‘‘खूप पर्याय असणं म्हणजे चैन नाही का? नाही, तसं फक्त भासतं. खाण्यापासून शिक्षणापर्यंत एकेका गोष्टीला असंख्य पर्याय झाले की निवडताना जीव कसा दडपतो, आपण निवडलेला पर्याय चुकीचा तर नाही ना म्हणून धास्तावतो. थकतो हो आम्ही, थकतो एकेकदा त्याने.’’चांगले दीड-पावणे दोन महिने इथे घालवून अप्पाकाकांची गावी परत जायची वेळ आली तरी आपण त्यांच्याकडे म्हणण्यासारखं लक्ष देऊ शकलेलो नाही ही जाणीव झाली तेव्हा घरातले सगळेच जरा ओशाळले. त्यांच्या मुक्कामातला शेवटचा रविवार सगळ्यांनी एकत्रपणे आणि मजेत घालवायचं ठरायला लागलं. अप्पाकाकांना कुठे तरी फिरायला न्यायचं, काही तरी छानशी भेट द्यायची आणि बाहेरच जेवून रमतगमत घरी यायचं या दिशेने चर्चा सुरू झाली. रविवारी, भल्या सकाळी १० वाजता, ‘‘लेट्स गो टू इन्फिनिटी मॉल. अप्पाकाकांना आवडेल तसं छानसं मनगटी घडय़ाळ घेऊ या तिथे. नाही तरी त्यांच्या मनगटावरच्या घडय़ाळातले काटे दिसेनासे झाल्येत त्यांना. मोठ्ठं डायल बघू या. सायकेडेलिक आकडे असलेलं,’’ पपानं जाहीर केलं. लग्गेच सनीनं त्यांना पंक्चर केलं.
‘‘आर यू क्रेझी पपा? इन्फिनिटी मॉलला आता कोणी जातं तरी का? बिग बोअर! त्यापेक्षा ‘सनी साइड अप’ला जाऊ. काय व्हरायटी असते तिथे?’’
‘‘पण स्कीम्स नसतात चांगल्या. आपल्या कोपऱ्यावरच्या त्या नव्या मॉलमध्ये फ्लॅट ३० टक्के सवलत आहे मिस्टर, आहात कुठे?’’ छकुलीनं ऐकवलं.
‘‘आपण अप्पाकाकांना एकच गिफ्ट देणार. त्यात सवलतीचा विचार कशाला करायचा?’’ ममाने विवेकाची टोचणी लावली.
‘‘मी विचार करत नाहीये, सहज सांगत्येय. शिवाय तिथे पिझ्झापण एकावर एक फ्री आहे वाटतं. फूडमॉलला,’’ अनुभवाचे बोल आले.
‘‘अप्पाकाकांना पिझ्झा चावेल तरी का? त्याऐवजी आपण ‘शुभंकरोती’ डायनिंग हॉलला जाऊ. त्यांना आवडणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतील तिथे.’’
‘‘अरे यारऽ सुट्टीच्या दिवशी भातावर वरण पिळून खायचं का?’’
‘‘तुला वरणभातावर लिंबू पिळण्याविषयी काही म्हणायचं का?’’
‘‘उगाच पिळू नकोस. पॉइंट लक्षात घे. वरणभात तर काय, ते रोजच खातात. त्यापेक्षा एखादय़ा मल्टिकुझिन जॉइंटला नेलं तर? प्रत्येकाला हवं त्या देशाचं अन्न..’’
‘‘मुळात या खेपेला अप्पाकाकांचं खाणंच फार कमी झालंय. त्यातल्या त्यात आइस्क्रीम आवडताना दिसतंय. गार, गोड आणि मऊ!’’
‘‘मग चला बास्किन रॉबिन्सच्या एखाद्या जॉइंटवर. खा म्हणावं किती खाता ते!’’
‘‘ते इम्पोर्टेड नको रे! साधी आपली माठातली कुल्फी आवडत असेल त्यांना.’’
‘‘माठ आहात सगळे. चला चला.. अगोदर बाहेर तर पडू. मग ठरवत जाऊ एकेकाच्या आवडीनुसार,’’ पपाने चर्चासत्रं आवरतं घ्यायची सूचना केली. पण तिच्यातून उलट त्याला वेगळीच गती मिळाली.
‘‘माझा एक तासाचा ओरिएण्टेशन कोर्स आहे. तिथे मी माझ्या बाइकवरून जाईन आणि तिथलं संपलं की तुम्हाला येऊन मिळेन,’’ सनीने सुनावलं.
‘‘मला आपल्या या कार्यक्रमानंतर मैत्रिणीकडे जायचंय. मला तुम्ही लोक तिथे सोडाल, का मी मैत्रिणीला तिथे बोलवू?’’
‘‘तिथे म्हणजे कुठे बोलवणार? आपण दहा ठिकाणी फिरणार. मला तर मुळात प्रश्न पडलाय. त्यांना घडय़ाळ द्यावं, का चांगला मोबाइल घेऊन द्यावा? आजकाल मोबाइल्सच्या काही मॉडेल्सवर खूप ठळक घडय़ाळं असतात. आमच्या भिशीतल्या एकीनं तिच्या आईला सहस्रचंद्रदर्शनाचं दिलंय घेऊन.’’
ममानं पुन्हा हरिदासाची कथा मूळपदावर आणली. हे घ्यायचं का ते, अमुक ठिकाणी घ्यायचं का तमुक ठिकाणी, असं जायचं का तसं, खाण्यासाठी याची निवड करायची का त्याची, कोण कसं कुठवर जाणार, असल्या प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टीवर चक्राकार चर्चा करण्याचं चक्र पुन्हा फिरवत होती ती. तेही तिला नकळत. हे सगळं ज्या अप्पाकाकांसाठी करायचं ते यात कुठेच नव्हते. घरात होते पण दूर होते, शांत होते, अलिप्त होते. शेवटी पपाला त्यांच्यासमोर जावंच लागलं.
‘‘सॉरी हं अप्पाकाका, तुमच्याच करमणुकीसाठी आम्ही काही काही ठरवतोय. पण तुम्हाला विचारत नाही आहोत.’’
‘‘चालू द्या.’’
‘‘जास्त उशीर नाही करणार. प्रॉमिस.’’
‘‘अरे ठीक आहे. मला कुठे दुसरीकडे जाऊन काही मोठा तीर मारायचा आहे?’’
‘‘तो आम्हीही मारत नसतोच हो. खूप खल मात्र करतो. साधं सिनेमाला जायचं म्हटलं तरी कुठला सिनेमा आणि कुठलं थिएटर यावर आमच्याकडे चौघांची चारशे मतं असतात.’’
‘‘छान आहे की मग! पंचेचाळीस वर्षांपूर्वी मी हे गाव सोडलं तेव्हा इथे फक्त दोनच चित्रपटगृहं होती. एकात देशी सिनेमे लागत, दुसऱ्यात विदेशी! संपलं! चर्चा तरी कशावर करणार? ते दाखवतील तो सिनेमा, खिशात पैसे असले तर आम्ही बघणार.’’
‘‘आता एकेका थिएटरमध्ये ५-६ स्क्रीन्स असतात. दिवसाच्या १५-१६ तासांत पंचवीस-तीस खेळ होतात सिनेमांचे.’’
‘‘काय सांगतोस? मजा आहे तुम्हा लोकांची.’’
‘‘असं तुम्हाला वाटतं.’’
‘का? खूप पर्याय असणं म्हणजे चैन नाही का?’’
‘‘तसं फक्त भासतं. ते नसताना. खाण्यापासून शिक्षणापर्यंत एकेका गोष्टीला असंख्य पर्याय झाले की निवडताना जीव कसा दडपतो, आपण निवडलेला पर्याय चुकीचा तर नाही ना म्हणून कसा धास्तावतो हे एकदा अनुभवलं की बरोबर कळतं.’’
‘‘मला तुझं बोलणं कळत नाहीये बाबा!’’
‘‘हेच बघा ना, तुम्हाला एक घडय़ाळ घेऊन द्यायचंय मला. एक साधं.. रोजच्या वापराचं. घडय़ाळ! आज बाजारात घडय़ाळांचे पन्नास शंभर ब्रॅण्ड्स असणार, ते आणखी पन्नास-शंभर दुकानांमध्ये मिळणार, त्यांच्यासाठी आणखी पन्नास-शंभर सवलतीच्या स्किमा, योजना, ऑफर्स असणार, आम्हा चौघांचे त्याबाबत पाच-पन्नास वेगवेगळे मुद्दे असणार.. या सगळ्यामागे अर्धा-पाऊण दिवस खर्चून आम्ही शेवटी घडय़ाळ खरेदी करणार जे तुम्ही तुमच्या काळात एका दुकानातून एका तासात खरेदी केलं असतंत. मग सांगा- कोणाचं काम सोपं? तुमचं का आमचं?’’ यावर अप्पाकाका काहीही बोलले नाहीत. सावरून म्हणाले, ‘‘मला कोणचंही जेवण चालेल बरं का!’’
‘‘पण मुलांना नाही चालणार अप्पाकाका. त्यांना एकीकडचं जेवण, दुसरीकडचं आइस्क्रीम आणि तिसरीकडची पानपट्टी लागेल. ते सगळ्यांचं सगळं तंत्र सांभाळताना आम्ही अर्धा-पाऊण दिवस खर्चल्यावर फक्त जेवू आणि त्यावरही कोणी तरी म्हणेलच, की बुवा यांच्यापेक्षा त्या फलाण्याढकाण्या ठिकाणी गेलो असतो तर बरं झालं असतं.’’
‘‘आमच्या वेळी दोन खाणावळी होत्या इथे. एक शाकाहारी. एक मांस-मच्छीवाली. पण तो शाकाहारीवालासुद्धा शनिवारी सकाळी बटाटेवडे करत नसे. उपासाचा वार ना तो? सगळ्यांनी साबुदाणावडा खा हवा  तर. इतर कांदालसणीचे पदार्थ नाहीत! असले एकेक समज तेव्हाचे!’’
‘‘होय ना.. तुम्ही काय खावं हे त्या खाणावळवाल्यानं ठरवावं म्हणजे कमालच होती, पण त्यामुळे तुमचं तुम्हाला ठरवावं लागत नव्हतं ना? इतर माणसं, नाती, व्यवस्था यातून परस्पर तुमचे निर्णय व्हायचे. आता प्रत्येक छोटय़ा छोटय़ा मुद्दय़ावर प्रत्येकानं आपापल्या परीने झुंजत बसा! थकतो हो आम्ही, थकतो एकेकदा त्याने.’’
‘‘असेल.. चालू द्या तुमचं. निघायची वेळ झाली की सांग,’’ अप्पाकाका निर्विकारपणे म्हणाले. पपांचा प्रश्न किंवा समस्या त्यांच्यापर्यंत फारशी पोचली नव्हती. त्यांच्या छोटय़ा-सीमित जगण्यात त्यांना निवड करायला फार काही समोर आलेलंच नव्हतं. इकडे बहुपर्यायी जगण्यातला चकवा आणि थकवा झेलण्यात मंडळी गर्क होती. मात्र या जीवनशैलीला पर्याय नव्हता. हिच्यातच जन्मलेला, जगलेला, वाढणारा त्यांचा नातू त्यांना तोंडभरून सांगत होता, ‘‘अप्पाकाका, आज आपण जातोय खरे; पण एक आठवडा थांबलात नाऽ तर तुम्हाला आणखी खूप घडय़ाळं बघायला मिळतील बरं का. पुढच्याच आठवडय़ात कॅम्पात ‘वॉचडॉग’ नावाचं फक्त घडय़ाळांचं मॉल निघणार आहे.. ८, १० हजार स्क्वेअर फुटांचं.. फक्त जगभरातली घडय़ाळं मिळणारं.. येणार का? बघा..’’
mangalagodbole@gmail.com