यक आहे. हे लायसन्स अखंडितरीत्या प्राप्त केलेले असावे. ते नसल्यास त्याला ते परीक्षेच्या काळात प्राप्त करावे लागेल. उमेदवाराला रातांधळेपण नसावे. चष्म्याशिवाय किंवा चष्म्यासोबत चांगली दृष्टी असावी.

मी बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षांला आहे. पुढे  काय करू? आयबीपीएस परीक्षा देऊ  शकतो? की इतर काही कोर्स करू?     – केतन अहिरे

तुमच्यासाठी एम.कॉम.चा पर्याय आहे. त्यानंतर एम.फिल., पीएच.डी. करून अध्यापनाच्या क्षेत्रात जाता येईल. कॉमर्समधल्या संकल्पना स्वयंस्पष्ट झाल्या असतील आणि त्याचा उपयोग करण्यात प्रावीण्य मिळवले असेल तर अकाऊंटंट म्हणून चांगल्या संधी मिळू शकतात. आयबीपीएएस (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन)तर्फे घेण्यात येणारी लिपिक संवर्गीय किंवा प्रोबेशनरी ऑफिसर्स परीक्षा तसेच स्टेट बँक इंडियाची लिपिक संवर्गीय किंवा प्रोबेशनरी ऑफिसर्स तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा तुम्हाला देता येतील. राज्यसेवा आणि नागरी सेवा परीक्षासुद्धा पदवी प्राप्त केल्यानंतर देता येईल. एम.बी.ए. करून फायनान्स/ सेल्स / मार्केटिंग/ ह्य़ुमन रिसोर्स या क्षेत्रांत तुम्ही करिअर करू शकता. उत्तम करिअरची संधी मिळावी यासाठी संवादकौशल्य, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, संगणकीय कौशल्य वाढवण्याकडे लक्ष द्यावे.

मी बी.डी.एस.च्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. या पदवीनंतर एम.डी.एस. सोडून आणखी काय करता येईल? – पवन शिंदे

तुम्हाला नेमका कशामध्ये रस आणि आवड आहे यावर करिअरच्या संधी अवलंबून असतील. तुम्ही सीईटी देऊन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकता. हेल्थ केअर मॅनेजमेंटचे मोठे  क्षेत्र याद्वारे उपलब्ध होऊ  शकते. बँकिंग क्षेत्रात प्रोबेशनरी ऑफिसर्सचे करिअरही करता येईल. राज्य आणि नागरी सेवा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्यांचे पर्याय उपलब्ध होऊ  शकतात. भाषेवर प्रभुत्व असल्यास पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करता येऊ  शकते. पण मुळात उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असलेल्या दंतवैद्यकीय क्षेत्राचा चार वर्षे अभ्यास केल्यानंतरही हे क्षेत्र  आपल्याला का सोडावेसे वाटते, याचा नीट विचार करायला हवा, असे वाटते.

मी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये तंत्रज्ञ म्हणून जानेवारी २०१६ मध्ये रुजू झालो आहे. मी आयटीआय इलेक्ट्रॉनिक्समध्ये केले आहे. माझे शिक्षण एम.एस्सी-सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग झाले आहे. मला नॅशनल थर्मल पॉवर सेंटरमध्ये काम करण्याची इच्छा आहे. – अनुप पंडित

नॅशनल थर्मल पॉवर सेंटरच्या पदभरतीची विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यासाठी वेळोवेळी जाहिरातही दिली जाते.  यात लेखी व तोंडी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स विषयात बी.ई. झालेल्या उमेदवारांना गेट २०१६च्या गुणांवर नुकतेच एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स या अर्हतेची पदे सध्या तरी दिसत नाहीत. संपर्क-http://www.ntpccareers.net/

सुरेश वांदिले