शिक्षकांची नियोजनाची आणि प्रत्यक्ष अवलंबनाची बैठक हसतखेळत व्हायची. कुणी बॉस नव्हतं. प्रत्येकाला संधी. प्रत्येकाची कल्पकता. प्रत्येकाचे विचार. हेच या शाळेचं वेगळेपण. एरवी सगळ्या शाळांतून मुख्याध्यापक आदेश काढतात नि बाकी सर्व केवळ अंमलबजावणी करतात. तेव्हा तो उपक्रम ‘राबवला’ जातो. इथं राबणं-राबवणं नव्हतं. शोध घेण्याचा हा प्रवास होता.. त्यातूनच पुढे आली कल्पना सगळ्या शाळेने एकाच विषयावर काम करायची..
ही  शाळा कधीच नाराज दिसायची नाही, कधीच उदासवाणी वाटायची नाही, कधीच मरगळलेली असायची नाही. आणि का असेल? खरी गोष्ट अशी की सगळी मुलं म्हणजे उत्साहाचा, चैतन्याचा अक्षरश: धबधब असतो. पण इतर अनेक शाळांमध्ये त्यांना एका अशा इमारतीत कोंबून बसवलं जातं तिथं सगळं काही दडपलं जातं. मोकळा वारा नाही, मोकळा श्वास नाही. सगळीकडे भरून असतो कंटाळा. तरीही वेळ मिळाला की मुलांमधला हा उत्साह बाहेर पडतोच.
 या शाळेचं तसं नव्हतं. कसं असेल? कारण इथली मुलं सतत मोकळा श्वास घेणारी, मनातलं व्यक्त करणारी, शाळेच्या अंगणात खेळणारी, दंगामस्ती करणारी नि तरीही आपल्या मनाने नियम पाळणारी होती. समजून देणं नि पटलं तर स्वीकारणं असंच घडत होतं या शाळेत! म्हणूनच मुलांना जे वाटेल ते मुलं बोलायची नि त्यातलं योग्य काय नि कसं हेही सांगितलं जायचं. मुलांना जाणवलेल्या अनेक गोष्टी मुलांना व्यक्त करायला इथे संधी होती. इतर शाळेत कसं होतं की सगळी मुलं एका समूहात बसतात आणि कुणी प्रश्न विचारला तर सगळी मुलं पटापट खाली मान घालतात. उत्तर द्यायचं असतं पण उभं राहायचं धाडस होत नाही. प्रश्न विचारायचा असला तर तो प्रश्न बरोबर आहे का या भीतीने बोलता येत नाही.
या शाळेचं असं नव्हतं. एखादा सणवार असावा, उत्सव असावा आणि सगळे जण मनापासून तो साजरा करत असावेत तसं या शाळेचं रूप होतं. आनंदी, उत्साही, चैतन्यमय. जेवढे मुलांचे चेहरे आनंदी तेवढेच मोठय़ांचेही. लेकुरवाळ्या विठूसारखी शिक्षकांची मूर्ती दिसे. कधी मुलांना शिक्षक लायब्ररीत जाताना दिसत, तर कधी मैदानावर खेळताना दिसत, कधी प्रयोग करताना, कधी गप्पा मारताना, नाटुकले बसवताना कधी झाडाखाली, कधी नदीवर, कधी रानात. शाळेच्या वर्गाबाहेर भरणारे खूपच वर्ग या शाळेत होते. नव्या नव्या कल्पना. मग काय? मजाच मजा.
  म्हणूनच या शाळेचं सगळं काही वेगळंच होतं. यातलं एक हे वेगळेपण. शाळेचा लळा नि शाळेला लळा दोन्ही गोष्टी. शाळेत आज सगळे जण एकत्र बसले होते. नेहमीसारखे. एक शिक्षक म्हणाले, ‘सगळी मुलं, म्हणजे सगळ्या शाळेतली मुलं एकाच विषयावर काम करतील?’
‘तुमच्या मनात हा विचार का आला ते समजलं तर होईल तसं.’
 ‘हो ना! म्हणजेच हा विचार कोणत्या टप्प्यापर्यंत व्यावहारिक ठरेल ते पाहता येईल..’
‘सगळ्यांचं छान नियोजन करावं लागेल नि काय साध्य झालं तेही पाहावं लागेल.’
शिक्षकांच्या या चर्चेचा समारोप मुख्य शिक्षकांनी केला, ‘अनेक गोष्टी करत राहणं हे महत्त्वाचं आहे. तेवढंच त्यातून काय काय सापडतंय, शोध लागतोय हेही महत्त्वाचं. मला काय म्हणायचंय हे तुमच्या लक्षात आलंच आहे.’
खूपच मजा आली जे घडलं त्यानं! त्याचीच ही गोष्ट.
‘घर’ ही संकल्पना घ्यायचं ठरलं. सगळे जण एकत्र बसले. कोणत्या वर्गासाठी घेऊ या यावर विचार सुरू असताना पहिल्यांदा ठरलं ५वी ते ९वी. मग कुणी तरी म्हणालं, ‘पहिली ते चौथी का नको?’ सगळ्यांनीच होकार दिला याला. १ ते ९वीपर्यंत सगळे वर्ग एकाच दिवशी एकाच विषयावर काम करू लागले. ‘घर’हा विषय जसा शिक्षकांच्या मनात आला तसाच मुलांशी बोलल्यावरही हाच विषय अनेकांना सुचला. विषयावर चर्चा झाली तेव्हाही खूप वेगवेगळे मुद्दे पुढे आले.
आपलं घर आपल्याला आवडतं. आपण घरी राहतो ना? प्राण्यांनासुद्धा घर असतंच की! पक्षीही घरटय़ात राहतात. घरी आई-वडील असतात. ज्यांना घर नसतं त्यांनी काय करायचं? त्यांच्या घराला अनाथाश्रम म्हणतात. घरात मज्जा येते. शाळा म्हणजे घरच असतं. घर. घर. घर. अशी किती तरी मतं ‘घर’ या विषयावर एकत्र आली आणि हाच विषय निश्चित झाला. मुळ मुद्दा होता करायचे काय? बैठक व्यवस्था कशी ठेवायची? वेळ किती द्यायचा? कुणी कुणी कोणत्या गटावर मदतनीस म्हणून काम करायचं? काय काय साधनसामुग्री लागेल? मुलांची सभा कशी घ्यायची? केव्हा घ्यायची? असे अनेक प्रश्न प्रत्येक शिक्षकानं हा उपक्रम करायचा ठरल्यावर नियोजनाच्या दृष्टीने उपस्थित केले. कारण ही या शाळेची पद्धत होती. कोणी तरी सांगतंय म्हणून आणि कोणाची तरी आज्ञा म्हणून उपक्रम घेतले जात नसत. सर्वाचा सहभाग, सर्वाचे विचार, मतं आणि व्यवस्थित नियोजन हे या शाळेचं वैशिष्टय़ होतं. त्यामुळे आपोआपच प्रत्येकावरच एक वेगळी जबाबदारी येत असे. याचा फायदा असा की कोणताच कार्यक्रम उपक्रम अयशस्वी होत नसे. एकाच व्यक्तीच्या अनेक गोष्टी लक्षात येतात असं नाही. प्रत्येक जण एका विषयाचा विचार अनेकांगांनी करतो. असे अनेक मुद्दे लक्षात घेतले जात असत.
त्यामुळे शिक्षकांची नियोजनाची आणि प्रत्यक्ष अवलंबनाची बैठक हसत खेळत व्हायची. कुणी बॉस नव्हते. प्रत्येकाला संधी. प्रत्येकाची कल्पकता. प्रत्येकाचे विचार. हेच या शाळेचं वेगळेपण. एरवी सगळ्या शाळांतून मुख्याध्यापक आदेश काढतात नि बाकी सर्व केवळ अंमलबजावणी करतात. तेव्हा तो उपक्रम ‘राबवला’ जातो. इथं राबणं-राबवणं नव्हतं. शोध घेण्याचा हा प्रवास होता..
अखेर तो दिवस उजाडला. सकाळी प्रार्थनेच्या वेळी सर्व शाळा एकत्र आली. सर म्हणाले, ‘आपण आज आपापल्या वर्गानुसार एकत्र बसणार आहोत. तुमच्या सर्वाच्या विभागात आज नेहमीसारखी बैठक व्यवस्था नसणार. आपण जे करायचं ठरवलंय त्याप्रमाणे बैठक व्यवस्था असेल. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी घरांची चित्रं काढणार आहेत. त्यामुळे ५वी ड्रॉइंग रूममध्ये बसेल. तिथे तुम्हाला कागद, रंग इ. साधनं आहेत. याशिवाय काही गरज असल्यास तिथे शिक्षक असतील.’ या सूचनेनंतर ५वी ड्रॉइंगरूममध्ये गेलीही. इ. ६ वीच्या मुलांना ‘घरांच्या प्रतिकृती तयार करायच्या होत्या. त्यांच्यासाठी मोकळी जागा ठरवण्यात आली. प्रतिकृतीसाठी लागणारे पुठ्ठे, कागद, माती, पुठ्ठे, रंग अशा किती तरी गोष्टी एकत्र ठेवल्या होत्या. शाळेसमोरील पोर्चमध्ये ६वीचे विद्यार्थी निघून गेले. ७वीला गटात विभागले गेले. झोपडी, रानातले घर, शहरातल्या चाळीतले घर, बंगला, राजवाडा, फ्लॅट, वाळवंटातील घरं, बर्फातील घरं असे घरांचे विविध प्रकार मुलांनी लक्षात घेतले. घरांच्या प्रकारानुसार वर्गाचे गट पाडण्यात आले. कारण त्या वर्गात मुलं खूप होती. शिवाय ज्यांना गट बदलायचे होते त्यांनाही तसं करता आलं. ७ वीची मुलं एका वर्गात एकत्र जमली. या वर्गाला अशा वेगवेगळ्या घरांतील कोणताही एक प्रसंग सादर करायचा होता. नाटक सादर करायचं होतं. तीही मुलं आपल्या जागेवर शिक्षकांबरोबर रवाना झाला. इयत्ता ८ वीसाठी गटचर्चेचं नियोजन होतं. वर्गात मुलं होती ५४. त्यामुळे ६/६ जणांचे गट चिठय़ा टाकून करण्यात आले नि गटचर्चेसाठी त्यांना विषयाच्याही चिठय़ा देण्यात आल्या.
९ वीचा वर्ग. या वर्गासाठी त्यांना सर्व विषयांची पुस्तकं देण्यात आली. या विविध विषयातील घरांचा संदर्भ शोधायचं ठरलं. मग ती कविता असो. किंवा भूगोलातील वेगवेगळी घरं असोत. इतिहासातील संस्कृती असो किंवा गणितातील घरं असोत. त्यानिमित्तानं मुलांनी पुस्तकं चाळली. मुलं आपल्या कामात दंग झाली.
सर्व शाळा एकाच विषयावर काम करताना पाहून लहान वर्गातली मुलं त्यांच्यात जाऊन मिसळली. त्यांना मदत करू लागली. त्यांना मजा वाटू लागली. या सर्व कामासाठी त्यांना घडय़ाळी १ तास देण्यात आला होता. घराच्या रचनेवरून आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, घरातल्या अनेक समस्या मुलांच्या लक्षात येऊ लागल्या. ‘खेडय़ामधले घर कौलारू’सारखी कविता भिंतीवर डोलू लाग्ली नि कविता चित्रातून मुलांनी मांडली. ‘घर म्हणजे नव्हेत नुसत्या भिंती’सारख्या कवितांवर मुलांनी आपल्या कल्पना मांडल्या. शाळा ‘घर’ झाली. प्रत्येक वर्गाला नि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. मुख्य म्हणजे कल्पनांच्या हिंदोळ्यावर सगळी शाळा झुलत होती. शाळेच्या शेवटच्या दोन तासांना याचं आयोजन झालं. मुलं हेच विचार घेऊन आपापले अनुभव एकमेकांना देत घेत घरी गेली.
किती तरी विषय यातून मुलं शिकली. सगळी शाळाच जणू गटात गटात काम करत होती. आणि आपल्या मनासारखं इथून पुढे शाळेनं ठरवलं की महिन्यातून दोनदा असं एकत्र बसायचं. साधे वाटणारे विषय किंवा स्रोत ठरवायचे नि सगळ्या शाळेनं संकलित काम करायचं. ‘घर’नंतर शाळेनं पाणी, झाडं, पक्षी, प्राणी, फुलं, संगणक, आकाश असे विषय घेतले नि सगळी शाळा सर्वासह सहभागी झाली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमाबाबतचा अंतिम अभिप्राय. शिक्षकांना नवल वाटलं की मुलंच किती सहजतेने शिकतात! यात समूहशिक्षण आलं, गरजेनुसार शिकणं आलं, प्रकल्पातून शिकणं आणि कृतीतून शिकणं आलं. संपूर्ण शाळा नि एवढी मुलं यांची किती प्रचंड शक्ती कार्यरत झाली!
शाळा आज अक्षरश: आनंदाने उमलली होती. स्वत:त रमून गेली होती.