मानव संसाधन विकासासाठी शिक्षण ही एक महत्त्वाची पायरी आहे. एमपीएससीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले असता या घटकाशी संबंधित चालू घडामोडींबाबत विश्लेषणात्मक आणि बहुविध अंगानी प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे याबाबत नेमका व मुद्देसूद अभ्यास आवश्यक ठरतो. त्या दृष्टीने राज्य मुक्त विद्यालयाबाबत आवश्यक मुद्दे येथे देण्यात येत आहेत.

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून National Institute for Open Schooling NIOS  ही स्वतंत्र संस्था सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. ठकडर ची केंद्रे भारत, नेपाळ व मध्यपूर्वेतील देशांमध्ये आहेत. ठकडर च्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावरील मुक्त विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय जुलै २०१७ मध्ये घेण्यात आला आहे. हे राज्य मुक्त विद्यालय मंडळ राज्यमंडळाचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय योजनेत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यांचा समावेश असेल. शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधीसाठीही या परीक्षांनी पात्रता मिळेल.

 मुक्त विद्यालयाची उद्दिष्टय़े :

* औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती सुरू करणे.

* शालेय शिक्षणातील गळती आणि अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.

* शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वाना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.

* जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे.

*  सुशिक्षित आणि जागरूक नागरिक बनविणे.

* स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

* दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

 मुक्त विद्यालयासाठी प्रवेश पात्रता/ विषय योजना-

अ)प्राथमिक स्तर – इयत्ता पाचवी.

उमेदवाराचे वय १० वर्षे पूर्ण असावे.

प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा, परिसर अभ्यास, गणित हे पाच विषय.

ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता आठवी

१)उमेदवाराचे वय १३ वर्षे पूर्ण असावे.

२)दोन भाषा विषय आणि सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, National Skill Qualification Framework (NSQF) व्यवसाय / कौशल्य विकास विषय यातील ३ असे ५ विषय.

३)दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषयांची तरतूद.

क) माध्यमिक स्तर – इयत्ता दहावी

१) नोंदणी करताना उमेदवाराचे वय १५ वर्षे पूर्ण असावे.

२) उमेदवार किमान पाचवी उत्तीर्ण व किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

३) दोन अनिवार्य भाषा विषय, शालेय वैकल्पिक विषय तसेच पूर्व व्यावसायिक विषय यांपकी ३ असे एकूण ५ विषय.

ड) उच्च माध्यमिक स्तर – बारावी

१) उमेदवारांचे वय १७ वर्षे पूर्ण असावे.

२) उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची इ. १०वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

३) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य परीक्षा मंडळाची इ. १० वी उत्तीर्ण असल्यास किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

४) दोन अनिवार्य भाषा विषय आणि कला/वाणिज्य/विज्ञान शाखेपकी कोणत्याही एका शाखेचे कोणतेही ३ विषय असे ५ विषय.

इतर महत्त्वाच्या तरतुदी

* योजनेमध्ये नोंदणीसाठी कमाल वयाची अट नाही.

* महाराष्ट्र राज्य मुक्तशाळेचे माध्यम मराठी, िहदी, इंग्रजी व उर्दू राहील.

* सर्व स्तरावरील सर्व विषय १०० गुणांसाठी असतील व यामध्ये लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्हीचा समावेश असेल.

* सर्व विषयांची परीक्षा एकाच वेळी देण्याचे बंधन असणार नाही. पाच वर्षांत एकूण नऊ परीक्षांना हव्या त्या विषयांची परीक्षा देता येईल.

* दरवर्षी एप्रिल व नोव्हेंबर असे वर्षांतून दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

* अभ्यासक्रमातील विविध विषयांसाठी अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय पुस्तिका सोडवणे आवश्यक राहील.

मुक्त विद्यालयाची वैशिष्टय़े

* सोयीनुसार अध्ययनाची सवलत.

* अभ्यासक्रमाची लवचीकता.

* व्यावसायिक विषयांची उपलब्धता.

* संचित मूल्यांकनाची व्यवस्था.

* सर्वासाठी शिक्षणाची व्यवस्था.

* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था.

फारूक नाईकवाडे