‘‘आज आम्हा दोघांची एकत्रित ओळख, लैंगिकता स्वास्थ्यासाठी काम करणारं दाम्पत्य अशी झाली आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतो आहोत. या दरम्यान आम्ही ८० ते ९० हजार शालेय मुला-मुलींपर्यंत पोहोचलो. त्या काळी सेक्ससंबंधित विषयांवर बोलायला  स्त्रिया फारशा तयार नसायच्या अशा वेळी आम्ही पती-पत्नी या सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलायचो. त्याचा खूप सकारात्मक परिणाम व्हायचा.’’ सांगताहेत डॉ. शांता साठे पती डॉ. अनंत साठे यांच्या बरोबरच्या ६० वर्षांच्या सहजीवनाविषयी..
जून २०१४. मी आणि अनंतने एकमेकांना ‘हो’ म्हटलं त्याला आता तब्बल साठ वर्षे झाली. आमचं लग्न ‘अ‍ॅरेंज्ड मॅरेज’ अगदी बटाटेपोह्य़ांसकट! प्रारंभीच्या सर्व सोपस्कारानंतर अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली, पण तत्पूर्वी मला अनंतशी बोलायचं होतं. अनंत एम.डी. आणि एम.एस.! वैद्यकीय क्षेत्रातील दोन उच्चतम पदव्या. साहजिकच काहींना प्रश्न पडला, ‘एवढा एम.डी. मिळतो आहे तुला, बोलायचं तरी काय आहे?’ पण माझं उत्तर होतं, ‘डॉक्टर हवा असला तर डिग्री पाहीन, पण मला हवा आहे नवरा!’
आमचं लग्न ठरलं जूनमध्ये. केलं ऑक्टोबरमध्ये. दोघांनी मिळून जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता तो. एकमेकांना जाणून घ्यायला, समजून घ्यायला, मुख्य म्हणजे दोघांमध्ये भावनिक ओढ, एक भावबंध निर्माण व्हायला एवढा काळ जाणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. एकमेकांना संपूर्णपणे अनोळखी असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकदम एकत्र राहायला, सहजीवन सुरू करायला लागणं आमच्या हिशेबात बसत नव्हतं. आमचा लग्नाचा दिवस २४ ऑक्टोबर. तीही एक गंमत आहे. २४ ऑक्टोबर हा ‘यूएनओ डे’. त्या वेळी मी पीएच.डी. करता नाव नोंदवलं होतं. माझ्या गाइडने विचारलं, ‘शांताबाई हा दिवस का निवडला?’ माझ्या तोंडून पटकन निघून गेलं, ‘सर, उत्तर अगदी सोप्पं आहे, existance of two sovereign independent nation. असं उत्तर आलं होतं ते माझ्या आईनं माझ्यावर केलेल्या संस्कारांमधून.
इथं थोडं आईबद्दल सांगायला हवं. माझी आई मनकर्णिका जोग. उत्तर भारतात लहानपण गेल्यामुळे औपचारिक शालेय शिक्षणाचा लाभ न मिळालेली माझी आई स्त्रियांवरील अन्यायांबद्दल अतिशय संवेदनशील, ‘स्त्री’कडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणारी, विलक्षण स्वतंत्र बुद्धीची, प्रतिभाशाली कवयित्री होती. तिच्या कविता उशिराने १९८५ मध्ये प्रसिद्ध झाल्या, ‘खुणेचं पान.’ त्यातील बंडखोर स्त्रीवादी विचारांकरता, मुंबईच्या महिला दक्षता समितीच्या वतीने मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार झाला होता. पती-पत्नी नात्यासंबंधाने माझे विचार घडले ते तिच्याच विचारांतून.
अनंतचा वैद्यकीय व्यवसाय आणि आमचे वैवाहिक जीवन बरोबरच सुरू झाले. माझे वडील द. श्री. जोग, फग्र्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक, तर अनंतचे वडील गो. शि. साठे, दस्तुर हायस्कूलमध्ये शिक्षक (१९५४ चे पगार लक्षात घ्यायचे.) साहजिकच सुरुवातीला आर्थिक ऊब नव्हती. काडी काडी जमवून घरटं बांधायचं होतं. पण त्यामुळेच आम्ही परस्परांच्या अधिक निकट आलो. १९५४ मध्ये कन्सल्टिंग सुरू केलं तर हॉस्पिटल सुरू करायला १९६३ साल उजाडलं. त्यावेळी जी काय थोडीबहुत मदत मला करता आली. उदा. ऑपरेशनला लागणारी उपकरणं र्निजतुक करणं, ओ. पी. डी. असली तर मदत करणं, खराब कपडे धुऊन टाकणं इ. गरज लागली तर हॉस्पिटल झाल्यानंतरही मी ऑपरेशन थिएटरमध्ये मदत करत असे. माझा पीएच. डी. चा अभ्यास तेव्हा सुरू झाला होता. काम संपवून घरी परतल्यावर गरमागरम पोळय़ा करून वाढायला शांता घरी हवी, अशी अनंतचीही अपेक्षा नव्हती. वेळ झाला तर सायकलीवरून फिरायला जाणं यात आमचा आनंद! उलट ठरविलेले कार्यक्रम फिसकटणे हे तर नित्याचंच. पहिल्या पाडव्याला अनंत तेव्हा एका जनरल हॉस्पिटलमध्ये ऑनररी होता. एक इमर्जन्सी आटोपून बाहेर जेवायला जाऊ म्हणून निघालेलो आम्ही एकापाठोपाठ आलेल्या केसेसमुळे पहाटेला परत आलो होतो.
आम्ही ‘मॅरेज कौन्सिलिंग’ करायचो. लोक विचारतात, ‘तुमची कधी भांडणं होत नाहीत का?’ पूर्वीही व्हायची. अजूनही होतात. दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं एकत्र नांदायची तर होणारच ना! त्यातून दोघंही बऱ्यापैकी संतापी असतील तर! किंबहुना आमचं दोघांचंही असं ठाम मत आहे की एखादं जोडपं, आमचं कधीच भांडण होत नाही म्हणत असलं तर खुशाल समजावं की तद्दन खोटं बोलताहेत किंवा त्यातलं एक इतकं बावळट आहे की भांडावसंही वाटत नाही. आमची भांडणं होत असली तरी एकमेकांच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला कधीच शंका नव्हती. त्यामुळं भांडणं संपल्यावर ऐक्य होणं सहज सुलभपणे घडत होतं. मला तर वाटतं अशा भांडणातूनच पती-पत्नी एकमेकांना अधिक ओळखू लागतात. नातं वादविवादामधून अधिक घट्ट होत गेलं. पुन्हा ‘दुधात साखर’ वगैरे काही खरं नाही. दोघं इतके एकरूप झाले तर कोण कुणावर प्रेम करणार?
आमचे स्वभाव भिन्न. अनंत माणसांचा लोभी, माणूसवेडाच म्हणा ना आणि मिश्कील! मी गंभीर काहीशी अंतर्मुख. बहिणीच्या लग्नानंतर अनंत घरात एकटा. मी सख्खी-चुलत मावस-मामी अशा दहा भावंडांमधील. साहजिकच दोघांनाही एकमेकाला सांभाळून घ्यावं लागलं. मागं वळून पाहताना असं वाटलं, आमचे वेगवेगळे स्वभावच परस्परपूरक आणि पोषक तर ठरले नाहीत?
आम्हाला दोन मुलगे. मोठा मकरंद. मुळात आर्किटेक्ट. आता मान्यतापात्र सर्जनशील आणि वैचारिक लेखनाकरता. त्याच्या ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ गाजताहेत. धाकटा शारंगधर. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचा संचालक. स्वत: एक वादनकार. दोघी सुना केवळ कायद्याने नव्हे (daughter in law) तर खऱ्या कन्या बनल्या आहेत. मुलांना ‘बॉनसॉय’ बनवायचं नाही असा आमचा निर्धार होता. कुठंतरी वाटतेय, त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. दोघं नातवंडं तर दुधावरची साय. त्यांना आम्ही आवडतो हे महत्त्वाचं!
आज आम्हा दोघांची एकत्रित ओळख, लैंगिकता स्वास्थ्यासाठी त्यातही विशेषत: किशोरवयीनांसाठी  (Adolescent Sexuality) काम करणारं दाम्पत्य अशी झाली आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतो आहोत. किंबहुना ही आमची सेकंड इनिंग म्हणायला हवी. आमची कार्यक्षेत्रंही आता एक झाली. आम्ही या कामाला सुरुवात केव्हापासून केली? काय काम केलं, कसं केलं? याविषयी बोलण्या अगोदर  या विषयाकडे कसे वळलो याविषयी थोडंसं!
अनंत ‘स्त्रीरोगतज्ज्ञ.’ वंध्यत्वाच्या केसेस यायच्या. साहजिकच त्यांच्या लैंगिक जीवनात डोकावण्याची गरज पडायची. एकतर या समस्येत पुरुषाचाही काही वाटा असू शकतो हेच मान्य नसायचं. पण एरवीही लैंगिक व्यवहारात स्त्रीची होणारी कुचंबणा, तिच्यावरचा अन्याय, नैतिकतेविषयी दुटप्पी धोरण यामुळे अनंत अस्वस्थ व्हायचा. तर ‘माझ्या मुलीला ‘यात’ (Sex शब्द टाळून) काही इंटरेस्ट नाही, पण नवरा बाहेर जाऊ नये म्हणून तयार होते’ असे उद्गार किंवा ‘लैंगिक संबंधातील अज्ञानामुळे’ वा ‘माझ्या आई-बाबांनी असं काही घाणेरडं केलं नाही’अशा समजामुळे वैवाहिक आयुष्याची सुरुवातच क्लेशकारक झाली आहे, अशा घटना कानावर यायच्या त्यामुळे तो व्यथित व्हायचा त्यानंतर तो याविषयी माझ्याशी बोलायला लागला. आमचं आपापसात नेहमी बोलणं व्हायचं. १९७४-७५च्या सुमारास आमचा मुलगाही ‘मोठा’ व्हायला लागला होता. त्याला काही सांगणं आवश्यक होतं, पण जवळिकीतून वाटणाऱ्या संकोचामुळे, आपण डॉक्टर असूनही मुलाची मित्रमंडळी जमवूनच त्याला माहिती दिली हेही अनंतला जाणवत होतं. पण गटाशी बोलल्यामुळे वाढत्या वयातील मुलांच्या मनातील काळज्या, चिंता, त्यांना नव्याने येणारे काही अनुभव, नव्याने जाणवणाऱ्या प्रेरणा, नैसर्गिकरीत्या जाणवणारे स्त्री-पुरुष आकर्षण, प्रेम, मोह याविषयीचा घोळ हे सर्व मुद्दे पुन्हा प्रकर्षांने समोर आले. समाजात डोळसपणे वावरताना कामजीवन हा केवळ शरीरशास्त्राशी जोडलेला (म्हणजे केवळ डॉक्टरचा) विषय नाही. ज्याला भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि स्त्रीपुरुष समानता (जेण्डर) असे अनेक पदर आहेत. त्यांचाही विचार करायला हवा, हे लक्षात आलं होतं. सेक्सकडे आणि ‘स्त्री’कडे पाहण्याचा दृष्टिकोनही तपासायला हवा. म्हणजेच लैंगिकता म्हणजे सेक्स-जेंडर असा विषय हवा. या सर्वाबाबत आम्ही दोघांनीही जवळच्या लोकांपाशी बोलायला सुरुवात केली. पण ते व्यक्तिगत पातळीवर.
आमच्या विचारांना एकरूप आलं, विशिष्ट घाट आला तो एका योगायोगामुळे. ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने १९७६ साली पुण्यामध्ये ‘लैंगिकता’ या विषयावर भरवलेल्या एका निवासी कार्यशाळेत प्रथम एक निरीक्षक म्हणून आणि नंतर सहभागी म्हणून भाग घ्यायला अनंतला संधी मिळाली. संस्थेचे पदाधिकारी आमच्या घरी आल्यावर वर सांगितलेल्या सर्व मुद्दय़ांवर लैंगिकतेच्या सर्व विषयांवर  सविस्तर ऊहापोह झाला. मग ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने पुण्यात एक शाखा काढावी आणि आम्ही त्यात समाविष्ट व्हावं’ असा प्रस्ताव आला. अशा प्रकारे १९७७ मध्ये पुणे शाखेच्या संस्थापक सदस्यांपैकी आम्ही एक बनलो. आता एक वेगळी नवीन वाट आम्ही एकत्रपणे चालणार होतो..
त्यानंतर ‘लैंगिकता’ या विषयासंबंधी अधिक खोलात जाऊन अभ्यास करण्याची आम्हाला गरज होती. हा विषय  multi-disciplinary आहे, असे आम्ही म्हणत होतो. आता घरातच एक डॉक्टर आणि एक सामाजिक शास्त्राची विद्यार्थिनी अशी आमची टीम झाली. अर्थातच आमच्या जोडीला या विषयामधील इतर जाणकार होतेच. वैयक्तिक आणि गटाच्या गटाच्या पातळीवर आम्ही किशोरवयीन मुलामुलींशी संपर्क साधायला लागलो. आमच्या कार्याला संस्थात्मक रूप आलं ते कुटुंब नियोजन संस्थेने ‘किशोरावस्था- जाण, जाणीव व जबाबदारी’ असा शालेय विद्यार्थ्यांकरता आखलेला प्रकल्प राबविण्याचे काम पुणे शाखेकडे सोपवलं तेव्हा. तीस स्वयंसेविकांच्या साहाय्याने १९८२ ते १९८९ या काळात (नंतर आर्थिक अडचणींमुळे प्रकल्प थांबवावा लागला) आम्ही ८० ते ९० हजार शालेय मुला-मुलींपर्यंत पोहोचलो. सुरुवातीला फक्त मुलींच्या शाळेत प्रवेश मिळाला. पण मुलींनीच ‘मुलांना जबाबदार बनवा, आम्ही निर्भय होऊ’ अशी मागणी केल्यावर मुलांच्या शाळेतही आम्हाला प्रवेश मिळाला. त्यातल्या दहा टक्के लाभार्थीचा आम्ही सव्‍‌र्हेही केला. प्रतिसाद हुरूप वाढविणारा होता. या विषयावर अनंतने श्रीलंका, फिलिपाइन्स येथे शोधनिबंध वाचले तेव्हा अशा प्रकारचा दक्षिण आशियातील हा पहिलाच प्रकल्प होता.
या प्रकल्पाच्या जोडीनेच आम्ही महाविद्यालयीन (विशेषत:) कनिष्ठ आणि १८ ते २१ या वयोगटातील इतर मुलामुलींकरताही काम करायला लागलो. सेक्ससंबंधित विषयावर बोलायला त्याकाळी फारशा स्त्रिया पुढे यायला तयार नसायच्या अशा वेळी आम्ही पती-पत्नी या सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलायचो. त्याचा खूप सकारात्मक परिणाम व्हायचा. या वयाच्या मुलामुलींसमोर बोलताना थोडंसं पुढे जाऊन वेळेला विवाहपूर्व लैंगिक अनुभव, लीव्ह इन रिलेशनशिप वगैरे मुद्दय़ांनाही हात घालायला लागायचा. याविषयी बोलताना आम्ही पापपुण्य भाषेत बोलायचो नाही (बोलत नसू) पण ‘सेफसेक्स’ एवढेच आमचं उद्दिष्ट नसायचं. सेक्स ही निसर्गाची सुंदर देणगी. तिचा माणूसपणाला शोभेल असा स्वीकार कसा करायचा? हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची धडपड होती. युवक-युवती नात्यातलं केवळ धोके शिकविण्यात रस नव्हता तर त्यातील सौंदर्य, सोबती येणाऱ्या जबाबदाऱ्या याची ओळख करून द्यायची होती. म्हणून स्त्रीपुरुष परस्पर आदर, स्वप्रतिष्ठा, आपल्या वर्तनाचे होणारे परिणाम (केवळ शारीरिक नव्हे) समजून घेणे व आपल्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारणं या मुद्दय़ांवर भर देत होतो. समाजातील लैंगिक संबंधाबाबतच्या दुटप्पीपणाबद्दल जाणीव करून देत होतो. लहानपणी योग्य माहिती योग्य वयात न मिळाल्याने मोठेपणी काय परिणाम होतात हे माहीत असल्याने तेही बोलत होतो, पण आमचं बोलणं एकतर्फी मार्गिकेप्रमाणे आम्ही बोलतो तुम्ही ऐका असं नव्हतं. आम्ही त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांना बोलकं करण्याचा, समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळेच या मुलांकडून आम्हाला निव्वळ आदर आणि प्रेमच मिळालं नाही तर त्यांच्या मैत्रीचाही लाभ झाला. आमच्या म्हातारपणाचा थोडासा विसर त्यामुळे पडत गेला.
हे सर्व साधणं कुटुंब नियोजन संस्थेच्या पाठिंब्याशिवाय शक्यच झालं नसतं. त्या आधारावर आम्हाला सर्व भारतभर या विषयावर कार्यशाळा घेता आल्या. पुणे विद्यापीठानेही आम्हाला प्रोत्साहन दिलं. या प्रश्नाचं, विषयाचं महत्त्व ओळखून प्राध्यापक व कॉलेज प्रिन्सिपॉल यांच्याही कार्यशाळा त्यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली भरविल्या आणि पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५०/६० ठिकाणी काही काही वेळेला तर पुन: पुन्हा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतले. या सर्वाच्या प्रोत्साहनाखेरीज एवढं काम करायला जमलंच नसतं. पालकांच्या मनातील या सर्व विषयाबाबतीत शंका दूर करण्याकरता आम्ही त्यांच्याशीही वेळोवेळी बैठकी घेतल्या काही वेळेला पुण्याबाहेरही.
प्रत्यक्षात किती जणांपर्यंत पोहोचणार म्हणून आम्ही सन २००२ मध्ये ‘हे सारं मला माहीत हवं! किशोरावस्था ओलांडताना!’ आणि २००६ मध्ये ‘काय सांगू! कसं सांगू! खास आईबाबांसाठी’ ही पुस्तके एकत्रितपणे लिहिली (राजहंस प्रकाशन, पुणे) दोन्ही पुस्तकांना प्रतिसाद चांगला मिळाला. पहिल्या पुस्तकाला नांदेड फाऊंडेशन तर ‘काय सांगू! कसं सांगू!’ या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. २००८ या कामाबद्दल Council of Sex Education and Parenthood [International]  या संस्थेचा golden lamp award  हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तर विलेपाल्र्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या वतीने आम्हाला दोघांना मिळून ‘आगरकर पुरस्कार’ मिळाला.
हे झालं आमच्या सेकंड इनिंगमधील सहजीवनाबद्दल. आम्ही दोघांनीही ते मनसोक्त उपभोगलं. माझी धाकटी बहीण गमतीने म्हणायची, ‘अनंता जोग आहे की साठे तेच आम्हाला कळत नाही.’ याहून यशस्वी सहजीवनाची वेगळी पावती असू शकते का?

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…