नीलेश गायकवाड आणि डॉक्टर दाम्पत्य डॉ.चंद्रशेखर वावीकर व त्यांची पत्नी डॉ. वैशाली वावीकर,ज्येष्ठांची कावड वाहणारे श्रावणबाळ जणू. त्यांच्यासंस्थेतर्फे वृद्ध ही राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांना आनंदाने आणि समाधानात वृद्धत्व कसे घालवता येईल यावर विचार करत अनेक कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांच्याविषयी..
विशीतला एक तरुण. नीलेश गायकवाड. ठाण्यातील तलाव पाळीच्या कट्टय़ाकडे वळण्याऐवजी त्याची पावले वळली ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ाकडे! सहसा तरुणाईला स्पर्श न करणारा विचार त्याला स्पर्शून गेला होता. ‘मी’ पुढेही समाज आहे, असं सामाजिक दायित्वाचं भान देणारा हा विचार! आपल्या या विचाराचं बोट धरून तो जेव्हा कट्टय़ावरच्या ज्येष्ठांमध्ये मिसळला जेव्हा त्याला प्रकर्षांने जाणवलं की यातले बरेचसे ज्येष्ठ एकाकी जीवन जगतायत. त्यांची मुलं परगावी, परदेशी आहेत. तर काहीजण भरल्या घरात एकटी पडली आहेत. यावर उपाय? त्याने स्वत:पुरता उपाय शोधला. तो त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायचा. त्यांचे वाढदिवस साजरे करायचा. त्यांची देखभाल करायचा. हळूहळू त्याच्या लक्षात आलं, ही मंडळी सधन आहेत. संपन्न आहेत. पण प्रेमासाठी आसुसलेली आहेत. नीलेशच्या प्रेमाने भारावलेली ही ज्येष्ठ मंडळी सणासुदीला त्याला आशीर्वाद द्यायला त्याच्या ‘व्यास क्रिएशन’च्या ऑफिसबाहेर चक्क रांगा लावायची. एवढय़ा सगळ्या आजी-आजोबांकडून घरच्या कार्यक्रमांसाठी त्याला अगत्याने निमंत्रणे यायची. आता आपण एकटे त्यांच्यासाठी काम करू शकणार नाही हे नीलेशला जाणवलं आणि त्याने आपल्या समवयस्कांना गोळा केलं. श्री. वा. नेर्लेकर ज्येष्ठ पत्रकार. नीलेशचे गुरू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी तरुण मंडळी एकत्र आली. सर्वानुमते एक मोठा कार्यक्रम करण्याचं ठरलं आणि ‘ज्येष्ठ महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली तेरा वर्षे हा महोत्सव दिमाखात पार पडतो.
नीलेश सांगतात, ‘या कार्यक्रमांच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ मंडळींकडे असते. कार्यक्रम समिती, स्वागत समिती, मेन्यू समिती यावर ज्येष्ठच काम करतात. पण अंतर्गत व्यवस्था मात्र आमची तरुण मुलंच पाहतात. त्यांना सर्वतोपरी मदत करतात. ठाण्यातील वेगवेगळ्या शाळा-कॉलेजचे विद्यार्थी टेबलं हलवण्यापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत सर्व काही करतात. पण फ्रंट लाइनवर असतात फक्त आमची ज्येष्ठ मंडळी!’’
ज्येष्ठ महोत्सवाच्या निमित्ताने नेत्रदान, देहदान, इच्छापत्र असे विषय घेऊन माहितीपर कार्यक्रम करण्यात आले व तिथेच त्यांच्याकडून फॉर्मस भरण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्येष्ठांशी संबंधित पाठदुखी, कंबरदुखी, मधुमेह, रक्तदाब, अल्झायमर इत्यादी व्याधींविषयी जनजागृती व्हावी या हेतूने तेराहून अधिक आरोग्य शिबिरे घेण्यात आली व साडेतीन हजारांहून अधिक ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला. या महोत्सवातून एक उद्घोषणा आकाराला आली, ती म्हणजे- ‘ज्येष्ठ- एक राष्ट्रीय संपत्ती!’ ज्येष्ठांच्या विविध क्षेत्रांतील अनुभवांचा लेखाजोखा मांडणारी प्रत्येक क्षेत्रातील जाणकार मंडळी आवर्जून ज्येष्ठ महोत्सवाला हजेरी लावू लागली व मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाला चालना मिळाली. ज्येष्ठ महोत्सवातील तरुणाईच्या उत्साहाची लागण आता ज्येष्ठांनाही होऊ लाागली. त्यातूनच ‘तलाव सुशोभीकरण रॅली’, ‘प्लॅस्टिकमुक्त ठाणे रॅली’ असे उपक्रम ज्येष्ठांनी सुरू केले.
नीलेश गायकवाड सांगतात, ‘ज्येष्ठ महोत्सवाच्या निमित्ताने मला सामाजिक अभिसरणाचा प्रयोग करायचा होता. केवळ वय झाल्याने अडगळीत पडलेल्या ज्येष्ठांना तरुण पिढीच्या संपर्कात आणायचं होतं. कदाचित आम्हा तरुणांची सौहार्दपूर्ण वागणूक अनुभवल्यावर हे आजी-आजोबा आपल्या घरातील मुला-नातवंडांशी जिव्हाळ्याने वागतील-बोलतील. या उमेदीने आम्ही एक छान प्रयोग केला. आम्ही ठाण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना आवाहन केलं. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ अशी संकल्पना घेऊन अत्यंत सुंदर, विविध आकार रंगांची ग्रीटिंग्ज जवळ-जवळ अकराशे आजी-आजोबांना पाठवली. त्यावर मुलांनी आपल्या वडिलांचे मोबाइल नंबर, पत्ते लिहिले होते. त्यातला मजकूर हृदयस्पर्शी होता. ‘आजी, तू मे महिन्यात माझ्या घरी येशील का राहायला’ इथपासून ते शुभेच्छांपर्यंत! बऱ्याच मुलांनी या ज्येष्ठांबरोबर आपल्या परगावच्या आजी-आजोबांनाही शुभेच्छापत्रे पाठवली. आम्हाला तीन पिढय़ांना एकत्र जोडायचं होतं. आमचा उद्देश सफल झाला.’
आज अनेक ज्येष्ठांकडे विविध आस्थापनांतील कामाचा अनुभव गाठीशी असतो. व्यास क्रिएशनद्वारा ‘करिअर मंत्र’ या कार्यक्रमांतून तरुणांना ज्येष्ठांचं मार्गदर्शन, करिअरमधील विविध समस्यांचं निराकरण करून सल्ले देण्यात येतात. अशा कार्यक्रमांतून ज्येष्ठांच्या तरुणांच्या मनाशी तारा जुळणं हेच अपेक्षित असतं. ज्येष्ठ महोत्सवातील उत्साहाला चरम सीमेवर नेणारा कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठरत्न, सेवारत्न पुरस्कार. या कार्यक्रमात मीडियाचा एवढा लखलखाट असतो की, आज या पुरस्कारांची सिने अ‍ॅवॉर्डसारखी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून बोलावण्यात येतं. ‘हा पुरस्कार माझ्या आजवरच्या कार्यासाठी मिळाला. मी धन्य झालो.’ अशा प्रतिक्रिया ज्येष्ठांकडून भावूकपणे येत असतात. विशेष म्हणजे ज्यांना हे पुरस्कार मिळाले नाहीत त्यांची नावं व कार्य इतर सेवाभावी संस्थांना आवर्जून पुरस्कारांसाठी कळवली जातात. आज ज्येष्ठ महोत्सवातील आठवणींवर वर्ष उत्साहाने व्यतीत करणारी व त्याची वाट पाहणारी अनेक मंडळी आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीला चालना मिळावी यासाठी त्यांना एकत्र येण्यासाठी त्यांच्या हक्काची जागा मध्यवर्ती ठिकाणी मिळावी यासाठी सर्वच तरुणवर्ग प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज ‘ज्येष्ठ भवना’ची संकल्पना आकारास येत आहे. तिथल्या सभांमधून ज्येष्ठांची सुरक्षा, निवृत्तिवेतन, ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा अशा विविध योजनांचा पाठपुरावा केला जातो. विशेषत: ज्येष्ठांसाठी ‘विरंगुळा केंद्र’ (day care centers))च जाळं पसरण्याची व ज्येष्ठांसाठी ‘लव्ह इन रिलेशन’ म्हणजे मित्र, मैत्रिणी, बहिणी, शेजारी असं कोणत्याही नात्याचं लेबल न लावता एकत्र राहण्याची सामूहिक निवास व्यवस्थेची संकल्पना राबवण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नीलेश गायकवाड यांच्या मनात आहेत.
त्यांना आजही पहिला ज्येष्ठ महोत्सव आठवतो. तो पहिला कार्यक्रम नीलेशने कर्ज काढून केलाय अशी कुणकुण बाहेर लागली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मच्छिंद्र कांबळी यांनी कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावर नीलेशला मिठी मारली आणि मानधनाचं पाकीट त्यांच्या खिशात सारलं. झालं! त्यानंतर थरथरत्या पावलांची रांगच लागली स्टेजवर! शेवटी नीलेशला जाहीर करावं लागलं, ‘हा कार्यक्रम देण्याचा आहे. घेण्याचा नाही. तेव्हा मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या?’ गतवर्षीच्या कार्यक्रमाला नीलेशचे बाबा गावाहून पहिल्यांदा हजर राहिले. नीलेशने त्यांचा सत्कार केला. ते रडत होते. सभागृह भारावून गेलं होतं. मधुकर भावे उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘ज्येष्ठांची कावड घेऊन निघालेला हा आधुनिक श्रावणबाळ’!’’
ग्रेसफुल एजिंग
श्रावणबाळ ही केवळ व्यक्ती नाही. ती वृत्ती आहे. ती ज्याच्याठायी असते तो कोणत्याही व्यवसायांत असला तरी मातापित्याचं ऋण अंशत: तरी फेडावं या विचारांनी अखंड झपाटलेला असतो. ही सेवाव्रती वृत्ती जोपासणारं ठाण्यातील एक अग्रगण्य डॉक्टर दाम्पत्य डॉ. चंद्रशेखर वावीकर व त्यांची पत्नी डॉ. वैशाली वावीकर! डॉक्टर वावीकर ठाण्यातील नामांकित नेत्रशल्यविशारद! डॉक्टरांकडे डोळ्यांच्या व्याधींची तक्रार घेऊन येणारे रुग्ण म्हणजे ज्येष्ठ मंडळी! ही मंडळी डॉक्टरांच्या सौजन्याने भारावून जाऊन अनेकदा त्यांच्याशी आपल्या मनांतलं गूज सांगत. आपल्या दुखऱ्या जागा, बोचऱ्या भावनांचं शेअरिंग करत. डॉक्टर रुग्णाचे डोळे तपासता तपासता त्यांच्या भावनिक आंदोलनात गुरफटून जात. अस्वस्थ होत. त्यांना जाणवत राही. या वृद्धाला मन मोकळं करण्यासाठी कुणीही नाही. त्याच्या वैयक्तिक समस्या मांडाव्या अशी जागा नाही. किंबहुना कधी तरी खळखळून हसावं, मनमुराद बोलावं किंवा झडझडून चर्चा करावी असं काही तरी ही मंडळी शोधतायत. त्यांनी आपल्या पत्नीला हे सर्व सांगितलं आणि उभयतांनी ठरवलं असा कट्टा आपण त्यांना मिळवून द्यायचा. बस्स! डॉक्टर पती-पत्नी रोज न चुकता बारा बंगल्याच्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या प्रहरी फिरायला जात. तिथे या संकल्पनेवर गरमागरम चर्चा झाली आणि “Joyful Living Graceful Aging” या उपक्रमाची सुरुवात झाली. अर्थात केवळ ज्येष्ठांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे हा मर्यादित हेतू या संकल्पनेमागे कधीच नव्हता, तर ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यात आजवर अनेक गोष्टी केलेल्या असतात. पण अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. कोणाला गाणं शिकायचं असतं. कोणाला नृत्य! तर कोणाला नवे छंद जोपासायचे असतात. त्या सगळ्यांना व्यासपीठ मिळवून देणं हा या उपक्रमामागचा प्रधान हेतू       डॉ. वैशाली वावीकर सांगतात, ‘‘अनेकदा पंचाहत्तर पुढील वयात लोक नवीन क्षेत्रात काम करायला लागतात आणि एक प्रकारे आपल्या वर्तणुकीतून ते हताश उद्विग्न  ज्येष्ठांपुढे आदर्श निर्माण करतात. त्यासाठीच आम्ही अशा ज्येष्ठांचे कार्यक्रम मुद्दाम आयोजित करतो. ज्येष्ठ मंडळी अतिउत्साही असतात. आमच्या मोठय़ा सभागृहात औपचारिक कार्यक्रम संपल्यावर ते स्वत:हून बोलायला लागतात, नकला करतात, गाणी म्हणतात, प्रवासातले अनुभव सांगतात. पारनाईकसर दर वेळी एक विनोद सांगून हसवतात. कार्यक्रमाला अनौपचारिक रूप येण्यापूर्वी मात्र एक माहितीपर उद्बोधक कार्यक्रम केला जातो.’’
या औपचारिक कार्यक्रमांत वैद्यकीय माहिती, विमाविषयक माहिती, ज्येष्ठांसाठी असलेली हेल्पलाइन व तिचा वापर कसा करावा, अचानक आजार उद्भवल्यास एकटय़ा ज्येष्ठाने कोणाशी व कसा संपर्क करावा, आर्थिक गुंतवणूक कशी करावी, स्वसुरक्षेचे उपाय कोणते, असे ज्येष्ठांशी संबंधित अनेक विषयांवर कार्यक्रम करण्यात आले आहेत. वैद्यक क्षेत्रांतील ज्येष्ठांशी संबंधित व्याधींवर स्वत: डॉ. वावीकर, डॉ. स्नेहल तन्ना, डॉ. बुरकुले यांनी श्रोत्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याचं निराकरण केलं आहे.
परंतु डॉक्टरांचं एवढय़ावर समाधान होईना. त्यांनी ‘इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापन केला. त्याद्वारे तळागाळातील, आदिवासी पाडय़ातील वृद्धांचे डोळे तपासणी व मोतीबिंदूच्या विनामूल्य शस्त्रक्रिया सुरू केल्या. एनजीओच्या मदतीने ग्रामीण भागांत वृद्धाश्रमांत जाऊन असे अनेक कॅम्प ‘वावीकर आय इन्स्टिटय़ूट’द्वारे घेतले जातात. आपल्या तीन मजली मोठय़ा इस्पितळासाठी गणुवत्तेचा मापदंड मानलं जाणारं मानांकन त्यांनी घेतलं आहे. ज्यायोगे रुग्णाला उत्तम गुणवत्तापूर्ण सुरक्षित सेवा देता येते. त्या अद्ययावत सेवेचा उपयोग व्हावा यासाठी ज्येष्ठांमध्ये नेत्रदानाची चळवळ रुजवण्याचं मोलाचं कार्य Joyful Living Graceful Aging” या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत. आजी-आजोबा दिनी नेत्रदानाची शिबिरे घेतली जातात.
ज्येष्ठांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचे केवळ डोस न पाजता त्यांना कार्यप्रवण करून सकारात्मक जीवन जगायला लावण्यात मोलाचं कार्य डॉ. वावीकर पती-पत्नी करत आहेत.
ज्येष्ठांची कावड वाहणाऱ्या अशा अनेक श्रावणबाळांची आज समाजाला गरज आहे.    
१) व्यास क्रिएशन्स
द्वारा नीलेश गायकवाड
डी-४, सामंत ब्लॉक्स
घंटाळी देवी मंदिर पथ,
नौपाडा, ठाणे (प.) ४००६०२.
संपर्क-०२२-२५४४७०३८
 ९९६७८३९५१०
Vyascreations@gmail.com
http://www.facebook.com/ joinvyascreationas
२) वावीकर आय इन्स्टिटय़ूट,
४था/ ५वा मजला,
अंबर आर्केड,
माजिवडा जंक्शन,
ठाणे-४००६०१.
संपर्क – ३९९१८३९९