केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. लोकसेवा आयोगाने जाणीवपूर्वक या टप्प्यास व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. स्वाभाविकच नागरी सेवापद प्राप्त करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक पूरक व पोषक क्षमता आहेत अथवा नाहीत याची चाचपणी याद्वारे केली जाते. २७५ गुणांसाठी असलेला हा टप्पा अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरतो. कित्येकदा अंतिम यादीतील स्थान मुलाखतीत मिळालेल्या गुणांवरच निर्धारित होते. म्हणूनच प्रत्येक उमेदवाराने व्यक्तिमत्त्व चाचणीचा अर्थ लक्षात घेऊन त्याची प्रभावी तयारी करणे क्रमप्राप्त ठरते.

व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारा नागरी सेवापदासाठी आवश्यक क्षमतांची चाचपणी केली जाते. यात उमेदवाराच्या शैक्षणिक आणि शिक्षणबाह्य अशा दोन्ही आयामांना महत्त्व दिले जाते. म्हणजेच व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. तज्ज्ञ व निष्पक्ष मुलाखत मंडळाद्वारा उमेदवारांची व्यक्तिगत सुयोग्यता जोखणे हा मुलाखतीमागील मुख्य उद्देश असतो. व्यापक अर्थाने उमेदवाराचा सामाजिक कल, वर्तमान घडामोडीविषयक भान व समज, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दृष्टीतील सकारात्मकता व आशावाद, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता, नेतृत्वगुण, बौद्धिक व नतिक बांधीलकी इ. गुणवैशिष्टय़ांची चाचपणी केली जाते.

अर्थात, मुलाखत ही प्राय: तुमच्या ज्ञानाची कसोटी पाहणारी परीक्षा नसते. पूर्व व मुख्य परीक्षेद्वारा विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासलेले असते. मुलाखत मंडळाद्वारे विचारले जाणारे काहीच (फारच कमी) प्रश्न तथ्थाधारित (फॅक्च्युअल) व माहितीप्रधान असतात. मंडळास रस असतो तो मुख्यत: उमेदवाराचा एखादय़ा बाबीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जाणून घेण्यात. मुलाखतीतील बहुतांश प्रश्न उमेदवाराचा दृष्टिकोन, भूमिका, उपायात्मक विचार करण्याची क्षमता तपासणारेच असतात.

त्यामुळे मुलाखतीत विचारलेल्या किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली यापेक्षा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य माहिती व आकलनावर आधारित, नेमकी आणि संतुलित स्वरूपाची असणे महत्त्वाचे ठरते. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास वा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यास, तसे सांगण्याची उमेदवाराची प्रामाणिक वृत्ती मुलाखत मंडळाला अभिप्रेत असते.

व्यक्तिमत्त्व चाचणीत उमेदवाराच्या विविध क्षमतांचे मूल्यमापन केले जाते. त्यातील मध्यवर्ती क्षमता म्हणजे महत्त्वाच्या बाबीविषयी स्वत:चे मत मांडण्याची क्षमता. आपल्या भोवताली घडणाऱ्या महत्त्वपूर्ण कळीच्या मुद्दय़ांविषयी उमेदवाराचे स्वत:चे मत असणे अत्यावश्यक ठरते. दुसरी बाब म्हणजे त्याची उलट तपासणी करणारे प्रश्न मुलाखत मंडळाने विचारल्यास आपल्या मताच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण देण्याची क्षमतादेखील उमेदवारामध्ये असणे महत्त्वपूर्ण ठरते. अर्थात प्रस्तुत मत टोकाचे अथवा अतिरेकी स्वरूपाचे असणार नाही याची खात्री बाळगावी. त्यामुळे एखाद्या विषयासंबंधी सविस्तर विचार करूनच आपले मत विकसित करणे अत्यावश्यक ठरते.

उमेदवाराकडून अपेक्षित दुसरी महत्त्वाची क्षमता म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता होय. प्रशासकीय सेवकास विविध स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे मुलाखतीतील काही प्रश्न उमेदवाराकडे प्राप्त परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा नाही याची चाचपणी करणारे असतात. मुलाखत मंडळ कित्येकदा जाणीवपूर्वक परिस्थितीजन्य प्रश्न विचारून निर्णय क्षमतेची पडताळणी करत असतात.

त्याचप्रमाणे अपरिचित अशा मुलाखत मंडळासमोर उमेदवार किती स्वाभाविकपणे आणि आत्मविश्वासपूर्वक स्वत:चे व्यक्तिमत्त्व सादर करतो यावर व्यक्तिमत्त्व चाचणीतील गुण अवलंबून असतात. मुलाखत मंडळाबरोबर होणारा संवाद हा स्वाभाविक, नसíगक अशा स्वरूपाचा असला पाहिजे. प्रश्नांची उत्तरे तयार करून, पाठांतर केलेली आहेत अशा रीतीने मांडली जाऊ नयेत. त्यासाठी मंडळाने प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंदांचा विराम घेऊन, विचार करून उत्तर देण्यास सुरुवात करावी. विचारलेला प्रश्न भलेही माहिती असला तरीही काही सेकंदांचा विराम घेतच विचारपूर्वक उत्तर दय़ावे. अन्यथा मुलाखत यांत्रिक होण्याचीच शक्यता असते. आत्मविश्वास हा मुलाखतीतील आधारभूत घटक आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. उमेदवाराच्या तयारीचे स्वरूप; आकलन व विचारातील स्पष्टता, त्याविषयक उमेदवारास वाटणारी खात्री; परिणामी मुलाखत मंडळासमोर आपले मत मांडण्याचा आलेला निर्भीडपणा आणि संवादातील प्रभावीपणा (औपचारिक संतुलित भाषा, आवाजाची योग्य पातळी, मंडळातील सर्वाना संबोधित करत सर्वाना संवादात सामावून घेणारी दृष्टी  इ.)या घटकांआधारे उमेदवाराचा आत्मविश्वास निर्धारित व आविष्कृत होत असतो. एकंदर विचार करता, मुलाखतीतील सर्व घटक-उपघटकांची प्रभावी तयारी आणि संवादाचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीस अत्यावश्यक क्षमतांचा विकास साधता येतो.