‘आता कुठले आपल्या हातून लेखन व्हायला?’ असे निराशेने म्हणणारी मी पूर्णपणे बदलून गेले. १९९०-१९९१ पासून लिहिता झालेला माझा हात आज वीसहून जास्त वर्षे लिहिताच राहिला आहे. वीस वर्षांमध्ये अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली..’
एम.ए.चे शिक्षण चालू होते. तेव्हाच मराठी विषयात पीएच.डी.साठी संशोधन करण्याची इच्छा मनात निर्माण झाली होती. १९८२ मध्ये मोठय़ा उत्साहाने मी पुणे विद्यापीठात एम.फिल.साठी प्रवेश घेतला. त्यासाठी जयवंत दळवी यांच्या नाटकांचा अभ्यास करून ‘समग्र जयवंत दळवी’ या विषयावर पीएच.डी. करायचे असे योजून मी काम सुरू केले. कोर्सवर्क झाले. प्रबंधिकेचे पहिले लेखन झाले आणि अचानक वेगवेगळय़ा अडचणींची माळच सुरू झाली.
माझी वाडिया महाविद्यालयातील नोकरी काही अपरिहार्य कारणांनी खंडित झाली. नवीन चिंचवडला मिळालेल्या नोकरीसाठी जा-ये करण्यातच दिवस जाऊ लागला. माझे मार्गदर्शक निवृत्त झाले. अचानक सुरू झालेल्या जळवाताच्या दुखण्याने, तर कधी सेप्टीक घेऊन पाय सुजायचे. कधी रक्ताची धार लागायची. किती औषधे केली तरी बरेच वाटत नव्हते. हे सारे कमी म्हणून की काय मोठा मुलगा दहावीत असताना आजारी पडला. जीवावरच्या दुखण्यातून तो वाचला. परंतु आम्ही दोघे पुरते हादरून गेलो. अशा परिस्थितीत लेखन, वाचन, संशोधनाचे विचारही माझ्या मनात येणे शक्य नव्हते. अभ्यासापासून कुठे तरी दूर फेकले गेले होते. निराश झाले. जशी वर्षे जाऊ लागली तसा आत्मविश्वास कमी होऊ लागला. भरपूर वाचन व मनापासून शिकवणे यामध्ये मी माझे मन रमविण्याचा प्रयत्न करीत होते. मानसिक दृष्टीने निराशेचा अंधकारमय काळ होता.
परंतु वातावरण हळूहळू निवळू लागले. मधून मधून यजमान मी पुन्हा काम सुरू करावे म्हणून सुचवत होते. मी प्रबंधिकेची फाइल काढून वाचायची इतकेच. वयाच्या चाळिशीनंतर नवीन विषय घेऊन कितपत काम करता येईल, याबाबत मीच साशंक होते. १९७१ मध्ये यजमानांची महाराष्ट्र बँकेच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या शाखेत बदली झाली. ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. द. दि. पुंडे सरांबरोबर परिचय झाल्यावर यजमानांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. सरांनी माझ्या कामाची चौकशी केल्यावर माझ्या संशोधनाची ‘रामकहाणी’ त्यांना सांगितली.
मी म्हणाले, ‘‘सर दळवींच्या नाटकांविषयीच्या प्रबंधिकेचे कच्चे काम झाले आहे. पण पुढे मला कितपत जमते आहे माहीत नाही!’’ सर उत्साहाने म्हणाले, ‘‘ते कोण ठरविणार? मी बघतो. पुन्हा येताना फाइल घेऊन या. आणि आता पीएच.डी.चा विचारही सोडू नका.’’
चार दिवसांनी सरांचा निरोप आला. माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने टर्निग पॉइंट ठरणारा दिवस उगवला. डॉ. पुंडे यांच्या रूपाने एक ज्ञानवंत, ऋषीतुल्य गुरूच मला भेटले होते. बॅडपॅचमधून मी खरोखर बाहेर पडणार होते. मॉडर्न महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आम्ही बसलो. सर म्हणाले, ‘‘हं वाचा. तुम्ही काय लिहिले आहे. तुम्हाला आवडणाऱ्या नाटकापासून वाचा!’’
मी वाचायला सुरुवात केली. ‘बॅरिस्टर’, ‘संध्याछाया’, ‘महासागर’..सरांनी मध्येच मला थांबवले. माझं अभिनंदन करीत म्हणाले, ‘‘अप्रतिम लेखन केले आहे तुम्ही. तुम्हालाच माहीत नाही- तुम्ही किती उत्तम लिहिता ते. आत्तापर्यंत तुमच्या हातून किती तरी लेखन व्हायला हवे होते. आता मात्र संशोधनाचा विचार सोडू नका. मी मार्गदर्शन करेन. या लेखनाचे काय करता येईल ते बघू.’’ सर बोलत होते. मी भारावून ऐकत होते. त्यांनी माझा आत्मविश्वास मला मिळवून दिला. घरी आल्यावर मी वेगळय़ाच मन:स्थितीत होते. नवीन जाणिवेने दोन दिवसांत प्रबंधिकेने लेखन पुन्हा वाचले. माझीच मला नव्याने ओळख होत होती.
सरांच्या मदतीनेच मला प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाली. मुदत फक्त दोन महिने. पुनर्लेखन करून मी वेळेत संपूर्ण प्रबंधिका सादर केली. ‘नाटककार जयवंत दळवी : सभ्य गृहस्थ हो ! ते पुरुष!’  प्रबंधाला ‘अ’ ग्रेड मिळाली. अधिक हुरूप आला. जयवंत दळवींच्या सर्वच नाटकांचा अभ्यास करून मी पुस्तक लिहिते. ‘दळवींची नाटके : एक अंतर्वेध’ १९९३ मध्ये पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. तीन साडेतीन वर्षांमध्ये लघुकादंबरीची संकल्पना व मराठी लघुकादंबरी या विषयावर पीएच.डी.चे कामही पूर्ण केले. लेखनाचे पर्व सुरू झाले होते.
‘आता कुठले आपल्या हातून लेखन व्हायला?’ असे निराशेने म्हणणारी मी पूर्णपणे बदलून गेले. १९९०-१९९१ पासून लिहिता झालेला माझा हात आज वीसहून जास्त वर्षे लिहिताच राहिला आहे. वीस वर्षांमध्ये अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली. नवीन दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सात-आठ लेखमाला लिहून झाल्या. अन्य लेखन वेगळेच.  ‘स्त्रियांची शतपत्रे: १८५० ते १९५०’ या संशोधन प्रकल्पाला महाराष्ट्र फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. कै.डॉ. सरोजिनी वैद्य यांनी राज्य मराठी विकास संस्थेसाठी ‘सकाळ : वृत्तपत्र व वृत्तपत्र समूह’ हे पुस्तक लिहिण्यास सांगितले. दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. नोकरी, घरातली कामे, जबाबदाऱ्या पार पाडतानाही लेखनाचा प्रवाह सातत्याने वाहत होता. मनाचे समाधान, कामाचा आनंद व समृद्धी किती वाढली सांगता येणार नाही.    ल्ल