निवृत्तीनंतर रेवदंडा येथे स्थिरावलेल्या सुभाष चिटणीस यांनी २००१ साली पर्यावरण संरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्थे’च्या माध्यमातून ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला करून देण्याचा निर्धार केला. हाती झाडू घेऊन समुद्रकिनारा स्वच्छ केला, त्या वेळी अनेकांचे हात येऊन मिळाले व अनेक समाजोपयोगी कामांचा श्रीगणेशा झाला.
‘मूर्ती मृण्मयी कर मनुजा रे
नको कृत्रिम रंग रसायन
राखा स्वच्छ सुरक्षित अन्
विसर्जनापश्चात किनारे
तू धरेचा पुत्र मानवा
एक तिचे नि:श्वास उसो
विनाश रोखून वसुंधरेचा
तिज रक्षणे हाती तुझ्या रे’
‘दूरदर्शन’च्या प्रबोधनपर चित्रफितीसाठी काव्यपंक्ती रचताना असे कार्य खरोखर कुठे चालत असेल, अशी सुतराम कल्पना नव्हती; पण रेवदंडय़ाच्या ज्येष्ठ नागरिक संघाने चौदा वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या या कार्याचा शुभारंभ करून या काव्यपंक्ती सत्यात उतरवल्या आहेत. या कार्याला निमित्तमात्र ठरले ते सुभाष चिटणीस व लता चिटणीस हे दाम्पत्य! स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झालेले सुभाष चिटणीस रेवदंडा इथल्या आपल्या मूळ गावी निवृत्तीनंतर जीवन शांतपणे व्यतीत करावे या हेतूने आले. रेवदंडा गावाला विस्तीर्ण व रमणीय असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. चिटणीस तिथे सकाळी नियमितपणे फिरायला जात असत. एकदा भरतीच्या लाटांचा रंगात आलेला खेळ पाहत ते बराच वेळ किनाऱ्यावर रमले. थोडय़ा वेळाने घराकडे निघाले असताना त्यांच्या लक्षात आले की, भरतीच्या लाटांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, टेट्रापॅक्स, रद्दी कागदाचे बोळे, निर्माल्य, रिकाम्या शहाळी, मद्याच्या बाटल्या असा खूपच कचरा किनाऱ्यावर आणून टाकलाय. ते अस्वस्थ झाले. त्यांनी जमेल तितका कचरा उचलला. कचरापेटीत आणून टाकला आणि तेवढी जागा स्वच्छ केली. पुढे हा नित्यक्रम ठरला. फिरणे आटोपले की जमेल तेवढा किनारा स्वच्छ करून घरी परतायचे; पण लवकरच त्यांना जाणवले, हे एकटय़ाचे काम नव्हे; पण मग करायचे काय? ते अस्वस्थपणे विचार करत राहिले. एकदा फिरून येऊन पेपर वाचत असताना अचानक एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. बातमी अशी होती की, नुकतीच मुंबईची चौपाटी नेव्हल स्टाफने आपले कुटुंबीय व विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छ केली. बस्स! या बातमीपासून प्रेरणा घेऊन चिटणीस ग्रामसभेत जाऊन थडकले व त्यांनी ग्रामसभेत निवेदन केले की, आपण स्वत: हातात झाडू घेऊन समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात करू, परंतु आम्हा मूठभर ज्येष्ठांना समाजातील सर्वानी सहकार्य केले तरच ही मोहीम यशस्वी होईल. ग्रामसभेतील सर्वच सदस्यांनी ही सूचना उचलून धरली. चिटणीस दाम्पत्य कामाला लागले. त्यांनी गावातील इतर ज्येष्ठांशी संपर्क साधून ‘रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्थे’ची स्थापना केली. तो दिवस होता २६ मे २००१. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते ज्येष्ठांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा वापर करून गावाचा जास्तीत जास्त विकास साधणे व सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून स्वत: पुढाकार घेऊन ज्येष्ठांसाठीच नव्हे, तर इतर समाजाला उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबवणे!‘ज्येष्ठ नागरिक संस्थे’ने रेवदंडय़ाचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे काम अग्रक्रमाने हाती घेण्याचे ठरवले. १२ एप्रिल २००२ ची प्रसन्न सकाळ! हाती झाडू घेतलेले पाच-पंचवीस ज्येष्ठ समुद्रकिनाऱ्यावर थडकले आणि त्यांनी किनारा झाडायला सुरुवात केली. पाहता पाहता ही बातमी वणव्यासारखी गावभर पसरली. ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी वर्ग, तेंडुलकर हायस्कूलचे विद्यार्थी किनाऱ्यावर आले, तेव्हा आपले वय विसरून त्या स्वच्छता कार्यक्रमात झोकून देऊन काम करणारी ही वृद्ध मंडळी त्यांनी पाहिली आणि आपोआप तेही हाती झाडू घेऊन कामाला लागले. हे दृश्य पाहिले मात्र, त्या थकलेल्या, थरथरणाऱ्या हातांतले झाडू क्षणभर थबकले. त्यांचे डोळे पाणावले. एकूण २०० जणांनी गटवार विभागणी करून काम सुरू केले. दुपार झाली. कचऱ्याचे जागोजाग ढीग करून ते जाळून टाकण्यात आले तेव्हा आपण स्वच्छ केलेला हा समुद्रकिनारा आता अधिकच आकर्षक दिसत आहे, अशी प्रत्येकाची भावना होती. किनाऱ्यालगतच्या एका वाडीत हात-पाय धुऊन सर्व जण विसावले. गरमागरम वडापाव व लिंबाच्या ताज्या थंडगार सरबताने तरतरीत झालेल्या सर्व मंडळींनी आता ज्येष्ठांच्या मदतीने व मार्गदर्शनाने गोव्यात पर्यावरणाचा समतोल साधण्याचे उपक्रम हाती घेण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.
 सर्वच नागरिकांना एक गोष्ट लख्खपणे जाणवत होती की, मुंबईकर पर्यटक अलिबागला शनिवार-रविवार येतात. वेळ असल्यास अलिबागवरून थेट मुरूडकडे प्रस्थान ठेवतात. वाटेतल्या रेवदंडय़ाच्या समुद्रकिनाऱ्याकडे त्यांच्या गाडय़ा वळत नाहीत. तेव्हा आता हे गाव आणि इथला परिसर, समुद्रकिनारा स्वच्छ व रमणीय राखणे हे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यटक या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर विसावतील व त्यायोगे त्यांच्या निवास-भोजनाच्या व्यवस्थेतून गावातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रेवदंडय़ात येणाऱ्या नवख्या पर्यटकांना पारनाका, बाजारपेठ इ.मधून समुद्राकडे जाणारे मार्ग चटकन लक्षात यावेत म्हणून तीन महत्त्वाच्या ठिकाणी ‘समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा मार्ग’ तसेच ‘किनारा स्वच्छ ठेवावा’ अशी सूचना लिहिलेले मोठे सूचनाफलक सिमेंटच्या साहाय्याने जमिनीत खोल पुरून लावून टाकले. तसेच सफाई मोहिमेची माहिती देणारे व ‘आपण सर्वच जण किनारा स्वच्छ ठेवू या’ असे पर्यटकांना आवाहन करणारे फलकही जागोजागी लावण्यात आले. एवढेच नव्हे, तर थोडय़ा थोडय़ा अंतरावर कचराकुंडय़ा बसवून त्यांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.
ज्येष्ठ मंडळींना या कामासाठी पैशांची चणचण भासू लागली, तेव्हा त्यांनी मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांतून या उपक्रमाच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. वृत्तपत्रांची कात्रणे व माहितीपत्रक घेऊन विलेपार्ले येथील महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्तांना ज्येष्ठ मंडळी भेटली. मंदिराच्या ट्रस्टींना हे काम खूप भावले व त्यांनी माफक निधी ज्येष्ठ नागरिक संस्थेला उपलब्ध करून दिला. त्यातूनच काटेरी पंजे, फावडी, किंतान, पोती, खराटे असे साहित्य मंडळाने खरेदी केले. आज या ज्येष्ठांना एकच खंत वाटते की, या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणारी यंत्रणा नाही. त्यामुळे हा कचरा जाळूनच नष्ट करावा लागतो. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने साहाय्य करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच संस्थेने अर्ज विनंत्या करून ग्रामपंचायतीला घंटागाडी सुरू करण्यास भाग पाडले आहे; परंतु त्यात जमा झालेला व विघटन न होणारा कचरा गावाबाहेर टाकला जातो. त्यामुळे गाव स्वच्छ झाले तरी तेथील तिवरांची झुडुपे नष्ट होण्याची भीती गावकऱ्यांना वाटत आहे. आज या स्वच्छता मोहिमेत केवळ गावकरीच नव्हे, तर आजूबाजूच्या लोकांनीही सहभाग घेतला आहे. ही संकल्पना आवडल्यामुळे किनाऱ्यावरील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या प्रो. डॉ. पूनम कुर्वे या आपल्या महाविद्यालयातील वीस विद्यार्थ्यांना घेऊन इथे आल्या व या उपक्रमात सहभागी झाल्या. लता चिटणीस सांगतात, ‘‘चौलच्या ग्रामस्थांनी त्यांच्या गावातही अशा स्वच्छता मोहिमांना सुरुवात केली आहे. नागाव इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाने आमच्या उपक्रमापासून स्फूर्ती घेऊन गावातील स्मशानाची सफाई केली. हेसुद्धा खूप कौतुकास्पद आहे.’’
सुभाष चिटणीस सांगतात, ‘‘चौल इथल्या कृषक कल्याणकारी संस्थेच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी वृक्षारोपणचे कार्यक्रम करतो. आमच्या गावात जायफळाची विपुल झाडे आहेत. त्यांचे संवर्धन करून त्यांच्या टाकाऊ सालींपासून मुरांबे- लोणची बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देतो व त्यांनी बाजारपेठही मिळवून देतो. गावाच्या परिसरातील डोंगरांवरून खळाळत वाहणारे निर्झर आमच्या गावाची शोभा वाढवतात; पण आम्ही सरकारच्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या कार्यक्रमाअंतर्गत वाळू भरलेली सिमेंटची पोती टाकून ‘वनराई बंधारे’ तयार करतो. सरकारच्या अशा योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवणे हे सुजाण नागरिक म्हणून आपलेही कर्तव्य आहे, असे मला वाटते! सर्वच गावांप्रमाणे रेवदंडा इथेही किनाऱ्यालगतचे लोक प्रातर्विधीसाठी किनाऱ्यांचा सर्रास वापर करतात. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून व आपले गाव ‘हगणदारीमुक्त गाव’ व्हावे म्हणून पोलीस व ग्रामपंचायतीला मदत म्हणून अनेक जण समुद्रकिनाऱ्यावर सकाळी सकाळी पेट्रोलिंगचे कामही करतात. अर्थात सरकारनेही त्यांना पुरेशी सार्वजनिक शौचालये बांधून घ्यावीत, असा आग्रहही धरतात.
अर्थात रेवदंडा ज. ना. संघाने विरंगुळा उद्यान उभारणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबिरे, ज्येष्ठांसाठी निबंध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे, योग व पंचकर्म उपचार, शिबिरे असे अनेक उपक्रम आजवर हाताळले आहेत व त्यांच्या या कार्यातून ज्येष्ठांनी फावल्या वेळात मनोरंजनाबरोबरच समाजासाठी विधायक कार्य कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठ सर्वच ज्येष्ठांसमोर ठेवला आहे.   

संपर्क- ज्येष्ठ नागरिक संस्था, रेवदंडा
पत्ता- द्वारा श्री. सुभाष चिटणीस
गणेश कृपा, विठोबा आळी, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड -४०२ २०२
फोन- ०२१४१-२४०३६८
९४२११५९०८०, ९४०४५५६९२९
http://www.jyesthanagriksanstharevdanda.com

संस्थेला मिळालेले पुरस्कार
(१) मुंबई तरुण भारतचा ज्येष्ठ पर्व सन्मान पुरस्कार (२००४)
(२) फेसकॉमचा कोकण विभागातील उत्कृष्ट संघ पुरस्कार (२००४)
(३) ईस्कॉनचा उत्कृष्ट ग्रामीण संघ पुरस्कार (२००४)
(४) आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र- भारत या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ‘कै. बी. जी. देशमुख- उत्कृष्ट ग्रामीण ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार (२०११) नारायण मूर्तीच्या हस्ते तसेच रघुनाथ माशेलकर, शरच्चंद्र गोखले इ. मान्यवरांच्या उपस्थित प्रदान!