मारुती चितमपल्ली
विद्यापीठाच्या शिक्षणात मी अपयशी ठरत चाललो होतो. त्यामुळे आत्मविश्वासही गमावतो की काय असे वाटत होते; पण नंतर मात्र आयुष्यात आपणाला जे आवडते अशाच व्यवसायाच्या क्षेत्रात जायचे मी मनोमन ठरवले. माझी मलाच नव्याने ओळख होत होती. वाचनामुळे साहित्य आणि तत्त्वज्ञानाची आवड निर्माण झाली होती. कुटुंबामुळे प्राणी विज्ञान आणि निसर्ग इतिहासात रस निर्माण झाला. व्यवहारी जीवनात उपयुक्त होईल, अशाच गोष्टी माणसाने शिकाव्यात हे तेव्हा पटले व तोच आयुष्याचा मार्ग असे मी ठरवून टाकले..

नोकरी किंवा व्यवसाय ठरवून करणारी अनेक जण असतात, पण माझ्याबाबतीत तसे घडले नाही. वनखात्यातील नोकरी मी काही ठरवून स्वीकारलेली नव्हती. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता कधी ही वाट जंगलाकडे वळली ते मलाही कळले नाही. आईला असलेल्या रानवाटेच्या माहेरओढीचा वसा मला मिळाला आणि आयुष्याची सुंदर वाट गवसली. गेली कित्येक तपे अरण्यात भ्रमंती केली आणि त्यांच्याच सहवासात राहिलो. आता वयोमानाने त्या भटकंतीवर पायबंद घातले आणि नाइलाजास्तव उर्वरित आयुष्यासाठी सिमेंटच्या जंगलाचा आसरा घ्यावा लागला.
सोलापुरातला जन्म आणि बालपणही सोलापुरातच गेलेले! गुजरातीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाडय़ात आमचे वास्तव्य असले तरीही आमची बोलीभाषा मराठीच! बहुभाषिकांचा वारसा आमच्या घराण्यात होता. आजोबा राहात असलेल्या बुधवार पेठेत तेलुगू आणि मराठी बोलणाऱ्यांची वस्ती असल्याने त्यांच्या घरी तेलुगूच बोलले जाई. बाहेर पडल्यानंतर आणि गरज भासली तरच मराठी भाषेचा वापर होत होता. आई आणि वडिलांना या दोन्ही भाषा अवगत होत्या. आम्ही सारी भावंडे घरी मराठीतच बोलत असू. शेजारी असलेल्या लोकांशी तेलुगू आणि मुस्लीमबहुल वस्तीत राहायला गेल्यानंतर त्यांच्यासोबत उर्दूमिश्रित हिंदीसुद्धा बोलत असू. तेलुगू भाषा बोलता येत असली तरीही लिहितावाचता येत नव्हती. तेलुगू भाषेतील गोडवा मात्र आजही मनाला भावतो, कारण त्या भाषेत लालित्य आहे.
अलीकडच्या काळात मूल वयाच्या तिसऱ्या, चौथ्या वर्षांपासूनच शाळेच्या पायऱ्या चढायला लागते. त्या काळात प्राथमिक शाळेची पायरी चढायला मला वयाचे नववे वर्ष उजाडावे लागले. हातात छडी घेऊन शिकवणाऱ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा दरारा अजूनही कायमस्वरूपी कोरला गेला आहे. छडीच्या साहाय्याने का होईना, पण त्यांनी प्रत्येक विषयात तरबेज केले. त्या वेळी त्यांनी छडी हातात घेतली नसती, तर कदाचित पाया कच्चा राहिला असता आणि पुढील शिक्षण घेता आले नसते. अरण्यवाटेच्या या प्रवासासाठी ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी.’ ही कविता कारणीभूत ठरली. चौथीनंतरच्या शिक्षणात मराठी शिकवणाऱ्या अरगडे सरांनी सुरेख चालीत ही कविता शिकवली आणि या कवितेतील एका दु:खी पक्षिणीचा वृत्तांत मनाला स्पर्शून केला. दहावीत असताना आता शिक्षण अर्धवट सुटते की काय, अशी वेळ आजारामुळे आली होती. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत दरमहा दहा रुपये शिष्यवृत्ती मिळत होती आणि फीसुद्धा माफ होती. परीक्षा दिली नसती तर हे सर्व गमावले असते. त्या वेळी गायकवाड सरांनी आधार दिला आणि भर तापात परीक्षा देऊन दहावीत वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. दरम्यानच्याच काळात लेखनाचा मला गवसलेला सूर पंडित सरांनी ओळखला. ‘लेखन असेच सुरू राहिले तर पुढे चांगले लेखक व्हाल,’ अशी शाबासकीची थाप त्यांनी दिली होती. घर लहान आणि कुटुंब मोठे अशी परिस्थिती. त्यात अभ्यासाला निवांतपणा मिळणे कठीण, पण आईसोबत भल्यापहाटे उठून अभ्यास करण्याची सवय लावून घेतली. उन्हाळ्यात हायस्कूलच्या गार व्हरांडय़ात बसून अभ्यास, तर रात्री वाडय़ाच्या माळवदावर निंबाच्या सावलीत पत्र्याच्या शेडमध्ये बसून अभ्यासाला लागत असे. सवर्णीयांच्या वस्तीत राहणाऱ्या मित्रांच्या कुटुंबातले वावरणेही बरेच काही शिकवून गेले. वाचनाची सवय दिवसेंदिवस अधिक गडद होत गेली. दिवाळी आणि उन्हाळय़ाच्या सुट्टय़ांत भुईकोट किल्ल्यासमोरील सामान्य वाचनालयातील विविध पुस्तके, कादंबरी, आत्मचरित्र आदींच्या वाचनाने खूप काही संस्कार मनावर झाले. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मराठीच्या प्राध्यापकांना एकदा मी माझ्या कथांची वही दाखवली आणि महाविद्यालयातील नियतकालिकात त्यातली एक कथा प्रसिद्ध झाली. मी लिहिलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या त्या कथेचा आनंद वेगळाच होता. वाचनाचा वसा वडिलांकडून मिळाला, असे म्हटले तरी चालेल. अबोल आणि रागीट स्वभावाच्या वडिलांना मी कधी हसताना पाहिले नाही. त्यांच्याजवळ जाण्यास मन कधी धजावले नाही. वाचनाची आवड मात्र त्यांना होती. शिक्षणाचे महत्त्वही पटले होते. परिस्थितीमुळे त्यांना फार शिकता आले नाही म्हणून आम्हा भावंडांना त्यांनी वेळेवर शाळेत दाखल केले. शाळेत नियमित गेले नाही तर ते शिक्षा करत.
वडिलांनी जशी वाचनाची वाट दाखवली तशीच आईने अरण्यवाटेची! अशिक्षित असली तरी पशुपक्ष्यांविषयी तिला खूप काही माहिती होते. चंडोल पक्ष्याला माळचिमणी, कोकिळेला कोयाळ, सातबहिणीला बोलाडय़ा, लावा म्हणजे भुरगुंज्या अशी किती तरी पाखरांची नावे तिच्याकडूनच ऐकली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकवला. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या शिकारी भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला, ही तिने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर न विसरता येणारी आहे. माळढोक हे नाव तिच्याच तोंडून पहिल्यांदा ऐकले. आईने रंगाविषयी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग मला फुलांच्या आणि पाखरांच्या रंगांचे हुबेहूब वर्णन करताना झाला. रंगांच्या छटांना निवडून त्यांना अचूक नाव देण्याचे तिचे कौशल्य जंगलप्रवासात बहुमौलिक ठरले. डाळिंबी, मनुका, कथ्था, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबडय़ा रंगांच्या छटा. जिलेबी, लिंबू, सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी या पिवळय़ा रंगाच्या छटा. लिंबोळी, पोपटी, शेवाळी या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी आणि आनंदी या निळय़ा रंगाच्या छटा. दुधिया, मोतिया आणि चांदी या पांढऱ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा या काळय़ा रंगाच्या छटा. दुअंजिरी, बैंगणी आणि मावा या जांभळय़ा रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली की रंगांचे मिश्रण. अरण्यवाटेच्या आवडीसाठी आई जशी कारणीभूत ठरली तसेच लिंबामामा माझा अरण्यविद्य्ोतला पहिला गुरू ठरला. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवायचा. पाखरांच्या गोड किलबिलीत ओढय़ातल्या वाहत्या पाण्यात शिंदीच्या झाडांच्या पडछाया दिसत. त्यातच मावळणाऱ्या सुंदर चांदण्या डोकावत. शिंदीच्या बनात सुगरण पक्ष्याची शेकडो घरटी उंच फांदीवर डोलताना दिसायची आणि त्यातली काही नळकांडय़ांसारखी, काही अंडाकृती, पण त्यात सुगरण पक्ष्याला शिरलेले मी कधी पाहिलेले नाही. वीण झाल्यानंतर सोडलेली ती घरटी असल्याचे त्या वेळी मामाकडूनच कळले. रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे रानात चुकवून चाललो. त्या झाडाखालून होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला मी तिथेच शिकलो.
अरण्यवाटेवर आणखी एकाने मला जंगलचे न्यारे जग शिकवले, माझा हणमंतामामा. पाखरांची नावे त्यानेच शिकवली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. लिंबामामासारखाच हणमंतामामानेही जंगलाची ओळख मला करून दिली. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी जेवढे ज्ञान आहे, तेवढे कदाचितच कुणाला असावे. विषारी, बिनविषारी सापापासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले. वन्यप्राण्यांच्या लोककथेने भरलेली पोतडी त्यांनी आमच्यापुढे रिती केली आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. हाच मामा अंधश्रद्धाळू होता, पण त्याची अंधश्रद्धाच मला पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले. रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे वन्यजीवशास्त्र उलगडले.
विद्यापीठाच्या शिक्षणात मात्र मी अपयशी ठरत चाललो होतो. त्यामुळे आत्मविश्वासही गमावतो की काय असे वाटत होते; पण नंतर मात्र आयुष्यात आपणाला जे आवडते अशाच व्यवसायाच्या क्षेत्रात जायचे मी मनोमन ठरवले. नव्याने मी मला उलगडत होतो. माझी मला नव्याने ओळख होत होती. वाचनामुळे साहित्य आणि तत्त्वज्ञानाची आवड निर्माण झाली होती. कुटुंबामुळे प्राणी विज्ञान आणि निसर्ग इतिहासात रस निर्माण झाला. व्यवहारी जीवनात उपयुक्त होईल, अशाच गोष्टी माणसाने शिकाव्यात हे तेव्हा पटले व तोच आयुष्याचा मार्ग असे मी ठरवून टाकले.. त्यातूनच वानिकी महाविद्यालयाची वाट गवसली. वानिकी महाविद्यालयात निवड झाली तर रानावनातील एक वेगळे आयुष्य जगता येईल हे त्या वेळी उमगले. रानावनात राहूनच भरपूर वाचनही होईल आणि हायस्कूलमध्ये असताना पुस्तक लिहिण्याची निर्माण झालेली आवड पूर्ण करता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करून पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल जिव्हारी लागला होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. कोईमतूरच्या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले. शिस्त काय असते हे या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव आम्ही विद्यार्थिदशेतच अनुभवले.
वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनाधिकाऱ्यांविषयी त्यांचा ग्रह अनुकूल नव्हता. अहोरात्र जंगलात राहण्याची संधी मिळूनही या वनाधिकाऱ्यांना पक्षी ओळखता येऊ नये किंवा त्यांनी पक्षिनिरीक्षणात व पक्षिशास्त्रात रस घेऊ नये याचे डॉक्टरांना वैषम्य वाटे. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले, पण आठवणीत कायम राहिले ते नवेगाव बांध आणि नवेगाव बांधचे माधवराव पाटील! शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून त्यांनी वनविद्या शिकली आणि ही वनविद्या त्यांच्याकडून मला शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला अनेक वर्षे लागली. नोकरीच्या निमित्ताने अनेक साहित्यिकांचा सहवाससुद्धा लाभला आणि त्यांच्याकडून साहित्याविषयीची जाण अधिक गडद होत गेली. नवेगाव बांध येथे असताना २० वर्षांच्या शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्ती घेऊन वन्यजीव संशोधन आणि लेखनाला वाहून घेण्याचा विचार मनात आला होता. पत्नी सरस्वतीने या विचाराला विरोध केला. सेवानिवृत्तीनंतर नवेगाव बांधजवळ पवनीला राहण्याचा विचार होता, पण याही संकल्पाला पत्नी सरस्वती आणि मुलगी छायाने विरोध केला. सेवानिवृत्तीनंतर व्यावहारिक पातळीवर येऊन विचार केला तेव्हा त्या दोघींचे म्हणणे पटले. सोलापूर किंवा पुण्याला स्थायिक होण्यात अनेक समस्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रात १५ वष्रे नोकरी केल्यानंतर विदर्भात नवेगाव बांधला आलो. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट अनुभवले आणि इथल्या अनुभवाने मला आपलेसे केले. या क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली. साहित्य क्षेत्रातील मित्रपरिवार नागपुरात मिळवता आला नाही तरी विदर्भ ही कर्मभूमी ठरली. आयुष्य एका वेगळ्या टप्प्यावर स्थिरावले खरे, पण आजही या अरण्यवाटेवरचे अनेक प्रवासी साद घालतात आणि त्याच्या आठवणी मला लिहित्या करतात..

Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केल्यानंतरसुद्धा जर्मन आणि रशियन भाषांचे अध्ययन केले. इतकेच नाही तर वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधनही केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभागी झाले. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ते संचालक होते.
शब्दांकन- राखी चव्हाण -rakhi.chavhan@expressindia.com