परेदशी उत्पादनं पाहताना आपलाही स्वत:चा भारतीय ब्रॅण्ड असावा, ही कल्पना माझ्या मनात आली आणि डॉरिसनं ती लगेचच उचलून धरली. तिच्यासमोर मी एखादी कल्पना मांडली रे मांडली की, ती कल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी ती जिवाचं रान करते. त्या जोरावरच आम्ही आमचा ब्रॅण्ड यशस्वी करून दाखवला. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘भरत अ‍ॅण्ड डॉरिस’ ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. अर्थात हे साम्राज्य उभारण्यासाठी लागणारी हिंमत, धमक डॉरिसमध्ये आहे. आमच्या उत्पादनाचा ब्रॅण्ड खूप यशस्वी आहेच, परंतु जोडीदार म्हणूनही आमचा ‘ब्रॅण्ड’ यशस्वी आहे, खात्रीचा आहे, घट्ट आहे.’’ सांगताहेत बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध रंगभूषाकार भरत गोडांबे, केशभूषाकार डॉरिस गोडांबे यांच्याबरोबरच्या २५ र्वषाच्या सहजीवनाविषयी.

१९ ९३ ची गोष्ट. मुंबईत सगळीकडे दंगलीचं वातावरण.. घराबाहेर पडण्याचीही भीती वाटावी अशी परिस्थिती.. याच दिवसांत माझा हृदयाचा आजार बळावला. डॉक्टरांनी तातडीने बायपास करण्याचा सल्ला दिला. माझ्या हृदयाला तीन मोठे ब्लॉकेजेस् होते. डॉक्टर म्हणाले, ‘ऑपरेशन तातडीनं करणं गरजेचं आहे..’ मी पुरता हादरलो. या आजारातून आपण वाचू शकत नाही, असेच विचार मनाचा ताबा घेऊ लागले. मन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागलं.. पण माझ्या पाठीशी डॉरिस खंबीरपणे उभी राहिली.. या कठीण प्रसंगी एका कर्तबगार व्यक्तीसारखी ती वागली. तिने ऑपरेशनसाठी माझी मानसिक तयारी करून तर घेतलीच, पण माझ्या मनावरील निराशेचं मळभ दूर करून ‘तू या आजारातून सहीसलामत बाहेर पडशील. तुला काहीही होणार नाही,’ अशा आश्वासक शब्दांनी माझ्यात विश्वास निर्माण केला  आणि त्यामुळेच मी ऑपरेशनला सामोरा जाऊ शकलो आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडलो. त्या दंगलीच्या दिवसांमधली तिची धावपळ, माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबीयांना धीर देणं, आधार देणं.. हे सारं तिनं एकटीनंच निभावून नेलं. खरंच तिनं मला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलं.. आज मागे वळून पाहताना मन जेव्हा विचार करतं तेव्हा वाटतं त्या वेळेस जर डॉरिस नसती तर.. पण माझ्या आयुष्यात तिच्या नसण्याचा विचारही मनाला नकोसा वाटतो. कारण गेल्या २५ वर्षांत तिनं माझं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय की, तिच्या अस्तित्वाशिवाय मी स्वत:चा विचारही करू शकत नाही..
तिची-माझी भेट अंधुकशी आठवते.. मी गिरगावात राहायचो. माझी घरची परिस्थिती बेतासबात होती. वडील लहानपणीच वारले. आर्थिक चणचण सततचीच होती. मी आणि माझ्या बहिणी असा गाडा ओढताना आईची तगमग मी पाहात होतो. पैशाअभावी शिक्षण पूर्ण करणं शक्यच नव्हतं. मग छोटी-मोठी कामं करायची आणि आईचा आर्थिक भार हलका करायचा हेच मी नक्की केलं. मी जिथे नोकरी करायचो तिथे प्रसिद्ध केशरचनाकार उषा हजारे यांच्याशी ओळख झाली. मग त्यांच्या मदतीने मी सणासुदीला भेटकार्ड तयार करण्याची कामं करू लागलो. मी भेटकार्डावर पानं-फुलांची सजावट करीत असे. माझं हे काम उषा हजारेंना खूप आवडलं. ‘तुझ्यातली ही कला वाया जाऊ देऊ नकोस,’ असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा नकळतपणे मला माझ्यातल्या कलेची जाणीव झाली. माझं काम बघून त्यांनी मला प्रसिद्ध रंगभूषाकार पंढरी जुकर यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम मिळवून दिलं. पंढरीकाका नाना चौकात राहायचे. त्यांनी मला दुसऱ्या दिवसापासूनच कामावर येण्यास सांगितलं. तेथेच डॉरिस अर्थात पूर्वीची द्रौपदी जलारामानी ही केशरचनाकार म्हणून काम करण्यासाठी येत असे. ती चित्रपट आणि जाहिरातींमधील कलाकारांचे केशरचनेचे काम करीत असे. खूप हुशार, मेहनती, संस्कारी, समजूतदार मुलगी म्हणून ती ओळखली जायची. एकत्र काम करताना आम्ही एकमेकांचे खूपच चांगले मित्र झालो. एकमेकांच्या सुखदु:खांची देवाणघेवाण होऊ लागली. माझ्या आयुष्यातील काही कटू आठवणींवर तिने अलवार फुंकर घातली. मैत्रीण म्हणून तिने मला धीर दिला. आमचे बंध अधिकच दृढ होत गेले.. ते आजही- म्हणजे २५ वर्षांनंतरही कायम आहेत.
 मी मराठी आणि डॉरिस सिंधी, मग संसार करताना काही सांस्कृतिक संघर्ष निर्माण होतील का? ती आपल्या घरात, रीतिरिवाजांमध्ये चपखल बसेल का, असे प्रश्न माझ्या मनात कधीच डोकावले नाहीत. याचं कारण म्हणजे, डॉरिसला मराठी संस्कृतीची मनापासून असलेली आवड. मराठी लोकांचे रीतिरिवाज, सण, पदार्थ तिला खूप आवडायचे. त्यामुळे वटपौर्णिमेपासून गणपती, पाडवा हे सण ती मनापासून साजरे करते. आमच्या घरात गणरायाचं आगमन होण्यासही डॉरिस कारणीभूत ठरली. गणेशोत्सवाच्या काळात घरी गणपती आणण्याची कल्पना तिचीच आणि त्या दिवसांमध्ये ती गणरायाचं आणि पाहुण्यांचं भरभरून करते.
 नातेसंबंध, भावना यांना फारशी किंमत नसलेल्या या चंदेरी दुनियेत वावरतानाही आमचं सहजीवन इतकं दृढ कसं, असा प्रश्न अनेकजण आम्हाला विचारतात. मला वाटतं आमच्यातील ‘घट्ट मैत्री’ हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर असावं. मला वाटतं, नवरा-बायकोपेक्षाही आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. आमच्या नात्यात कधीही एकमेकांचे ‘इगो’ आड येत नाहीत. छोटी-मोठी भांडणं होतात, वादविवाद होतात, पण ही भांडणं, वादविवाद टोक गाठत नाहीत. आमच्यात कोणी एकानं जरी भांडणाची परिसीमा गाठली, तरी दुसरा समजूतदारपणाने एक पाऊल मागे जातो. वातावरण शांत झालं की, त्या विषयावर चर्चा होते आणि तो विषय नाजूकपणे हाताळला जातो. आम्हा दोघांमधले, कुटुंब-नातेवाईकांमधल्या नातेसंबंधाचा बंध सक्षमपणे जपण्याचं काम डॉरिसचंच. ..हे संबंध आजही तितकेच टिकून आहेत, याचं श्रेयही डॉरिसचंच. ती व्यवसाय, घर, कुटुंब या आघाडय़ा कशा काय यशस्वीपणे सांभाळू शकते, हे माझ्यासाठी एक कोडंच आहे. माझ्या कर्करोगग्रस्त आईचा तिने शेवटपर्यंत केलेला सांभाळ, माझ्या बहिणींची लग्न, त्यांचे संसार, आमच्या मुलीचं संगोपन, शिक्षण.. या साऱ्या गोष्टींकडे कामाच्या व्यापातही तिचं काटेकोपरपणे लक्ष असतं. ती कामाच्या बाबतीत जितकी व्यावसायिक आहे तितकीच कौटुंबिक पातळीवर उत्तम गृहिणी या दोन्ही गोष्टी तिच्या व्यक्तिमत्त्वात आहेत.. आणि म्हणूनच घर आणि व्यवसाय ही तारेवरची कसरत ती यशस्वीपणे पेलते. खरंच, ती जीनियस आहे.
आम्ही एकाच व्यवसायात आहोत, पण नवरा-बायको म्हणून आम्ही एकमेकांना मदतच करतो. एकमेकांशी खुलेपणाने चर्चा करतो. सूचना करतो. एखादी गोष्ट खटकली की ती लगेचच सांगतो. पण निर्णय स्वातंत्र्य मात्र ज्याचं त्याला. तिचे निर्णय अंतिमत: ती घेते आणि माझे मी. आम्ही कामाबाबत खूपच व्यावसायिक आहोत आणि नवरा-बायको या नात्यात हळवे. कदाचित म्हणूनच आम्ही या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी झालो आहोत.
आम्ही सुस्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण अशा अनेक तारकांच्या केशरचना व मेकअप केले. त्यांच्याकडून वाहवा मिळवली आहे. सगळ्यांनीच आमच्या केमिस्ट्रीला भरभरून दाद दिली आहे. ‘तुमची जोडी एकदम झकास,’ अशीच पावती असे. मला वाटतं, आमची जबरदस्त केमिस्ट्री हीच यास कारणीभूत आहे. श्रीदेवीचा पहिला मेकअप आम्हीच केला. ती आपल्या लुकविषयी खूपच जागरूक असणारी अभिनेत्री आहे. तिचा आमच्या कामावर इतका विश्वास होता की, आम्ही दोघं जे करू ते तिच्या लुकसाठी उत्तमच असेल, यावर ती ठाम असे. त्यामुळे आमच्या कामातही ती ढवळाढवळ करीत नसे. भरत-डॉरिस आहेत ना, मग नो प्रॉब्लेम, अशीच तिची भावना असे.
एक आठवण सांगतो, ‘शिल्पा शेट्टी एका कार्यक्रमाला जज म्हणून उपस्थित होती. तिने कार्यक्रमासाठी स्वत:चे रंगभूषाकार, केशरचनाकार आणले होते. पण जेव्हा तिला कळलं की तिथे आम्ही दोघे आहोत तेव्हा तिने आमच्याकडूनच मेकअप आणि केशरचना करून घेतली. तिने जाहीर केलं की, भरत-डॉरिसच माझा मेकअप करतील.’ ही आम्हा दोघांसाठी मोठी शाबासकी होती.
२००७ ला रंगभूषेतील उत्पादनांचा आमचा स्वत:चा ‘भरत अ‍ॅण्ड डॉरिस’ हा ब्रॅण्ड बाजारात आम्ही आणला. मेकअप करताना वा केशरचना करताना आम्हाला अनेकदा परदेशी उत्पादनांवर अवलंबून राहावं लागत असे आणि ही बाब आम्हा दोघांनाही खटकत असे. व्यवसायानिमित्त आम्हा दोघांच्या खूप परदेशवाऱ्या होत. तेव्हा परेदशी उत्पादनं पाहताना आपलाही स्वत:चा भारतीय ब्रॅण्ड असावा, ही कल्पना माझ्या मनात आली आणि डॉरिसनं ती लगेचच उचलून धरली. आमचं असंच होतं- कल्पना माझी आणि ती साकारायची, सत्यात आणायची डॉरिसनं. तिच्यासमोर मी एखादी कल्पना मांडली रे मांडली की ती कल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी ती जिवाचं रान करते. ती झपाटल्यागत कामाला लागते. खरं तर आमच्यातील एक सामायिक दुवा म्हणजे आमचं कामातील झपाटलेपण. आम्ही दोघेही  टोकाचे ‘वर्कोहोलिक’ आहोत. माझी निर्णयक्षमता चांगली आहे आणि तिचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि त्या जोरावरच आम्ही आमचा ब्रॅण्ड यशस्वी करून दाखवला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही.. आज रंगभूषा आणि केशरचनेचे शिक्षण देणारी आमची स्वत:ची संस्था आहे. या संस्थेत परदेशातील विद्यार्थीही शिकण्यासाठी येतात. ही सारी किमया, हे यश आहे ‘भरत अ‍ॅण्ड डॉरिस’ ब्रॅण्डचं. अर्थात हे साम्राज्य उभारण्यासाठी लागणारी हिंमत, धमक डॉरिसमध्ये आहे. अगदी घरापासून ते दुकानांसाठी जागा विकत घेण्याचा निर्णय करण्याची हिंमत केली ती तिनेच. जागांची निवड, पैशांची जुळवाजुळव ही गणितं तिनंच मांडली आणि पूर्णही केली. आमच्या व्यवसायातील आणि वैवाहिक जीवनाच्या यशासाठी  शंभर टक्के गुण देईन ते तिलाच.
रंगभूषेमध्ये डोळे अधिक सुंदर करण्याठी मला आणि अप्रतिम केशरचनेसाठी डॉरिसला मानलं जातं. आमची या क्षेत्रातील खासियतच तशी आहे. अर्थात दोघांनीही मेहनतीने हे स्थान पटकावलं आहे. हे स्थान पटकावताना एकमेकांना उत्तम साथ मिळाली, इतकंच.
चंदेरी दुनियेत राहूनही आमचे पाय जमिनीवर आहेत ते आमच्यावर झालेले संस्कार आणि एकमेकांची साथ यामुळेच. आमच्या एकाच्याही डोक्यात या चंदेरी दुनियेचा झगमगाट गेला असता तर काही खरं नव्हतं. अर्थात याचं श्रेय आम्ही एकमेकांनाच देतो. आमच्या उत्पादनाचा ब्रॅण्ड खूप यशस्वी आहेच परंतु जोडीदार म्हणूनही आमचा ‘ब्रॅण्ड’ यशस्वी आहे, एकमेकांशी घट्ट आहे! आणि तो कायम राहील याची खात्री आहे.    
शब्दांकन : लता दाभोळकर- lata.dabholkar@expressindia.com

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स