एक काळ असा होता, जेव्हा आर्लिनला अन्न मिळवण्यासाठी दारोदार पदार्थ विकावे लागत होते. एकच ड्रेस रोज धुऊन घालावा लागे; पण त्याच आर्लिनने नंतर शहरातील टॅक्सी स्टँडवर कॉर्न सूप आणि सॉसेस विकणे सुरू केले. ‘हेअर ड्रेसिंग’मध्ये विशेष कौशल्य मिळवून, पैसा गाठीशी जमल्यावर ‘रिफ्लेक्शन्स’ नावाचे स्वत:चे सलून सुरू केले. ते चालल्यावर छोटेखानी सुपर मार्केट सुरू केले. त्याची इतकी भरभराट झाली की, पुढे ‘शार्लोट स्ट्रीट’वरील ‘डेरेलिक्ट’ हा सुप्रसिद्ध मॉल खरेदी केला आणि जुन्या जागा घेऊन ती मॉलमध्ये रूपांतरित करणे हा तिचा पुढे व्यवसायच झाला. त्या आर्लिनविषयी..

आर्लिन मोहोम्मद. ‘पोर्ट ऑफ स्पेन’च्या शार्लोट स्ट्रीटवरील मॉल्सची मालकीण, ‘आर्लिन्स फ्राइड चिकन’ या सुप्रसिद्ध ब्रँडची कर्तुमकर्ती, एक उत्तम गायिका आणि बरेच काही असलेल्या या स्त्रीची  कर्तृत्वगाथा अतिशय रंजक आणि उत्स्फूर्त आहे. ठरवून, नीट आखीवरेखीव असं तिचं आयुष्य नाही. उगवलेला प्रत्येक दिवस म्हणजे तिच्या ‘परम दयाळू प्रभू’ने तिला दिलेली एक संधी असते आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे तिने सोने केले आहे. आर्लिनचे पूर्वायुष्य हे मात्र आत्यंतिक प्रतिकूलतेने, अडीअडचणींनी भरलेले असेच होते.
साधारण २६-२७ वर्षांपूर्वी त्रिनिदादचा एक भाग असलेल्या पिकटन रोडवरील ल्याव्हेंटिल इथे आर्लिनचे कुटुंब राहत होतं. ल्याव्हेंटिल हा भागच गरिबांची वस्ती म्हणूनच त्या वेळी प्रचलित होता. आर्लिनच्या कुटुंबात सहाही स्त्रिया होत्या. आर्लिन, तिची आई आणि तिच्या चार बहिणी. आई प्लम आणि आंब्याचे प्रिझव्‍‌र्हर्स (मुरंबे, लोणची, जॅम, जेली इ.) बनवीत असे आणि आपल्या पाच मुलींच्या मदतीने त्यांची गावात विक्री करत असे.
आर्लिन सांगते, ‘‘या पदार्थाच्या बाटल्या एका बास्केटमध्ये ठेवून आम्ही दारोदार त्याची विक्री करत असू! जे काही पैसे मिळायचे त्यातून आमचे जेमतेम पोट भरत असे. आमच्याजवळ प्रत्येकीसाठी कपडे घ्यायला पैसे नसत. अगदी आज घातलेले जरा बरे कपडे रात्री धुऊन दुसऱ्या  दिवशी तेच आम्ही पुन्हा वापरत असू! मात्र आमच्यावर उपासमारीची वेळ कधी आली नाही. इतरांकडे असणाऱ्या अनेक सुंदर गोष्टी आमच्याजवळ कधीच नसत याचे मला फार वाईट वाटत असे. त्याच वयात आपण काही तरी छोटेमोठे काम करून पैसे कमवायचे आणि चांगले आयुष्य जगायचे विचार माझ्या मनात येत असत!’’
आपल्या शालेय शिक्षणाबद्दल आर्लिन सांगते, ‘‘माझे शिक्षण लवकरच बंद पडले. मला अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता, फी जमा करायला पुरेसे पैसे नसत याहीपेक्षा मला अभ्यासात फार गती नव्हती हे खरे आहे. उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठीची जी प्रवेश परीक्षा असते ती काही मी पास झाले नाही, त्यामुळे शिक्षण आपोआपच बंद पडले.’’
आता पुरेसा रिकामा वेळ हाताशी असल्याने आर्लिनने शहरातील टॅक्सी स्टँडवर कॉर्न सूप आणि सॉसेस विकणे सुरू केले. तिच्या खाद्यपदार्थाच्या सवर्ि्हग्जची किंमतही तिने अगदी एक डॉलर ते तीन डॉलर अशी वाजवी ठेवली होती. आर्लिनचे लाघवी वागणे-बोलणे, तिची स्वच्छता आणि टापटीप यामुळे तिचे खाद्यपदार्थ लवकरच शहरभर लोकप्रिय झाले आणि तिचा ग्राहकवर्ग हळूहळू वाढत गेला.
‘‘मोठा व्यवसाय करायचा तर तुम्हाला अगोदर एक ‘कस्टमर बेस’ शोधावा किंवा तयार करावा लागतो. माझ्या या छोटय़ाशा उद्योगाने मला तो तयार मिळवून दिला,’’ असे आर्लिन सांगते.
जसजसा पैशाचा ओघ सुरू झाला तसे तिने बचत करायला सुरुवात केली आणि लवकरच तीन ‘फूड कार्ट्स’ खरेदी केल्या. त्यापैकी एक ती स्वत: वापरत असे आणि उरलेल्या दोन तिने भाडय़ाने दिल्या.
शाळकरी मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले ‘फ्राइड चिकन ब्रेस्ट बोन्स आणि फ्राइज’ असे कॉम्बिनेशन असलेली डिश आपल्या गाडीवर ठेवायला सुरुवात केली.
मांसाचे मॅरिनेट, सीझनिंग (खारवणे, मसाले इ. लावून ठेवणे) आर्लिन स्वत: करीत असे आणि बाकी इतर सर्व जसे तळणे, पॅक करणे वगैरे गोष्टी तिच्याकडे कामाला असलेल्या लोकांवर ती सोपवत असे. आई या सर्वावर लक्ष ठेवत होतीच. आता आर्लिनला आपण दुसरे काही तरी शिकायला हवे असे वाटू लागले. ‘एल डोराडो यूथ कॅम्प’मध्ये तिने नाव नोंदवले आणि ‘हेअर ड्रेसिंग’मध्ये विशेष कौशल्य मिळवले. थोडा अनुभव आणि पैसा गाठीशी जमल्यावर ‘नेल्सन अँड डय़ूक’ या गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर ‘रिफ्लेक्शन्स’ नावाचे स्वत:चे सलून सुरू केले. त्यापाठोपाठ एक (छोटेखानी सुपर मार्केट) ‘मिनी मार्ट’ सुरू करून न्यूयॉर्कमधून आणलेली वस्त्रप्रावरणे ती विकत असे. हे दुकान २४ तास उघडे असे. काही दिवसांनी लगेचच दुसरे एक कपडय़ांचे दुकान तिने शार्लोट स्ट्रीटवर सुरू केले.
येणाऱ्या मिळकतीतून जास्तीत जास्त बचत कशी करता येईल यावर तिचा कटाक्ष असे. ‘इस्टर्न क्रेडिट युनियन’कडून तिला आर्थिक पाठबळ उपलब्ध झाले. लवकरच ‘नेल्सन स्ट्रीट’वर एक इमारत तिने खरेदी केली. इथे तिचे चिकन शॉप तिने स्थानांतरित केले. आता आपणही मोठा व्यवसाय करू शकतो असा आत्मविश्वास तिच्यात दृढ झाला आणि सतत तेच स्वप्न आर्लिनच्या डोळ्यांसमोर तरळू लागले.
‘शार्लोट स्ट्रीट’वरील ‘डेरेलिक्ट’ नावाचा सुप्रसिद्ध मॉल लवकरच तिने खरेदी केला. केस, नखे, कपडे आदींशी संबंधित अठरा विविध ब्रँड्सची दुकाने असलेल्या या मॉलचे लवकरच ‘आर्लिन्स मॉल’ असे नामांतर झाले.
जुन्या मोडकळीला आलेल्या, पण मोक्याच्या जागेवर असलेल्या इमारती विकत घेणे, त्यांचे स्वरूप पालटवून मॉलमध्ये त्यांचे रूपांतर करणे हा आर्लिनच्या व्यवसायाचा एक ‘पॅटर्न’ बनून गेला. जुन्या इमारती घेताना तिला अनेकांनी सावध केले आणि परावृत्तही केले; पण आर्लिन बधली नाही. याच पडक्या इमारतींनी तिचा व्यवसाय अधिकाधिक वाढायला मदत झाली. एका मॉलला तिने आलियाज मॉल (आर्लिनच्या चार अपत्यांपैकी एक) असे नाव दिले आहे, तर दुसरा ‘ए अँड ए’ या नावाने प्रसिद्ध आहे.
आर्लिनचा व्यवसाय खाद्यपदार्थ, कपडे, केसांसंबंधी उत्पादने, किरकोळ विक्री उद्योग व इतर ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री असा विस्तारत गेला आहे. १४४ जगप्रसिद्ध ब्रँड्स ती आपल्या मॉल्समध्ये ठेवते. आर्लिनला ‘क्वीन ऑफ शार्लोट स्ट्रीट’ असे कौतुकाने संबोधले जाते.
‘‘आज व्यवसायाचे प्रशिक्षण देणारे अनेक मोठमोठाले आणि महागडे कोर्सेस सर्वत्र उपलब्ध आहेत; पण उत्तम व्यवसाय कसा करावा याचे प्राथमिक धडे मी घेतले ते माझ्या अशिक्षित आईकडून.’’ हेही आर्लिन कौतुकाने सांगते.
आर्लिनची आई हीदेखील एक श्रद्धाळू ख्रिश्चन स्त्री  आहे आणि तिचा हाच स्वभाव आर्लिनमध्येही पुरेपूर उतरला आहे. कोणालाही कधी फसवू नये, अडचणीत असलेल्याला मदत करावी, कष्टांकडे पाठ फिरवू नये, प्रभूची सतत प्रार्थना करत राहिल्याने आत्मबल वाढते, असे ती सतत सांगत असते. प्रभूवर आपला विश्वास अशा तऱ्हेने जोपासावा की, ‘‘आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मिळेल असे संस्कार आईने आपल्याला दिल्यामुळेच खरे तर आज मी या स्थानावर आहे,’’ असेही आर्लिन  सांगते.
सतत उत्साहात असणारी आर्लिन उत्तम गायिकादेखील आहे. तिच्या गाण्यांच्या अनेक सीडीज् बनल्या असून त्या बहुतेक धार्मिक स्वरूपाच्या आहेत. तिला संपत्तीविषयी बोलण्यात फार रस नाही. ती म्हणते, ‘माझ्यासारखी दारोदारी जॅम, जेली विकणारी मुलगी आज चार मोठमोठाले स्वतंत्र व्यवसाय यशस्वीपणे सांभाळू शकते हे महत्वाचं नाही का?  ज्यांना अगदी शून्यातून व्यवसाय उभारायचा आहे त्यांना या उदाहरणातून नक्कीच प्रेरणा मिळेल.’
तरुणांनी खूप स्वप्नं पाहावीत  आणि ती सत्यात उतरवण्यासाठी खूप झटावे, असे तिला वाटते. ‘छोटीशी का होईना, पण नियमितपणे बचत करत राहा आणि प्रामाणिकपणे आपले काम करीत राहा. मोठमोठी स्वप्ने पाहा आणि त्या दिशेने मार्गक्रमण करा’ असा संदेश तिच्यासारख्या गरीब परिस्थितीतील तरुणांना ती देते. आपल्याला मिळालेल्या धार्मिक संस्कारांमुळे जीवनात एक प्रकारची तत्त्वनिष्ठ बैठक तयार व्हायला हवी. आत्मबल वाढले की, आपल्यापुढे येणारी संकटे क्षुद्र वाटू लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्गही दिसू लागतात. आर्लिन आज एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक असली तरी तिची अशी नीतिमूल्ये तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.   

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…