आपल्याकडे ऑनलाइन अभ्यासक्रमांना आजही म्हणावी तितकी समाजमान्यता लाभलेली नाही. मात्र, नजिकच्या भविष्यात संस्थेत उपलब्ध असलेल्या प्रवेशजागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ऑनलाइन अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढणार, हे नक्की. ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या बदलत्या स्वरूपाविषयी..
अर्थार्जनाची निकड असल्याने पदवीनंतर लगेचच नोकरीची संधी चालून आली की मनात असूनही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमानंतर पुढे आणखी काही स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम शिकण्याचा कित्येकांचा कल कमी होतो. वेळेच्या अभावी नियमित अभ्यासक्रमांना ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांकरता ऑनलाइन अभ्यासक्रम सोयीस्कर ठरतात.
नियमित अभ्यासक्रमांपेक्षा ऑनलाइन अभ्यासक्रमांचा दर्जा काहीसा कमी असतो, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. हे लक्षात घ्यायला हवे की, नजीकच्या भविष्यात ऑनलाइन अभ्यासक्रमांचे प्रस्थ वाढणार असून या अभ्यासक्रमांमुळे शिक्षण क्षेत्राचा पुरता कायापालट होत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांमुळे कुणालाही शिकणं सहजशक्य बनलं आहे. वाजवी शुल्कात प्रवेश घेता येईल असे हे ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी नीट पूर्ण केले तर त्यांच्या शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होऊ शकतो. त्याखेरीज ऑनलाइन अभ्यासक्रमांचे शिकवणी शुल्क नियमित अभ्यासक्रमांच्या तुलनेत वाजवी असते. परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये अशा तऱ्हेचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध असतात.
आज ऑनलाइन अभ्यासक्रम आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमधील तफावत वेगाने नाहीशी होताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे आज नोकरी देऊ करणाऱ्या कंपनीला तुम्ही कसे आणि कुठे शिक्षण घेतले यापेक्षा तुम्हाला त्या विद्याशाखेतील अद्ययावत माहिती व ज्ञान किती आहे हे पडताळून पाहणे महत्त्वाचे वाटते.
खरे पाहता, आज ऑनलाइन अभ्यासक्रमांपुढील मुख्य आव्हान म्हणजे परीक्षेचा आणि गुणांकन पद्धतीचा स्तर उंचावणे आणि कॅम्पस शिक्षणापेक्षा ऑनलाइन अभ्यासक्रमांचा दर्जा नगण्य नाही हे सिद्ध करणे.
ऑनलाइन अभ्यासक्रमांचे विविध पर्याय असतात. त्यात पूर्णत: ऑनलाइन आणि मिश्र अथवा संकरित स्वरूपाचे ऑनलाइन अभ्यासक्रम असे दोन प्रकार येतात. पहिल्या प्रकारात विद्यार्थी-प्राध्यापकाची भेट होत नाही, तर दुसऱ्या प्रकारात विद्यार्थी सत्राच्या विशिष्ट वेळी कॅम्पसमध्ये उपस्थित राहतो. अशा अभ्यासक्रमांची वैधता आणि कायदेशीर बाबी यांचा प्रश्न येत नाही, याचे कारण विद्यार्थ्यांला कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
शिक्षण पूर्णत: ऑनलाइन घ्यावे की मिश्र स्वरूपात, हा मुद्दा निकालात निघाला की ते सिन्क्रोनाइज्ड असावे की सिन्क्रोनाइज्ड नसावे हा मुद्दा लक्षात घ्यावा. जर तो ऑनलाइन अभ्यासक्रम सिन्क्रोनाइज्ड नसेल तर त्या अभ्यासक्रमात आधीच रेकॉर्ड केलेली लेक्चर्स असतात, ज्यात व्हॉइस ओव्हर पॉवर पॉइंट स्लाइड्स असू शकतात किंवा यू टय़ुबवरील व्हिडीओज असू शकतात (उदा. खान अ‍ॅकेडमी) किंवा प्रेझेन्टेशन.
मेसेज बोर्डस्, ई-मेल यांद्वारे विद्यार्थी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करू शकतात. मात्र,  सिन्क्रोनाइज्ड ऑनलाइन अभ्यासक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापक एकाच वेळी ऑनलाइन असू शकतात. प्राध्यापकांना लिहिण्यासाठी व्हाइट बोर्ड आणि फाइल्स शेअर करण्याची क्षमता देण्यात आलेली असते. प्राध्यापक जे सांगतात, ते विद्यार्थ्यांना ऐकू येते आणि त्यानुसार विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधणे शक्य होते.
ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे अथवा अध्यापन करणे या दोन्ही गोष्टी आनंददायक ठरू शकतात. या व्याख्यानांचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ही सारी लेक्चर्स ऑनलाइन असतात. त्यामुळे हवी असतील तेव्हा ती पुन्हा ऐकणे शक्य असते. मात्र, ऑनलाइन अभ्यासक्रमात वर्गाचा माहोल, मित्र जमवणे कठीण होऊन बसते, ही या शिक्षण प्रक्रियेतील एक त्रुटी आहे.
साधारणपणे ऑनलाइन लेक्चर हे २०-२० मिनिटांच्या क्लिप्समध्ये विभागलेले असते. विद्यार्थी लेक्चर ऐकतात, त्यानंतर त्यांचा गृहपाठ करतात आणि नंतर ऑनलाइनरीत्या पुन्हा काही तासांसाठी क्लासमध्ये येतात. मात्र, ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या या स्वरूपात कालौघात  खूप बदल होत गेले.. ते बदल म्हणजे काही अभ्यासक्रमांत आठवडय़ातून एकदा तीन तासांचे लेक्चर ऐकायला येणे, शिक्षक शिकवत असताना ऐकणे अथवा तीन तासांचे लेक्चर रेकॉर्ड करून ऐकणे. अलीकडे २० मिनिटांची रेकॉर्डेड लेक्चर्स होतात, गृहपाठ होतो, या वेळी ऑनलाइन क्लासचा वेळ एक तास इतका कमी करण्यात आला, ज्या वेळात विद्यार्थी त्यांच्या साऱ्या शंकांचे निरसन करून घेतात.
समाजमान्यता मिळण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमांना आपल्या देशात अद्याप मोठा टप्पा पार करायचा आहे. संस्थेत उपलब्ध असलेल्या प्रवेशजागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ऑनलाइन अभ्यासक्रमांचे उपयोजन वाढणार, हे नक्की. यामुळे अस्तित्वात असलेल्या शिक्षण संस्थांवरही अधिक भार येणार नाही.
ऑनलाइन शिक्षण हा आपल्याकडच्या पायाभूत सुविधांच्या अभावावरही उपयुक्त ठरणारा मार्ग आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये अनेक संभाव्य शक्यता दडलेल्या आहेत. त्याकरता या अभ्यासक्रमांच्या मार्गातील अडथळे दूर करत विद्यार्थी, कंपन्या आणि सरकार यांनी आपापल्या स्तरावर प्रतिसाद द्यायला हवा.
– अपर्णा राणे