यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये ‘भारतीय समाजाचे वर्तमान प्रश्न’ (Current Issues In India) या अभ्यासघटकाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या घटकांतर्गत वर्तमान भारतीय समाजाची मूलभूत वैशिष्टय़े, सामाजिक विविधता, स्त्रियांचे आजचे प्रश्न, लोकसंख्या, दारिद्रय़ आणि विकासाच्या आंतरविरोधातून उद्भवणारे मुद्दे, नागरीकरणातील समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजाच्या विविध अंगांवर होणारे परिणाम, सामाजिक सक्षमीकरणाचे मुद्दे तसेच जमातवाद, प्रदेशवाद आणि धर्मनिरपेक्षतेसंबंधीच्या मुद्दय़ांचा समावेश केलेला दिसून येतो. या अभ्यासघटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांवरही यूपीएससीने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेले दिसून येतात. मागील काही वर्षांत ६२ गुणांपासून ते ७५ गुणांपर्यंत प्रश्न विचारले गेले आहेत. प्रश्नांचे स्वरूप पाहता यूपीएससीने सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये कमीतकमी ५ ते ६ प्रश्न या अभ्यासघटकांवर सातत्याने विचारलेले आहेत.

आजपर्यंत मुख्य परीक्षेत कुटुंब पद्धती, जाती, लिंगभाव, जागतिकीकरण, धर्मनिरपेक्षता, प्रदेशवाद, दारिद्रय़ यांच्या विविध आयामांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रस्तुत लेखात ‘भारतातील कुटुंबसंस्था आणि तिचे वर्तमानकालीन स्थान’ याचा थोडक्यात ऊहापोह या लेखात केलेला आहे. या घटकाचा अभ्यास करताना कुटुंबरचना ही एक ‘सामाजिक संस्था’ आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते काय प्रकारचे राहिले आहे, याही बाबी सर्वप्रथम ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या जोडीने समजून घ्यावी लागते. परंतु त्यासोबत जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक आर्थिक प्रवाहाच्या प्रभावातून कुटुंबरचनेत काय प्रकारचे बदल होत आहेत याचाही विचार करावा लागतो.

मुख्य परीक्षेच्या दृष्टीने विचार करू पाहता, मागील दोन वर्षांपूर्वी मुख्य परीक्षेत पुढील प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता – ‘संयुक्त कुटुंबाची जीवनशैली सामाजिक मूल्याऐवजी आर्थिक चलघटकांवर अवलंबून आहे, यावर चर्चा करा.’ या प्रश्नाची मुळं शोधण्यासाठी शहरीकरण व औद्योगिकीकरण अंतर्भूत असलेली आर्थिक प्रक्रिया नीट समजून घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूला वर म्हटल्याप्रमाणे मुद्दे कितीही जुने असले तरीही त्या मुद्दय़ांचे वर्तमानातील स्थान काय आहे आणि त्याची चिकित्सा यावर यूपीएससी भर देताना दिसते.

भारतीय समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान समाज राहिलेला आहे. खेडे ही त्याची पृष्ठभूमी राहिलेली आहे. संयुक्त कुटुंबाला जात-वर्गीय संरचनेचासुद्धा आधार होता. संयुक्त कुटुंबे प्रामुख्याने पितृसत्तात्मक राहिलेली आहेत. कमीतकमी तीन पिढय़ांचे त्यात अस्तित्व दिसून येते. वंशवेल, खानदान, पितृसत्ता आणि सामाजिक दर्जा या सामाजिक मूल्यांसाठी संयुक्त कुटुंबरचना महत्त्वाची मानली जात होती.

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या धोरणाने रोजगाराचे आणि उत्पन्नाचे अन्य पर्याय समोर आले. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचे धोरण कायम राहिल्याने संयुक्त कुटुंबरचनेत मोठा बदल घडून येत गेला. रोजगार, शिक्षण तसेच जातव्यवस्थेतील वैगुण्यामुळे खेडय़ातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. अशा परिस्थितीत संयुक्त कुटुंबरचेनेचे आधार आणि गुणवैशिष्टय़ांमध्ये बदल घडून आले. थोडक्यात, सामाजिक मूल्याऐवजी संयुक्त कुटुंबावर आर्थिक घटक प्रभाव टाकू लागले.

जागतिकीकरणाच्या रेटय़ातून कुटुंबे वर्तमान बाजारव्यवस्थेचे ग्राहक या भूमिकेत उतरू लागली. वाढत्या गरजांमधून अधिक अर्थार्जन कमावण्याकडे कल वाढू लागला. त्यातून आपण आणि आपली मुले याव्यतिरिक्त घरात इतर माणसांचा वावर नकोसा वाटू लागतो. त्यातूनही संयुक्त कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. व्यक्तीचे झालेले वस्तुकरण कुटुंबरचनेत बदल घडवून आणते. त्यामुळे चंगळवादाने कुटुंबसंस्थेवर काय प्रकारचे परिणाम केले याचीही उत्तरे मिळवणे आवश्यक आहे.

संयुक्त कुटुंबरचनेकडून विभक्त कुटुंबरचनेकडे झालेल्या स्थित्यंतरातून अनेक मुद्दे निर्माण झाले. विभक्त कुटुंबात आई-वडील दोघे नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने लहान मुलांचा सांभाळ ही मोठी जिकिरीची समस्या बनली. त्यातून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न निर्माण झाला. शहरांमध्ये पाळणाघरे तयार झाली. त्यामुळे शहरीकरण आणि विभक्त कुटुंबे यांच्या आंतरसंबंधावर यूपीएससीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

दुसरी समस्या म्हणजे निवाऱ्याची जागा मर्यादित असल्याने आणि कुटुंबाचा खर्च वाढण्यातून घरातील वृद्धांचे राहणीमान प्रभावित झाले. त्यातून समाजामध्ये त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे उदयाला आली. या धर्तीवर वृद्धांची हेळसांड थांबवण्यासाठी सरकारने कोणती धोरणे आखली आहेत याचाही विचार अभ्यसामध्ये करावा लागेल.

कुटुंबसंस्थेच्या संक्रमणातून जनरेशन गॅप नावाची समस्या समोर आली. मने जुळत नाहीत, धारणा एकसारख्या राहत नाहीत, दृष्टिकोनामध्ये फरक पडत जातो अशी विविध लक्षणे असलेल्या जनरेशन गॅपचा अर्थ लावणे, ती निर्माण होण्याचे आधार तपासणे तसेच या जनरेशन गॅपची कारणे आणि परिणाम याचाही अभ्यास अनिवार्य ठरतो.

वर्तमान कुटुंबसंस्थेचा परिचय करून घेण्यासाठी कुटुंबपद्धतीचे पायाभूत घटक आणि तिची गुणवैशिष्टय़े काय होती आणि त्यात वेळोवेळी कसा फरक पडत गेला, तसेच त्यात कोणते बदल घडून आले, बदलास जबाबदार असणारी प्रक्रिया आणि चलघटक कोणते आहेत यालाही स्पर्श करावा लागेल. त्या दृष्टीने किमान पातळीवर संकल्पनात्मक अभ्यास एनसीईआरटीच्या इयत्ता १२ वी समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातून करता येऊ शकतो. ती मुख्यत ‘इंडियन सोसायटी’ आणि ‘सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया’ या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्या पुढे जाऊन वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून संदर्भ पाहावे लागतील, तरच वर्तमान कुटुंबपद्धतीचे बदललेले संदर्भ आणि तिचे समग्र चित्र समोर येऊ शकेल.

चंपत बोड्डेवार