01-ekulatहे सगळे गोबरे गाल, हे सगळे इटुकले हात मला काही सांगू पाहात आहेत. ते काय आहे? हे सगळे छोटे जीव मला कुठे तरी नेऊ पाहात आहेत. मला तिथे जायचं आहे. सतराशे साठच्या वेगात धावणाऱ्या माझ्या मनाच्या गाडीला जरा शांतवायचं आहे..

कालचा दिवस माझ्या आयुष्यातल्या अनेक इटुक झिपऱ्यांचा होता. ती सगळीच झिपरी फार खरी आहेत. त्यांना खोटं बोलताच येत नाही, म्हणून ती सगळी माझ्यावर जेव्हा भरभरून प्रेम करतात तेव्हा मला मी ‘राणी’ असल्यासारखं वाटतं. त्यातल्या प्रत्येकानं मला आयुष्यात मोलाचं खूप काही दिलं आहे. त्यातल्या एकानं तर वयाच्या तिसऱ्या वर्षीच तो राजा आणि मी राजकन्या असून त्याचं आणि माझं लग्न झाल्याचं जाहीर केलेलं आहे. माझं आणि संदेशचं लग्न आधीच झालेलं आहे याची तमा तो बाळगत नाही. त्याच्या घरी मी पाऊल ठेवताच तो राजा होतो आणि मोठय़ा रथातनं मला न्यायला येतो. त्या रथात मला ऐटीत बसवून दिगंताची सैर घडवतो. हा ‘राजा’, ‘नवरा’ म्हणून फारच पझेसिव्ह आहे. तो आणि मी खेळत असताना त्याच्या आई-वडिलांनीसुद्धा माझ्याशी काहीही, एक शब्दही बोललेलं त्याला चालत नाही. एकदा मी त्याच्याकडे गेलो असताना माझा अजून एक मित्र आणि त्याची बायको त्यांच्या घरी आले. मला तिथे बघून आनंदी होऊन ते माझ्याशी गप्पा मारायला लागताच या माझ्या ‘राजा’ नवऱ्यानं त्या दोघांसमोर फरशीवर लोळण फुगडी घेऊन भोकांड पसरलं! त्याचा एकच हेका ‘तू घली जाऽऽ ए तू प्लीज घली जाऽऽऽ’ मी गप्पा मारत असलेला माझा तो मित्र आणि त्याच्या बायकोला त्यानं ‘अतिथि देवो भव’चे कुठलेच शिष्टाचार न पाळता हा केलेला हुकूम ऐकून माझ्या या ‘राजा’ नवऱ्याचे आईवडील गोरेमोरे होऊन गेले होते.
आणखी एक इटुक इवली सध्या माझ्या आयुष्यात आहे. मामाच्या बायकोला ‘मामी’ म्हणतात हे नियम तुमच्या आमच्यासाठी. तिनं माझं नाव ‘मिमी’ ठेवलं आहे. मला तिच्याबरोबर बागेत खेळायला फार आवडतं. मी कितीही काम करून, कितीही दमून आले असले तरी तिच्याबरोबर बागेत गेले तरी ती काही क्षणात माझा शिणवटा दूर पळवते. ती आग्रही, हट्टी नाही. मी जर तिच्याऐवजी बागेतल्या इतर मुलांशी खेळायला लागले तर ती फक्त कुतूहलाने पाहत राहते. तिला नक्कीच वाटतं, ‘मिमीनं माझ्याशी खेळावं’ पण ती ते ओरडून सांगत नाही. पण दुसऱ्या मुलांशी थोडा वेळ खेळून मी तिच्यापाशी आले की तिच्या सुंदर डोळय़ांत एक मोहक हसू येतं. ते हसू फार प्रेमळ असतं. ती मला आयुष्यातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींपाशी शांत हसून घेऊन जाते. ती कधीच झाडावरची फुलं तोडत नाही. खाली पडलेलं एखादं सुकलेलं फूल बघूनसुद्धा तिला फार अप्रूप वाटतं. बागेतला बराचसा वेळ ती मला वेगवेगळय़ा रंगांची पानं, फुलं दाखवते. मग आम्ही त्या फुलांना ‘ए कावेरी, हे फूल म्हणजे आभाळातली चांदणी आहे का गं?’ अशी नावं ठेवतो. मी तिच्या आसपास नसतानाही ती बऱ्याचदा माझी वाट बघत असावी असं मला उगाचंच वाटतं. तिनं मला हे कधीच सांगितलं नाही, पण मी दिसताच तिचे डोळे मला ते सांगतात. ती माझ्याबरोबर नसली, मी दुसऱ्या कुठल्या गावी असले तरी आसपासच्या प्रत्येक पाना-फुलांत ती मला दिसते. ती माझी चांदणी आहे. हे मी तिला कधीच सांगितलं नाही, पण कालच्या दिवसाच्य मिनित्ताने आज ते मला तिला सांगायचं आहे.
माझी एक इटुक इवली तर साता समुद्रापार आहे. तिची माझी खरंतर फक्त फेसबुकच्या तिच्या फोटोमधून किंवा ‘स्काईप’ नावाच्या तांत्रिक वरदानामुळे संगणकाच्या छोटय़ा चौकोनातूनच भेट होते. ती आता खूप दिवसांनी भारतात आली आहे. ती मला ओळखेल तर नक्कीच, पण माझ्याबरोबर रुळेल का असं वाटत असताना ‘अमू अत्तूऽऽ’ म्हणून तिनं विमानतळावर घातलेली सहज साद मला चकित करून गेली. हे बाळ फार खटय़ाळ आहे. तिला सर्वाना हसवायला आवडतं. म्हणून तिचे फोटो काढायला गेलं की ती वेगळेच चेहरे करते. ते चेहरे बघून मी आणि संदेश ती आसपास नसताना पण खिदळतो. ती इथे थोडेच दिवस आहे, पण त्या मोजक्या वेळात ती मला आणि इतरांना जे काही भरभरून देते आहे आणि आमच्याकडून जे काही भरभरून घेते आहे ते बघून असं वाटतं आहे की तिला या लहान वयातही तिचं इथे भारतात थोडेच दिवस असणं, याचा अर्थ पुरेपुर कळतो आहे. ती वेळ घालवत नाहीए. क्षणात नाती जोडते आहे. तिने तिच्या आसपासच्या लोकांना आकाशगंगेतल्या वेगवेगळ्या ग्रहांची वेगवेगळी नावे ठेवली आहेत. माझं नाव आहे ‘अर्थ आत्या’ , संदेश आहे ‘व्हिनस काका’ कारण, व्हिनस हा ग्रह ‘अर्थ’च्या सगळ्यात जवळ असतो, त्याचा मोठा भाऊ, माझा दीर आहे ‘ज्युपिटर काका’ कारण ज्युपिटर व्हिनसपेक्षा मोठा आहे. त्याच्या दोन मुली- ओवी आणि माही यांना अचानक ग्रह सोडून फळांची नावं मिळालीत, त्या आहेत स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज. तिला मराठीत बोलायलाच आवडतं हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. काल रात्री ती हट्ट करून ‘अत्तूशेजाली झोपू देऽऽ’ म्हणून माझ्या खोलीत झोपायला आली. मला म्हणाली, ‘तुला नाइस बनी आणि नॉट सो नाइस बनीची गोष्ट येते का?’ मी म्हटलं ‘नाही गं’ मग तिनं विचारलं, ‘मग तुला काय येतं?’ म्हटलं, ‘मला गाणं येतं,’ तर म्हणाली, ‘मग माझ्यासाठी गाणं म्हण. मी ‘माझ्या गं अंगणात, कुणी सांडीला दहीभात, जेवतो रघुनाथ, सिमरनबाळ!’ असं गाणं सुरू करताच तिनं अलगद तिचा छोटुकला हात माझ्या हातात सरकवला आणि ती निर्धास्त माझ्या शेजारी झोपी गेली. पहाटे तिला आणि मला एकदमच अर्धवट जाग आली तर डोळे न उघडताच म्हणाली, ‘जरा गाणं म्हण गं.’ मी पुन्हा ‘माझ्या गं अंगणात’ म्हणताच पुन्हा त्याच निर्धास्तपणे झोपी गेली. तिच्या ‘गाणं म्हण गं’मध्ये तिनं तिच्या-माझ्यामधले साती समुद्र एका क्षणात पार करून टाकले होते. त्यात इतकी सहजता होती, तिचा स्वर इतका रोजचा, सवयीचा होता, जणू गेले तीनशे पासष्ट दिवस ती हेच गाणं ऐकत इथेच माझ्या शेजारी झोपत होती. ‘स्काईप’वर तिच्याशी बोलताना कित्येकदा मी माझ्या लॅपटॉपच्या छोटय़ा चौकोनाला हात लावून तिच्या गालावरून हात फिरवायचा प्रयत्न केला आहे. त्या ‘तोकडय़ा’ प्रयत्नानं कितीतरी आसुसले आहे, ती येण्याआधी तिच्या-माझ्यातल्या या अंतराला, घाबरलेल्या मला तिनं एका रात्रीत, इतकं सहज असं आश्वस्त करून टाकलं आहे. तिच्या समजुतीनं मला समजूतदार केलं आहे. मला ती सतत माझ्याजवळ हवी आहे. पण ती जर मला ‘बनीची गोष्ट’ येत नाही म्हणून मला जे येतं ते माझं गाणं इतक्या सहज ऐकू शकते, नुसती ऐकतंच नाही तर अर्धवट झोपेत पुन्हा एकदा सहज ‘जरा गाणं म्हण गं’ म्हणून ते गाणं तिच्या-माझ्या असण्याचा, नात्याचा भागच करून टाकते, तर मग मला माझ्या लॅपटॉपला हात लावल्यावर तिच्या गोबरुल्या मऊ गालांचा स्पर्श का होऊ नये? होईल, नक्कीच होईल?
अजून एक धिटुकला मुंबईला माझ्या घराशेजारीच राहतो. तो, मी आणि संदेश आम्हा दोघांसाठी काय आहे हे शब्दांत कसं सांगू? संदेशनं त्याच्यावर एक पुस्तकच लिहिलं आहे, ‘मोंटुकले दिवस’ नावाचं! ते पुस्तकच काय ते सांगेल. या छोटय़ा, त्याला छोटं तरी कसं म्हणू? माझं चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा तो आपोआप कुठून तरी प्रगट झाल्यासारखा न बोलावताच येतो. तसा काही दिवसांपूर्वी आला. आला की तो थेट मुद्दय़ालाच हात घालतो. आल्या क्षणी संदेशला म्हणाला, ‘‘आप के चेहरे पे ये लाइन्स क्यू है?’’ संदेश म्हणाला, ‘‘क्या करू माँटू, उमर बढ रही है।’’ यावर तो साडेचार वर्षांचा जीव बेफिकिरीनं उद्गारला- ‘‘उमर तो बढेगीही!’’ संदेश म्हणाला, ‘‘वो भी सही है। उमर तो तुम्हारी भी बढ रही है माँटू, लेकीन तुम्हारे चेहरे पे लाइन्स नही है, ऐसा क्यू?’’ यावर एक क्षण विचारमग्न होऊन तो जीव म्हणाला, ‘‘हसते रहने का, फिर चेहरे पे लाइन्स नही आती!’’ मी म्हटलं, ‘‘वा माँटू, आज तो तुमसे बहोत सारे सवाल पूछने चाहिये, तुम कितने अच्छे जवाब दे रहे हो!’’
माँटू म्हणाला, ‘‘पूछो, पूछो, कुछ भी पूछो!’’ म्हटलं, ‘‘माँटू, मुझे तुम्हारे जैसे एक बच्चा चाहिए, होगा क्या?’’
‘ ‘क्यू नही होगा?’’
‘‘लेकीन मुझे नाटक में काम भी करना है, तो फिर मुझे बच्चा होगा तो उसकी देखभाल कौन करेगा?’’
‘‘अरे, वो सुबह तुम्हारे घर ताई आती है ना, उसको शामको भी बुलाओ, वो सम्हालेगी तुम्हारा बच्चा!’’
‘‘लेकीन बच्चे के लिये पैसे बहोत लगते है, वो कम पड गये तो?’’
‘‘तो चिंता नही करने का. किसी दोस्त से पैसा लेने का, लेकीन एक बात याद रक्खो, कितना पैसा लिया वो ध्यान में रखने का, और जब पैसा आयेगा तब उतना पैसा गिनके उस दोस्त को वापस करने का!’’
‘‘अच्छा माँटू, मुझे कभी कभी मेरे पिताजी की बहोत याद आती है, वो तो अब नही है, तब क्या करने का?’’
‘‘तब?’’ इथे तो माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘ये तो सबसे आसान सवाल!’’ मी म्हटलं, ‘‘ये आसान है?’’ तो म्हणाला, ‘‘फिर? आँखे बंद करने का. अभी ये सामने तुम्हारे पिताजी का फोटो है नं, वो फोटो बंद आँखों के सामने लाने का। फिर पिताजी के बारे में सोचते रहने का, सोचते रहने का। इतना सोचने का की लगेगा पिताजी है ही। फिर आँखे खोलने का!’’ म्हटलं, ‘‘हॉ माँटू, सचमें बहोत आसान है!’’ त्यानंतर संदेशनं त्याला विचारलं, ‘‘माँटू, भगवान है?’’ तो बेधडक म्हणाला, ‘‘बिल्कूल है!’’ संदेश म्हणाला, ‘‘लेकीन वो दिखते तो नही!’’ यावर तो म्हणाला, ‘‘जब मैं मा के पेट में था तब दिखता था क्या?’’ इथे मी आणि संदेश शांतच झालो.
हे सगळे गोबरे गाल, हे सगळे इटुकले हात मला काही सांगू पाहात आहेत. ते काय आहे? कालच्या दिवसाच्या निमित्तानं मला ते नीट ऐकायचं आहे. हे सगळे छोटे जीव मला कुठे तरी नेऊ पाहात आहेत. मला तिथे जायचं आहे. सतराशे साठच्या वेगात धावणाऱ्या माझ्या मनाच्या गाडीला जरा शांतवायचं आहे. हे सगळे गोबरे, झिपरे जीव, त्यांची लय, त्यांचा वेग वर्तमानाशी, भवतालाशी तंतोतंत जुळलेला.. माझं मोठं झालेलं मन जेव्हा गोबरं, इटुकलं होतं तेव्हा या सगळय़ा गोबरुल्यांच्या लयीनं मीही आसपास पाहू शकत होते, भवतालाशी अशीच निरागस जुडलेली होते.
तेव्हाचे सोपे प्रश्न मोठे होता होता किती अवघड होऊन गेलेत. तसं भाबडं नाही होता येणार आता, पण निरागस राहता येईल, वर्तमानात राहता येईल, खरं राहता येईल, सोपं राहता येईल, राहायचं आहे. कालच्या दिवसाच्या निमित्तानं मला त्या गोबऱ्या माझ्याशी जुडायचं आहे. माझ्या आयुष्यातल्या या ‘गोबऱ्या गुरूंच्या’ मदतीनं!

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!