.. संगीता थोडी विचारात पडली, नंतर विचार केला, बाळ आपल्याच घरात आपल्याबरोबर राहणार, थोडा त्रासही होईल पण दत्तक घेतल्याने त्या जोडप्याचं आयुष्यभराचं दु:ख कमी होईल. या विचारांने ते नवरा-बायको दोघे दत्तक विधीला तयार झाले.
माझ्या दिराला दोन्ही मुलगेच, बहिणीलाही दोन्ही मुलगेच असल्याने त्यांनाही मुली हव्या होत्या. मुलगी नाही म्हणून त्यांना आजही वाईट वाटते. त्याहूनही एक वेगळा अनुभव म्हणजे माझ्या मैत्रिणीचा. तिला दोन हुशार मुलगे, पण मुलगी नाही म्हणून थोडी ती हिरमुसलेली. मला म्हणाली, ‘आपकी बेटी बहुतही अच्छी है। मुझे दे दो ना, बहुतही प्यारी है।’ तिच्या या वाक्याने मी दचकलेच. आपला पोटचा गोळा असा कुणाला द्यावासा वाटेल?
.. पण एक घटना अशी घडली की त्याने मलाही विचारात पाडलं. माझी कामवाली संगीता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने ती आनंदात होती. पण एके दिवशी मला म्हणाली, ‘मी आणखी एका बाळासाठी ‘चान्स’ घेतला आहे.’ मी म्हणाले, ‘तुझी दोन्ही मुले गोजिरवाणी आहेत. त्यातही एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना नीट शिकव, संस्कार चांगले कर, मोठे कर आणखी तिसरे मूल कशाला?’
  ती म्हणाली, ‘मला पहिला मुलगा झाला. सारे घर आनंदी झाले. त्यानंतर मुलगी झाली. भावाला बहीण मिळाली. आम्ही सारे आनंदी झालो. पण माझ्या थोरल्या दिराला मूलबाळ नाही म्हणून ते कष्टी होते. डॉक्टरांनीच तसं सांगितल्यामुळे त्यांच्या आशा संपल्या होत्या. त्यामुळे सासूबाईंनीच सांगितले, ‘संगीता, आता तूच एक ‘चान्स’ घे आणि जे बाळ होईल ते दिराला दत्तक दे.’
  संगीता थोडी विचारात पडली. नंतर विचार केला, बाळ आपल्याच घरात आपल्याबरोबर राहणार, थोडा त्रासही होईल पण दत्तक घेतल्याने त्या जोडप्याचं आयुष्यभराचं दु:ख कमी होईल. या विचारांने ते दोघे तयार झाली.
संगीता आणि तिचे कुटुंब मराठवाडय़ातील मागास भागातील एक गरीब शेतकरी कुटुंब. यातील त्यांचे विचार समाजालाही विचार करायला लावणारे ठरले. शिक्षण कमी असलेल्या या कुटुंबाने मोठय़ा धाडसाने पाऊल उचलले. घरातले विचार म्हणजे मोठय़ा मनाचे निदर्शन होते. संगीताने होणारे मूल म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, दिराला दत्तक द्यायचे अन जाऊ-दिराला आनंदी बघायचे हा निर्धारच केला होता.
 संगीताला मुलगी झाली आणि दत्त जयंतीच्या मुहूर्तावर संगीताकडे ‘दत्तक’ समारंभ मोठय़ा आनंदाने, समाधानाने पार पडला. आपली छोटी तान्हुली तिने आपल्या जाऊबाईच्या ओटीत दिली आणि समाधान पावली.
आज समाजात ‘मुलगी झाली हो’ ही बातमी सांगताना अनेकांची नाके मुरडली जातात. काही कुटुंबं दु:खी होतात. पण या ‘दत्तक’ देण्याच्या समारंभाने समाजाला एक चांगली दिशा दिली. नवे विचार मांडणे आणि ते स्वीकारणे यांसारख्या दिव्य दानाचा पायंडा पाडला, असे म्हणावयास हरकत नाही.  समाजाने यापुढे अशा परंपरेकडे लक्ष यायला हवे या विचाराचे स्वागत करायला हवे. तसेच जागरूक समाज, विचारवंत यांनाही विचार करायला लावणारी ही प्रथा ठरणार आहे.
 ‘मुलगी दत्तक दिली किंवा दत्तक मुलगी घेतली’ ही प्रथा समाजात जर रुजली तर समाजहिताच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरणार आहे. समाजात ज्या अनिष्ट रूढी होत्या त्या दूर करण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले, पण समाजातील घटकांकडूनच असे विचार रुजत गेले तर समाज सुधारणेला वेगाने चालना मिळू शकेल. स्त्रीवर होणारे अत्याचार, हत्या इत्यादींवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल असे विचार करणाऱ्यांचे व प्रथा पाडणाऱ्या व्यक्तींचे समाजाकडून कौतुक, शासनाकडून सत्कार व्हायला हवा. समाज सुधारणेला यातून नवी दिशा मिळू शकेल.