रेफरी हे सर्वसमावेशक काम आहे. टेनिस कोर्टची स्थिती स्पर्धेयोग्य आहे की नाही, चेंडूंची उपलब्धता, बॉल बॉइज किंवा गर्ल्स यांच्याशी सुसंवाद आदींची जबाबदारी सर्वार्थानं रेफरीवर असते. बढतीनुसार बॅजचा रंग बदलतो, श्रेणीचा बॅज मिळणं सन्मानाचं आहे, मात्र तो बॅज टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आशियातील पहिल्या गोल्ड बॅज रेफरी असणाऱ्या शीतल अय्यर यांच्याविषयी..

म हिला टेनिसपटू म्हटलं की खेळापेक्षा ग्लॅमरचीच चर्चा अधिक रंगते. मात्र त्याच वेळी महिला तसेच पुरुषांच्याही सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी असणाऱ्या महिला अंपायर्स आणि रेफरी दुर्लक्षितच राहतात. खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर टेनिसपटू शीतल अय्यर यांनी पडद्यामागच्या या भूमिकेत शिरण्याचा निर्णय घेतला. टेनिस म्हणजे दिवाणखान्यात निवांतपणे बसून ग्रॅण्ड स्लॅम मैफलीचा आनंद लुटणे हा समज बळावलेला. मात्र व्यवस्थापन, मानसशास्त्र, शिस्त, नेतृत्व या कौशल्यांची परीक्षा पाहणाऱ्या अधिकारक्षम रेफरीचं काम त्यांनी स्वीकारलं.
नव्वदीच्या दशकात भारतीय टेनिस विकसनशील टप्प्यात असताना असा विचार करणंच धाडसी होतं मात्र घरून मिळालेल्या टेनिस वारशाला नव्या विचारांचं कोंदण देत वाटचाल करण्याचा निर्णय शीतल यांनी घेतला. पंधरा वर्षांच्या अनुभवसंपन्न प्रवासानंतर शीतल आज आशियातील पहिल्या गोल्ड बॅज रेफरी आहेत. हा प्रवास खाचखळग्यांचा होता पण नवं काही तरी शोधण्याची, करून दाखवण्याची जिद्द मनात असेल तर प्रवाहाविरुद्धही पोहता येतं हे शीतल यांनी सिद्ध केलं आहे.
शीतल पूर्वाश्रमीच्या मुंबईच्या कन्नमवार कुटुंबातल्या. वडील पेशाने वास्तुरचनाकार तर आईचं ब्युटी पार्लर होतं. खेळाशी संदर्भात असं कुणीच नव्हतं. मात्र वडिलांना टेनिसची प्रचंड आवड. टेनिस खेळण्याचे, पाहण्याचे संस्कार वडिलांकडूनच पुढच्या पिढीत संक्रमित झालेलं. एकत्र कुटुंबात वावरणाऱ्या शीतल यांच्या बहिणी आणि भाऊ या सगळ्यांनाच टेनिसचं वेड. त्यातूनच स्पर्धात्मक स्तरावर खेळायला सुरुवात झाली. क्लब, तालुका-जिल्हा-राज्य हे टप्पे पार करीत शीतल यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केली. १९८८ ते १९९१ कालावधीत १४, १६ आणि १८ वर्षांखालील गटांत क्रमवारीत अव्वल स्थानी होत्या. वर्ल्ड यूथ कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. रुपारेल महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयातून पदवी घेत असतानाही टेनिसचा ध्यास मागे पडला नाही. याच काळात रॅकेटशी संलग्न शीतल आणि सुंदर अय्यर यांची प्रेमाची ‘सव्‍‌र्हिस’ बहरली. सुंदर स्वत: टेनिसपटू आणि शीतल यांचे मोठे बंधू नितीन कन्नमवार यांचे मित्र. मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. आज सुंदर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचीव आहेत तर जगातल्या मान्यवर रेफरींमध्ये नितीन यांची गणना होते. लग्नानंतरही शीतल खेळत होत्या. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांत त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र टेनिसशी असलेली नाळ तोडायची नव्हती. मग त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. १९९७ मध्ये आयटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने चेअर अम्पायर आणि रेफरी यांच्या कामाचं स्वरूप विशद करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेने नव्या जगाची ओळख झाली, काही तरी वेगळं करण्याची संधी मिळू शकते याची जाणीव झाली आणि यामध्येच काम करण्याचा निर्णय घेतल्याचं शीतल सांगतात. औपचारिक गोष्टींची पूर्तता झाल्यावर १९९८ साली मुंबईत झालेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेत शीतल यांनी चेअर अम्पायर म्हणून पदार्पण केलं. या अनुभवाबद्दल शीतल सांगतात, ‘आपल्या अखत्यारीत सामना होणार, खेळाडू कसे वागतील, नियमांचे पालन करू शकू ना या सगळ्याबद्दल प्रचंड भीती होती, आत्मविश्वास नव्हता, परंतु टेनिस कोर्टवर पोहोचल्यावर हे सगळं बदलेल याची खात्री होती, कारण कोर्ट मला नवीन नव्हतं. आणि तसंच झालं. पुरुष टेनिसपटूंना ही बाई अम्पायिरगचं काम करू शकेल याबद्दल साशंकता होती, मात्र जसा एकेक सेट होत गेला त्या वेळी या बाईला खेळाची, नियमांची जाण आहे हे त्यांना कळलं. सामना संपेपर्यंत त्यांची देहबोलीही बदलली. आपण हे काम निश्चितपणे करू शकतो याची मला खात्री पटली.’ मात्र शीतल यांचा कामाचा परीघ चेअर अम्पायरपुरता मर्यादित न राहता रेफरीपदापर्यंत विस्तारला.
टेनिसच्या परिभाषेत चेअर अम्पायर म्हणजे कोर्टवर उंच खुर्चीवर बसून पंचगिरी करणारी व्यक्ती. चेअर अम्पायर विशिष्ट सामन्यापुरतेच जबाबदार असतात. मात्र रेफरी हे सर्वसमावेशक काम आहे. टेनिस कोर्टची स्थिती स्पर्धेयोग्य आहे की नाही, ऑन कोर्ट खेळाडूंना पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी, खेळाडूंची निवासव्यवस्था आणि स्पर्धेठिकाणी पोहचण्यासाठीची वाहतूक व्यवस्था, चेंडूंची उपलब्धता, बॉल बॉइज किंवा गर्ल्स यांच्याशी सुसंवाद, सरावासाठीची कोर्ट्स सुसज्ज ठेवणं, विदेशी खेळाडू आणि त्यांना करावा लागणारा प्रवास लक्षात घेऊन स्पर्धेचं वेळापत्रक तयार करणं आणि प्रत्येक सामना इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या मानकांनुसार होतो आहे याची जबाबदारी सर्वार्थानं रेफरीवर असते. खेळाडू आणि स्थानिक संयोजक यांच्यातला दुवा म्हणून आयटीएफतर्फे नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे रेफरी. चेअर अम्पायर म्हणून शीतल यांच्या तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेऊन आयटीएफने त्यांची थेट रेफरीपदासाठी शिफारस केली. एरवी या पदासाठी परीक्षा द्यावी लागते. सुरुवातीच्या टप्प्यात रेफरींना व्हाइट बॅज दिला जातो. कामातली अचूकता, सातत्य, तंदुरुस्ती, संवादकौशल्य याचं कठोर परीक्षण केलं जातं. तीन वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर २००४ मध्ये शीतल यांची पाचदिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली. त्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर आयटीएफने त्यांना सिल्व्हर बॅज देऊन सन्मानित केलं.
बढतीनुसार बॅजचा रंग बदलतो, मात्र रेफरीचं काम समाधानकारक नसेल तर खेळाडू आयटीएफकडे तक्रार करू शकतात. आयटीएफच्या निकषांनुसार रेफरीचं काम झालं नसेल तर बॅज परत घेतला जातो. त्यामुळे वरच्या श्रेणीचा बॅज मिळणं सन्मानाचं आहे, मात्र तो बॅज टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आशिया तसंच जगभरातल्या स्पर्धाच्या यशस्वी संचालनानंतर शीतल २००७ मध्ये आशिया खंडातील पहिल्या महिला गोल्ड बॅज रेफरी झाल्या.
‘मुलाचा जन्म झाल्यानंतर रेफरी कामाकडे वळले होते. त्या वेळी मुलाला घरी सोडून जाताना त्रास होत असे. त्या वेळी व्हॉट्सअप, जीमेल, फेसबुक, स्काइप ही संपर्काची साधनं विकसित झाली नव्हती. त्यामुळे नियमित बोलता येईल याची शाश्वती नसे. पण नवरा आणि मुलाने माझ्या कामाचं स्वरूप समजून घेतलं होतं. त्याविषयी कधीही खळखळ केली नाही. म्हणूनच एवढी वाटचाल करू शकले. दहा दिवस विदेशात राहिल्यानंतर घरी परत आल्यावर नेहमीच्या रुटीनशी जुळवून घेईपर्यंत पुन्हा निघण्याची वेळ होत असे. कामानिमित्ताने मी साधारण २२-२४ आठवडे (निम्मं वर्ष) घराबाहेर असते,’ शीतल सांगतात. रेफरी होण्यासाठी टेनिसपटू असायला हवं का यावर शीतल सांगतात,‘ चेअर अम्पायर आणि रेफरी होण्यासाठी टेनिस खेळलेलं असायला हवं, हा प्रचलित गैरसमज आहे. पण तसं अजिबातच नाही. खेळाची पाश्र्वभूमी असेल तर विचारांची बैठक आधीच तयार असते. व्यवस्थापन तत्त्वं महिलांमध्ये उपजतच असतात. त्याचा या कामात उपयोग होतो. या कामामुळे साचेबद्ध आयुष्यातून सुटकापण मिळते.
नवा देश, नवी माणसं, नवीन वातावरण अनुभवण्याची आवड असेल तर मुलींसाठी, महिलांसाठी हे क्षेत्र उत्तम आहे. आर्थिकदृष्टय़ा महिलांना सक्षम करण्याची ताकद या कामात आहे. महिलांच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न कळीचा असतो, परंतु संयोजक सर्वतोपरी काळजी घेतात. गेली १५ र्वष स्पर्धाच्या निमित्ताने मी एकटी जगभर फिरते आहे. आपण ज्या देशात जातोय तिथली संस्कृती, शिष्टाचार समजून वावरावं लागतं. डेव्हिस चषकासारख्या दोन देशांदरम्यानच्या सामन्यांच्या वेळी राजकीय आणि सामाजिक भान जागरूक असावं लागतं. कोर्टवर आणि पर्यायाने स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही याची जबाबदारी रेफरीवर असते. शेरेबाजी करण्याकडे कल वाढू लागला आहे. खेळभावनेला बट्टा लावणारे हे प्रकार टाळण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागते. टेनिसचं सच्चेपण जपण्याची जबाबदारी हातातले अधिकार वापरून निभवावी लागते.’
टेनिसपटू तसेच अन्य क्षेत्रांतल्या मुलींनी या क्षेत्राकडे वळावं यासाठी अखिल भारतीय टेनिस संघटना तसेच संलग्न संघटनांमार्फत आयोजित कार्यशाळा, शिबिरांमध्ये त्या मार्गदर्शन करतात. टेनिसपटूंनी खेळणं थांबवल्यावर खेळाशी असलेलं नातंही दुरावतं. मात्र चेअर अम्पायर तसेच रेफरीचं काम टेनिसशी बांधीलकी पुन्हा बळकट करू शकतं आणि स्वत:च्या पायावर उभं राहण्याची, स्वतंत्र होण्याची शिदोरी देतं हे शीतल आवर्जून सांगतात. आजमितीला तीसपेक्षा अधिक देशांची वारी झालेल्या शीतल यांचं पुढचं लक्ष्य आहे- ग्रॅण्ड स्लॅम आणि ऑलिम्पिक स्पर्धा. क्रीडा संस्कृतीचा अभाव असणाऱ्या देशात बोलून दाखवण्यापेक्षा कृतीद्वारे बदल घडवणाऱ्या शीतल युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. ल्ल