लग्नाला ४८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी नवऱ्याने तुझे आणि माझे मार्ग भिन्न असल्याचे सांगितले आणि मी निराश विचारांच्या भोवऱ्यात सापडले. त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सापडला आणि तोच माझ्या आयुष्याचा टर्निग पॉइंट ठरला.
मी एक वयस्कर संसारी गृहिणी आहे. ४८ वर्षे सुखाने व आनंदाने संसार केला. तीन मुलांना जन्म देऊन काटकसरीच्या संसारातही माझ्या बाळांना मी लाडकोडांत वाढवले. तिन्ही मुले उच्चशिक्षित झाली व योग्य मार्गाने संसारालाही लागली. माझं मन आनंदाने भरून गेले. त्या आनंदात भर घातली ती नातवंडांनी. पण.. अशा समाधानी व आत्मानंद देणाऱ्या माझ्या संसारात दुधात मिठाचा खडा पडावा तसा प्रसंग माझ्यावर आला..
 जून महिना होता तो. एके सकाळी माझे पती माझ्या समोर येऊन उभे राहिले. मला खडे बोल सुनवत म्हणाले, ‘‘हे बघ, माझं आयुष्य हे माझं आहे. यापुढे तू त्यात ढवळाढवळ करू नकोस. मला हवं तसं मी जगेन. मला हवं ते मी करेन. तू तुझ्या जगण्याचा माझ्या आयुष्याशी संबंध लावू नकोस. तुला हवं तसं तू जग.’’ क्षणभर कानांवर विश्वासच बसेना. ४८ वर्षे ज्याच्याबरोबर संसार केला त्याने असे म्हणावे? का आणि कशासाठी? अनेक प्रश्नांच्या वावटळीत मी गोंधळून गेले. मला आता कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळणार नव्हतं तरीही प्रश्न पडतच होते. त्याच विचारांच्या भोवऱ्यात मी पार निराशेत गेले. निराशा-निराशा-निराशा. फक्त निराशाच.
 दोनच महिन्यांपूर्वीच माझी ‘स्पाइन सर्जरी’ झाली होती. नुकतीच कुठे मी घरातल्या घरांत फिरू लागले होते. नैराश्यामुळे माझ्या डोळय़ातून व सर्वागातून मुंग्या येऊ लागल्या. मग माझी मीच माझ्या सर्जनकडे गेले. त्यांनी सर्व ऐकून घेतले, मला म्हणाले, तुझं ऑपरेशन चांगलं झालं आहे. शरीराची चिंता करू नको. माझे ऐक. आपण कोणी देव, साधू संत नाही. आपल्या साध्याशा आयुष्यात असा मानसिक धक्का बसतो तेव्हा निराश होणं स्वाभाविक आहे. मी तुला तीन महिन्यांच्या गोळय़ा, औषध देतो. ते घे. बरं वाटेल. मी घरी आले. विचार केला, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे घेऊन बघू गोळय़ा. बघूया काय होतं ते.
माझी मुलगी गावातच राहते. ती माझी प्रकृती बघण्यासाठी वरचेवर येत असे. तिने माझ्या मनाचा कोंडमारा बघितला. म्हणाली, ‘‘आई, माझं ऐक. प्राप्त परिस्थितीत आता काहीही सुधारणा होणार नाही. ते अशाच पद्धतीने विचार करणार. तू त्यांच्याकडून कसली आशा करू नकोस. तुला वाचनाची खूप आवड आहे. तू आध्यात्मिक साहित्य वाचायला सुरुवात कर. तुझ्या मनाला बरं वाटेल.’’
आणि मी तिचा सल्ला ऐकला.. तोच आयुष्यात टर्निग पॉइंट ठरला. माझ्या जवळची ग्रंथसंपदा बाहेर काढली. प्रथम मी रामकृष्ण परमहंसांचं चरित्र पुन्हा वाचलं, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं. मला गोडी लागली. मग ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, रामदास स्वामींचा दासबोध, एकनाथी भागवत सर्व ग्रंथ गेल्या ४-५ वर्षांत मी वाचून पूर्ण केले. आचार्य विनोबाजींचे गीताप्रवचने, डॉ. देरवणे, डॉ. यशवंत पाठक यांची पुस्तकेही माझ्या वाचनात आली आणि माझा मनाचा कल अध्यात्माकडे झुकला. मन शांत-शांत झालं.     
सत्मार्गाने चालून जन्म व्यतीत करणे, सर्वाशी गोड बोलणे. येईल त्याला स्वत: बनवलेले दोन घास खायला घालणे, कुणाला आपला मुलगा, कुणाला नातू समजून यथाशक्ती मदत करणे, सर्वाची बारीक-सारीक नड भागवणे. समोरच्या गरजूच्या तोंडावरचे हासू पाहून मला बरे वाटते. आज मी ८० वर्षांची झाले. अजून हिंडते-फिरते. इतकी वर्षे संसारात घालविल्यानंतर समाधान व आनंदाचे क्षण देवाने माझ्या ओटीत घातले आहेत. जे झाले चे झाले. मी माझ्या पतींची ऋणी आहे. माझ्या आयुष्यात अध्यात्मामुळे आनंद मिळाला. माझ्यात आशावाद फुलवला. म्हणून मी म्हणते,
मी रोज अंधारातून पहाटेची स्वप्ने पहाते
मी रोज वसंताची वाट बघते,
थोडी फार पानगळ होतच असते.
तरी मी मात्र वसंताचीच स्वप्ने पहाते.
अंधारातून प्रकाशाकडे डोळे लावून बसते.