कोलकात्यात एकमेव असा ‘४२०’ हा ‘रूफ टॉप फ्ली मार्केट इव्हेंट’ लोकप्रिय झालाय. ही भन्नाट कल्पना निपजली आहे देविका अरोराच्या सुपीक डोक्यातून! ‘रूफ टॉप फ्ली मार्केट’ म्हणजेच गच्चीसारख्या मोकळ्या जागेत छोटय़ा-मोठय़ा कुशल कारागिरांना आणि सोबत कलाकारांना उपलब्ध करून दिलेलं छोटंसं मार्केट!
ए का कलाउद्योजक तरुणीच्या कल्पक अभिव्यक्तीतून साकारलेला ‘रूफ टॉप फ्ली मार्केट इव्हेंट’ अर्थात ‘४२०’! ‘रूफ टॉप फ्ली मार्केट’ म्हणजेच गच्चीवरच्या मोकळ्या जागेत छोटय़ा -मोठय़ा कुशल कारागिरांना, कलाकारांना उपलब्ध करून दिलेलं छोटंसं मार्केट! सहकारी तत्त्वावर व्यापार करणारे किरकोळ व्यापारी आणि त्यासोबतच ‘परफॉर्मिग आर्ट्स’ यांच्यावर विशेष कटाक्ष असलेला ‘इव्हेंट’ असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. कोलकात्यात एकमेव असा हा ‘रूफ टॉप फ्ली मार्केट इव्हेंट’ लोकप्रिय झालाय आणि ही भन्नाट कल्पना निपजली आहे देविका अरोराच्या सुपीक डोक्यातून!
देविकाचा जन्म बंगळुरूचा! ती आठ वर्षांची असताना तिचे आई-वडील कोलकाता इथे स्थायिक झाले आणि देविकाचं पुढचं शिक्षण तिथेच पार पडलं. ‘‘बंगळुरूच्या बगिच्यातून कोलकात्याच्या कलकलाटात मला काही दिवस फार ‘अजीब’ वाटलं. पण इथल्या माणसांच्या धमन्यांतून कला आणि साहित्य वाहतं आणि हळूहळू हे माझ्यातही प्रवाहित झालं. माझ्यातील कलाकार व कलारसिक हा कोलकात्यात बहरत राहिला. मी फोटोग्राफी पण करते. नाटक, संगीत, सिनेमा व त्याचप्रमाणे इतर सर्वच कला मला प्रिय आहेत,’’ देविका सांगते.
एका वेळी असंख्य गोष्टी करणं देविकाला आवडतं! पदवीसाठी देविकाला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि ती लंडनला गेली. तिथे तिने ‘एण्टरटेनमेंट बिझनेस’ या विषयात पदवी मिळवली आणि त्या सोबतच युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, लंडन इथून फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं. पण आता पुढे काय, हा प्रश्न तिला भेडसावत राहिलाच! नंतर तिने ‘टेड डॉट कॉम’ कंपनीसाठी, तसंच ‘लश’ या कॉस्मेटिक कंपनीत काही वर्षे नोकरी केली. पण तिच्यातील कलाकाराचा पिंड तिला वेगळंच काही तरी करायला सांगत, सुचवत होता! ती भारतात परतली.
कोलकात्यातील निर्मितीक्षम अशी गुणवत्ता, अनेक कलाकार थोडीशी जरी आशा दिसली की कोलकाता सोडून बाहेर जात, कारण त्यांना इथे म्हणावा तसा वाव आणि उत्पन्न मिळत नाही हे तिच्या लक्षात आलं. या सर्वानी कोलकात्यात स्थिरावायला हवं यासाठी आपण काही तरी करावं, पण हे काही तरी म्हणजे नेमके काय हे अनेक महिने तिचे तिलाच स्पष्ट होईना! एकदा अस्वस्थतेत संपूर्ण रात्र जागून काढल्यावर पहाटे पहाटे तिच्या डोक्यात ‘रूफ टॉप फ्ली मार्केट इव्हेंट’ची कल्पना साकारली!
‘‘खूप वर्षांपासून आपण एखादी गोष्ट शोधत आहोत आणि आपल्याला जे हवं होतं ते नेमकं मनात साकारलं की जी अवस्था असते ना त्या अत्यंत अद्भुत अशा भावावस्थेत मी घडय़ाळात बघितलं! पहाटेचे ४.२० झाले होते! ‘चारसो बीस’ हा तो क्षण होता!’’ ‘४२०’ या नावामागे काय दडलंय हे अशा तऱ्हेने ती स्पष्ट करते.
‘‘माझा पिंड कलाकाराचा आहे. माझे अनेक निकटचे परिचित आणि मित्रमंडळी कला क्षेत्रात खूप चांगली गुणवत्ता असलेले आहेत. यात अनेक डिझायनर्स, डान्सर्स, म्युझिशियन्स, कॉमेडियन्स आणि माझ्यासारखे अनेक ड्रीमर्स आहेत. या सर्वाच्या जवळ जगाला देण्याजोगं, दाखवण्याजोगं असं खूप काही आहे. पण यांच्याजवळ व्यासपीठ उपलब्ध नाही. मला हे सतत खटकत असे! मग आपण स्वत:च तसं व्यासपीठ का उपलब्ध करून देऊ नये या विचारांनी मला पछाडलं होतं. आणि यातूनच ‘४२०’ची संकल्पना आकारली. मी स्वप्नाळू स्त्री आहे. हे नाव जरा हटके असल्यानं लोक उत्सुकतेनं का होईना सुरुवातीला आमच्याकडे येतील असं मला वाटलं आणि गंमत म्हणजे उत्सुकतेने येणारे लोक आता आमचे नियमित ग्राहक आहेत.’’
भारतातलं एकमेव अशा या ‘रूफ टॉप फ्ली मार्केट इव्हेंट’ दर दोन-अडीच महिन्यांनी भरवले जातात. कोणत्याही मोठय़ा इमारतींच्या गच्चीवर केले जाणाऱ्या या इव्हेंटमध्ये स्टॉल लावणारे सर्वजण इथे आपापली उत्पादने, कला व सेवा यांचं प्रदर्शन मांडतात आणि त्यातून व्यवसायवृद्धी व  नेटवर्किंग करतात. सुरुवातीला ५००-६०० लोकांची गर्दी या इव्हेंटला होत असे. आता हा आकडा २०००च्या वर गेलाय! तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग या गर्दीत प्रामुख्याने जाणवतो.
या ‘स्टार्ट अप व्हेंचर’मध्ये तुला सर्वात मोठी अडचण काय आली असं विचारलं तेव्हा देविका म्हणते, ‘‘जरी अनेक कलाकार व इतर कौशल्य जाणणारी मंडळी माझ्या मित्रपरिवारात होती, तरी एक व्यवसाय फायद्यात चालविण्यासाठी ते पुरेसं नव्हतं आणि या इव्हेंटला बघायला कोण येणार, हाही प्रश्न मला छळत होताच!
पण लवकरच लोकांच्या लक्षात आलं की, इथे काही तरी निराळं, अस्सल मिळतंय जे मोठाल्या मॉल्समध्ये मिळत नाही. मग काय.. गर्दीचा आलेख सतत चढत राहिला! आतापर्यंत सहा मोठय़ा इव्हेंट्स ‘४२०’ने आयोजित केल्या आहेत. प्रत्येक वेळी निराळी ‘थीम’ यासाठी ठरवली गेली. ‘दिवाली लाइट्स’, ‘बॉनफायर नाइट’ , ‘बॅक टू बेसिक्स’, ‘ड्रामारामा’, ‘हेझ’ आणि ‘आफ्टरग्लो’ अशी तरुणाईला जवळची वाटणारी ‘थीम टायटल्स’ देविकाने योजली. शहरातील उभरते म्युझिक बॅण्डस, नाटय़कर्मी यांचे प्रत्यक्ष (लाइव्ह) प्रयोग आणि या सोबत सेंद्रिय शेती उत्पादने, ज्वेलरी, नव्या दमाच्या डिझायनर्सनी बनवलेले कपडे, पादत्राणे, पोस्टर्स, गृहसजावटीच्या कलात्मक वस्तू या सोबतच खाण्यापिण्याचे विविध पदार्थ हेही या इव्हेंटचे विशेष आकर्षण ठरते. आपल्याला हवी तशी एखादी वस्तू केवळ आपल्यासाठी डिझाइन करून दिली जाते. इथे स्टॉलचे भाडे नवोदितांना सहज झेपेल असे ठेवले जाते. प्रवेश फी देखील अगदीच नाममात्र असते, जेणेकरून पुढच्या वेळी सर्वाना इथे येण्याचा हुरूप टिकून राहावा!
प्रत्येक वेळी या इव्हेंटचे स्वरूप अधिकाधिक दर्जेदार कसे होत राहील याकडे देविकाचे विशेष लक्ष आहे. सध्याचं मार्केट हे बेभरवशाचं आहे. उत्पादन, जाहिरात आणि विक्री याचा खर्च जाऊन फार नफा छोटय़ा उत्पादकांना होत नाही. अशा वेळी ‘फ्ली मार्केट’ हा उत्तम पर्याय आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासहित किंवा मित्र-मैत्रिणींसहित मजेत शॉपिंग करत, खात-पीत, कलेचा आस्वाद घेत ‘क्वॉलिटी टाइम’ व्यतीत करायचा आणि तोही खिशाला परवडेल अशा तऱ्हेने, तर कोलकातावासी या इव्हेंटला अधिक पसंती देताहेत.
आतापर्यंतचा संस्मरणीय इव्हेंट कोणता, असे विचारले तेव्हा देविकाने एका प्रसंगाविषयी सांगितलं, ‘‘जेव्हा तुमच्या इव्हेंट्स या कुठल्या तरी ‘गच्चीवर भरवल्या जातात तेव्हा सर्वाधिक भीती असते ती वातावरण कसे असेल याची! एका मोठय़ा इव्हेंटच्या वेळी नेमका जोरदार पाऊस सुरू झाला! आता आम्ही काय करणार होतो? पण आमच्या म्युझिशियन्सने कमाल केली. मंद पावसाळी लायटिंगच्या साथीने त्यांनी ‘रेनी अकॉस्टिक जॅम’ (गिटारवरील पावसाचे संगीत) सुरू केले आणि हळूहळू सर्वच जण त्या धुंदीत पावसात नाचण्याचा आनंद घेऊ लागले. एकाच वेळी पाच-सहाशे लोक एकाच संगीताच्या तालावर नृत्य करताहेत हे चित्र माझ्यासाठी आणि तिथे उपस्थित सर्वासाठीच खूप अद्भुत होते.’’
‘‘अशा तऱ्हेचे ‘रुफ टॉप्स’ जर सर्वत्र उपलब्ध झाले तर व्यवसाय करण्यासाठी जी स्पेस लागते त्याला एक स्वस्त पर्याय निर्माण होऊ शकेल. आम्हाला अजून यासाठी बऱ्याच पायाभूत सोयीसुविधा तयार करायला हव्यात आणि त्यासाठी थोडा अवधी द्यावा लागेल,’’ असे देविका म्हणते.
एक विशेष नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे या इव्हेंटमध्ये दारूचा समावेश केला जात नाही. ‘अनेकांनी मला याविषयी छेडले आणि तुझा व्यवसाय वाढवायचा असेल तर हे आवश्यक आहे हे सांगितले. पण मला ते पटत नाही. दारू न पाजताही नशा चढते. काही तरी नवीन पाहिल्याची, ऐकल्याची आणि केल्याची, अनेकांचे आयुष्य एका नव्या उमेदीने भारून टाकण्याची!!!’’
सध्या देविका आपल्या मोठय़ा स्वप्नांना आकार देण्यासाठी व्हँकुव्हर, कॅनडाला आहे. नव्या उमेदीचे भारतीय कलाकार, कारागीर, व्यावसायिक या सर्वाना जगभरात अशा तऱ्हेचे व्यासपीठ मिळायला हवे आणि भारतीय कला व संस्कृतीचा परिचय या निमित्ताने जगभरातील लोकांना करून देता यावा असे मला मनापासून वाटते. यासाठी कोअर टीमची बांधणी, आर्थिक निधीची तरतूद, कलाकारांचे व्यवस्थापन हे सगळं सगळं सध्या सुरू आहे. आणि काय सांगू, हे मी किती एन्जॉय करतेय ते!’’
देविकाच्या मते सर्वानीच, जे आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आहेत आणि एक सुखवस्तू आयुष्य जगता यावे इतपत जे कमावत आहेत त्यांनी समाजातील वंचितांच्या, ‘नॉट सो लकी’ लोकांच्या जगण्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाचा ठरावीक भाग ती एका अपंग शाळेसाठी देते. तिचा भाऊ हा सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे आणि यांच्या वेदना तिने लहानपणापासून बघितल्या आणि अनुभवल्या आहेत असे ती सांगते. आपल्या कलात्मक ऊर्मिना अशा तऱ्हेने व्यावसायिक स्वरूप देऊन आपल्या सोबतच इतर प्रतिभाशाली व्यक्तींनाही व्यासपीठ उपलब्ध करून देत नव्या उमेदीच्या तरुणाईसोबत समुत्कर्ष साधत जीवनगाणे गात जगण्याचा ‘आर्टप्रेन्युर’ देविकाचा फंडा नक्कीच कौतुकास्पदच आहे.
sharvarijoshi10@gmail.com