पाश्चात्त्य आधुनिक वैद्यकशास्त्रात वाणी व शब्दनिर्मितीचा जो विचार केला आहे त्यापेक्षा किती तरी पटीने खोलवर भारतीय तत्त्वज्ञानाने नादचैतन्याचे उगमस्थान असलेल्या वाणीचा विचार केला आहे. वाणीचे चत्वारस्वरूप व्यक्त केले आहे. ती रूपे म्हणजे- १. नाभीस्थित परावाणी, २. हृदयस्थित पश्यंतीवाणी, ३. कंठस्थित मध्यमावाणी, ४. मुखस्थित वैखरीवाणी.
वाणीतून स्फु रणाऱ्या नादचतन्याचे चार भागांत विभाजन केले आहे ते म्हणजे घोष, ध्वनी, नाद व शब्द. कोणाही व्यक्तीच्या मनात आवाजनिर्मितीचा विचार आल्याबरोबर नाभीस्थित परावाणी स्फुरण पावते. नादचतन्याचे पहिले रूप घोष निर्माण होतो. तद्नंतर त्या घोषाचे, हृदयस्थित पश्यंतीवाणीमध्ये ध्वनीत रूपांतर होते. पश्यंतीकडून ते ध्वनिरूप नादचतन्य, कंठस्थित मध्यमावाणीत आल्यावर ते नादरूपात साकारते व त्यानंतर मध्यमावाणीत निर्माण झालेल्या नादाचे वैखरीवाणीद्वारे म्हणजेच मुखस्थित जीभ, दात, टाळू, मुर्धा व ओठ यांच्या विशिष्ट कार्याने शब्दांत रूपांतर होते. थोडक्यात, कोणीही उच्चारलेला शब्द वरवर पाहाता वैखरीवाणीतून प्रगट झालेला वाटत असला तरी त्याच्यामागे अनुक्रमे कंठस्थित नादरूप मध्यमावाणी, हृदयस्थित ध्वनिरूप पश्यंतीवाणी आणि नाभीस्थित घोषरूप
परावाणीचे बल असावे लागते. कोणाही व्यक्तीच्या वर नमूद केलेल्या चत्वारवाणी शुद्ध असतील तर त्याच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सर्व अष्टगुण घेऊन बाहेर पडेल. उपनिषदकार म्हणतात-
 जसे कोणतेही झाडाचे पान शिरांनी व्याप्त असते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण देह चत्वारवाणीच्या स्थूल अथवा सूक्ष्म रूपाने व्याप्त असतो. पूज्य ज्ञानराज माऊलींनी ॐ या  परमशुद्ध नादचतन्याला चत्वारवाणीचे मंदिर संबोधले आहे, कारण त्याच्या नित्य शास्त्रशुद्ध साधनेने साधक व्यक्तीच्या चत्वारवाणी व त्यातून स्फुरणारी नादचतन्याची घोष, ध्वनी, नाद व शब्द ही चारही रूपे खऱ्या अर्थाने फुलतात, बहरतात. ॐकार म्हणजे वाणीचे मूलतत्त्व आहे. वाणीचे संपूर्ण वैभव म्हणजे ॐकाराचाच विलास आहे, कारण वाणी म्हणजे केवळ जिव्हा व्यापार नसून अंतरात्म्याचा आवाज आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचेही प्रमुख अंग आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी नित्यनेमाने ॐकार साधना करून चत्वारवाणीचे शुद्ध स्वरूप अंगी बाणायला नको का? चत्वारवाणीतून ॐ फुलवा. व्यक्तिमत्त्व व आरोग्य आपणच खुलवा.
डॉ. जयंत करंदीकर -omomkarom@rediffmail.com