वयाची साठी उलटलेल्या सरासरी ४० टक्के स्त्रियांचे मणके ठिसूळ होऊन फ्रॅक्चर झालेले असतात. यासाठी हाडाच्या बळकटीची काळजी तरुण वयातच घेणे आवश्यक असते. कारण तिशीच्या आधी गाठलेल्या उच्चांकावरच हाडांची बळकटी अवलंबून असते.
गेल्याच महिन्यात माझे ८० वर्षांचे काका मुंबईला आले होते. त्यांना भेटायला माझी १० वर्षांची भाची आली होती. त्यांच्याशी उभ्या उभ्या बोलताना अचानक जाणवलं की, माझ्या लहानपणी मला धिप्पाड वाटणारे काका आता जवळजवळ माझ्याच उंचीचे भासत होते आणि दुसरीकडे लहानशी भासणारी भाची माझ्या खांद्याच्याही वर पोहोचली होती. मुले वाढतात पण वृद्ध कसे वाकतात? तरुणपणी ताठ असलेला मणका पुढे झुकतो वाकडा होतो, पाय गुडघ्यातून वाकतात! हे सगळे बदल आपल्या हाडांच्या ठिसूळ होण्याने होतात याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात.
जर ही स्थित्यंतरे पुरुषांमध्येही होतात तर महिलांसाठी त्यात विशेष असे काय आहे?
संशोधकांचे म्हणणे आहे की, वयाची साठी उलटलेल्या सरासरी ४० टक्के स्त्रियांचे मणके ठिसूळ होऊन फ्रॅक्चर झालेले असतात.
हीप फ्रॅक्चर म्हणजे कमरेच्या सांध्यांच्या फ्रॅक्चरचे वृद्ध स्त्रियांमधील प्रमाण समवयीन पुरुषांच्या दुप्पट असते. यातील ८० टक्के फ्रॅक्चर्स पडणे, मामुली इजा यामुळे होतात. महत्त्वाचे म्हणजे, योग्य प्रतिबंधक उपाय, सुधारित आहार व जीवनशैली यांच्याद्वारे ही फ्रॅक्चर्स टाळता येतात. पण ही पावले तरुणपणीच उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुखवस्तू घरातले माझे दोन पुतणे याचे बोलके उदाहरण आहेत. १५ वर्षांचा माझा पुतण्या, चांगला उंच वाढलेला पण पाठदुखीची तक्रार करीत होता. दहावीचा अभ्यास आणि दप्तराचे ओझे यांनी त्रस्त झाला होता. शाळेनंतर क्लास आणि विरंगुळा म्हणून टी. व्ही. या पलीकडे दोन वर्षे दुसरे जग त्याला माहीत नव्हते. पाठीचा एक्स-रे काढला तेव्हा आम्ही आणि रेडिऑलॉजिस्ट थक्कच झालो. इतर काहीही विकार नसलेल्या, सुखवस्तू मुलाला ऑस्टिओपेनिया (ऑस्टिओपोरोसिसच्या आधीची स्थिती) होता. मग दूध, अंडी, व्हिटामिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्या या उपायांनी त्याची तब्येत सुधारली. त्याचा दुसरा चुलतभाऊ, १८ तास वातानुकूलित ऑफिसात संगणकासमोर बसून काम करतो जागे राहायला कॉफी, तहान लागली की कोक आणि मधेमधे सिगारेट यांचे सेवन करतो पायी चालणे, व्यायाम यांचे तर या मुलांना वावडेच असते! त्यालाही ‘विटामीन डी’ची इन्जेक्शने घ्यावी लागली.
तिसरे उदाहरण आमच्याच एका अस्थिघनता चिकित्सा शिबिराचे आहे! गंमत म्हणून अस्थिघनता बघायला गेलेल्या पंचविशीतल्या तरुण, सुशिक्षित सुखवस्तू विद्यार्थिनींमध्ये ऑस्टिओपेनिया मोठय़ा प्रमाणात आढळला.
वरील उदाहरणे आपणा सर्वासाठीच धोक्याची सूचना देत नाहीत का?
या विकाराबद्दल माहिती मिळविताना, आपण प्रथम हाडांची जडणघडण, तसेच त्यात आहार, कॅल्शियम डी व्हिटामिन, व्यायाम इतर औषधे व आजार यांची भूमिका थोडक्यात जाणून घेऊ या.
लहान वयात व कुमार वयात आपली हाडे झपाटय़ाने वाढतात. यातही असे पाहिले गेले आहे की, मुले व मुली यांच्या हाडांची वाढ कुमारवयापर्यंत समान असते, पण पुढे मुलींमध्ये या वाढीची गती आणि प्रमाण कमी होते.
वयाच्या ३० पर्यंत ही वाढ चालू राहते व अस्थिघनता आणि वस्तुमानाचा उच्चांक गाठला जातो. पुढील आयुष्यातील अस्थिघनता हाडांची बळकटी या तिशीआधी गाठलेल्या उच्चांकावर अवलंबून असते.
महिलांचे सर्वोच्च अस्थी वस्तुमान – (पीक बोन मास) पुरुषांच्या तुलनेत कमी असते. तिशीनंतर जरी शारीरिक वाढ थांबली तरी हाडे सातत्याने, आपल्यातील जुनी सारणी नष्ट करून नवीन सारणी भरून स्वत:चे रिमॉडेलिंग, पुनर्निमाण करीत असतात. हाडांमध्ये भक्षक म्हणजे सारणी नष्ट करणाऱ्या आणि सर्जक म्हणजे नवी सारणी बनविणाऱ्या पेशी असतात. यांच्या या प्रक्रियेत, कॅल्शियम अत्यावश्यक असते. कॅल्शियम आपल्याला आहारातून दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, भाज्या-फळे, नाचणी, मांस आदींतून मिळते. स्नायू व रक्तातही कॅल्शियम असते. जेव्हा रक्तातले कॅल्शियम घटते तेव्हा हाडांतून त्याची भरपाई केली जाते.
‘डी व्हिटामिन’ हे आहारांतून कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आवश्यक असते. व्हिटामिन आपल्याला आहारातून मिळते. शिवाय सूर्यप्रकाशाच्या मदतीने, त्वचेच्या पेशींमध्येही ते बनविले जाते. म्हणूनच सूर्यप्रकाशात बाहेर जाणे, व्यायाम करणे आवश्यक आहे, बुरखा धारण करणाऱ्या महिलांना या व्हिटामिनच्या स्रोतापासून वंचित राहावे लागते व सर्वस्वी आहारावर अवलंबून राहावे लागते.
तसेच ही हाडांची वाढ व पुनर्निमाण टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन पॅराथायरॉइज हॉर्मोन, थायरॉइड हॉर्मोन, कॅल्सिटोनिन या हॉर्मोन्सवरही अवलंबून असते.
इस्ट्रोजेनचा शरीरातील साठा रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजनंतर घटतो व त्यामुळे अस्थिघनताही घटते. सुरुवातीला दरवर्षी तीन टक्के या गतीने महिलांची अस्थिघनता घटते. जर बांधा छोटेखानी व वजन अगदी कमी असले तर अशा स्त्रियांमध्ये ऑस्टिओपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. ऑस्टिओपोरोसिस होणे साठ ते ऐंशी टक्के केसेसमध्ये आनुवंशिक, तर २० ते ४० टक्के केसेसमध्ये जीवनशैली आहार, इतर आजार, औषधे यावर अवलंबून असते.
ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे- वर म्हटल्याप्रमाणे अनेकदा ऑस्टिओपोरोसिस पूर्णत: निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतो.
कमरेच्या हाडाच्या फ्रॅक्चरसारखे घातक परिणाम दिसून येईपर्यंत रुग्णांना त्यांच्या हाडांच्या ठिसूळपणाबद्दल कल्पना सुद्धा नसते.
इतरांमध्ये मणक्याची हाडे झिजून दबल्यामुळे पाठदुखी जाणवते, वयपरत्वे उंची कमी झालेली काहींच्या लक्षात येते, कणा वाकतो, सांध्याच्या पडण्याने अथवा इजेने फ्रॅक्चर होते.
काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला ऑस्टिओपोरोसिस अपेक्षित असला पाहिजे आणि तो टाळण्यासाठी योग्य त्या वैद्यकीय तपासण्या, तसेच जीवनशैलीचे नियमन व औषधोपचार केले पाहिजे.
कोणाला ऑस्टिओपोरोसिसचा संभव असतो? जर रजोनिवृत्त वयाच्या चाळीशीआधी आली असेल तर अस्थिघनता लवकर कमी होते. अंडाशये काढून टाकली असली तर आणि कुटुंबातील इतर स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिस झाला असेल तर अशा व्यक्तींनाही त्याचा धोका असतो.
थायरॉइड ग्रंथीच्या विकारात पॅराथायरॉइड अ‍ॅड्रिनल ग्रंथीच्या विकारात हाडे ठिसूळ होऊ शकतात. थायरॉइडचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे.
काही विकारांसाठी ज्या रुग्णांना स्टिरॉइड्स चालू असतात त्यांची हाडे ठिसूळ होतात. आकडी (फीट अथवा इपिलेप्सी) चे उपचार नैराश्य (डिप्रेशन)चे उपचार, कॅन्सर किमोथेरपी ट्रान्सप्लान्टनंतरचे औषधोपचार इत्यादीमुळे हाडे ठिसूळ होतात.
दीर्घकाळ प्रोजेस्टेरॉनची इन्जेक्शने घेतल्यानेही ऑस्टिओपोरोसिस संभवतो, पण ही इन्जेक्शने, ज्या स्त्रिया दुसरे गर्भनिरोधक मार्ग अवलंबू शकत नाहीत त्यांनाच दिली जातात. त्यामुळे त्याचे फायदे व तोटे यांचा सारासार विचार करून उपयोग करणे हितावह ठरेल.
आपण आधी पाहिल्याप्रमाणे जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग काय करायचे नाही आणि काय करायचे हे आता पाहू.
आहार : आहारात कॅल्शियम व व्हिटामिन डी हे दूध, दुग्धजन्य पदार्थ, केळी, संत्री, नाचणी, अंडी, मांस यांचा अंतर्भाव केल्यास नैसर्गिक स्वरूपात कॅल्शियम मिळते. पालेभाज्यांमध्येही कॅल्शियम असते, पण ते तेवढे मोठय़ा प्रमाणात शोषले जात नाही. सोयामध्ये कॅल्शियम मिळते. व्हिटामिन डी मासे, अंडी, कॉडलिव्हर, मशरुम्स यामध्ये असते.
आहारातील कॅल्शियम पालेभाज्यांतील फायटेट ऑक्झलेटमुळे शोषले जात नाही.
आहारात मीठ, कॉफी, शीतपेये यांचा अंतर्भाव हाडांना अत्यंत मारक ठरतो हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे.
दर शंभर मिलिग्रॅम कॅफिन आपल्या हाडांतून सहा मिलिग्रॅम कॅल्शियम खेचून घेते. अमेरिकन डाएटरी गाइडलाइन्स दरडोई मीठ १ चमचापर्यंत मर्यादित ठेवायला सांगतात; पण लोक दुप्पट मीठ वापरतात. १ चमचा मीठ वापरण्याने चाळीस मिलिग्रॅम कॅल्शियम बाहेर फेकले जाते.
प्रोसेस्ड फूडस, कॅनमधील ज्यूस, केचप सॉस पिझ्झा, बर्गर इत्यादीमध्ये मोठय़ा प्रमाणात मीठ असते. शीतपेयांमध्ये असलेले फॉस्फरस हाडांमधून कॅल्शियम शोषून घेते.
मद्यपान आणि तंबाखूचे सेवन कॅल्शियमला मारक ठरते. त्यामुळे त्यांचा पूर्णत: त्याग करणेच चांगले!
व्यायाम आणि ऑस्टिओपोरोसिस :
हाडांचे पुनर्निर्माण व त्यांची घनता सांभाळणे यात व्यायामाचा खूप मोठा वाटा आहे, पण व्यायाम नेहमी प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली शिकणे व करणे अत्यावश्यक आहे. व्यवस्थित सपाटीवर चांगले वॉकिंग शूज घालून चालणे हा सर्वाना जमणारा सोपा व मोफतचा व्यायाम आहे.
हे सर्व झाले प्रतिबंधक उपाय! आता आपण तपासण्यांकडे वळू.
बोनडेन्सिटी-डेक्झा (डय़ुएल एनर्जी एक्स-रे अ‍ॅब्सॉर्पशिओमेट्री) ही तपासणी एक सोपी, बिनचूक रिपोर्ट देणारी, पण थोडी महाग तपासणी आहे. यात मणका, कमरेचे सांधे आणि मनगट यांची अस्थिघनता तपासली जाते.
व्हिटामिन डीची रक्तातील पातळी- या तपासणीबद्दल तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे जरूर वाटल्यास वैद्यकीय सल्ल्यावरून ही तपासणी करून घ्यावी.
औषधोपचार- बाजारात कॅल्शियमचे अनेक प्रकार व डोस असलेल्या गोळ्या व पेय औषधे उपलब्ध आहेत. आपल्याला ही औषधे साधी वाटतात, पण त्यांची प्रक्रिया इतर औषधांबरोबर होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे.
काही प्रकारच्या ब्लडप्रेशरच्या अथवा हृदयविकाराच्या गोळ्या, थायरॉईडची औषधे प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायॉटिक्स) इत्यादीबरोबर कॅल्शियम घ्यायचे असल्यास वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यावे.
चांगल्या गोष्टींचे अतिसेवनही चांगले नसते! कॅल्शियमच्या अतिसेवनाने मुतखडा (स्टोन), बद्धकोष्ठ, रक्तवाहिन्यांत कॅल्शियमचे थर जमणे, लोह व जस्त यांचे शोषण न होणे इत्यादी अपाय होऊ शकतात.
भारतीयांचा आहार कॅल्शियमची जरूर पूर्ण करत नाही. गरोदर महिलांना साधारण १००० ते १५०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व पन्नाशीनंतरसुद्धा १००० ते १२०० मि.ग्रॅ. कॅल्शियम घेण्याचा सल्ला बहुतेक डॉक्टर देतात.
व्हिटामिन डी हे कॉडलिव्हर ऑइलच्या गोळ्या, व्हिटामिनची पावडर व इंजेक्शन या स्वरूपात उपलब्ध आहे.
बायफॉस्फोनेट्स : ही औषधे ऑस्टिओपोरोसिससाठी मोठय़ा प्रमाणात दिली जातात, पण त्यामुळे मळमळ, पोटदुखी, गिळण्यात त्रास, अ‍ॅसिडिटी, अन्ननलिकेवर सूज इत्यादी परिणाम संभवतात. ही औषधेसुद्धा वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी : अस्थिघनता इस्ट्रोजेनवर अवलंबून असते हे आपण पाहिलेच. याचा हा मोठा फायदा आहे; पण स्तनांचा व गर्भाशयाचा कर्करोग व रक्ताच्या गुठळ्या होणे या दोन गंभीर आजारांच्या शक्यतेमुळे हॉर्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी सर्वाना देता येत नाही व ती वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यायची असते.
यापुढील इतर उपचार म्हणजे पॅराथायरॉईडद्वारा काम करणारी औषधे रॅलॉक्सिफीन इ. हे क्वचितच दिले जातात.
या चर्चेवरून आपण योग्य आहार, योग्य व्यायाम आणि औषधोपचार ऑस्ट्रिओपोरोसिस टाळू शकतात, तसेच आहार व व्यायाम तरुणपणीच सुरू करावे लागतात हे जाणून घेतले. आता ते अमलात आणण्याचा निश्चय करूया.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता