या सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह करता आला. डॉक्टर-रुग्ण संबंधांत दोन्ही बाजूंच्या जबाबदाऱ्या, देवत्व बहाल करून डॉक्टर या व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या अपेक्षा किती रास्त- किती अवास्तव अशा अनेक विषयांवर व्यक्त होता आलं.
एक स्त्री डॉक्टर म्हणून काम करताना समाजाच्या विविध स्तरांतील माणसं स्त्री-मुक्तीच्या आणि स्त्री-पुरुष समानतेच्या तथाकथित काळात परस्परांशी कसे वागतात, हे डोळस व संवेदनशील वृत्तीने बघताना अनेक वेळा खूप अस्वस्थ वाटे. िलगभेदावर आधारित सामाजिक विषमता, स्त्रीला गृहीत धरण्याची वृत्ती, मुलगा-मुलगी याविषयीच्या पारंपरिक सदोष संकल्पना, स्त्री भ्रूणहत्या अशा वेगवेगळ्या घटना रोज अनुभवाला येत व मन उद्विग्न होई. जिथे स्त्रीची विटंबना, मानहानी होतच राहते त्या समाजाला, देशाला प्रगतिशील म्हणायचे का? स्त्रीला खरे तर या िलगभेदावर आधारलेल्या विषमतेच्या समाजरचनेपासून, दूषित मानसिकतेपासून मुक्ती हवी आहे. अशा विचारांच्या अस्वस्थतेतून, आंदोलनांतून ओघानेच साऱ्या सत्य प्रसंगांचे उत्स्फूर्त एकटाकी लेखन झाले, जे मी या सदराच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडले. आजूबाजूला घडणाऱ्या दैनंदिन जीवनातील अशा घटनांकडे अधिक सहृदयतेने पाहून त्या बदलण्याचा आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न सुरू केला, तर या अस्वस्थतेचे सार्थक झाले असे मला वाटेल.
स्त्रीला एक ‘माणूस’ म्हणून स्वतंत्र अभिव्यक्तीने जगता यावे व ‘स्त्री’ म्हणून जन्माला आल्याचे लाजिरवाणे अनुभव तरी तिच्या वाटय़ाला येऊ नयेत, यासाठी समाजाचा प्रत्येक घटक जागरूक असावा एवढीच किमान अपेक्षा आहे. माझ्या सुरुवातीच्या काही लेखांत हा जिव्हाळ्याचा विषय मी ‘डॉक्टर’च्या नजरेतून वाचकांसमोर ठेवला. पण ‘डॉक्टरांच्या जगात’ या शीर्षकाचा जाणीवपूर्वक विचार केला, तेव्हा त्यातून अभिप्रेत असलेल्या विषयाची व्याप्ती ही स्त्री-पुरुष विषमतेच्या अनुभवांपलीकडे काही मांडण्याची होती. त्यामुळे पुढील सर्व लेखांचं प्रयोजन- डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श, एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह. डॉक्टर-रुग्ण संबंधांत दोन्ही बाजूंच्या जबाबदाऱ्या, देवत्व बहाल करून डॉक्टर या व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या अपेक्षा किती रास्त- किती अवास्तव अशा अनेक विषयांवर व्यक्त होता आलं. आत्तापर्यंत आयुष्यात भेटलेल्या आदरणीय व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांचा अल्प परिचय सर्वाना करून देता आला. ‘डॉक्टरांच्या जगा’ची अव्यक्त बाजू रुग्णांसमोर म्हणजेच पर्यायाने समाजासमोर मांडता आली, ज्यायोगे माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या मनातील सुप्त विचारांना, भावनांना शब्दांची वाट मिळाली. लोकांमध्ये या व्यवसायासंबंधी थोडी जागरूकता निर्माण करता आली.
मला ‘या व्यवसायातील वाईट प्रवृत्तींविषयी लिहा’ असा काही वाचकांकडून आग्रह झाला. उदाहरणार्थ-कट प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस, दलाली, औषध कंपन्या- डॉक्टरांचे हितसंबंध व उद्योग वगरे विषयांवर लिहिणं मला प्रस्तुत वाटलं नाही. प्रत्येकाने आपापल्या विषयात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे तेच समाजासमोर ठेवावं व सभोवतालच्या चांगल्या प्रवृत्तींना ओळखण्याची, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची दृष्टीच पर्यायाने समाजाला द्यावी, हे माझे वैयक्तिक मत आहे. वाईट गोष्टींना आळा घालण्याचे काम कायदा व त्याहीपेक्षा ज्याची त्याची सदसद्विवेकबुद्धी करेल अशी आशा! वैद्यकीय व्यवसायाची अंधारी बाजू समाजासमोर मांडून जास्त प्रसिद्धी मिळेल कदाचित, पण त्यापेक्षा नेटाने सकारात्मक मार्गाने त्याच व्यवसायाची प्रकाशमय बाजू लोकांसमोर ठेवणं मला जास्त गरजेचं वाटतं. कारण अशा पणतीसारख्या मंद वाटणाऱ्या प्रकाशातसुद्धा अंधाराचे अनंत अणू-रेणू उजळायचे सामथ्र्य आहे यावर माझी श्रद्धा आहे, लोकांमध्येही हा विश्वास वाढीस लागू दे!
या लेखमालेच्या निमित्ताने मागील तेवीस वर्षांच्या माझ्या वैद्यकीय व्यवसायाचा आढावा घेताना मी थोडी भावुक, अंतर्मुख नाही झाले तरच नवल होतं. या व्यवसायातले चढ-उतार सांगायचे तर ज्या केसमध्ये सर्व खबरदारी घेऊन चांगली शस्त्रक्रिया करून देखील अनपेक्षित गुंतागुंत निर्माण होते व अंतिम परिणाम बदलतात, तर काही वेळा सगळ्या नकारात्मक धोक्यांना पत्करून केलेल्या शस्त्रक्रियेचा रुग्ण ठणठणीत होऊन घरी जातो. कधी कधी हे अनाकलनीय वाटतं. कधी कधी लोकांच्या आजाराचं महत्प्रयासाने निदान केल्याचा आनंद वाटतो. अर्थात त्यांना तो आजार झाल्याचा तो आनंद नसतो, पण गणित सोडवून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचल्यावर विद्यार्थ्यांचा जो आनंद असतो; तोच इथे असतो. पण वैद्यकीय व्यवसायात सगळी गणितं इतकी सहजासहजी व आपण म्हणू त्याप्रमाणे सुटत नसतात. कारण माणसाचं शरीर म्हणजे यंत्र नाही, तर अनंत पेशींच्या समूहांचे विविध कामांसाठी विशेष गट करून तयार झालेल्या विविध संस्थांनी बनलेलं ते एक अजब चतन्य आहे. शरीरशास्त्राच्या रचनेनुसार प्रत्येकाचं सारखं, पण प्रत्यक्षात मात्र सर्व आंतररचना सारखी असूनही प्रत्येकाचं वेगळेपण त्याच्या कार्यपद्धतीतून दाखवणारं! तितकंच अनाकलनीय, भाकीत न करता येण्याजोगं!
हे सगळं निर्माण करणारा देव अस्तित्वात आहे की नाही, यावर विद्वानांच्या चर्चा, वादविवाद होतात. पण वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाल्यावर पहिल्याच वर्षी गर्भशास्त्राचा अभ्यास केल्यावर कळतं की, गर्भधारणा झाल्यावर एका पेशीपासून अनादि अनंत पेशींनी बनलेला बिनचूक माणूस घडण्यासाठी रचनेची केवढी उलथापालथ व्हावी लागते! मग आपण ‘नॉर्मल’ असल्याचं कौतुक, आश्चर्य वाटतं आणि ‘त्या’च्याबद्दल अपार कृतज्ञता दाटून येते. सुधीर फडके यांच्या एका गाण्यात आहे बघा-
‘या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे!’
 खरं आहे, पण ‘तो’ दिसला नाही तरी ‘त्या’चं अस्तित्व आमच्या पेशात क्षणोक्षणी जाणवतं. हृदयाची स्पंदने, श्वासाचा आवाज, पोटातील आतडय़ांची हालचाल, आईच्या पोटातील बाळाचे हृदयाचे ठोके हे सारे तल्लीनपणे ऐकताना त्यातून मला जाणवतं त्या निर्मात्याचं अस्तित्व-  सोहम्  आणि प्रत्येक वेळा ते ऐकल्यावर एका विलक्षण जाणिवेने मन हरखून जातं. हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेच्या पूर्वीच्या तंत्रपद्धतीत माणसाचं हृदय ४० मिनिटे बंद ठेवलेलं असे. त्या वेळात जेवढय़ा रक्तवाहिन्या खंडित झाल्या असतील, त्या काही मिलिमीटर जाडीच्या वाहिन्यांना शिवून जोडण्याचं काम कुशलतेने पण त्वरित संपवावे लागे. ज्याक्षणी ते संपवून, मशीनद्वारे चालणारे रक्ताभिसरण थांबवून हृदय पुन्हा चालू करण्याचा क्षण येई, तो क्षण शब्दांत वर्णन करणे शक्य नाही – कितीही पारंगत हातांनी ती शस्त्रक्रिया केलेली असेल, तरी ते हात समíपतपणे मनोमन जोडले जात; कारण तो क्षण हा सर्वस्वी ‘त्या’ चतन्य देणाऱ्याच्या हातात असे. प्रसूतीच्या खोलीत मनुष्य जन्माचं जे वातावरण असतं, ते एकदा पाहिलेला माणूस कधीही ‘आई’पणाचे महत्त्व विसरणार नाही. देवाच्या या सुंदर, विस्मयकारक निर्मितीला सूज्ञपणे दाद देऊन तो फक्त एवढंच विचारेल, ‘बाळ नॉर्मल आहे ना? मुलगा की मुलगी हे प्रश्न विचारण्याचं त्याला भानच राहणार नाही.असं हे विलक्षण वैद्यकीय विश्व-ज्यात शास्त्रावर आधारित निकषांची श्रद्धेने जोपासणी करायची असते. कुशाग्र बुद्धी, कष्ट, चाणाक्षपणा, संवेदनशीलता, संयम, एकाग्रता, संवादकुशलता, समíपत वृत्ती या गुणविशेषांचा इथे कस लागतो.
मला विविध अनुभवांनी समृद्ध करून विचारप्रवृत्त केलेल्या माझ्या अनेक रुग्णांना, लेखांना वर्षभर सातत्याने प्रतिसाद देणाऱ्या सुहृदांना, माझ्याशी काही वैद्यकीय अनुभव वाटणाऱ्या माझ्या व्यावसायिक सहकाऱ्यांना, मनमोकळेपणाने संपर्क करून माझ्याशी विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या, ‘चतुरंग’च्या वाचकांना व ज्यांना गृहीत धरून पुढे जाणं अयोग्य होईल अशा मदतीचा हात देणाऱ्या माझ्या कुटुंबीयांना मन:पूर्वक धन्यवाद! माझ्यातील ‘डॉक्टर’ या क्षणी देवाकडे फक्त एकच मागणं मागेल. जे उपनिषदांत लिहिलेलं आहे-
‘न त्वहम कामये राज्यम, न स्वर्गम न पुनर्भवम
कामये दुखतप्तानाम प्राणिनाम आर्तीनाशनम’
अर्थात‘ मला राज्याची, न स्वर्गप्राप्तीची, पुनर्जन्माची अपेक्षा नाही, परंतु वेदनांनी त्रस्त झालेल्या जिवांचे दुख निवारण्याचे सामथ्र्य मला दे!’
इति लेखन सीमा!    (समाप्त)