हत्ती हा माणसांप्रमाणेच अतिशय संवेदनशील प्राणी आहे. त्यालाही विरहाची भावना मोठय़ा प्रमाणात आणि दीर्घकाळ जाणवत असते. विविध सणांसाठी आणि तस्करीसाठी पकडताना, वापरताना या शांतताप्रिय हत्तींना होणारा त्रास सर्वानाच कळावा यासाठी
संगीता अय्यर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे झटत आहेत.

एक रम्य सकाळ आहे, तुम्ही चहाचे झुरके घेत वृत्तपत्र वाचण्यात गढून गेलेले आहात. तुमची मुलं त्यांच्या मित्रांबरोबर खेळत आहेत. मधून मधून त्यांचा आरडाओरडा तुम्हाला ऐकू येतो आहे. मस्त जेवण आणि मग दुपारची झोप असं तुमचं स्वप्नरंजन सुरू आहे.. आणि अचानक प्रचंड मोठे आवाज सुरू होतात. तुमची मुलं तुमच्याजवळ पळत येतात. त्यांना पकडण्यासाठी कोणी अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागोमाग आले आहेत. ते तुमच्या मुलांना पकडून तुमच्यापासून दूर घेऊन जातात. तुम्हाला त्यांचा जिवाच्या आकांताने ओरडण्याचा आवाज येतो आहे. पण तुम्हाला जायबंदी करून जखडून ठेवल्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. नाही ना कल्पना सहन होत? पण या प्रसंगाला भारतात पकडलेला प्रत्येक हत्ती सामोरा गेलेला आहे.

आज आपण देवळात, मंदिरात, सर्कशीत, रस्त्यावर जेवढे म्हणून हत्ती बघतो, त्यांच्या आयुष्यातलं हे सत्य विदारक आहे. हे सत्य जगासमोर आणायचं काम संगीता अय्यर विविध माध्यमांचा वापर करून अथकपणे करत आहेत.
संगीता अय्यर दक्षिण भारतातल्या. त्यांचा जन्म, शिक्षण केरळमध्येच झालं. उच्चशिक्षणासाठी त्या मुंबईमध्ये आल्या. त्यानंतर पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी त्या कॅनडामधल्या हंबर कॉलेजमध्ये दाखल झाल्या. जीवशास्त्रामध्ये शिक्षण झाल्यामुळे लोकांपर्यंत पर्यावरण, सामाजिक प्रश्न आणि मुख्यत: पर्यावरणाचं अर्थकारण पोचवावं, असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी याच विषयात पुढचं शिक्षण घेतलं. त्या दरम्यान त्यांनी ‘बातम्यांमध्ये प्रदर्शित होणारा पर्यावरणाचा प्रश्न’ यावर एक माहितीपट तयार केली होती. त्यानंतर त्या बरीच र्वष अनेक मासिकांसाठी, वाहिन्यांसाठी पर्यावरणसंबंधित पत्रकारिता करत राहिल्या.

बराच काळ या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम केल्यावर त्यांचं मन त्यांना पुन्हा भारताकडे खेचू लागलं. अय्यर जेव्हा भारतात यायच्या तेव्हा
‘थ्रिसूर पूरम’ या सणाच्या दरम्यान हत्ती आणि त्यांचे होत असलेले हाल अनुभवत होत्या. त्यासंदर्भात ‘हॉफिंग्टन पोस्ट’ या ऑनलाइन दैनिकात लेखनही करत होत्या. पण या विषयाचा आवाका लक्षात घेता केवळ लेखन करून थांबणं बरोबर नाही, याची त्यांना जाणीव होती. माणसांपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी पोचवायाच्या असतील, तर शब्दांपेक्षा चित्र किंवा सर्वात उत्तम म्हणजे चलचित्रांचं म्हणजे व्हिडीओ हे मध्यम सर्वात प्रभावी ठरतं, हे त्यांच्या १०-१५ वर्षांच्या पत्रकारितेनं त्यांना शिकवलं होतं. त्यामुळे तेव्हापासून एवढा महत्त्वाचा विषय लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांनी भारतात केरळ राज्यातल्या हत्तींच्या परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली.

त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना असं लक्षात आलं की, आपल्याला हत्ती या प्राण्याबद्दल खूपच कमी माहिती आहे. हत्ती हा हुशार प्राणी आहे हे केवळ आपण शाळेत शिकलो असलो, तरी हत्तीची हुशारी म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला बघताना आपल्याला हत्तींविषयीच्या खऱ्या परिस्थितीची जाणीवही होत नाही. ‘‘हो, हत्ती हा हुशार प्राणी आहे हे नक्कीच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो अत्यंत संवेदनशील आहे. हत्तींना समजून घेण्यासाठी हत्ती आणि माणूस यांमध्ये बरेच साम्य आहेत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे’’, असं त्या म्हणतात.

हत्ती हे कळपात राहतात त्यामुळे माणसाप्रमाणेच ते ‘सामाजिक’ प्राणी आहेत. त्यांच्या कळपामध्ये प्रत्येक हत्तीचं काम ठरलेलं असतं आणि त्यामुळे त्यांच्यातले संबंधही खूप पक्के असतात. हे झाले सामाजिक संबंध, पण त्यांचे स्वत:च्या पिल्लाबरोबरचे संबंध खूपच पक्के असतात. हत्तींच्या कळपामध्ये साधारणपणे सर्व मादीच असतात. या हत्तीणी आणि त्यांची बालके मिळून हा कळप बनतो. इथे पक्की स्त्रीप्रधान संस्कृती असते. त्यांच्या भल्या मोठय़ा कुटुंबाची मुख्य एक हत्तीण असते. ती त्या कळपासाठी सगळे निर्णय घेत असते. मार्ग कुठला शोधायचा, कुठे थांबायचं, कुठे विसावायचं सगळे निर्णय तिचे! हा कळप कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांना मदत करतो, कधी दुसऱ्याच्या गरजा ओळखून आपणहून मदतीलाही जातो. सामाजिक संबंध पक्के असल्यामुळे त्यांची विरहाची भावना ही अनेक दिवस टिकते. बरंच काही मनुष्यप्राण्यासारखंच आहे ना? मग आपली मुलं आपल्यापासून हिरावून घेतली की जेवढं दू:ख आपल्याला होतं तेवढंच ते त्यांनाही होतं हे आपण पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे, असं संगीता अय्यर आवर्जून सांगतात.

या हत्तींवरचे हे बिकट प्रसंग इथेच संपत नाहीत. त्यांना आपल्या कळपापासून तोडून, ट्रकमध्ये भरून, अनेक अवैध मार्गानी शहरांमध्ये आणण्यात येतं. इथे त्यांना अत्यंत छोटय़ा जागेत डांबून ठेवलं जातं. मोकळ्या हवेत, ताजं गवत खाणाऱ्या हत्तीला असं साखळदंडांनी बांधून ठेवलं तर तो चवताळणारच. हत्ती चवताळले की त्यांना अत्यंत अमानुषपणे वागवलं जातं. गेल्या २ वर्षांमध्ये भारतात केवळ माणूस आणि त्याने दिलेली अमानुष वागणूक यामुळे ३००च्या वर हत्तींचे मृत्यू झाले आहेत, असं अय्यर सांगतात. हे सगळं सहज टाळण्याजोगंदेखील आहे. पण त्यासाठी माणसाने त्यांचा अट्टहास सोडला पाहिजे. अय्यर यांनी याच विषयाला त्यांच्या ‘गॉड्स इन श्ॉकल्स’ या माहितीपटामध्ये समर्पकपणे मांडलं आहे.

डिसेंबर महिन्यापासून केरळमधील वेगवेगळ्या सणांमध्ये हत्तींचा वापर होतो. केरळमध्ये ‘थ्रिसूर पूरम’ हा खूप महत्त्वाचा सण. यामध्ये हत्तींना सजवून मिरवणूक काढली जाते. त्याच्या आधी एक महिना त्यांना दारोदार फिरवून वर्गणी गोळा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. प्रत्यक्ष सणाच्या वेळी त्यांना प्रखर उन्हामध्ये तासन्तास न खातापिता उभं केलं जातं. त्यांच्या आजूबाजूला कर्णकर्कश आवाजाचे फटाके उडवले जातात, गुलाल उधळला जातो. अशा आवाजांनी शांतताप्रिय हत्तींना प्रचंड त्रास होतो. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण अय्यर आणि त्यांच्या चमूने खूपचं प्रभावीपणे केलं आहे. या ‘गॉड्स इन शॅ कल्स’ या माहितीपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

अय्यर यांचं काम हे माहितीपट बनवण्यापाशी संपत नाही. नुकताच त्यांनी ‘अवेकनिंग अन एलीफंट इन यू’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये तणावाशी सामना करत असलेल्या मानसिकदृष्टय़ा कमकुवत व्यक्तींना मदत केली जाते. यासाठी त्यांनी ‘गुगल हँगआऊट’चा खुबीने वापर करून अनेक गरजवंतांना मदत केली आहे. अय्यर म्हणतात की, त्यांना निसर्गाने खूप काही शिकवलं. खूप यशही मिळवून दिलं. आता वेळ आहे ती निसर्गाला काही परत करण्याची. यासाठी त्यांनी नुकतीच ‘बर्मुडा एन्व्हायर्नमेंटल अलायन्स’ची स्थापना केली. याच्या स्थापनेमागचं कारण त्यांचा मुलगा आहे, असंही त्या म्हणतात. या अलायन्समार्फत बर्मुडा या बेटावरच्या जैवविविधतेबद्दल काही माहितीपट तयार केले गेले आहेत. ते नुकतेच ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रदर्शितही केले आहेत.

स्वत: जीवशास्त्राच्या अभ्यासक, नंतर पत्रकारितेचा अभ्यास, त्यानंतर बरीच र्वष प्रत्यक्ष वाहिन्यांवर काम, त्यानंतर स्वत: काही माहितीपटांची निर्मिती एवढय़ावर त्यांच्या कामाचा आलेख संपत नाही. नुकताच त्यांनी अमेरिकन राज्यकर्ते आणि पर्यावरणवादी अल गोर यांच्या हाताखाली पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे अय्यर यांना आता त्यांचा पर्यावरण विचार लोकांपर्यंत पोहोचवायचं आणखी एक साधन मिळालं आहे. अय्यर यांच्या मते माणूस सध्या आपल्या पृथ्वीच्या इतिहासाच्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर राहतो आहे. इथे मानवप्राण्याने आपल्या भविष्याचा, आपल्याबरोबर अनेक प्राणिमात्रांच्या भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. हे भविष्य उज्ज्वल असेल किंवा विनाशकारी असेल, त्याची निवड ही मानवानेच करायची आहे.
संगीता अय्यर यांचं काम हे पर्यावरणाच्या दृष्टीने एका वाईट काळात नक्कीच एक आशेचा किरण दाखवतो. या कामाने अनेकांना बळ मिळत आहे.
प्रज्ञा शिदोरे  pradnya.shidore@gmail.com