आज आईपणाच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत. भावनेपेक्षा वैचारिक, खंबीर निर्णय हा आजच्या आईचा स्थायिभाव झाला आहे. त्यातून त्या कुटुंबात आनंद, समाधान आणि प्रेम वृद्धिंगत होत जातं. पण आजही अशा अनेक माता अवतीभवती दिसतात ज्या आपल्या मुलांमध्ये इतक्या गुंततात, की मुलांची लग्नं झाली तरी त्यांना त्यांच्यावरचा हक्क सोडवत नाही. त्यांना वाटणारी असुरक्षिता मग मुलांच्या आयुष्यात, संसारात काजळीसारखी झाकोळते.. प्रेम दूर राहूनही, अलिप्त राहूनही करता येतं हे त्यांच्या गावीही नसतं. अशा आईंसाठी..

अतिशय आनंदाने व थोडीशी रागावून मी माझ्या मत्रिणीला, नीताला फोन केला. तिच्या लेकाचं, समीरचं लग्न ठरलं होतं. खूप आनंद झाला होता मला. राग अशासाठी आला की एवढी आनंदाची बातमी मला बाहेरून कळली होती. एरवी छोटय़ा-मोठय़ा गोष्टींसाठी फोन करणाऱ्या नीताने ही बातमी मला का सांगितली नसावी?
पलीकडून पडलेल्या आवाजात तिने ‘हॅलो’ म्हटलं. खळखळत्या झऱ्याप्रमाणे बोलणाऱ्या नीताचा तो आवाज ऐकून मी म्हटलं, ‘‘काय गं बरं नाही की काय?’’ उसनं हसून ती म्हणाली, ‘‘अगं सांगणारच होते तुला, समीरचं लग्न ठरलं आहे म्हणून! ’’ तिचा आवाज ऐकून काही तरी बिनसलं असल्याची मला शंका आली. तिला म्हटलं, ‘‘अगं तूच समीरच्या लग्नाची वाट बघत होतीस ना, मग?’’ मला आठवलं, तिच्या मुलीचं, शाल्मलीचं लग्न ठरलं तेव्हाची नीता! जावई दिसतो कसा, शिक्षण, घरदार, देणीघेणी फुलवून फुलवून सांगणारी हीच नीता आज गप्प गप्प होती. खरं तर तिला मुलगी पसंत होती. स्मार्ट, शिकलेली. पण त्याचं लग्न ठरल्यापासून तिच्यासमोर सून घरात येणार, आता घरात माझं स्थान काय? हा एकच प्रश्न होता. तिला जाणीव झाली होती, तिच्या होऊ पाहाणाऱ्या डळमळीत स्थानाची, तिचा हक्क कोणीतरी शेअर करण्याची! कोणाजवळही बोलता न येणारी ही व्यथा!  खरं म्हटलं तर ज्यांना मुलगा आहे ती प्रत्येक बाई मुलाचे लग्न ठरते तेव्हा या अवस्थेतून जात असणारच. कसा विचार करत असेल प्रत्येक आई? ती भावनेला महत्व देते की वास्तवाला?
नीताच्या मुलीचे शाल्मलीचे लग्न ठरले तेव्हा  जावई येणार म्हणून हिची अशी अवस्था झाली का? नाही. कारण जावई हिच्या घरी राहायला येणार नव्हता. हिची लेक जाणार होती. अर्थात जावयाच्या आईची हीच अवस्था झालेली असू शकते जी आज नीताची झाली आहे. मी तिला विचारलं, ‘‘तुला असं का वाटतं आहे की तुझं स्थान डळमळीत  झालं आहे?’’ ती म्हणाली, ‘‘अगं, छोटीशी गोष्ट! घरात अचानक तुमचं कुणी मतही विचारात घेत नाही, दुर्लक्ष करतात तेव्हा गोष्ट मनाच्या तळाशी जाऊन बसते. परवा बठक आटपल्यावर रेवाच्या आईच्या सांगण्यावरून समीर व रेवा फिरायला गेली. एरवी छोटय़ा- मोठय़ा गोष्टींसाठी मला विचारणारा समीर, मला काहीच विचारलं नाही त्यादिवशी. मला वाईट वाटलं आणि जाणीव झाली की, त्याच्या जीवनातील माझं स्थान हललं आहे. आता तर नांदी झाली आहे. ही तर नुसती झलक आहे.’’ तिची व्यथा ऐकली आणि वाटलं, खरंच मुलाचं लग्न ठरलं की, आईचं स्थान दुय्यम होतं? डळमळीत होतं? की हे फक्त तिच्या मनाचे खेळ आहेत?
ch06खरं तर मुलीचं लग्न होऊन ती सासरी येते तेव्हा तिचं स्वतंत्र असं स्थान नसतं. घरची लक्ष्मी इत्यादी बोलायच्या गोष्टी असतात. साधी कोिशबीर करायची झाली तरी आईकडे ज्या पद्धतीने होते तशी करता येत नाही, पण दिवस जातात, महिने जातात, र्वष लोटतात, तसं तिचं राज्य सुरू होतं, ते सून येईपर्यंत! आमच्या एक आजी होत्या, अतिशय प्रेमळ पण स्पष्टवक्त्या! एकदा आम्ही लग्न ठरलेल्या आमच्या मत्रिणीला चिडवत होतो की, आता काय तुझे मखमली दिवस, आम्हाला विसरशील आता. तशी ताडकन त्या म्हणाल्या, ‘ए पोरींनो नसत्या भ्रमात राहू नका. सुरुवातीचे कसले मखमली दिवस? ते तर  फक्त ऐकून घ्यायचे दिवस! जेव्हा तुमची मुलं मोठी होऊ लागतात ते दिवस मखमली! कारण तोपर्यंत घर तुमच्या ताब्यात येतं. सर्व निर्णय, सर्व सूत्रं तुमच्या हाती येतात, खऱ्या अर्थाने घर तुमच्या हक्काचं होतं.’
अर्थात हे स्थान मिळवण्यासाठी स्वत्त्व विसरून आपलं घर या एकाच भावनेने ती सर्व कष्ट करत असते. ‘देणं’ या दोन अक्षरांत तिचं जग सामावलेलं असतं. मुलाचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा कळत-नकळत या स्थानाला बारीकसा धक्का बसतो, हळूहळू हे धक्के वाढत जातात व आणि कधी कधी तर भूकंप होऊ सगळंच उद्ध्वस्त होतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आज विभक्त, स्त्री स्वत:च्या पायावर उभी आहे, मुलगा भारतात असू दे किंवा परदेशात, कालानुरूप स्थल-काल-परिस्थिती बदलली, पण मुलाचं लग्न झालं की, आईच्या स्थानाला काही अंशी तरी धक्का बसतो हे सत्य कायम आहे.
 आमच्याकडे एकदा फॅमिली गेट टुगेटर होतं. चुलत भावाचं नुकतंच लग्न झालं होतं. काकूंचा स्वभाव असा की सर्वाच्या आवडीचे करून पोटभर खायला घालायचे, मग स्वत:ला नाही उरले तरी चालेल. मुलाला हे माहीत होतं, म्हणून तो पहिला घास नेहमी आईला भरवायचा, सर्वाना त्याची ही सवय माहीत होती. त्यादिवशीही त्याने वाटीमध्ये आईस्क्रीम घेतलं, पण पहिला घास बायकोला भरवला. सर्वाचं लक्ष पटकन काकूंकडे गेलं. त्यांचा चेहरा पडला होता. उसनं हसून काही तरी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण निराशा त्या लपवू शकल्या नाहीत. खरं तर त्यांनाही वाटत होतं की, मुलाने व सुनेने प्रेमाने राहावं, पण एवढय़ा दिवसांची सवय अचानक थांबली आणि काकू दुखावल्या गेल्या.  
बाल्कनीत उभी होते. तीच आठवण मनात रेंगाळत होती. सहज खाली लक्ष गेलं. सोसायटीतील राहुल नवीन लग्न झालेली त्याची बायको व आई बाहेर निघाली होती. राहुल ड्राइव्हिंग सीटवर बसला, बाजूला नवीन लग्न झालेली त्याची बायको पटकन येऊन बसली, आईला मागे बसण्याशिवाय पर्याय नव्हता. आईचा खंतावलेला चेहरा माझ्या नजरेनं टिपलाच! खरं म्हटलं तर क्षुल्लक गोष्ट, मानण्या न मानण्याची! आणि अपरिहार्यही, पण कुठे तरी, काही तरी दुखावलं जातच, वाटतं, गाडीतीलच नव्हे तर मुलाच्या जीवनातील स्थान कुणी तरी हिरावून घेतलं आहे.     
या आणि अशा अनेक गोष्टी! आतापर्यंत ‘नवीन कपडे आणायला चलच किंवा तूच तुझ्या आवडीने आण’ असं म्हणणारा मुलगा लग्न झाल्यावर बायकोच्या आवडीचे कपडे आणतो किंवा तीच त्याचे कपडे आणते तेव्हा कुठे तरी त्रास होतोच. आईच्या हातचाच एखादा पदार्थ हवा म्हणून हटून बसणारा मुलगा नावं न ठेवता सुनेच्या हाताचं खातो, तेव्हा जखम खोलवर होते.
     नुकत्याच रस्त्यात जोशी काकू भेटल्या. घामाघूम झाल्या होत्या. मी म्हटलं, एवढय़ा भर उन्हात कुठे गेला होतात? पाणी आणू का? माझ्या बोलण्यातील कळकळ त्यांना जाणवली. डोळे भरून आले. जोशी काका गेल्यानंतर खूप कष्टाने त्यांनी चिरंतनला वाढवलं होतं. त्याचं लग्न झाल्यावर चिरंतन व त्याची बायको वेगळी राहत होती. तेव्हाच आपलं स्थान दुय्यम झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं, पण आईचं हृदय. चिरंतन आजारी आहे कळलं म्हणून बघायला गेल्या, तेव्हा सून ऑफिसला व तिची आई चिरंतनच्या शुश्रुषेला होती. चिरंतन इतका आजारी असून आपल्याला बोलावलंही नाही त्याचं त्यांना जास्त दु:खं झालं. आपल्या मुलाच्या आयुष्यातील आपलं स्थान हरवल्याची त्यांना खात्री पटली व त्या त्याच पावली परतल्या.
 माझ्या बहिणीचा नीलिमाचा फोन आला. तुझा सल्ला हवा. वैतागली होती. म्हणाली, ‘‘सुजितच्या लग्नाला दोन महिने झाले होते. आतापर्यंत लॉकर फक्त मी व माझा नवरा हाताळत होतो. मुलाच्या आग्रहामुळे सीमाचं नावपण घातलं. खरं म्हटलं तर माझं मत होतं जरा स्वभाव कळू दे, हळूहळू नाव घालू. प्रश्न अविश्वासाचा नव्हता! काल मी बँकेत गेले तर सीमा व तिची आई भेटल्या. तिची आई म्हणाली, सीमाला लॉकरमध्ये सामान ठेवायचं होतं म्हणून आलो होतो. मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही.  सीमाची जरी ती आई असली तरी आमच्या आíथक व्यवहारात ती परकी होती. खरं म्हटलं तर सीमा व तिच्या आईने स्वत:हूनच मर्यादा घालून घ्यायला हवी. आता काय करू सांग, दुसरा लॉकर घ्यायला सांगू? नाहीतरी लग्न झाल्यानंतर आपला आíथक व्यवहार वेगळाच ठेवतात ते दोघं. परवाच दोघं नवीन गाडी बुक करून आले व नंतर आम्हाला सांगितलं. गाडी बघायला आम्हाला ‘तुम्हीपण चला’ म्हणाले असते तर? आम्ही का त्यांच्या आवडीच्या विरुद्ध आहोत.’’ तिची तडफड मी समजू शकत होते, परंतु हा प्रश्न चिडचीड न करता शांतपणे सोडवता येऊ शकतो. एवढंच मी तिला सांगू शकले.
  खरंच ईश्वराने आई ही व्यक्ती अशी बनवली आहे की, तिच्या वात्सल्याची सर कोणालाच येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ती मुलांचं इष्टच जपते. काळीज काढून देणाऱ्या आईची गोष्ट सर्वश्रुत आहे, पण म्हणूनच मुलाच्या बाबतीत ती जास्त पझेसिव्ह झाली आहे. मुलीच्या बाबतीत तिच्या जन्मापासून सवय झालेली असते की, ती दुसऱ्याची ठेव आहे, ती एक दिवस दुसऱ्या घरी जाणारच! म्हणून कदाचित अनेक वर्षांपासून तिची भावनिक तयारी झालेली असते, पण मुलगा हक्काचा! (अर्थात अलीकडे एकुलत्या एका मुलीच्या बाबतीतही तिचं हे पझेसीव्हपण दिसायला लागलं आहे.) त्याच्यात ती नको एवढी गुंतून पडते, इतकी की, एकही धागा उसवलेला चालत नाही. म्हणूनच मुलाचं लग्न ठरलं की, अशी आई अस्वस्थ होते. त्याच्यावर हक्क सांगणारी, पर्यायाने मुलावरील हक्कात वाटेकरी येते. आईच्या तालावर नाचणारं घर अडखळू लागतं. पण याचा ही आई अर्थ लावते, आपलं स्थान डळमळीत झालंय!
   खरं तर प्रत्येक लग्नाळू मुलाची आई या अवस्थेतून जाते. पण कोणी प्रामाणिकपणे कबूल करत नाही,  यात नवीन असंही काही नाही. ही जगरहाटी वर्षांनुर्वष सुरू आहे. त्यातल्या अनेकींना मार्ग सापडतो. तर काही जणी आयुष्यभर कुढत राहतात म्हणूनच सून घरात आल्यानंतर आपलं स्थान अढळ राहावं असं वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा व मुलगी यांच्या संसारातील लक्ष काढून घेणं, हे उत्तम. ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलीप्रमाणे मुलाची ‘पाठवणी’ करावी, स्वत:हून त्याचा स्वतंत्र संसार थाटून द्यावा. स्त्री ही अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिका तिने समजून घेऊन निभावली तर अनेक वाद मिटतील. ज्या वेळी ती सासू होते तेव्हा स्वत: सून असतानाचे दिवस आठवले व सुनेला समजून घेतलं तर?
   प्रत्येकीच्या हे लक्षात पाहिजे की, मी जशी सुनेची सासू आहे तशीच माझ्या मुलीचीही कुणी सासू आहे. दोघींचंही स्थान, सुखदु:ख, ताबा, हक्क एकच आहे. म्हणूनच दोघींनी आपल्या वागण्यावर मर्यादा घालून घ्यायला हवी. मुलीच्या संसारात किती लक्ष घालायचं यावर लक्ष्मणरेषा आखायला हवी. आपलं दु:ख दुसऱ्याच्या भूमिकेतून पहिलं तर ते पटकन जाणवतं.  
  जसा सुजित सीमाचा संसार- आपण आपल्या मुलीबरोबर तिच्या सासरचा लॉकर उघडायला जाऊ का, की मुलीला समजावू ही तुमची खासगी बाब आहे म्हणून? मुलगी जावयाने मोठी गोष्ट घेताना तुमचा सल्ला मागितला तर त्यांना सांगू का, की तुमच्या आईबाबांनापण विचारा, की आपणच सल्ले देत राहू? सून घरात आली की, आईला आपले स्थान हलल्यासारखं वाटतं त्याला आजकाल काही अंशी सुनेची आईही जबाबदार असते, कारण सुनेच्या वागण्यातून आईच्या वागणुकीचे पडसाद उमटतात. आजची मुलगी सुशिक्षित आहे, स्वत:च्या पायावर उभी आहे. तिला सल्ले देण्याची गरज नाही. कित्येक वेळा तिलासुद्धा आईचे सल्ले रुचत नाहीत, पण केवळ आई म्हणून ती गप्प बसते.
   कन्यादान करावं की करू नये, त्याला दान म्हणावं का हा वादाचा मुद्दा; परंतु आजही अनेक लग्नात हे सांग्रसंगीत केलं जातं. लग्नात मुलीचं कन्यादान करतात त्यात जबाबदारी पार पडल्याचा आनंद असतो. पण मला वाटतं, कन्यादान पदरात घेऊन मुलाच्या आई-वडिलांना अधिक पुण्य मिळत असावं. कारण दान देण्याच्या अनुभवापेक्षा दान घेण्याचा अनुभव वेगळ्या अर्थाने फार कठीण आहे. कारण सुनेच्या भवितव्याची जबाबदारी आपण घेतो. घेतलेलं दान निभावण्यासाठी हवं दातृत्व ,संयम व मनाचा मोठेपणा. हे तीनही गुण प्रत्येक आईत असतात. पण अनेकदा तिच्या या मोठेपणाची सावली फक्त पोटच्या मुलांनाच मिळते.
    मूल मोठं होतं तसं त्याचं विश्व निराळं होतं. पाखराच्या पंखात बळ आलंय व ते आता तिच्या आधाराशिवाय भरारी घ्यायच्या प्रयत्नात आहे हे तिच्या लक्षातच येत नाही. ती त्याला अडवून ठेवायला बघते व अधिक गुरफटली जाते. त्याच्या पायात बळ आल्यावर त्याला मोकळं सोडलं, स्वातंत्र्य दिलं तर?
आज पाश्चात्त्य देशात मुलं १८ वर्षांची झाली की, घराबाहेर पडतात. स्वत: नोकरी करून शिक्षण करतात. पुढचं आयुष्य ही त्यांची स्वत:ची जबाबदारी असते. लहानपणापासून त्यांना हे माहीत असतं. साहजिकच आई-वडील व मुलं यांचं एकमेकांवर प्रेम असतं, गरजेला एकमेकांना मदत करतात, पण गुंतून राहणं नाही, अपेक्षा नाही. स्थान, हक्क, वाटणी हे प्रश्न नाहीत. एकाच घरात राहून कुढत बसणं नाही, अशांती नाही. प्रत्येक जण स्वत:च्या मर्जीने आयुष्य जगतो. बंधन नाही, पाश नाहीत. म्हणूनच आई-वडील वार्धक्यपण सुंदरतेने जगतात.
     आज इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. सर्वाचा जगभर प्रवास होतो, एकमेकांच्या जीवनाची माहिती होते. आज आपल्याकडेही आई-वडिलांनाही त्यांच्या स्पेसची जाणीव झाली आहे. त्यांनाही निवृत्तीनंतरचं आयुष्य एन्जॉय करायचं आहे. तसं त्यांनी करायला हवं. आजकालच्या व्यग्र आयुष्यात जे जे करायला मिळालं नाही ते या वयात केलं तर मुलंही मोकळी होतील. कारण लग्न झाल्यावर मुलाच्या प्राथमिकता बदलू शकतात म्हणूनच पत्नीचा त्याच्यावर प्रथम हक्क असू शकतो हे सत्य स्वीकारायला हवं. यामुळे  कळत-नकळत आईचं गुंतणंही कमी होईल. अपेक्षांचं ओझं कमी होईल. बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार मुलाचा स्वतंत्र संसार थाटून दिला तर तो स्थानाच्या भोवऱ्यातून बाहेर पडेल. कदाचित हा विचार कोणाला कठोर वाटेल, पण आजच्या काळाची ही गरज आहे. मुलं व आई-वडील दोघांनाही आपली स्पेस हवी आहे, तर मग सामंजस्याने हा प्रश्न सुटला तर काय हरकत आहे? चार भिंतींच्या आड होणारी भांडणं, कोणावर तरी होणारा अन्याय म्हणजे सुदृढ कुटुंब व्यवस्था का? अशा एकत्र कुटुंबापेक्षा चार पावलं दूर राहून अडीअडचणीला उपयोगी पडलं तर का नको?
म्हणून हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे की आयांनी मुलांना आपल्या प्रेमात गुंतवून दुबळं, अस्थिर करू नये, उलट त्याचीही मुलीसारखी मोठय़ा मनाने ‘पाठवणी’ करायला हवी.     

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न