महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०१७ च्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर २०१७ ला घेण्यात येणार आहे. पुढील दोन अंकांत आपण वन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे आखता येईल ते पाहू.

*   मुख्य परीक्षेचे स्वरूप

*   मुख्य परीक्षा – ४००गुण

*   प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन

१. सामान्य अध्ययन

२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

वन सेवा मुख्य परीक्षेतील पेपर २ ची विभागणी आयोगाने वरीलप्रमाणे दोन घटकांत केलेली आहे.

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक १

सामान्य अध्ययन

१.     भारताचा इतिहास, महाराष्ट्रावर अधिक भर

२.     देशाचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, महाराष्ट्रावर अधिक भर.

३.     भारतीय राज्यसंस्था व शासन, घटना आणि राजकीय प्रणाली, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था.

४.     आर्थिक आणि सामाजिक विकास

पेपर क्रमांक २

सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

मुख्य परीक्षा पेपर क्र. २चे माध्यम केवळ इंग्रजी असते याची नोंद परीक्षार्थीनी घ्यावी.

१.     सामान्य विज्ञान (जनरल सायन्स)

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र

२.     निसर्ग संवर्धन (नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन) –

२.१ मृदा – मृदेचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैवशास्त्रीय गुणधर्म. प्रक्रिया आणि माती निर्मितीचे घटक, मृदेच्या उत्पादकतेत त्यांची भूमिका, मातीचे प्रकार, मातीसंबंधित समस्या आणि त्यात सुधारणा.

माती आणि ओलावा टिकणे – जमिनीची धूप होण्याची कारणे, नियंत्रणाची पद्धत. वनांची भूमिका, पाणलोट व्यवस्थापन वैशिष्टय़े आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी उचलावी लागणारी पावले.

२.२ पर्यावरणीय व्यवस्था –  प्रकार, अन्नसाखळी, अन्नजाळी, पर्यावरणीय पिरॅमिड, ऊर्जेचा प्रवाह, कार्बन आणि नायट्रोजनचे जैवरासायनिक चक्र

खते – सेंद्रिय आणि रासायनिक

वनस्पती आणि प्राण्यांचे आजार.

कीटकनाशके इजा होऊ शकतील अशा वनस्पती आणि तण.

२.३ पर्यावरणीय प्रदूषण – प्रकार, नियंत्रण, निर्देशक आणि धोक्यात आलेल्या प्रजाती. उत्खनन आणि खाणकामासंबंधित पर्यावरणीय       समस्या. ग्रीनहाउस इफेक्ट, कार्बन ट्रेिडग, पर्यावरणीय बदल.

२.४ देशातील महत्त्वाची जंगली श्वापदे –  गुरांच्या जाती, चारा आणि गवताळ प्रदेश  व्यवस्थापन, कुरणांचे अर्थशास्त्र.

२.५ देशातील महत्त्वाच्या स्थानिक वृक्षांच्या जाती, विदेशी वनस्पती, वनस्पती-उत्पादनांचा  स्रोत. उदा. अन्न, फायबर, जळाऊ लाकूड, इमारतीसाठीचे लाकूड इत्यादी, वनउत्पादन, औषधी वनस्पती, ऊर्जा लागवड, खारफुटी, वनआधारित उद्योग.

वनस्पतीच्या वाढीवर आणि वितरणावर परिणाम करणारे घटक. भारतातील वनांचे प्रकार.

२.६ राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये, जागतिक वारसा वास्तू.

सामाजिक वनीकरण, वन व्यवस्थापन, शेती वनीकरण.

भारतीय वन धोरण, भारतीय वन कायदा, वन्य जीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा. १९८०.

निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था.

२.७ हवाई छायाचित्रे, कल्पनात्मक नकाशे, उपग्रह चित्रे यांचा वापर. ‘जीआयएस’चे तत्त्व आणि उपयोजन.

जैवविविधता, जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे, जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्व. वनस्पती प्रजनन, उती, आदिवासी आणि वने, देशातील महत्त्वाच्या जमाती.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नजरेखालून घातल्यास दिसून येते की, पेपर क्रमांक १ या सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणा, जगाचा आणि भारताचा (त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा) प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारतीय राज्यघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था, देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकांवर आयोगाने भर दिला आहे.

पेपर क्रमांक २ (सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन) चा अभ्यासक्रम हा साहाय्यक वनसंरक्षक-  गट अ ( ACF) व वनक्षेत्रपाल- गट ब (RFO) या पदांना पूरक असा निर्माण करण्यात आला आहे. या पदांवर कार्य करताना आवश्यक असणारे ज्ञान व कायद्याच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय यांचा योग्य समन्वय पेपर क्र. २ मध्ये साधण्यात आला आहे.

पुढील अंकात आपण २०१४ व २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करू व त्यातील उपघटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे मुद्देसूद विवेचन करू.