कलाकारांचा एकमेकांशी संवाद होणं, त्या संवादातून नवीन कलानिर्मिती होणं, त्याबरोबरच नवीन कला शिकणाऱ्यांना संधी मिळणं, आणि हे सगळं ‘आर्टस्फियर’च्या एका व्यासपीठावर घडतं. त्यांच्या प्रेरणास्रोत आहेत,  करिष्मा आणि अनुभा हर्लाल्का या बहिणी.
कला आणि समाजातली प्रगल्भता यामध्ये एक पक्कं नातं आहे. असं म्हणतात की, कोणताही समाज हा प्रगल्भ होण्यासाठी त्याची नुसतीच आíथक प्रगती होऊन उपयोगाचं नाही, तर त्यासाठी समाजामध्ये नवीन गोष्टी निर्माण व्हायला हव्यात, नवे शोध लागायला हवेत, नव्या प्रक्रिया निर्माण व्हाव्यात. ही निर्मितीक्षमता जशी व्यवसायांमध्ये यायला हवी तशीच ती कलाक्षेत्रातही व्हायला हवी. कला क्षेत्रामध्ये नवनिर्माणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या हर्लाल्का भगिनींच्या कामाला मिळणारा प्रतिसाद म्हणूनच आशावादी ठरतो.
कलाकारांना त्यांच्या कलेचं व्यवसायात रूपांतर करताना अनेकदा अडचणी येतात असं आपल्याकडे दिसून येतं. यालाच छेद देत २०१२ मध्ये पुण्यात करिष्मा आणि अनुभा हर्लाल्का या बहिणींनी ‘आर्टस्फियर’ची स्थापना केली आणि दोनच वर्षांत छोटय़ा कल्पनेचं एका यशस्वी व्यवसायात रूपांतर केलं. ‘आर्टस्फियर’, म्हणजे विविध प्रदर्शन कला (performing arts) प्रयोगांसाठीचं एक व्यासपीठ. इथे केवळ कला शिकवल्या जात नाहीत, तर विविध कलाकार आपल्या कलांमध्ये इतर कला प्रकारांकडून प्रेरणा घेऊन नावीन्य आणि प्रयोगशीलता आणण्याचा प्रयत्न करतात. इथे त्या कलेबरोबरच, त्या कला प्रकाराने होणारे मानसिक बदल यावर विशेषकरून भर दिला जातो. येथे केवळ कला शिकवण्याचा ‘क्लास’ भरत नाही, तर विविध कलाकारांनी आपापल्या अनुभवातून, प्रयोगातून, कलेमधून होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी, त्याबद्दल प्रयोग करण्यासाठी चालवलेली चळवळ भेटीस येते, त्यांच्यासाठी तयार केलेलं एक जिवंत व्यासपीठ इथे अनुभवता येतं.
अनुभा आणि करिष्मा या दोघींनीही मानसशास्त्रामध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. आणि लहानपणापासून नृत्याचे धडेही घेतले आहेत. स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या अनुभाला अनेक वर्षांपासून नृत्य आणि मानसशास्त्र या दोन गोष्टींना जोडेल असं काही तरी करावं असं वाटत होतं. यामधूनच मग डान्स थेरपीची एक संस्था उभारावी, असं तिच्या मनात आलं. यासाठी भारतामधल्या काही प्रयोगांच्या ती शोधात होती. पण अनेक दिवस शोधूनही तिला आवडेल असं, सर्वसमावेशक केंद्र तिला सापडलं नाही. त्यामुळे अनुभाला ज्या पद्धतीचं केंद्र हवं होतं ते तिने स्वत:चं उभं करायचं असं ठरवलं. भारतात, आणि इतर जगातही डान्स थेरपीची वर्कशॉप्स अनेक ठिकाणी घेतली जातात. पण त्याला मानसशास्त्र जाणणाऱ्या, त्यात अभ्यास आणि काम केलेल्या तज्ज्ञांचा सहभाग अभावानेच असतो. त्यामुळे त्याचा नक्की फायदा शिकणाऱ्या व्यक्तीला होतोच असं नाही. झाला तरी तसं सिद्ध नक्कीच करता येत नाही. कारण मानसशास्त्राची काहीच प्रमाणे तिथे लागू झालेली नसतात. मानसशास्त्रामध्ये शिक्षण झाल्यामुळे अशा प्रयोगांमधला फोलपणा अनुभा आणि करिष्माला कायमच जाणवायचा. त्यामुळे आपल्या केंद्रामध्ये जेव्हा डान्स थेरपी दिली जाईल तेव्हा याला शास्त्रीय पाया नक्कीच असेल, असा निश्चय त्या दोघींनी केला होता. त्याबरोबरच, केवळ त्या कलेचा अभ्यास न होता त्याने होणाऱ्या सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्यांनी ठरवलं होतं.
२०१२ वर्षांच्या सुरुवातीला त्यांच्या अशा एका केंद्राची कल्पना थोडी मर्यादित होती. पुण्यामध्ये कल्याणीनगर या भागात एका सदनामध्ये त्या त्यांचे वर्ग घ्यायच्या. या एकाच स्टुडीओमध्ये नृत्याचं सादरीकरण, चर्चा, कार्यालय सगळंच होतं. पण जसं जसं त्या वर्कशॉप्स घ्यायला तज्ज्ञांना बोलवत होत्या तसं तसं त्यांच्याकडची मागणीही वाढतच होती. त्यांच्या कामानिमित्त जसं जसं त्या लोकांना भेटत होत्या तसं तसं त्यांना नृत्याबरोबरच इतरही कला या ‘आर्टस्फियर’मध्ये प्रदíशत व्हाव्यात असं जाणवू लागलं. त्यामुळे ‘आर्टस्फियर’ची संकल्पना विस्तारू लागली. मग एकाचे दोन आणि आता दोनाचे ३ स्टुडियो झाले आहेत. आज इथे नृत्याचे ४ प्रकार म्हणजे कथ्थक, भरतनाटय़म, सालसा आणि सध्या भारतात व्यायामप्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॅले डान्सचे वर्कशॉप्सही इथे होतात. प्रत्येक नृत्यप्रकार शिकवण्यासाठी त्या त्या क्षेत्रात अनेक र्वष अभ्यास केलेले कलाकार इथे येत असतात. जसं कथ्थकसाठी शांभवी दांडेकर यांच्या अकादमीच्या शिष्या वर्ग घेत असतात.
इथे वर्ग घेत असलेल्या काहींशी बोलल्यावर हे इतर नृत्य किंवा योगा क्लाससारखं याचं स्वरूप नाही हे चटकन लक्षात येतं. तिथे ड्रम्स शिकवणारा एक मुलगा म्हणाला की इथे, इतर कलाकारांकडे बघून मी माझ्या कलेविषयी अधिकच जागरूक झालो आहे. सालसा करणाऱ्याकडून मी माझ्या ड्रिमगमध्ये पॅशन कशी येईल हे शिकलो. मार्शल आर्ट्सच्या शिक्षकांमधून कोणत्याही कलेची वृद्धी ही नियम आणि व्यवस्था या शिवाय होऊच शकत नाही हे शिकलो. आत्ममग्न होऊन, आपल्याच निर्मितीवर खूश होऊन राहण्यापेक्षा इथे आलो की मला रोज नवीन शिकायला मिळतं. नवीन आव्हानं समोर येतात आणि त्यामुळे माझ्या कलेबरोबर माझी एकरूपता अधिकच वाढते.
कलाकारांचा एकमेकांशी संवाद होणं, त्या संवादातून नवीन कलानिर्मिती होणं, त्याबरोबरच नवीन कला शिकणाऱ्यांना संधी मिळणं, आणि हे सगळं एका व्यासपीठावर घडत असल्याने ही गोष्ट विचार करणाऱ्याला फारच छान वाटते. पण हे सगळं साध्य होण्यासाठी गरजेची होती ती करिष्मा आणि अनुभा यांची जिद्द आणि जोखीम उचलण्याची तयारी!
या दोघीही कलाशाखेच्या असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक ज्ञान अजिबात नव्हतं. पण होतं एक स्वप्न. आणि त्यामागे धावण्याची तयारी. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांनी, वडिलांनी आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंटने त्यांना खूप मदत केली, त्याच्या शिवाय त्यांचा हा व्यवसाय पहिल्या काही महिन्यातच बुडाला असता, असं त्या हसत हसत सांगतात. जागा घेण्यासाठी पसा उभा करणं, कलाकारांना अशा व्यासपीठाचं महत्त्व पटवून देणं. इथे लोकं येतील म्हणून वेग वेगळे प्रयोग करणं हे सगळं त्या शिकत होत्या. पाण्यात पडल्यावर जसं काही गटांगळ्या खाल्ल्या की, आपल्याला आपोआपच हात पाय मारून मग पोहायला येतं, तसचं आमचं झालं, असं त्या सांगतात. हे सगळं करताना एकमेकींच्या विरुद्ध स्वभावाचाही यांना फायदा झाला. अनुभा, जरा जास्त रिक्स घेणारी, नवीन प्रयोगाला पटकन ‘हो’ म्हणणारी, बडबडी आणि मोकळ्या स्वभावाची आहे. तर करिष्मा, जरी वयाने लहान असली, तरी अधिक विचारी, शांत आहे. अनुभा वेगवेगळ्या कल्पना मांडत असते आणि करिष्मा त्या कल्पना प्रत्यक्षात कशा आणता येतील यावर लक्ष केंद्रित करत असते. त्याच्या या कामामधून आज पुण्यात ‘आर्टस्फियर’ची तीन मोठी दालनं आहेत. इथे नृत्याबरोबरच, ड्रम्स थेरपी, रेकी, विशेष क्षमता असणाऱ्या मुलांसाठी कला वर्ग, मार्शल आर्ट ट्रेिनगसाठी या सगळ्यासाठी जागा आहे.
यापुढच्या काळात या ‘आर्टस्फियर’मध्ये आणखी धमाल करायचं अनुभाच्या मनात आहे. इथे शांत बसून वाचन करायची जागा निर्माण करायची आहे. आज कोठेही, एक तासभर शांतपणे वाचत बसावं, विचार करावा अशी जागाच नाही. प्रत्येकाला अशा जागेची गरज वाटते, पण कोणीच अशी जागा देत नाही! तर इथे एक छोटं ग्रंथालय, एक कॅफे असावा असं अनुभाच्या डोक्यात आहे. नवीन पुस्तकांचं जाहीर वाचन, कविता वाचन इथे व्हावं, चर्चा घडाव्या असं तिला वाटतं. आणि करिष्मा आता या कल्पनेला प्रत्यक्षात कसं आणावं याच्या विचारात आहे.  फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात कला क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल झाले, ‘आर्टस्फियर’सारखे प्रयोग भारतामध्ये कलाक्षेत्रात मोठे बदल घडवतील का? बघायलाच हवं!
प्रज्ञा शिदोरे -pradnya.shidore@gmail.com