‘‘विशाल कामात गुंततो, तेव्हा कधी कधी मी लांबून त्याच्याकडे पाहत बसते. त्याची चिंतनमग्न मुद्रा पाहता पाहता मी त्याच्यात हरवून जाते. रंगमंचावर गीत गाता गाता त्या गाण्यात मी हरवून जाऊन स्वत:भोवती रिंगण घालू लागते तशी! रंगमंच कसाही असो, कोणत्याही आकाराचा असो, मला त्यात स्वत:भोवती रिंगण घालण्याची जागा आपोआप दिसू लागतेच. तो माझा आंतरिक शोध असतो. त्या आंतरिक शोधाचं माध्यम असतं ‘गाणं’ आणि त्या शोधाचा माझा साथीदार असतो विशाल. आमचं सहजीवन हा आत्मशोधाचा प्रवास आहे..’’ सांगताहेत प्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज आपले संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते पती  विशाल भारद्वाज यांच्याविषयी..

माझा देवावर विश्वास आहे. संगीत नावाच्या श्रेष्ठ कलेसाठी त्याने माझी निवड केली आणि त्याच कलेसाठी देवाने विशाल भारद्वाजचीही निवड केली. आम्हाला एकत्र येण्यासाठी संगीत हेच निमित्त ठरलं आणि नंतर तेच आमच्या जगण्याचं कारणही ठरलं..
मी मूळची दिल्लीची. हिंदू कॉलेजात संगीत विभागामध्ये शिकत होते. आमच्या कॉलेजच्या सर्वच कार्यक्रमांत माझा सहभाग असायचा. आवाज चांगला होता. थोडा वेगळ्या जातीचा होता, पण मी गायचे, स्पर्धा जिंकायचे. तिथल्या संगीत विश्वात थोडसं नाव झालं होतं. १९८३ साली, मी तेव्हा दुसऱ्या वर्षांत शिकत होते. आणि तो माझ्यापेक्षा दीड वर्षांनी लहान असल्याने असेल, दबकत येऊन थोडंसं हळुवारपणे त्यानं मला विचारलं, ‘तुम्ही मी लिहिलेली गझल गाल का?’ मी टक लावून त्याच्याकडे पाहिलं. ती सरळ, प्रामाणिक नजर मला त्याच्या गझलेकडे घेऊन गेली. तिला मी चाल बांधली व स्पर्धेत, कार्यक्रमांत गायली. पारितोषिकं मिळाली आणि मला विशाल भारद्वाज नावाचा एक छानसा मित्र मिळाला. आमची मैत्री क्षणात झाली, पण प्रेम हळूहळू निर्माण होत गेलं..
 संगीत माझ्या रक्तातच आहे. आमचं कुटुंब तसं मोठं. सहा बहिणी, एक भाऊ आणि आई-बाबा. बाबांना संगीत शिकायचं होतं औपचरिकपणे. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना परवानगी दिली नाही. ती हौस त्यांच्या मुलांनी पूर्ण केली. माझी बडी दीदी-उषादीदी ही गांधर्व महाविद्यालयात शास्त्रोक्त संगीत शिकत होती. अद्यापही भल्या पहाटे सुस्नात, केस मोकळे सोडून हातात तानपुरा घेऊन ‘सा’ लावलेली उषादीदी माझ्या नजरेसमोर आहे. पिताजींनी आईलाही, लग्नानंतर गाणं शिकायला प्रवृत्त केलं होतं. तीसुद्धा गायची. पिताजी दर महिन्याला आमच्या घरी संगीत सभेचं आयोजन करायचे. प्रत्येकानं गायलंच पाहिजे असा दंडक होता. रात्री आठ-साडेआठला सुरू झालेली संगीत सभा पहाटे उशिरापर्यंत चालायची. आमच्या घरी देशातले उत्तमोत्तम कलाकार यायचे. पं. रसिकलाल अंधारिया, पं. जितेंद्र अभिषेकी,                       पं. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व हे सारे आमच्या कुटुंबाचाच भाग होते. गांधर्व महाविद्यालयात       पं. विष्णु दिगंबर जयंतीचा मोठा कार्यक्रम असे. त्या कार्यक्रमांतील गाण्यांच्या मैफिलींना आम्ही सारे जात असू. रात्री उशीर झाल्यावर झोप यायची. पिताजी कडेवर घेऊन घरी यायचे. तेव्हा कळलं नाही, पण आता लक्षात येतं त्या संस्काराचं महत्त्व!  माझ्याही गाण्याचं लोक कौतुक करायचे. माझा आवाज वेगळा होता. तरीही लोक म्हणायचे, ‘उद्या ही नाव कमावेल.’ मला लता मंगेशकर, आशा भोसलेंची गाणी आवडायची, पण मी स्पर्धात त्यांची गाणी गात नसे, कारण माझ्या आवाजाचा वेगळा पोत, पण इतर वेळी ती गाणी गुणगुणायचे. ‘मेघा छाए, आधी रात’ गुणगुणताना डोळ्यांत पाणी दाटायचं. नातेवाईक चेष्टा करायचे. (पण, ते पाणी का? याचा उलगडा आता आता होऊ लागलाय.) मी त्या सुरांशी माझं नातं शोधू पाहायचे.        
पं. विनयचंद्र मुद्गल, पं. मध्युभाई मुद्गल, वसंत ठकारजी यांच्याकडून शास्त्रोक्त गायनाची पहिली संथा गांधर्व महाविद्यालयात मिळाली तर घराण्याची संथा मला इंदोर घराण्याचे महान गायक पं. अमरनाथ यांनी दिली. ते सांगायचे- ‘बेटा, खुदको पहले सुनो! स्वत:चा आवाज आधी ऐक. स्वत:ला काय सांगायचंय याचा शोध घे.’ मी संगीतामध्ये स्वत:ला शोधत राहिले. या शोधाच्या प्रवासात विशाल माझा सहप्रवासी झाला..
विशाल राम भारद्वाज मूळचा मेरठचा. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी गीतं लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवी राम भारद्वाज यांचा तो मुलगा. रामजींनी मुंबईत येऊन नाव कमावलं होतं. प्रत्येक कलावंताला मुंबईची ओढ असते. विशाललाही ती होती. तो संगीताच्या, साहित्याच्या बाबतीत ध्येयवेडा होता.  हळूहळू आमचंही ‘संगीत’ जुळलं. त्यानं गीतं लिहायची व मी त्यांना चाली बांधून गायची, असा नंतर शिरस्ता बनला. मी त्या वेळी काहीशी उद्धट होते. घरात सर्वात लहान म्हणून लाडावलेली मुलगी व कौतुकाची सवय! कोणालाही पटकन बोलून जायचे. विशाल त्या मानाने सरळ, प्रामाणिक आणि ऋजू आहे. त्याच्या वागण्यातली ऋजूता मला हळूहळू भावली. मी त्यांच्या प्रेमात पडले, आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर दोन र्वष आमचं लग्न होऊ शकलं नाही.
विशाल शिकत असतानाच संगीतरचना करायचा. १९८४ साली त्याची एक रचना खुद्द आशा भोसले यांनी गायली होती. पण दुर्दैवानं त्याचे वडील वारले. त्याला जगण्यासाठी कामं करावी लागली. तो मुंबईत आला. त्याचा संघर्ष सुरू झाला. त्याच्याबरोबर माझाही! लग्न ठरल्यानंतर तो तब्बल वर्षभर मुंबईत होता. आमची भेटच नाही. विरहवेदना दोन्हीकडे. तो सी.बी.एस्. म्युझिक कंपनीत नोकरीला लागला. स्वतंत्र कार्यक्रम शोधू लागला. मुंबई दूरदर्शनसाठी कार्यक्रम करू लागला. त्या वर्षभरात त्याला भेटायच्या ओढीनं मी यायचे. तो एक-दीड खोलीच्या भाडय़ाच्या घरात आई व भावासोबत राहायचा. मला राहायला जागा नव्हती. त्या वेळी त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली छाया गांगुलींनी दूरदर्शनसाठी गाणी गायली होती. त्यांना ही अडचण समजली. छायादीदींनी मला त्यांच्या घरी नेलं. त्यांची गाणी गाऊन (‘आपकी याद आती रही’ सारखी अनेक गाणी) मी स्पर्धेत बक्षिसं मिळवली, त्यांच्याच घरी राहायला मिळालं. असेच दिवस चालले होते. अखेर आम्ही लग्न केलं.
 विशालचं स्वत:चं घर नव्हतं. सहा महिन्यांत भाडं देता येतील इतपत पैसे साठवणीला होते. त्याची आई, भावाकडे राहायला गेली व मला स्वतंत्र घर थाटून दिलं. विशालनं नोकरी करायची नाही, अशीच अट मी त्याला घातली होती. संगीत हेच विश्व हवं होतं. तो आमच्यातला समान दुवा होता. विशालची मिळकत फारशी नव्हती, पण जगायला पुरेशी होती. जे मिळायचं त्यात भागवायचो. आमच्यात ‘मूहँ दिखाई’साठी ज्येष्ठ नातेवाईकांकडून आशीर्वाद म्हणून पैसे मिळायचे. तेही आम्हाला संसाराला त्या वेळी पुरले. उद्याची फारशी चिंता नव्हती. स्थिरस्थावर होईपर्यंत मूल होऊ न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. पैसा हे जगण्याचं उद्दिष्ट नव्हतं, तर ते साधन होतं. ‘संगीत’ ही उपजीविका नव्हती तो आमचा प्राण होता. दूरदर्शनवरच्या कामाचे फारसे पैसे मिळायचे नाहीत. त्यात विशाल उत्तमोत्तम कलाकारांना बोलवायचा. त्यांचं मानधन देऊन हाती फारसं उरत नसे. पण दुय्यम काही करण्याचा आमचा स्वभावच नाही. आम्ही सर्वश्रेष्ठ करतो, असा आमचा दावा नाही, पण आम्ही आमच्यातलं सर्वश्रेष्ठ देतो हेही तितकंच  खरं! त्या वेळी कविता कृष्णमूर्तीनं आम्हाला खूप मदत केली. अगदी आर्थिक मदतही. कुमार शानूही त्या वेळी दूरदर्शनवर विशालसाठी गायला. विशालने मलाही दूरदर्शनवर गायला संधी दिली. मी पिनाज मसानीसोबतही गायले. पण सी.बी.एस. कंपनीसाठी नाही. त्या वेळी मला कोण ओळखत होतं?
 विशाल शांत प्रकृतीचा बनत गेला. तो चिडत नाही आताशा. पण गाण्याच्या बाबतीत मात्र तो शिस्तीचा आहे. सर्वाच्या बाबतीत, अगदी माझ्यासाठीसुद्धा. १९९४ पासून तो माझ्यासाठी बुल्लेशाह यांच्या रचनांना चाली बांधत होता. त्याच्या चाली अवघड असायच्या. काही वेळा गाताना त्याला हव्या तशा हरकती येत नसत. पण तो त्याच्या हट्टापासून ढळत नसे. मी चिडायचे. माइकसमोरून निघून जायचे. स्वत:वर कावत बसायचे. पण हा त्याच्या मतावर ठाम असायचा. त्याला हवा तसा परिणाम गळ्यातून येईपर्यंत तो थांबायचा नाही. न ओरडता, शांतपणे तो काम करत राहायचा. पती-पत्नीचं नातं त्या वेळी तो बाजूला सारायचा. त्या वेळी तो फक्त संगीतकारच असायचा.
  विशालला साहित्याचीही उत्तम जाण आहे. विविध भाषांतली अनुवादित, भाषांतरित पुस्तकं तो वाचतो. आमच्या म्युझिक  रूममध्येच नाही तर आमचा वावर जिथे जिथे असतो तिथे तिथे संगीताची साधनं आणि पुस्तकं असतातच. विशालच्या डोक्यात सदोदित संगीतच असतं. अलीकडे तो चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आदी बनलाय. मीही त्याच्यासोबत प्रत्येक जबाबदारी हटकून उचलते. ‘तू ही जबाबदारी उचल’ असं आम्ही एकमेकांना कधी सांगत नाही. ते गृहीतच धरतो. जिथे कुठे कमतरता दिसते तिथे पाणी कसं खळगा भरून काढून मगच पुढे जातं, तसं आम्ही दोघं करतो.
घरगुती गोष्टींबाबत विशाल वा मी आग्रही नसतो. दोघांपैकी कोणीही घरातली कामं करतो. पूर्वी मी रियाज करायचे तेव्हा विशाल सकाळची न्याहारी व चहा वगैरे बनवायचा. आमचा मुलगा आसमान याचीही काळजी विशाल घेतो. त्याला वेळ मिळेल तेव्हा नाही, तर मुलासाठी तो खास वेळ काढतो. आसमान हे नाव त्यानंच शोधलं व गुलजारजींनी त्या नावाला पसंती दिली. गुलजारजी हे त्याचे आवडते लेखक, ते पितृस्थानी आहेत आम्हाला. त्यांनाही विशालबद्दल पित्याचं ममत्व वाटतं. विशालची सांगीतिक आणि साहित्यिक जाण त्यांना आवडते.
 विशाल माझा नवरा आहे म्हणून नाही पण एक सर्वस्पर्शी प्रतिभावंत आहे, म्हणून मला त्याच्याविषयी आदर वाटतो. याचा अर्थ आमच्यात वाद होत नाहीत, असं मुळीच नाही. आमच्यात वाद नक्की होतात. पण ते तात्पुरते असतात. ते व्यक्तिगत अहंभावाचे (ego) नसतात तर मुद्दय़ांवर आधारित असतात. तो मुद्दा आम्ही मिळून सोडवतो व मार्ग काढतो. प्रत्येक पती-पत्नीच्या आयुष्यात तसे वाद होतातच, ते येथे सांगण्यात पुनरावृत्ती होईल. पण एक नक्की आहे, आम्ही परस्परांना पूरक आहोत, २१ वर्षांनंतरही परस्परांवर अनुरक्त आहोत.
विशाल संगीतरचना करताना त्याला पाहणं कुतूहलाचं असतं. तो शांत असतो, पण अंतर्यामी अस्वस्थ असतो. तो नेहमी काही ‘हटके’ करतो पण सर्वसामान्यांना ते कळेल असा त्याचा प्रयत्न असतो. मराठीतीलच नव्हे तर भारतातील मोठे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्याला एक मंत्र दिला होता. खळेकाका, (आम्हीपण त्यांना खळेकाकाच म्हणायचो) आमचे शेजारी होते यारी रोडवर. आम्ही नवा नवा संसार थाटलेला. त्यांना विशाल पुत्रवत आवडायचा व माझ्यावर त्यांचं सुनेसारखं प्रेम होतं. त्यांच्या घरातल्या प्रत्येक सणावाराला आमचं मेहुण ठरलेलं. अगदी कुटुंबीयांसारखे लाड करायचे ते. खळेकाका त्याला म्हणाले होते, ‘गाणं कितीही अवघड बनवा, परंतु अवरोही अशी साधी, सोपी, सरळ असावी की कोणालाही सहज गुणगुणता यावं.’ खळेकाकांची गाणी तशीच होती. झी अ‍ॅवॉर्डच्या कार्यक्रमात मी त्यांचं ‘या चिमण्यांनो’ हे गाणं गायलं होतं, त्यामुळे मला त्याचा प्रत्यक्ष प्रत्ययही आला होता. विशालनं हा गुरुमंत्र लक्षात ठेवला आहे.
मला गाणी देताना माझा पती म्हणून नव्हे तर मी एक गायिका म्हणून माझ्या आवाजाच्या पोताला अनुसरून तो चाली रचतो. हा पोत पाश्र्वगायिकेचा नाही हे त्याला माहिती आहे. १९९४ पासून तो माझ्यासाठी बुल्लेशाहची रचना स्वरबद्ध करत होता. त्या दरम्यान ‘माचिस’ आला अन् त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. पण तरीही तो ‘इश्का इश्का’ या माझ्या अल्बमसाठी काम करत होता. त्या अल्बमने आमचा जीवन प्रवास बदलला. मी हळूहळू शांत होत गेले. आसमानच्या आईपणानं एक वेगळं परिमाण लाभलं होतं. माझ्यातला आध्यात्मिक धागा बळकट होत गेला. गुलजारजींनी आमच्यासाठी ‘नमका इश्क’ हा अल्बम लिहून दिला. त्यानंतर मीही भावनिकदृष्टय़ा पूर्णपणे बदलले. भगवान ओशोंच्या विचारांचा आम्हाला परिचय झाला. त्यांचा प्रभाव आम्हा दोघांवरही आहे. ओशो कम्यूनमध्ये मी नियमित जाऊ लागले. त्यांचे विविध अभ्यासक्रम मी पूर्ण केले. सूफी पंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली. ‘सूफी’ ही एक संपूर्ण जीवनशैली आहे, असं त्यात जाणवलं. जेव्हा जेव्हा मी कार्यक्रम करते, तेव्हा तेव्हा माझ्या मनात ती जाणीव जागृत होते. त्यामुळे माझ्यातील नकारात्मक जाणिवा नष्ट झाल्या. सकारात्मक प्रकाशानं जीवन भरून गेलं. ‘इश्का इश्का’ आणि ‘नमका इश्क’नंतर भौतिक जीवनात फारसे बदल झाले नाहीत. पण मी अंतर्यामी बदलून गेले व आमचं संसारिक नातं अधिक प्रगल्भ झालं. मला व्यक्तिगतरीत्या कामं मिळत नव्हती. पण विशाल खूप बिझी झाला होता. त्याच्या निर्मितीसंस्थेचा काही भार मी उचलत होते.
  २००६ साली ‘ससुराल गेंदा फूल’ या गीतानं मात्र सारं बदललं. या वेगळ्याच प्रकारच्या गाण्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि मग माझ्यासारख्या पोत असणाऱ्या गायिकांना एक दालन उघड झालं. तोपर्यंत मी आणि विशाल शांतपणे वाट पाहत होतो. हा संयम विशालमध्ये पूर्वीपासूनच होता. पण माझ्यात त्याच्या सहवासाने व ओशोंच्या तत्त्वज्ञानामुळे निर्माण झाला. यानंतर वेगवेगळ्या संगीतकारांनी माझ्यासाठी गाणी रचली. २००९ नंतर स्वतंत्र शोज होऊ लागले. धावपळ सुरू झाली.
विशालसोबत सहजीवन जगताना एक व्यक्ती म्हणून आणि एक कलावंत म्हणून माझा विकास झाला. मी आज चित्रपट गायिका म्हणून कामं करतेय.
 रियाजाच्या वेळा नक्की नसतात, पण दिवसात चार ते पाच तास रियाज मी करतेच. विशाल त्यावर लक्ष ठेवून असतो. वेळ मिळेल तेव्हा आम्ही संगीतावर चर्चा सुरूच असते. चित्रपट-निर्मितीबाबत मात्र अगदी व्यवस्थित वेळ काढून विविध विषयांवर व चित्रपटांच्या विविध अंगांवर आम्ही चर्चा करतोच. त्यातील माझ्या मतांना तो विचारात घेतोच. पण अंतिम निर्णय त्याचा असतो. घरातल्या गोष्टींबाबत त्याची मतं असतात. पण माझा निर्णय अंतिम असतो, असे तो मानतो. तो झकास जेवण बनवतो. किंबहुना लग्नानंतर त्यानंच मला जेवण करायला शिकवलं. तो दाल माखनी, मटर पनीर यासारख्या भाज्यांबरोबरच फणसाची, मटणाच्या चवीची अवघड भाजीही लीलया करतो. आमच्या दोघांच्याही जेवण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत.
 तो कामात गुंततो तेव्हा कधी कधी मी लांबून त्याच्याकडे पाहत बसते. त्याची चिंतनमग्न मुद्रा पाहता पाहता मी त्याच्यात हरवून जाते. रंगमंचावर गीत गाता गाता त्या गाण्यात मी हरवून जाऊन स्वत:भोवती रिंगण घालू लागते तशी! रंगमंच कसाही असो, कोणत्याही आकाराचा असो, मला त्यात स्वत:भोवती रिंगण घालण्याची जागा आपोआप दिसू लागतेच. तो माझा आंतरिक शोध असतो. त्या आंतरिक शोधाचं माध्यम असतं ‘गाणं’ आणि त्या शोधाचा माझा साथीदार असतो विशाल भारद्वाज. आमचं सहजीवन हा आत्मशोधाचाच प्रवास आहे..    (सदर समाप्त)