परक्या देशात गेल्यावर भाषा येत नसल्यानं वाट खडतर होते. असंख्याचा हा प्रश्न ‘कल्चरअ‍ॅली’नं सोडवला आहे, मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून.  या अ‍ॅपमुळे मोबाइलवरच नवी भाषा अगदी सहजपणे शिकता येणार आहे. प्रन्शू पटनी या तरुणीच्या यामागील महत्त्वपूर्ण योगदानाविषयी.

नि मित्त शिक्षणाचं असो की नोकरीचं परदेशात जायचं म्हटलं की एक अडचण ठरलेली असते, ती म्हणजे भाषेची. परक्या देशात राहायचं तर गरजेपुरती का होईना तिथली भाषा यायला हवी. त्यामुळेच परदेशात जायचं ठरलं की सुरू होते ती तिथली भाषा शिकण्याची धडपड. क्लास लावून किंवा पुस्तक, सीडी, अ‍ॅपच्या माध्यमातून त्या भाषेचे धडे घेण्याचा एक मार्ग. पण क्लासला जाणं, सीडीज ऐकणं, पुस्तकांवरून भाषा शिकणं यासाठी वेळ मिळतोच असं नाही. शिवाय या माध्यमातून भाषेचे धडे, गिरवणे म्हणजे शास्त्रशुद्ध भाषा शिकवण्याच्या पद्धतीनं जावं लागतं, दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारे शब्द, नेहमीची व्यावहारिक वाक्ये, वाक्चप्रचार असे कामापुरते चटकन शिकता येईल अशी सोय नसते. अशा परिस्थितीत करायचं काय, या प्रश्नावर रामबाण उपाय शोधला आहे, प्रन्शू पटनी या तरुणीनं. परदेशी जाणाऱ्यांना तिथली भाषा सहजपणे शिकता यावी यासाठी तिने ‘कल्चरअ‍ॅली’ नावाचं व्यासपीठच उपलब्ध करून दिलंय.
 परदेशातली भाषा शिकण्यात येणाऱ्या अडचणी प्रन्शूनं अगदी जवळून अनुभवल्या. २०१२ मध्ये तिच्या नवऱ्याला, निशांतला कामासाठी काही काळ चीनमधल्या शांघाय या शहरात राहावं लागणार होतं. त्यावेळी तो अमेरिकेतल्या ‘केलॉग्ज स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ मध्ये शिक्षण घेत होता. एका एक्सेंज प्रोग्राम अंतर्गत त्याची निवड झाली होती. निशांत शाकाहारी. त्यामुळे चीनसारख्या देशात स्थानिकांना आपल्या खाण्यापिण्याच्या गरजांबद्दल समजवायचं कसं, याची त्याला काळजी होती. शांघायमध्ये राहायचं तर त्याला तिथली ‘मँडरिन’ ही स्थानिक भाषा येणं गरजेचं होतं. मग पुस्तकं, ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून निशांतनं ‘मँडरिन’ शिकण्याचा प्रयत्न केला. पण दररोजच्या व्यस्त दिनक्रमात मँडरिनचे धडे घेणं त्याला जमेना. निशांतप्रमाणेच बहुसंख्य लोकांना एखादी तरी परदेशी भाषा शिकायची इच्छा असते. पण आपल्या वेळेनुसार निवांतपणे भाषा शिकण्याची फारशी साधनंच उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी येतात, हे प्रन्शूला जाणवलं. २०१२ च्या मध्यात निशांतही शांघायहून परतला पण या भाषेच्या अडचणीवर काहीतरी उपाय शोधायचा, असा निश्चय करूनच. मग त्याने प्रन्शूच्या साथीनं ‘इन्टॅप लॅब्स’ नावाची कंपनी सुरू केली.
 ‘इन्टॅप लॅब्स’च्या माध्यमातून या दोघांनीही ‘कल्चरअली’ हे परदेशी भाषा शिकण्याचं नवं व्यासपीठ लोकांना उपलब्ध करून दिलं. मँडरिन, स्पॅनिश या परदेशी भाषांसह इंग्रजी, िहदी आणि पंजाबी अशा अनेक भाषा या माध्यमातून शिकता येतात. २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये ‘कल्चरअ‍ॅली’ हे अ‍ॅपही लाँच झालं. आतापर्यंत जगभरातल्या २२० देशांमधल्या साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून घेतलंय. गुगलच्या प्ले स्टोअरमधलं हे लोकप्रिय अ‍ॅप ठरलंय. या अ‍ॅपच्या निर्मितीत प्रन्शू पटनीचा मोठा वाटा आहे.  
कल्चरअ‍ॅलीमुळे अपरिचित भाषेतून संवाद साधण्याचा हा बिकट मार्ग बराच सोपा झाला आहे. ‘कल्चरअ‍ॅली’मुळे भाषेच्या अडचणी दूर होतायत. स्थानिक भाषेत बोलल्यानं लोकांमधला दुरावाही कमी होतोय. अशा अनेक प्रतिक्रिया, या माध्यमातून भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. बरं विद्यार्थीसुद्धा आहेत तरुणांपासून, व्यावसायिकांपासून ते आजी-आजोबांपर्यंतचे. या सगळ्यांना नवी भाषा शिकण्याचा निखळ आनंद देणारी, प्रन्शू पटणी म्हणूनच खऱ्या अर्थानं ‘चेंज मेकर’ ठरली आहे.
 ‘कल्चरअ‍ॅली’ प्रमाणेच परदेशी भाषेचे धडे देणारी बरीच अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण ‘कल्चरअ‍ॅली’ स्पर्धकांपेक्षा सर्वार्थानं वेगळं ठरलंय. म्हणूनच या अ‍ॅपला जगभरातूनच प्रचंड प्रतिसाद मिळतोय. परदेशी भाषा शिकण्याची प्रक्रिया ओझं न वाटता शिकणाऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनावी, या पद्धतीनं ‘कल्चरअॅली’ची रचना करण्यात आली आहे. फक्त पाठांतराने कोणतीही भाषा शिकता येत नाही. तसंच एखादी भाषा शिकल्यानंतर त्या भाषेत संवाद साधता येणं गरजेचं असतं. ‘कल्चरअॅली’चाही हाच प्रयत्न आहे. जी भाषा शिकायची आहे त्या भाषेसोबत आपली मत्री झाली की संवाद साधणं फारसं अवघड नसतं. म्हणूनच ‘कल्चरअॅली’मध्ये सोशल साइट्चाही प्रभावी मदत घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनं ‘कल्चरअॅली’त एकदा लॉग इन केलं की ट्वीटर तसंच फेसबुकवरच्या न्यूजफिडमध्ये त्या भाषेतले शब्द टाकले जातात. यामुळे विद्यार्थी भाषा जास्त चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. फेसबुकवर ब्राउिझग करतानाही तो भाषेच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे त्या भाषेत संवाद साधणं सोपं होऊन जातं. नवे शब्द सतत डोळ्यांखालून गेल्याने विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढते.
   ‘कल्चरअॅली डॉट कॉम’ या वेबसाइटची रचनाही आटोपशीर आणि आकर्षक आहे. या साइटमध्ये लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू होतं. ‘कल्चरअॅली’ची अनेक वैशिष्टय़े आहेत. यात भाषाशिक्षणासाठी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करण्यात आला आहे. भाषेचे धडे देणारे व्हिडीओज साइटवर उपलब्ध आहेत. स्पॅनिशचे ७०, मँडरिनचे ३० आणि िहदीचे १८ व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमधून संवाद, व्याकरण, शब्दसंपत्ती आणि उच्चार यांचं शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि श्रवण कौशल्य वाढवण्यासाठी विविध गेम्स व पझल खेळण्याचा पर्यायही आहे. ‘ऑडिओ डिक्शनरी’ हेसुद्धा ‘कल्चरअॅली’चं एक वैशिष्टय़ं आहे. नेहमीच्या वापरातल्या हजारपेक्षा जास्त शब्दांचे अर्थ या डिक्शनरीत पहायला मिळतील. यासोबतच त्या त्या भाषेच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्काइपवर व्हीडिओव्दारे थेट मार्गदर्शनही मिळू शकतं. विद्यार्थी आपल्या सोयीनं व्हिडीओ मार्गदर्शनाची वेळ निवडू शकतात. प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनही विद्यार्थी आपल्या शंका दूर करू शकतात. यामुळे अगदी क्लासमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळतो.  
  प्रत्येक भाषेचा लहेजा जपण्याचा ‘कल्चरअॅली’चा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक भाषा शिकवण्याची पद्धतही वेगळी आहे. ‘कल्चरअॅली’मध्ये उपलब्ध असलेल्या भाषांच्या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं, हेही विद्यार्थ्यांना पाहता येतं. तुम्ही काय शिकला आहात याची उजळणी आणि सराव करण्याची सोयही यावर आहे. सीडी, प्लॅशकार्डच्या माध्यमातून भाषा शिकण्याची पद्धत आता जुनी झाली. कारण सीडीज, फ्लॅशकार्डस विद्यार्थ्यांला भाषेशी जोडून ठेवत नाहीत. पण विद्यार्थ्यांना भाषेशी जोडून ठेवण्याच्या दृष्टीनं, संवाद साधण्याच्या माध्यमातून कल्चरअॅली अॅपची रचना करण्यात आली आहे.
    दरवर्षी जगभरातले जवळपास एक अब्ज लोक नवी परदेशी भाषा शिकण्याच्या प्रयत्नात असतात. त्यापकी ६० टक्के लोक इंग्रजी भाषा शिकण्याला प्राधान्य देतात, असं प्रन्शू सांगते. ‘कल्चरअॅली’च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या भाषेच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असावा, यावर प्रन्शूनं भर दिलाय. ‘कल्चरअॅली’ वेबसाइट आणि अॅपवरचा मजकूर भाषातज्ज्ञ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. भाषा शिकवणारी इतर अॅप्स िहदीतून इंग्रजीत फक्त भाषांतर करतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकडे त्यांचा कल कमी आहे. दृकश्राव्य माध्यमाचाही त्यात फारसा वापर केला जात नाही. ‘कल्चरअॅली’नं नेमकी हीच कमतरता हेरली आहे. दृकश्राव्य माध्यमाचा कल्पक वापर व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या भाषेत संवाद साधण्याची संधी ही दोन  वैशिष्टय़े ठरल्याचे प्रन्शूचे म्हणणे आहे.
    प्रत्येक देशाची स्वतची संस्कृती आणि भाषा असते. भाषा शिकली तर त्या देशातली संस्कृती जाणून घेता येते. स्थानिकांशी संवाद साधता येतो. त्या देशाशी एकरूपही होता येतं. आपण जिथे जाणार त्या देशाची भाषा येणं गरजेचं असतं. संवादाचा अभाव कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीत अडसर ठरता कामा नये, हाच  विचार प्रन्शू आणि निशांत पटनी या जोडप्यानं केला आणि ‘कल्चरअॅली’ही संकल्पना प्रत्यक्षात आली. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून ‘कल्चरअॅली’नं भाषा शिक्षणाला एक नवा आयाम दिला आहे. म्हणूनच कल्चरअॅली भविष्यात भाषा शिक्षणाचं एक प्रभावी माध्यम ठरू शकेल, यात शंका नाही.   
श्रीशा वागळे-जादोन – shreesha.indian@gmail.com
  

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका