आज कहे म कल भजूं पर
काल कहे फिर काल।
आज काल के करत ही
औसर जासी चाल ।।
संत कबीर आपल्या दोहय़ामध्ये म्हणतात, माणसाची फार मोठी कमाल आहे. आज म्हणतो, मी उद्यापासून भजन करेन, उद्या आल्यावर पुन्हा ‘उद्या’ची भाषा करू लागतो, असे करण्यामुळे साधनेस योग्य असा ‘वर्तमानकाळ’ हातातून निसटून जातो.
साधनेची योग्य वेळ कुठली?
शरीरसाधना करण्यासाठी आदर्श वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पण पहाटे उठता येत नाही म्हणून आम्ही साधनाच करणार नाही असे चालणार नाही. ज्या क्षणी जमेल त्या क्षणी मनापासून केलेले सत्कृत्य ‘साधना’ या सदरात बसते. ‘भजन’ करणे याचा अर्थ नुसतेच भक्तिसंगीत, टाळ कुटणे, रिकामपणाचे उद्योग असा घ्यायचा नसून केलेल्या प्रत्येक कृतीत ‘भक्तिभाव’ आणणे असा होतो. ‘आज माझ्या हातून घडणारे कर्म हे त्याचीच कृपा, त्याचे फळही त्यालाच समíपत करू या’ ही भावना प्रचंड मानसिक समाधान, आनंद देते. ही सत्कृत्याची मानसिक साधना चोवीस तास होऊ शकते.
आज आपण खांद्याचा सांधा सल करू या. या वयात खांदेदुखीचा त्रास असल्यास सावकाश कृती करा. सुखावह बठक स्थिती घ्या. उजव्या हातांची बोटे उजव्या व डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर ठेवा. आता गोलाकार घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने खांदे फिरवून घ्या. हाताचे कोपरे वर जाताना खोलवर श्वास घ्या. वर्तुळाकार रीतीने कोपरे खाली घेताना श्वास सोडा. सावकाशपणे साधारण दहा आवर्तने करा. काल्पनिक वर्तुळ शक्य तितके मोठे करा. स्पाँडिलायटिस, खांदा आखडणे, खांद्यामध्ये आलेला थकवा, ताण दूर करण्यासाठी या आसनांचा लाभ होतो. 

खा आनंदाने! : नैवेद्य
चत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापकी एक- गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे. सूर्योदयापूर्वी गुढी उभी करण्याच्या काठीची (ब्रह्मध्वज)साग्रसंगीत पूजा करावी हे तुम्हा सर्वाना माहितीच आहे. तुम्ही आयुष्यभर या रीती पाळल्या आहेत. मग आज मी वेगळं काय सांगणार? जर बनवलेला नवेद्य काही कारणाने खाता येणार नसेल (आजार किंवा औषध) तर सण कसा साजरा करायचा? हा ‘पाडवा मेनू’ खास तुमच्यासाठी! सकाळी मुखमार्जनानंतर कडुिनबाची कोवळी पाने, िहग, ओवा, चिंच खाण्याचा प्रघात आहे. आंबट, तुरट, तिखट रसाचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे. याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवनशैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.
मसालेभात
(स्पेशल आजी-आजोबांसाठी)
१/२ कप – दलिया, १/४ कप – सालीची मूगडाळ, १/४ कप मिश्र भाज्या – फरसबी / तोंडली / वांगं / मटार / गाजर वगरे, १-१ चमचा तेल आणि तूप, १ टी-स्पून मोहोरी, १ टी-स्पून जिरे, १/२ टी-स्पून हळद पावडर, १/४ चमचा िहग, ३ कप पाणी, मीठ चवीनुसार, १ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा गोडा / काळा मसाला.
सजावटीसाठी किसलेला नारळ + कोिथबीर
*पाण्यात दलिया आणि डाळ स्वच्छ धुवा आणि बाजूला ठेवा.
* तेल गरम करा आणि मोहरी आणि जिरे, हळद आणि चिमूटभर िहग घालून फोडणी करा.
* भाज्या, काजू घालून थोडे परतून घ्या. मग धुतलेला दलिया आणि डाळ घाला आणि परता.
*आधणाचं पाणी घाला. मीठ , गोडा / काळा मसाला आणि लाल मिरची पावडर घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे शिजवा.
*बारीक चिरलेली कोिथबीर आणि किसलेले नारळ भुरभुरा. वरून १चमचा साजूक तूप घाला.
सोबत : कोकम किंवा टोमॅटो सार, फेसलेल्या मोहरीची फोडणी असलेली किसलेली काकडीची कोिशबीर, पुदिना -कोिथबिर चटणी, मूगडाळीच, गूळ घातलेलं पुरण – एकदम झक्कास बेत!
वैदेही अमोघ नवाथे आहारतज्ज्ञ

आनंदाची निवृत्ती : पंचसूत्रीनुसार वाटचाल
अठ्ठावन्नाव्या वर्षी मी निवृत्ती घेतली त्याला लवकरच १३ वर्षे पूर्ण होतील. परंतु कालच निवृत्त झालो, असे मला वाटते. कारण माझी निवृत्तीनंतरची वाटचाल या पंचसूत्रीवर चालू आहे –
* १७/१८ तासांची कार्यशील दिनचर्या.
* माझ्याजवळील पुंजी माझी नसून मी तिचा एक ट्रस्टी आहे असे मी समजतो.
* समाजाकडून काही मिळवण्याची अपेक्षा न ठेवता या ना त्या स्वरूपात समाजासच काही देण्याचे धोरण.
* आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे.
* जिच्या पाठिंब्यावर मी या स्थितीत आहे, त्या माझ्या अर्धागिनीला सुखात आणि आनंदात ठेवणे.
बालवयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सान्निध्य लाभले. त्यामुळे गेली पन्नास वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत मी कार्यरत आहे. या अनुषंगाने ग्रामीण आणि शहरी भागात तसेच समाजाच्या विविध स्तरांत आणि विविध वयोगटांत काम करण्याची मला संधी मिळाली.
बँकेतील नोकरीमुळे वेगवेगळ्या प्रांतांत आणि तेथील खेडय़ांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला. नोकरीतील सोयी/सवलतींमुळे भारत दर्शनही घडेल. अशा प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीवर निवृत्तीनंतर लोकांमध्ये राहणे सोपे झाले.
नातेवाईक, संघपरिवार, आमची हाउसिंग सोसायटी, ज्या शिक्षण संस्थेत मी अनेक वर्षे काम केले तेथील सहकारी, बँकेतील मित्रमंडळी अशा विविध समुदायांत वरचेवर जाणे सहज प्रवृत्ती झाली आहे.
शतायुषी होईन की नाही माहीत नाही. परंतु दीर्घायुष्याची किल्ली सापडली आहे असे मला वाटते.
अच्युत खरे

पुणे हेल्पलाइनपुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी ०२०-२६११११०३ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचे काम सोमवार ते शुक्रवार सकाळी ९-३० ते सायं. ४ या वेळेत चालते. ज्येष्ठ नागरिकांनी हेल्पलाइनला संपर्क साधल्यानंतर त्यांच्या समस्यांचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांना मदत उपलब्ध करून दिली जाते. आवश्यकता असेल तर तज्ज्ञांच्या मदतीने समुपदेशनही केले जाते. अनेकदा रस्त्यावर दिवे लागलेले नाहीत, एखाद्या कार्यालयात मदत केली जात नाही अशा तक्रारी सांगणारेही फोन येतात. अशा वेळेस संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून तक्रार निवारणाचा प्रयत्न केला जातो. या हेल्पलाइनचे वैशिष्टय़ म्हणजे ज्येष्ठांनी संपर्क साधल्यानंतर स्वत: वरिष्ठ अधिकारी त्या समस्येमध्ये लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.

धडपडे आजी-आजोबा : स्वत:चेच विक्रम मोडणारे युचिरो
२००३ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी तर २००८ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी आणि २०१३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी जपानच्या युचिरो आजोबांच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली आहे. ही नोंद ज्या कारणासाठी झाली त्याची दखल घेण्यात आली आहे ते कारण मोठे धाडसी आहे. युचिरो आजोबांनी प्रत्येक वेळी स्वत:चाच माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम मोडीत काढलाय. ते माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातील पहिले ज्येष्ठ नागरिक आहेत. जापनीज स्किअर (बर्फावरून स्केटिंग) केझिओ मिऊरा यांचे ते पुत्र आहेत. युचिरो यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा गोटा मिऊरा हादेखील गिर्यारोहक असून त्यानेही वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे.
६ मे १९७० रोजी माउंट एव्हरेस्ट शिखर स्कीइंग करून सर करणारे युचिरो हे पहिले स्कीअर आहेत. ‘द मॅन हू स्काइड डाऊन एव्हरेस्ट’ हा लघुपटही त्यांच्यावर तयार करण्यात आलेला आहे. १९७५ मध्ये उत्तम लघुपटासाठीचा ‘अकेडमी अॅवॉर्ड’ प्राप्त झालेला हा पहिला ‘खेळ लघुपट’ आहे.
८० व्या वर्षी तिसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या या आजोबांची आतापर्यंत सहा ऑपरेशन्स झाली आहेत. या वयातही युचिरो दर महिन्याला गिर्यारोहणाचे किमान ३० कार्यक्रम न थकता घेतात. युचिरो आजोबांचे आणखी एक ऑपरेशन होणार आहे, परंतु ते होण्याआधी त्यांना स्कीइंगसाठी जपानमधील ‘सापोरे’ या ठिकाणी भेट द्यायची आहे. सध्या ८२ वर्षे वय असलेल्या युचिरो यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी हिमालय पर्वतरांगांमधील ‘चोओयु’ हे शिखर पादाक्रांत करण्याचा संकल्प सोडला आहे. आता बोला..
संकलन-गीतांजली राणे