महागाईच्या पाश्र्वभूमीवर साठेबाजी, काळाबाजार यासारख्या घटनांविरोधात महिलांनी जी आंदोलने केली ती पितृसत्तेविरोधात नव्हती. या आंदोलनांनी शहरी स्त्रियांना सामाजिक प्रश्नांचे भान दिले, आत्मविश्वास दिला. ‘ठोठवा म्हणजे दार उघडेल’ ही जाणीव करून दिली..

महाराष्ट्रात १९७२ साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे महागाई गगनाला भिडली. साठेबाजीला ऊत आला. रॉकेल, तेल, तूप, साखर असे एकेक पदार्थ बाजारातून गडप होऊ लागले. निम्न आर्थिक स्तरातल्या आणि मध्यमवर्गीय स्त्रिया या महागाईने प्रचंड चिडल्या होत्या आणि त्यांच्या रागाला एक नवी दिशा मिळाली, त्या काळी उदयाला आलेल्या तीन स्त्री नेत्यांमुळे.
महागाईच्या विरोधात रोज एकेका महिला मंडळाने सत्याग्रह करून सत्याग्रहाची मालिका सुरू केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमिलाताई दंडवते यांनी केले. या पाश्र्वभूमीवर भारतीय महिला फेडरेशनने सर्व पक्षातील महिला आणि गृहिणींची सभा घेतली. यातून समाजवादी महिला सभा आणि इतर काही महिला संस्थांनी एकत्र येऊन ‘महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती’ची स्थापना केली. मृणाल गोरे त्याच्या अध्यक्ष होत्या. त्या आमदारही असल्याने विधानसभेत महिलांच्या मागण्या लावून धरणे त्यांना शक्य होते.
कम्युनिस्ट पार्टीच्या तारा रेड्डी, मार्क्‍सवादी पार्टीच्या अहिल्या रांगणेकर आणि समाजवादी पार्टीच्या मृणाल गोरे या तीन रणरागिणी पार्टीतले मतभेद विसरून एकत्र आल्या आणि मुंबईतल्या झोपडपट्टीतील स्त्रिया, गिरणी कामगार स्त्रिया आणि मध्यमवर्गीय स्त्रिया हजारोंच्या संख्येने त्यांना सामील झाल्या. दादरला पहिला मेळावा झाला. त्याला प्रचंड गर्दी झाली. पहिला मोर्चा तेलाच्या भाववाढीविरोधात करण्याचे ठरले. मोर्चा अडवला तर सत्याग्रह करण्याचे ठरले. सत्याग्रह झाला आणि त्यात इतक्या स्त्रिया उतरल्या की त्यांना पकडून तुरुंगात ठेवायला जागाच नव्हती. त्यामुळे संध्याकाळी सर्व स्त्रियांना सोडून देण्यात आले. आपली एकजूट ही आपली शक्ती आहे, या जाणिवेने स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजारातून तेल, तूप, रवा, मैदा, साखर अशा गोष्टी गायब झाल्या. रेशनवर तर सडलेले, भिजलेले आणि कचऱ्यांनी भरलेले तांदूळ मिळत होते. अमेरिकन गहू तर इतका वाईट होता की, तिथली जनावरेही खाणार नाहीत. शिवाय हा माल तरी रेशनच्या दुकानात नक्की मिळेल याची खात्री नसे. काळय़ा बाजाराला लोक कंटाळले होते. शिवाजी पार्कला झालेल्या बायकांच्या सभेत कोणी तरी म्हटलं, की या सरकारला लाटण्यानं बदडून काढलं पाहिजे. मृणालताईंनी ही कल्पना उचलून धरली आणि हजारो स्त्रिया हातात लाटणे घेऊन मोर्चात उतरल्या. पोलीसही चकित झाले. बायकांचा एवढा मोठा मोर्चा त्यांनीही कधी पाहिला नव्हता. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी मोर्चाच्या नेत्यांना भेटीला बोलावले, पण मुख्यमंत्र्यांनीच मोर्चासमोर यावे, असा आग्रह बायकांनी धरला. संध्याकाळी सातनंतर स्वत: मुख्यमंत्री मोर्चाला सामोरे आले, पण निवेदन मात्र त्यांनी स्वीकारले नाही. लाटणे हे स्त्रियांचे या नंतरच्या अनेक आंदोलनात प्रखर हत्यार बनले आणि लाटणेवाली बाई म्हणून मृणाल गोरे प्रसिद्ध झाल्या.
यानंतर पुढील दोन-तीन वर्षे महिलांनी महागाईविरोधात अनेक अभिनव आंदोलने केली. रॉकेल टंचाईमुळे स्वयंपाकासाठी, अंघोळीच्या पाण्यासाठी स्टोव्ह पेटवणं अवघड होऊन बसलं, तेव्हा एका आंदोलनात हजारो स्त्रियांनी स्टोव्हच्या टाकीत पाणी भरून आणलं आणि ते रस्त्यावर ओतून आपला राग व्यक्त केला.
मंत्र्यांना घेराव घालण्याचे कार्यक्रमही अनेक झाले. तत्कालीन पुरवठामंत्री हरिभाऊ वर्तक यांना अचानक त्यांच्या घरी जाऊन काही स्त्रियांनी घेराव घातला. त्यांनी रेशनवर मिळणारा सडका तांदूळ आपल्या बरोबर नेला होता. ‘तुम्ही कोणता तांदूळ खाता? त्यांनी मंत्रीमहोदयांना विचारलं.’ तुम्ही खाता तोच, साळसूदपणे मंत्री म्हणाले. ‘आम्हाला बघू तुमचा तांदूळ’ गर्दीतून आवाज आला. मंत्र्यांनी अडवूनसुद्धा एक बाई त्यांच्या स्वयंपाकघरात घुसली. डब्यात पाहिलं तर बासमती तांदूळ! मूठभर तांदूळ बाहेर आणून तिनं बाकीच्यांना तो तांदूळ आणि जनता खात असलेला तांदूळ दाखवून मंत्र्यांची बोलती बंद केली.
किलाचंद बॉम्बे ऑइल सीड्स अ‍ॅण्ड एक्सचेंजचे अध्यक्ष रामदास किलाचंद यांनी सरकारला ठरल्याप्रमाणे तेल दिले नव्हते, हे कळल्यावर गनिमीकाव्याने स्त्रियांनी त्यांना चार तास घेराव घातला आणि तेलाचा राहिलेला कोटा देण्यास भाग पाडले.
मुख्यमंत्र्यांची कचरातुला हा आणखी एक गाजलेला कार्यक्रम. रेशनच्या धान्यातला कचरा वेचून बायकांनी पिशव्या भरभरून आणला आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळय़ाची कचरातुला केली. मृणालताईंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले उपरोधिक मानपत्र वाचले.
लाटणी थाळय़ांवर आपटून घराबाहेर येऊन सगळय़ांनी थाळय़ा बडवत घंटानाद करायचा असे ठरल्यावर रोज अर्धा तास हा कार्यक्रम सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरही हा कार्यक्रम राबविण्यात आला. या आंदोलक बायकांची मंत्र्यांनी तर एवढी धास्ती घेतली होती की, बायकांचा मोर्चा येत आहे, असे कळल्यावर एक मंत्री मागच्या दाराने पळूनच गेले. ‘इंदिराबाई इंदिराबाई जिकडे तिकडे महागाई’ या घोषणेने बायका सारा परिसर दुमदुमून सोडत. ७४-७५च्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ‘देखो सरकार का खेल, सस्ता दारू महंगा तेल’ अशा घोषणा देत २० हजार बायकांनी मोर्चा काढला होता. तो तोडण्याचा प्रयत्न झाला. २०० बायकांना अटक झाली. त्यावेळची महागाईविरोधातली आंदोलने आजही अनेकांच्या स्मरणात असतील. पण नेहमी प्रश्न पडतो की महागाई ही फक्त स्त्रियांचीच समस्या होती का? या आंदोलनात पुरुष सहभागी झाल्याचा कुठे संदर्भ मिळत नाही. दिलेल्या पैशात घर खर्च भागवणं हा बहुधा स्त्रियांचाच प्रांत मानला गेला असावा.
महागाईविरोधी आंदोलन १९७४ पर्यंत गुजरातलाही पोहोचले. तिथे त्याला नवनिर्माण आंदोलने म्हटले जाते. मुळात भाववाढ, महागाई, भ्रष्टाचार काळाबाजार यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनात हजारो मध्यमवर्गीय स्त्रिया उतरल्या. भाववाढीवरून सरकारच्या लाचखोर प्रवृत्तीवर जोरदार हल्ले झाले. कित्येक ठिकाणी अन्नसत्याग्रह करण्यात आले. नव्या युगाचं स्वागत करण्यासाठी बायका प्रभात फेऱ्या काढू लागल्या. थाळय़ा बडवून बडवून विधानसभेची शोक घंटा वाजवण्यात आली. एक समांतर न्यायालय उघडून पुढाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली. या न्यायालयातील निर्णयानुसार नेते लोकांचे पुतळे जाळण्यात आले. हे आंदोलन चिरडून टाकण्यास पोलिसांना तीन-चार महिने लागले. शंभर एक लोकांचा त्यात मृत्यू झाला. नवनिर्माण आंदोलनामागे जयप्रकाशजींच्या ‘संपूर्ण क्रांती’ची प्रेरक शक्ती होती. राजनीती भ्रष्ट झाली आहे म्हणून आता लोकनीतीची वेळ आली आहे. जाती व्यवस्था, धार्मिक रीतिरिवाजांना विरोध, राजनीतिक आणि आर्थिक परिवर्तन, समाज आणि व्यक्ती संबंधात परिवर्तन हा या लढय़ाचा केंद्रबिंदू होता.
ही दोन्ही आंदोलने पितृसत्तेविरोधात नव्हती. स्त्रियांकडे उत्पादकाची भूमिका नसून प्रामुख्याने उपभोक्त्याची भूमिका आली. पुरुषांना लज्जित करण्यासाठी अनेकदा त्यांना बांगडय़ांचे आहेर देण्यात आले, म्हणजे एक प्रकारे त्यांना बायकी ठरवून बायकांनी आपले कनिष्ठ स्थान मान्य केले. पण एकूण या दोन आंदोलनांनी शहरी स्त्रियांना सामाजिक प्रश्नांचे भान दिले, त्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायला लावले. आत्मविश्वास दिला. ‘ठोठवा म्हणजे दार उघडेल’ ही जाणीव करून दिली, आणि तरीही दार नाही उघडले तर बळ लावून ते सर्वानी मिळून उघडावे लागते हा धडा शिकवला. १९७५ नंतर स्त्री स्वातंत्र्याची जी अनेक आंदोलने झाली, त्याची पूर्वतयारी या आंदोलनाने झाली.    n