अतुल करिअरच्या अगदी सुरुवातीला बँकेत नोकरी करत होता, पण त्याच्या नाटय़ सृष्टीतल्या वाटचालीच्या दृष्टीने त्याने मला सांगितलं की मला नोकरी करायची नाहीये. मी एका मिनिटात त्याच्या म्हणण्याला होकार दिला. पुढे   माझे वडील जेव्हा गेले तेव्हा जवळजवळ वर्षभर त्याचा परिणाम माझ्यावर जाणवत होता. त्या काळात अत्यंत प्रेमाने, समजून घेऊन तो वागला. आम्हाला दोघांनाही असं वाटतं की गोष्टी व्हायच्या त्या वेळीच होतात आणि इमाने इतबारे केलं की हव्या त्या गोष्टी मिळतातच. कोणत्याही गोष्टीच्या मागे न धावता स्वत:च्या हिमतीवर आज आम्ही आमचं विश्व उभं केलं याचा  अभिमान आहे आम्हाला.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध नृत्यांगना  
सोनिया परचुरे  पती अभिनेते अतुल परचुरे यांच्याबरोबरच्या १८ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
काही योग अचूक जुळून येतात आणि तेव्हा पटतं की नात्याचे बंध हे असेच सहज बांधले जातात म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा नाटक-सिनेमाशी काहीच संबंध नव्हता. पण अचानक कॉलेजमध्ये असताना एकांकिका-नाटक करायची संधी मिळाली आणि ‘गेला माधव कुणीकडे’ या व्यावसायिक नाटकात मी काम करायला लागले. विनय येडेकरची भूमिका अतुल करायला लागला आणि आम्ही तब्बल २५० प्रयोग एकत्र काम केलं. त्यापूर्वी ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या मालिकेत मी अतुल परचुरे या नटाला पाहिलं होतं. मला तो आवडतही होता. पण या माणसाशी आपलं लग्न होईल, असं मात्र स्वप्नातही वाटलं नव्हतं. एरवी कोणत्याही नाटकात रिप्लेसमेंट न करणारा अतुल कदाचित आमची भेट व्हायची होती म्हणून या नाटकात आला असावा. दिवसाला तीन-तीन प्रयोग आम्ही केले. शिवाय दौरे, रोजचे प्रयोग यातूनच हळूहळू याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय पक्का व्हायला लागला. म्हणजे त्या वेळी अतुल हा माझ्यासाठी देवाने पाठवलेला दूत होता, असं मला आजही वाटतं कारण म्हणूनच मी शास्त्रीय नृत्याची साधना करू शकते आणि  त्यात पाय रोवून ठामपणे उभी आहे. आज मी माझा प्रत्येक क्षण मला हवा तसा जगते आहे, याचं श्रेय अतुलला आणि आमच्या कुटुंबाला आहे.
खरं तर ज्या वेळी मी त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्याला या क्षेत्रातली बायको नकोय, हे त्याचं मत मला माहिती होतं. दोघं एका क्षेत्रात असतील तर कौटुंबिक जीवनात समस्या येऊ शकतात त्यामुळे घराकडे पूर्ण लक्ष देऊन स्वत:चं काही करणारी बायको त्याला चालणार होती. पण एका क्षेत्रातली नको हे त्याचं ठाम मत होतं. त्या वेळी मी शास्त्रीय नृत्य शिकत होते, शिवाय मला विनय आपटे, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी अशा मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती, अनेक बक्षिसंही मी मिळवली होती. काही उत्तम ऑफर्स आल्या होत्या चित्रपटाच्या. त्यामुळे जेव्हा लग्नासाठी हे क्षेत्र सोडायचा मी निर्णय घेतला तेव्हा अनेक जण अवाक् झाले. अनेकांनी मला खूप समजावण्याचाही प्रयत्न केला. पण माझा निर्णय झालेला होता आणि त्या निर्णयाबद्दल मला आजही कधी ‘आपण बरोबर केलं का?’ असा प्रश्न पडत नाही. कारण या माझ्या निर्णयामुळे आता मी एका सुसंस्कृत घरात वावरते आहे आणि सहजीवन म्हणजे मला वाटतं की फक्त नवरा-बायकोचं नातं नाही तर या घराशी, घरातल्या माणसांशी असलेलं माझं नातं हे माझं सहजीवन आहे. आज मी कोणताही निर्णय घेतला तर माझं घर माझ्या पाठीशी उभं असतं. माझ्या नृत्यसाधनेसाठी मला हवा तो वेळ, हवी ती जागा दिली जाते. त्यात कुणी आडकाठी आणत नाही. कारण शास्त्रीय नृत्य म्हटल्यावर ते शिक्षण कधीच पूर्ण न होणारं असतं. आजही मी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे शिकते आहेच. तसं पाहायला गेलं तर या घराचा नृत्याशी काही संबंध नव्हता. पण एक सांस्कृतिक वारसा आणि वातावरण या घरात होतं. माझ्या सासूबाई म्हणजे गणपतराव बोडस यांची नात आणि माझे सासरे पं. राम मराठे यांचे शिष्य. माझी नणंद नंदा परचुरे ही वसंतराव कुलकर्णी यांची शिष्या, उत्तम गायिका. आता लग्नानंतर ती सोलापुरात असते. या सगळय़ा वातावरणामुळे माझ्यातल्या कलाकाराला ही सगळी मंडळी समजून घेऊ शकली. त्यामुळे आज चांगले लेखक, कवी, साहित्य, संगीत याची जाण असणारी माणसं या घरात आहेत. कलेचा वारसा असला तरी त्यांच्या वेळी सासूबाईंना काही करता आलं नाही म्हणून ‘तू कर’ आणि ‘मला जमेल तेवढी मदत मी नक्की करेन’ ही त्यांची भूमिका नेहमीच असते.
सासूबाईंकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. त्या उत्तम स्वयंपाक करतात. तो मी त्यांच्याकडून शिकले. त्यांचं वागणं, त्यांचा खरेपणा या गोष्टी कळत-नकळत खूप काही शिकवून जातात.(तो खरेपणा अगदी अतुलमध्येही आलाय. तो काही बाबतीत अगदी ठाम आहे. म्हणजे तो म्हणतो, ‘तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे हे खरं आहे, पण साबुदाण्याची खिचडी आईचीच चांगली होते. तुझ्यावरच्या प्रेमाखातर मी उगाचच तुझं कौतुक नाही करणार.’)  मुलगी आणि सून म्हणजे मी आणि माझी नणंद. आम्हा दोघींचं पारडं सतत सारखं ठेवणं हे सासूबाईंनी सहजपणे सांभाळलं असल्यानं घरातलं वातावरण छान राहिलंय. मला आठवतं, डिलिव्हरीनंतर मला जेवण नीट जात नव्हतं. त्यांना ते बरोबर समजलं होतं. त्या माझ्यासाठी तसंच जेवण करत असत जे मी नक्की खाईन याची त्यांना खात्री होती. त्यांच्या त्या स्वयंपाकाची चव मी आजही विसरू शकत नाही.
 तसंच माझ्या क्लासच्या कार्यक्रमांनाही माझे सासू-सासरे नेहमी हजर असतात. सासरे बोलून दाखवत नाहीत पण आम्हाला परफॉर्म करताना पाहून त्यांच्या डोळय़ात नेहमी आनंदाश्रू असतात आणि सासूबाईंचं तर तिथलं वावरणं बघून कुणाचा विश्वास बसत नाही की त्या माझ्या सासूबाई आहेत. अगदी सहज त्या वातावरणात रुळतात.
तसा अतुल पूर्वी फारसा कार्यक्रमांना येत नसे. आमची मुलगी सखिल नृत्य करायला लागल्यापासून तो थोडा थोडा सहभागी व्हायला लागला. पण नवरा आहे म्हणून त्याने माझ्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे किंवा माझ्या मनासारख्याच सगळय़ा गोष्टी त्याने केल्याच पाहिजेत वगैरे याबाबतीत मी कधीच फारशी आग्रही नव्हते. तसंच त्यांचं फ्रेंडसर्कल किंवा त्याला क्रिकेटची मॅच बघायला आवडते तर याबाबतीत मीही कधी त्याला अडवलं नाही किंवा अशा फालतू गोष्टीवरून आमच्यात कधी वाद झाला नाही.
अर्थात नवरा म्हणून त्याने दिलेले काही सुखद धक्केही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे मी अगदी एका मुलीपासून कथ्थक शिकवायला सुरुवात केली. आज कथ्थकचे क्लासेस घेते. जसजशी मेहनत घेत गेले तसतशी संख्या वाढत गेली. या सगळय़ाबद्दल त्याला खूप कौतुक आहे. पण त्या सगळय़ात किंवा तिथल्या व्यवहारात, निर्णयात त्याने कधीच लुडबुड केली नाही. म्हणजे क्लासमधून किती उत्पन्न मिळतं हे तो आजही विचारत नाही. पण क्लासला जेव्हा दहा वर्षे पूर्ण झाली त्या वेळी झालेल्या कार्यक्रमाला तो आवर्जून हजर होता आणि त्याने मला हिऱ्यांच्या मंगळसूत्राची भेट दिली. तसंच जेव्हा मी कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियाची टूर करून आले. तेव्हा त्याने मला ‘स्विफ्ट डिझायर’ भेट दिली. तर अशी त्याची सरप्रायजेस मला खूप आवडतात. मग त्याच्या एका वाढदिवसाला मी ठरवलं की आपणही अतुलला काही तरी भेट देऊया म्हणून आज आम्ही ज्या जागेवर घर बांधलय ती गुहागरची जमीन मी त्याला  भेट दिली. त्यामुळे असे छान क्षण खऱ्या अर्थाने जगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो.
 एक गोष्ट अतुलच्या बाबतीतली मला खूप आवडते ती म्हणजे अनेक वर्षांपूर्वी त्याची जी मतं होती ती आजही तशीच आहेत. म्हणजे त्याचा कोणताही विचार हा तात्पुरता नसतो तर तो पक्का असतो. जसं आज त्याला दिग्दर्शनाच्याही संधी चालून येतात पण तो म्हणतो, नटाने अभिनय करावा. त्याचा अभिनय बघूनच त्याला पुढचं काम मिळालं पाहिजे. उगाच पुढचं काम मिळवण्यासाठी नटाने काही वेगळे प्रयोग करू नयेत.
त्याच्या या विचारावर तो ठाम आहे. खरंतर सध्याचं वातावरण आणि त्यासाठी मिळणारे पैसे पाहता मोह होऊ शकतो. पण मला अभिमान वाटतो की अतुल त्याच्या विचारापासून कधी ढळला नाही किंवा मीही कधी त्याच्या नावाचा फायदा घेऊन कार्यक्रम मिळवले नाहीत. मुळात आमच्या कामात आम्ही आमचं नातं कधीच आणलं नाही आणि यासाठी वेगळं काही ठरवावं लागलं नाही.
खरंतर आमच्या सहजीवनात सगळं काही योग्य वेळी मिळत गेलं आम्हाला. आम्हाला दोघांनाही असं वाटतं की गोष्टी व्हायच्या त्या वेळीच होतात आणि इमाने इतबारे केलं की हव्या त्या गोष्टी मिळतातच. कोणत्याही गोष्टीच्या मागे न धावता स्वत:च्या हिमतीवर आज आम्ही आमचं विश्व उभं केलं याचा अभिमान आहे आम्हाला. मुळात लग्न करताना काही मूलभूत गोष्टींबद्दल आमच्यात पुरेशी स्पष्टता होती. म्हणजे एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही, एकत्र कुटुंबात राहायचं, घरातले निर्णय आई-बाबांनी घ्यायचे. हे सगळं आपसूकच ठरलेलं होतं.
एक गोष्ट मात्र मीही त्याला सांगितली होती. की तुझ्या आईत आणि माझ्यात कधी जर वाद झाला तर तू मध्ये पडायचं नाही आमचं आम्ही निस्तरू. अर्थात सासूबाईंच्या स्वभावामुळे तशी वेळ कधीच आली नाही. पण मी हे सांगितलेलं असल्यामुळे अतुल नेहमी म्हणतो की बाहेर काम करताना मला घरातली चिंता नसते. नाहीतर घरातल्या आई आणि बायकोतल्या वादामुळे कलाकारांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मी पाहिलेलं आहे.
अतुल गमतीने म्हणतोही की तुम्ही तिघी एक व्हाल आणि मला बाहेर काढाल इतकं तुमचं गुळपीठ जमलंय आणि ती खरीच गोष्ट आहे. अगदी सुरुवातीला मी लग्न होऊन आले तेव्हा जेव्हा जेव्हा माझं आणि अतुलचं भांडण व्हायचं आणि आई माझ्या बाजूने उभ्या राहायच्या. घरात नवीन आलेल्या सुनेला पुरेसा वेळ द्यायला हवा. हे  किती सहजपणे आपल्या कृतीतून  दाखवलं त्यांनी.
अतुलची एक गोष्ट मला खूप आवडते. त्याची जर चूक असली तर तो क्षणात मला सॉरी म्हणून मोकळा होतो आणि त्याला जितकं खरेपणाने सॉरी म्हणता येतं ना तितकं कदाचित मलाही येत नाही. त्यामुळे आमचं भांडण टिकत नाही. मुळात एकमेकांचा विचार, मतांचा विचार आम्ही मोकळेपणाने करू शकतो म्हणून आम्ही दोघंही करिअरमध्ये जे आम्हाला हवं ते करू शकलो.
अतुल करिअरच्या अगदी सुरुवातीला सारस्वत बँकेत नोकरी करत होता, पण त्याच्या नाटय़ सृष्टीतल्या वाटचालीच्या दृष्टीने त्याने मला सांगितलं की मला नोकरी करायची नाहीये. खरं तर नुकतंच आमचं लग्न झालं होतं. पण मी एका मिनिटात त्याच्या म्हणण्याला होकार दिला तसंच माझे वडील (प्रा. गुरुनाथ भार्गव मुळे) जेव्हा गेले तेव्हा जवळजवळ वर्षभर त्याचा परिणाम माझ्यावर जाणवत होता. पण त्या काळात अत्यंत प्रेमाने, समजून घेऊन तो वागला. त्याचंही त्यांच्याशी खूप चांगलं नातं जुळलेलं होते. शिवाय सगळय़ांनाच मदत करण्याची त्याची वृत्तीही मला खूप आवडते. अनेक पडद्यामागच्या कलाकारांना त्याने घर मिळवून दिलंय, नोकरी मिळवून दिली आहे आणि त्याचा कुठेच कधीच गवगवा त्याने केला नाही. त्यामुळे माझ्याकडूनही आपोआप त्याच्या या वृत्तीला खतपाणीच घातलं जातं किंबहुना या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आमच्या सहजीवनाचा एक भाग झाल्या आहेत.
आमच्या सहजीवनातली आणखी एक खूप सुंदर गोष्ट म्हणजे आमची मुलगी सखिल. तीन गोष्टींबद्दल अतुल खूप पझेसिव्ह आहे. दादर, आई आणि सखिल. सखिलची तर तो अतिकाळजी करतो, पण माझा बिनधास्त स्वभाव आणि अतुलसारखे समतोल विचार तिच्यात पुरते उतरलेत. दोघांमधल्या चांगल्या गोष्टी तिने उचलल्यात आणि सगळय़ात महत्त्वाची आणि आम्हाला आवडणारी गोष्ट म्हणजे ती आजी-आजोबांशी खूप जोडलेली आहे. आमचं पाच जणांचे कुटुंब आहे. फिरायला, हॉटेलमध्ये किंवा कुठेही एकत्र कुटुंब जायचं म्हणजे आम्ही पाचही जण जातो. गंमत म्हणजे रोज सकाळी सखिल जेव्हा तयार होऊन कॉलेजला जायला निघते तेव्हा आजी-आजोबा तिला आवर्जून सांगतात की, तू आज खूप सुंदर दिसतेस. आता तर सखिलने एका चित्रपटातही काम केलंय ज्याचं आम्हाला सगळय़ांनाच खूप कौतुक आहे.
आम्ही आता दादरमध्येच एका मोठय़ा घरात राहायला जातोय. या नव्या घरात जसं मला हवं तसं इंटिरिअर त्याने मला करायला सांगितलं आणि मला हे नंतर कळलं की त्याचं आणि सखिलचं या विषयावर बोलणं झालं होतं तेव्हा तो तिला म्हणाला होता की, इतकी वर्षे आईने खूप तडजोड केली. लग्नाआधी मोठय़ा बंगल्यात राहायची सवय होती तिला आणि इतकी वर्षे ती या छोटय़ाशा जागेत आनंदाने राहिली. आता तिच्यासाठी आपण मोठय़ा जागेत जायचं. अतुलच्या माझ्या विषयीच्या या प्रेमामुळेच पुन्हा एकदा त्याने दिलेलं हे सरप्राइज मला सुखावून गेलं आहे.   
uttaramone18@gmail.com,
sonia_parchure@yahoo.com

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले