सगळाच विरोधाभास होता त्या दिवशी, सगळय़ाच गोष्टींमध्ये! म्हणजे बघा ना! इतका काळ वाट पाहिल्यानंतर सीरियलमधला तो आनंदाचा क्षण पुढे येऊन ठाकला होता; पण सेटवरच्या वातावरणातला आनंद बाकी सरलाच होता. स्क्रिप्टमधल्या शब्दांमागे लेखिकेने लगबग दाखवलेली होती; पण आम्हा सर्वाच्या कॅमेऱ्यामागच्या हालचाली जरा मंदावल्याच होत्या त्या दिवशी, वातावरण उदास वाटत होतं. कुणी गप्पा मारण्याच्या मन:स्थितीत नव्हतं; पण संवाद साधण्याची सातत्याने धडपड होती प्रत्येकाची. इतर वेळी ‘पॅक अप्’ शब्द ऐकता क्षणी भराभरा घराच्या दिशेने निघणारी पावलं त्या दिवशी मात्र अडीच वर्षांच्या आठवणींमध्ये रेंगाळली होती.

अडीच र्वष.. बाप रे! कसा काळ सरत गेला कळलंच नाही. या काळात मी तुमच्याशी जान्हवीच्या रूपातून बोलत होते. तुम्ही रोज आठ वाजता तिला पाहत होतात आणि आठ ते साडेआठ हा अर्धा तास दिसण्यासाठी मी मात्र रोजच्या दिवसाचे तेरा तास ‘ती’ बनून जगत होते. तुमच्यासारखीच माझ्याही आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती ती. तुमची ‘जान्हवी’, माझी ‘सर्वात लाडकी’ कलाकृती होती आणि अर्थात तिला घडवण्यासाठी खूप जणांची मेहनत होती, तिचा चेहरा जरी माझा असला तरीही. मी बार्शीमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता माझ्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचा प्रयोग करत होते. एक वेगळी भूमिका साकारत होते. तेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या टी.व्ही.वर ‘जान्हवी’ची शेवटची भेट घेत होतात. बरोबर! २४ जानेवारी २०१६. रविवारची संध्याकाळ आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मालिकेचा महाएपिसोड (शेवटचा एपिसोड).

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

पूर्वीपासून आपण असं ऐकत आलोय की, मृत्यूनंतर माणसाचं शरीर संपतं; पण त्याचा आत्मा अमर आहे. तो पुन्हा जन्म घेतो एका नवीन शरीरात. आम्हा कलाकारांच्या बाबतीत अगदी उलट आहे बघा! कारण आमचं शरीर, चेहरा हे आम्ही कलाकार म्हणून जगतो तेव्हा तेच असतं; पण एक कलाकृती संपुष्टात आल्यावर आमच्या शरीरातल्या त्या भूमिकेचा आत्मा नष्ट होतो आणि एका नवीन गोष्टीतल्या, नवीन पात्राच्या गरजेनुसार आम्ही एक संपूर्ण नवीन आत्मा आमच्या शरीराला देत असतो आणि हो, एकाच वेळी जेव्हा आम्ही दोन वेगवेगळय़ा गोष्टींमधली, वेगवेगळी अशी दोन पात्रं साकारत असतो, तेव्हा त्या दोन पात्रांच्या वागण्या- बोलण्यात, हावभावात कधीही गल्लत होऊ देत नाही. ती एकमेकांपेक्षा वेगळी वाटावीत म्हणून सातत्याने कार्यरत असतो. हे सगळं खरं असलं तरीही २४ तारखेच्या त्या प्रयोगात कांचन साकारतानाही माझं मन जान्हवीजवळ जाऊन येत होतं. विचित्र अस्वस्थ वाटतं होतं. काही तरी सुटून जात होतं हातातून असं; पण हे सगळं स्वाभाविकच होतं. कारण या भूमिकेने माझ्यातल्याच माझी बरेचदा नव्याने ओळख करून दिली होती. जे हसणं तुमच्या मनाला भिडलं होतं ना, ती तेजश्रीमधली आनंद व्यक्त करणारी भावना इतकी सुंदर दिसू शकते ही जाणीव जान्हवीने करून दिली होती; पण ते हसू तिच्या हक्काचं बनवून ती मात्र मलाही कायमची सोडून जात होती.. मी नाटकाचा प्रयोग संपवला, काही प्रेक्षक मला भेटायला आले आणि त्यातले एक जण पटकन मला म्हणाले, ‘‘मी डॉक्टर आहे आणि कालच्या एपिसोडमध्ये प्रसूतिवेदना तुम्ही इतक्या सुंदररीत्या दाखवल्यात की, ‘टेन आऊट ऑफ टेन’.’’ माझ्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना आली आणि मी लेखामध्ये सुरुवातीला उल्लेख केला त्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसात जाऊन पोहोचले. तुम्हाला सीरियल पाहताना ज्या क्रमाने गोष्टी घडताना दिसतात, त्याच क्रमाने शूटिंग करणं गरजेचं नसतं, त्यामुळे बारशाचा सीन आधीच शूट करून झाला होता. खरं तर अख्खा महाएपिसोड राहिला होता तो फक्त एक दिवस. लेखाच्या सुरुवातीला सांगितलेला विरोधाभासाचा दिवस, जो हॉस्पिटलमध्ये शूट होत होता.

आता तुम्ही म्हणाल, ‘विरोधाभास’ हा शब्द मी सातत्याने का वापरते? सांगते, सगळं सांगते. तुमचं लाडकं पात्र आम्ही जन्म दिलेलं मूल असतं. त्या दिवशी डिलिव्हरी शूट करण्यासाठी मी ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये प्रवेश केला आणि कळून चुकलं, जान्हवी तिच्या बाळाला जन्म देतेय. या सीनमध्ये तेजश्री मात्र तिच्या बाळाला- ‘जान्हवी’ला गमावणार होती त्याच सीननंतर अगदी कायमची. खिन्न होऊन गेलं होतं माझं मन. या डिलिव्हरीच्या भागाचं सर्व महाराष्ट्रात कौतुक झालं, खरं- खरं वाटून गेलं सगळं. हातातली कामं सोडून श्वास रोखून सगळय़ांच्या नजरा टीव्हीवर खिळून राहिल्या होत्या ‘कृष्णा’चा जन्म होईपर्यंत; पण हे सगळं साकारताना माझ्या आत काय- काय चालू होतं ते सगळं आज सांगते.

खिन्न मन:स्थितीत त्या बेडवर चढून बसले मी. मंदारदादाने  (आमचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी) मला विचारलं, ‘‘तेजू! रेडी?’’ त्याच्याही आवाजात उसनं अवसानच होतं. कारण खरं तर आम्ही कुणीच रेडी नव्हतो. नाही! सीन करण्यासाठी आम्ही कायम उत्साहात असायचो आणि हा सीनही आम्ही चोखच करणार होतो; पण आम्ही रेडी नव्हतो ते ‘शेवटचा’ सीन, ‘अखेरचा’ सीन करण्यासाठी. तरीही परिस्थिती स्वीकारण्यासाठी मी होकारार्थी मान हलवली. पोझिशन घेतली, चेहरा कॅमेऱ्यात स्थिरावला आणि कानावर ‘अ‍ॅक्शन’ हा शब्द पडला, त्याच्या पुढच्याच क्षणी, ‘मला नाही जान्हवीला सोडायचंय..’ या तीव्र हट्टाने पहिला अश्रू ढळला. तुम्हाला मात्र टीव्हीवर दिसली ती जान्हवीची आई होण्याची प्रबळ सकारात्मक इच्छा, खऱ्या प्रसूतिवेदना सहन करणारी आई. त्या क्षणाच्या वेदनेची जाणीव कमी करण्यासाठी बहुधा गेल्या नऊ महिन्यांत तिने तिच्या कल्पनाविश्वात बाळासाठी पाहून ठेवलेला स्वप्नरंजक भविष्यकाळ आठवत असावी; पण मी चेहऱ्यावर वाढत जाणाऱ्या वेदना दाखविण्यासाठी जान्हवीच्या भूतकाळात डोकावत होते आणि वेदनादायी क्षण शोधत होते; पण डोळय़ांसमोरून पावलोपावली जान्हवीने मला मिळवून दिलेलं प्रेम, ओळख, प्रसिद्धी हेच सगळं तरळून जात होतं, पण या क्षणाला ते आठवणं उपयोगाचं नव्हतं, कारण या सगळय़ा कमावलेल्या सुखावह आठवणी होत्या ना माझ्या, ज्याच्यामुळे वेदना टिकली नसती कॅमेऱ्यात. म्हणून मग मी भूतकाळातल्या अशा पीरियडमध्ये जाऊन पोहोचले, जिथे याच सीरियलवर, जान्हवीवर जोक्स होऊ लागले आणि ‘सोशल साइट्स’ ज्या दिवसरात्र आमचं कौतुक करून थकत नव्हत्या त्या आमची सीरियल कशी बोअर, फालतू आहे आणि त्यातले आम्ही कलाकार कसे कामच करू शकत नाही किंवा जान्हवी खूप ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग’ करते असं सगळं वक्तव्य करणारे कॉमेंट्स दाखवायला लागल्या होत्या. ते पुन्हा नुसतं आठवूनही मनामध्ये कालवाकालव झाली. तीव्र कळ आली आणि त्या क्षणापर्यंत हे सगळं पाहून, सहन करून, प्रत्येक क्षणी स्वत:ला खचू न देता, त्याच जिव्हाळय़ाने काम करत राहून, संयमाने टिकून राहण्यासाठी धडपडणारी मी जिवाच्या आकांताने किंचाळले, या साचलेल्या नाराजीला, दु:खाला वाट करून दिली आणि कॅमेऱ्यात खरी वाटून गेले. अजूनही सीनमधला डिलिव्हरीचा ‘तो’ क्षण आलाच नव्हता. पुन्हा मनात विचार सुरू झाले. त्रास, वेदना, धडपड दाखवत राहायची होती. मला विचार करताना लक्षात आलं आमच्या चंदेरी  दुनियेत सगळंच क्षणभंगुर असतं. आम्ही कलाकार तुम्हाला जितके पटकन आवडून जातो त्याहीपेक्षा जलद आम्ही नावडीचेही होतो. आहो! पण आमचे बारा-चौदा तासांचे रोजचे कष्ट नाही टळत, ना आमचे आई- वडील कधीच तुमच्या मुलांच्या रोजच्या कामांवर बोट ठेवायला आणि त्यांच्याबद्दल एखादा ग्रह करून घ्यायला येत. सगळय़ाचं घरांमधली मुलं रोज स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात, चुकत असतात, चुकांमधून शिकत असतात; पण त्यांना रस्त्याने जाणारा अनोळखी माणूस जाब नाही विचारत- ‘का चुकलात?’ असा. मग आमच्या बाबतीत असं का? चेहऱ्यावरचा रंग उतरला की, आम्हीसुद्धा अत्यंत सामान्य माणूस बनूनच जगतो; पण ‘कुणीही यावे, टपली मारून जावे’ हे आमच्याबाबतीतच का? ती साधी टपली अंतर्मनात खोलवर इजा करते हो आम्हाला! या जाणिवेने खूप रडू येत होतं मला; पण आज मला माझ्यापुरती व्यक्त होण्याची मुभा जान्हवीने मिळवून दिली होती. मी मोकळी होत होते, हे सगळं करताना आजूबाजूचे सगळे चेहरे दिसत होते मला, त्यांच्या डोळय़ांमध्ये मात्र कौतुक दिसत होतं माझ्या कामाबद्दलचं आणि जान्हवीच्या डोळय़ातून निसटणारा प्रत्येक अश्रू माझ्यातल्या कलाकाराला धीर देत होता. तुमच्या मनात ‘कलाकार’ म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा हा माझा आटापिटा वाया जाणार नाही याची ग्वाही देत होता आणि अखेर तो क्षण आला. ‘कृष्णा’ने जान्हवीच्या पोटी जन्म घेऊन ‘होणार सून..’मधलं तिचं स्थान मिळवलं आणि तेजश्रीने तुमच्या मनातलं, ‘कलाकार’ बनून तिचं स्थान परत मिळवलं.

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मूल जन्माला आलं की, ‘सुवेर’ लागतं आणि सुवेरात आनंद असतो. आज हे सगळं लिहिताना, मागे वळून बघताना खरंच खूप तृप्त आहे मी. ‘न भूतो न भविष्यति’ असं काही तरी मिळून गेलंय आणि हे सुवेर जान्हवीच्या बाळामुळे नाही, तर हा सीक्वेन्स साकारताना तुम्हाला आवडणाऱ्या जान्हवीचं पात्र करणाऱ्या माझाही कुठे तरी पुन्हा एकदा ‘एक चांगला कलाकार’ म्हणून तुमच्या मनात नव्याने झालाय, यासाठी आहे बरं का! (अर्थात २३ जानेवारी २०१६ च्या एपिसोडनंतर तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या प्रतिक्रियांवरून मी स्वत:ला तसं सांगून सुखावून घेतलंय.) या नवीन जन्मानंतरचा बारशाआधीचा बारा दिवसांचा काळच जणू जगतेय मी आता फक्त.‘चंदेरी खोटी दुनिया’ आमची, त्यामुळे जान्हवीच्या ‘लांबलचक’ नऊ महिन्यांसारखेच हे बारा दिवसही जरा मोठे असतील, पण एक नवीन नाव, एक नवीन आत्मा, एक नवी ओळख घेऊन, माझा ‘नामकरण विधी’ होईलच आणि मला खात्री आहे, जान्हवी नाही, पण तिच्यासारखीच एक खरी भूमिका घेऊन येऊन तुमच्या मनाचा दरवाजा पुन्हा ‘तुमच्या घरातली एक सदस्य’ होण्यासाठी ठोठावीन मी.
तेजश्री प्रधान