आतापर्यंत नोकरी वा करिअर आणि संसार हेच सांभाळणं स्त्रीला अवघड जात होतं. पण काळ बदलत जातोय तसं स्त्रीने स्वत:तील ताकदीला अधिकच बळ दिलं, त्यामुळे नोकरी-करिअर आणि संसार यांच्या जोडीला छंद हा तिसरा कोन अलगद येऊन चिकटला. आजच्या स्त्रीसाठी ती आता कसरत राहिली नाहीए तर ती जगण्याला ऊर्जा देणारी, आनंद देणारी गोष्ट झालीय. म्हणून ‘चतुरंग’च्या आजच्या वर्धापन दिन विशेष अंकात त्या स्त्रियांना सलाम करतोय; ज्यांनी आपला संसार, आपलं करिअरही सांभाळलंच, पण त्याचबरोबर आपल्या छंदालाही मनसोक्त उपभोगलं. समाजसेवेतून काही विधायक घडवलं. आजच्या पुरवणीत अशाच पाच जणींचा समावेश केला आहे. गायिका आशा भोसले, डॉ. ममता लाला, जयश्री काळे डॉ. मीनल माटेगांवकर आणि शार्लिन वाझ! त्यांच्यासारख्याच आजच्या चतुरस्र स्त्रियांना ‘चतुरंग’चा मानाचा मुजरा!

आयुष्यभर गाण्याची सुरेख मैफल सजवणाऱ्या आशा भोसले आज आपल्या आणखी एका आवडीच्या गोष्टीत मग्न आहेत, ‘आशाज्’ या रेस्टॉरंटच्या माध्यमातून आपल्या पाककलेला सर्वदूर पसरवण्याच्या! त्यासाठी शेफना खास प्रशिक्षण देताहेत. स्वत: पदार्थाची चोखंदळ निवड करताहेत. एखादा पदार्थ शिकून घेण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या आणि या व्यवसायातलीही माणसं जपणाऱ्या आशाताईंमधल्या एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाविषयी.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?

ch09    ‘अ‍ॅडिंग अ लिटिल स्पाइस टू लाइफ’ हे ब्रीद वाक्य असलेली ‘आशाज्’ ही जगातील भारतीय रेस्टॉरन्टची एक चेन, आशा भोसले यांची! खरं तर त्यांच्या गाण्यांनी आपल्या आयुष्यात फार पूर्वीच अपूर्व गोडी निर्माण केलीय. पण आता ‘आशाज्’मध्ये प्रत्यक्ष स्वादाचाही अविष्कार घडतो आहे. स्वर व स्वाद या अंतरात्म्याला साद घालणाऱ्या दोन गोष्टी. त्यांची सुरुवातही ‘स्व’ने होते, आशाताईंच्या ‘स्व’ची छाप ‘आशाज्’मधल्या प्रत्येक गोष्टीवर पडली आहे आणि म्हणूनच त्यांचं गाणं असो की खाणं वेगळाच आनंद देतं!
२००२ मध्ये दुबई येथे वाफी सिटीमध्ये त्याचं पहिलं रेस्टॉरंट सुरू झालं. खास भारतीय जेवणाची लज्जतदार चव व जोडीला ‘सांगीतिक’ सजावट यामुळे लवकरच या रेस्टॉरंटचं नाव झालं आणि त्याच बरोबरीने कुवेत, कतार, बहारीन, अबुधाबी, इजिप्त, बर्मिगहॅम येथे १० रेस्टॉरंट उघडली गेली. येत्या ५ वर्षांत मध्य पूर्व आशिया, ब्रिटन आणि उत्तर अमेरिका येथे १० रेस्टॉरंट उघडण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
आज आशाताईंशी केवळ उद्योजिका म्हणून गप्पा मारायच्या होत्या. सुरुवात अर्थातच त्यांच्या भूतकाळातील बालपणातल्या खाण्याच्या आठवणीनेच झाली. ‘‘खाण्याची आवड उद्योगात कशी बदलली माहीत नाही. पण आधी आयुष्यात गाणं आलं आणि मग खाणं करणं. चार वर्षांची असल्यापासून वडिलांनी गाणं शिकवलं. गाणं हेच आयुष्य होतं. बाबांबरोबर, नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरायचं, राहायला घर नव्हतं. त्यामुळे शिक्षणाची तशी हेळसांडच झाली. बाबा गेल्यानंतर आईसह आम्ही पाच भावंडं पहिल्यांदा पुण्याला व नंतर कोल्हापूरला आलो. तिथं गेल्यावर शाळेत गेलो तर गेलो नाही तर नाही. शाळा, शिक्षण यापेक्षा आम्ही गाणं शिकावं हाच आईचा प्रयत्न व इच्छा होती. ७०-८० वर्षांपूर्वीचा काळ होता. मुलींच्या शिक्षणाची तशी पद्धत नव्हतीच. पण आईनं स्वयंपाक मात्र शिकवला. मुलींच्या जातीला तो आलाच पाहिजे, यावर तिचा कटाक्ष होता.
कोल्हापूरला असतानाही माई तशी अस्वस्थच असायची. तिला सदैव चिंता होती, या मुलांचं काय होणार? गुजराती डोकं होतं तिचं! आई गुजराती होती, खानदेशची! तिचा सारखा दोन अधिक दोन किती, असा व्यवहारी विचार असायचा. कोण गाणार, कोण वर येणार, कोण वडिलांसारखं होणार? ती आम्हाला सतत वडिलांचा आवाज कसा वर चढायचा, ते किती मोठे होते, त्यांच्या गाण्यांना कसे वन्समोअर मिळायचे हे खुलवून खुलवून सांगायची. वडील दिसायला सुंदर, आईही सुंदर, गुजराती गोरी! पण एकदम मराठी, नऊवारी साडीतली! मग तिनं आम्हाला सांगायला सुरुवात केली की, तुम्ही दिसता किती सुंदर. हिरॉईन तुमच्यापुढे काहीच नाही. आम्हा मुलांच्या मनात आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हे तिनं पहिलं, हा असा आत्मविश्वास फक्त आईच देऊ शकते, निर्माण करू शकते. आम्हीही स्वत:ला सुंदरच समजत गेलो. पण यामुळेच आमच्यात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला. जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, जीवनाच्या प्रत्येक शर्यतीत उपयोगी पडला. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज  इथपर्यंत पोहोचलो!’’
‘‘आई कट्टर शाकाहारी व वडील गोव्याचे, मासे खाणारे! आमच्याकडे पूजापाठ व धार्मिक कार्याचं फार होतं. वडिलांची पुण्यतिथी असो किंवा इतर धार्मिक कार्यक्रम. त्या वेळी स्वयंपाक मी व मीनाताई करायचो. पुरणपोळी, खीर, सात
ch14भाज्या, पाच-सहा कोिशबिरी, तीन-चार चटण्या, भात, कढी, उडदाचे वडे. बटाटे, मिरची, घोसाळे, दोडके, ओव्याच्या पानांची भजी असा स्वयंपाक करायचो. चूल पेटवायची, वरती फोडणी द्यायची, खालती निखाऱ्यावर दुसरा पदार्थ शिजायचा! पुरण वाटणं, ढवळणं ही कामं माझी. रात्री १२ ला सुरुवात करायचो, सकाळी ११ वाजायचे सगळं संपायला. मग आम्ही झोपायचो. या वेळी माझं वय असेल १० वर्षांचं!’’ भविष्यातील सुगरणीचा आणि नंतरच्या उद्योजिकेचा पाया इथे घातला असावा बहुधा!
आशाताईंचं पुढचं आयुष्य खूपच धावपळीचं होतं, लग्न, मुलं आणि गाण्याचं रेकॉर्डिग यात दिवस जात होते. त्यानंतर त्या (१९६०) प्रभुकुंजमध्ये राहायला आल्या. थोरला मुलगा हेमंत बाहेर शिकायला होता. आणि इतर दोघांना आनंद व वर्षांला खाण्याचं जबरदस्त वेड.
आशाताई पुन्हा आठवणीत रमल्या, ‘‘मी बाहेर जायला लागले की मुलं मला विचारायची, ‘आई कोणाकडे चाललीस? राज कपूरकडे? मग आम्हाला बांधून आण हं! त्यांच्याकडे छान असतं जेवण! त्या आंटीकडे कबाब खूप छान असतात, कुणाकडची बिर्याणी अप्रतिम असते!’ मुलांचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटायचं. आपल्याही हातचं जेवण यांना आवडायला हवं. मग माझ्या डोक्यानं घेतलं आपण व्हेज जेवण खूप केलं, आता नॉन-व्हेज शिकायचं! अक्षरश: ध्यास घेतला आणि झपाटल्यासारखी एकएक पदार्थ शिकत गेले. मग याला विचार, त्याला विचार असं करत करत लखनौपर्यंत पोहोचले. भारतात लखनौचं जेवण प्रसिद्ध! तेथील लोक शोधून त्यांच्याकडून तेथील लखनवी कबाब, मटण बिर्याणी, दही मासा हे पदार्थ शिकले.’’

‘‘आणखी  एक पदार्थ म्हणजे पसंदा! आज मूळ कृती कोणालाही माहीत नाही. जे करणारे होते, ते सर्व गेले. आज कुठेही पसंदा म्हणजे मटणाचे नुसते छोटे तुकडे देतात. पण पसंदा म्हणजे एक मोठा तुकडा. रात्रभर मसाला लावून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी शिजायला ठेवतात. तो गळून जातो अगदी. चमच्याने वाढून वर कांदा ठेवतात. तो मसाला, ते वाटण-घाटण सर्वाना जमत नाही. मला अनेकदा वाटतं, एखाद्या टी.व्ही.वरच्या रेसिपी शोमध्ये हा करून दाखवावा. जेणेकरून अनेक जण ही कृती बघतील, करून पाहतील व मूळ रेसिपी फुकट जाणार नाही.’’

‘‘चांदबाला नावाची मुलगी होती. छान गाणं गायची. तिनं मला पाया व बिर्याणी शिकवली. मजरूह सुलतानपुरींच्या घरचं जेवण साऱ्यांना आवडायचं. त्यांच्या बेगमना सांगितलं, ‘मुझे खाना सिखना है आप जैसा.’ त्यांनी खालाकडे मला सुपूर्द केलं. तिने अगदी चपाती लाटून मध्ये कापून गोल गोल फिरवायची व पराठा कसा लाटायचा तेही शिकवलं. त्यानंतर हळूहळू पंजाबी पदार्थ शिकले. कोलकात्याला जाऊन तेथील पदार्थ शिकले. मस्कतला गेले, तिथे पाकिस्तानी धाबा होता. अत्यंत चविष्ट जेवण. मुलं लागली मला चिडवायला. मग काय मी थेट त्यांच्या खानसाम्यापर्यंत पोहोचले. पाकिस्तानीच होता तो. त्याने मला मस्कत गोश्त शिकवलं. तो पाकिस्तानी माणूस जेव्हा मला कृती सांगत होता तेव्हा मी हातातील टिशू पेपरवर लिहीत गेले, शाई पसरत होती, मग हातावर लिहून घेतलं. पण जिद्द सोडली नाही. मुंबईला जेव्हा परतले तेव्हा बाजारात जाऊन नवीन लोखंडी कढई आणली आणि मस्कत गोश्त बनवले.’’
ch11
‘‘मटण बिर्याणी व चिकन बिर्याणी तर सर्वाकडे असतेच, पण एकदा लेकीनं, वर्षांनं फर्माईश केली ती फिश बिर्याणीची! मी स्वत:च मसाला तयार केला व फिश बिर्याणी बनवली. केशर बिर्याणीचीही तीच कथा! मटार पॅटिस, खिमा पॅटीस करतात तशीच माझी स्वत:ची कृती म्हणजे फिश पॅटिस व िझगा पॅटिस! माझी पुण्यातील मैत्रीण कुंदा ढवळे हिच्या मैत्रिणीकडून रोगनजोश शिकले.’’
‘‘एक अनुभव सांगते, रेसिपी सांगताना कोणीही त्यातील खुब्या सांगत नाही. ‘ये डालो, वो डालो हो जाएगा!’ असं मोघम असतं बऱ्याचदा. मी एकदा सरसोंका साग बनवला. त्याचा कडवटपणा जात नव्हता. एकदा एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ला तर कडवटपणा अजिबात नव्हता, मी थेट तिथल्या कुकलाच विचारलं, त्यानंही सहजपणे सांगितलं, ‘सरसो एक घंटा पानी मे भिगो के रखना, कडवापन निकल जाता है!’ माझं सर्वाना सांगणं आहे की, विद्या हे दान असं आहे की ते दिल्याने वाढतं त्यामुळे रेसिपी सांगताना त्यातील टिप्ससह सांगा.’’
‘‘मला खिलवायला फार आवडतं. त्यामुळे मी तयारीही नीट करते. समजा उद्या चार माणसं घरी जेवायला येणार आहेत तर रात्री झोपतानाच कोणत्या पदार्थाबरोबर कोणता जाईल, हा मसाला टाकावा का? कोणता? माशाचं लोणचं की कोलंबीचं, कोलंबीची मिरवणी की बोंबिलाची? कुणाला काय आवडेल याचा सर्व विचार करते. हळूहळू मी स्वत:च्या अशा रेसिपीज तयार केल्या. जसे गाणे, गाण्यापूर्वी वाचून त्याचा अर्थ समजून, त्या गाण्याची पाश्र्वभूमी काय आहे हे समजून घेऊन, त्यातील बारकावे टिपून घेऊन जर मनापासून गाणं म्हटलं तर त्या गाण्याची मजा काही औरच असते. कारण त्यात आत्मा ओतून समरस होऊन ते गाणं गायलेलं असतं. तसंच स्वयंपाकाचंही आहे.
स्वयंपाक करताना त्यात सर्व लक्ष केंद्रित करून, मेहनत घेऊन करणं अतिशय महत्त्वाचं, उदा मासा तळताना त्याचा मसाला गळता कामा नाही. त्याचा तुकडा पडता कामा नाही. तळून काढल्यानंतर तो टिशूवर ठेवून त्यातील तेल निथळून घेतलं पाहिजे. मंद आचेवर सर्व तळणं झालं पाहिजे. लोणी कढवताना वरती फेस आला, लालसर रंग येऊ लागला की चुलीवरून उतरवून ठेवायचं. चपाती केली तर तव्यावरून काढून हातावर फोडून ताटात वाढली पाहिजे. अशी चपाती माणूस किती खातो ते समजतही नाही. पूर्वी चुलीजवळ बसलेली आई, तिथूनच कुणाच्या पानात काय संपलं आहे हे लक्ष ठेवून वाढायची. स्वत: आधी जेवायची नाही. प्रेमाने केलेलं व वाढलेलं याला अतिशय महत्त्व आहे. मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा सर्वाचं जेवण होईपर्यंत जेवत नाही. सर्वाचं पोट भरलेलं पाहून समाधान वाटतं.’’
‘‘एखादा पदार्थ करायला तुमच्याकडे सर्व मसालेच पाहिजेत असं नाही. प्रेमानं केलेला साधा वरणभातही चविष्ट लागतो.’’ हे सांगताना आशाताईंची एक आठवण ताजी झाली. ‘‘कोल्हापूरचे भालबा पेंढारकर आणि आम्ही सगळी भावंडं एकदा रायगड चढून गेलो. भालबा एकदम शिवाजीमय झाले होते. त्या वातावरणात असताना अचानक त्यांनी मला सांगितलं, ‘आशा! जे काही इथे आहे त्यात तू स्वयंपाक कर. बघू या तरी सुगरण काय करते ते!’ चूल पेटवली, काय होती ती भांडी घेतली. बटाटे होते ते कापले. तिखट-मीठ फक्त होतं ते घातलं. रस्सा बनवला. दूध होतं त्यात तांदूळ घातले व खीर बनवली. भात बनवला. जेवायला बसल्यावर भालबा म्हणाले, आशा, तुझ्या हातात अन्नपूर्णा वसली आहे.’’ तो आशीर्वादच होता.
ch12
भूतकाळातून गप्पा ‘आशाज्’वर आल्या. त्या म्हणाल्या, ‘आशाज्’ हे रेस्टॉरन्ट सुरू करायची कल्पना आनंदची! तो म्हणाला, आई, तू स्वत: एवढे पदार्थ केले आहेस तर तुझ्या रेसिपिजचे एक पुस्तक लिही. मी दोन-चार पदार्थ लिहिले, पण कंटाळा आला. कारण एक चमचा मसाला, अर्धा इंच आल्याचा तुकडा, दोन लसणीच्या पाकळ्या, असं मला मोजून-मापून जेवण करता येत नाही. प्रत्येक पदार्थ अंदाजानं टाकायचा ही माझी सवय. रियाज करूनच गाण्यात सहजता येते. मग आनंदनं आणखी एक पर्याय दिला, मी हॉटेल काढतो, तू तिथे येऊन शिकव.. इथेच ‘आशाज्’चा श्रीगणेशा झाला.’’
‘‘माझा आनंद सर्वच बाबतीत माझा बॅकबोन आहे. एक वेळ अशी होती की मुलं लहान, मी एकटी, पसा सांभाळता न येणं, लोकांना देणं, त्यांनी फसवणं, अशा अनेक प्रसंगी तो खंबीरपणे माझ्या मागे उभा राहिला. पशाचे व्यवहार त्यानं सांभाळले आणि मी सावरले. दुबईत त्याला काही लोकं भेटली, यानं शब्द टाकला. माझं नाव आलं, लोकांना काही तरी वेगळं वाटलं, कल्पना प्रत्यक्षात आली आणि ‘आशाज्’ साकारलं गेलं.’’
मी मध्येच विचारलं, ‘‘आशाताई, तुम्ही हाडाच्या कलाकार आहात, असं असताना कला व व्यवहार यांची सांगड कशी घातलीत?’’ त्या म्हणाल्या, ‘‘जीवनातील प्रत्येक गोष्टीत कला व व्यवहार दोन्ही असतात. रेस्टॉरन्टच्या बाबतीतही तसंच. स्वयंपाक ही मोठी कला आहे. त्यामुळे स्वयंपाक कसा हवा व स्वयंपाकघर कसं असावं हे मी सांभाळते.
रेस्टॉरन्टचा आíथक व्यवहार, ‘रेस्टॉ’ची संपूर्ण व्यवस्था, अंतर्गत सजावट, जागेची निवड, परदेशात असल्यामुळे स्टाफ भारतातून किंवा इतर देशांतून आणणं, त्यांचे व्हिसा, लेबर कॅम्पची व्यवस्था हे सर्व व्यवहार आनंद बघतो.’’
‘‘दुबईला जाऊन तेथील शेफना मी माझ्या रेसिपीज शिकवल्या. त्यात केशर बिर्याणी, फिश बिर्याणी, मस्कत गोश्त, सुलतानपुरी कबाब या प्रमुख होत्या. ज्यांच्या ज्यांच्याकडून मी सर्व गोष्टी शिकले, ते सर्व माझे स्वयंपाकातील गुरू आहेत. त्यांनी माझ्या या कलेत भर टाकली. त्यांची नावे मी त्या त्या रेसिपिजना दिली. जसे मस्कतला शिकले म्हणून मस्कत गोश्त, सुलतानपुरींच्या घरी शिकले म्हणून सुलतानी कबाब! आपल्या गुरूंची आठवण ठेवण्याचा अधिक चांगला मार्ग कोणता असू शकेल? हे सर्व पदार्थ ‘आशाज्’मध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. बिर्याणी करणारा मुलगा एका वर्षांत घाबरून गेला. बिर्याणीच्या ऑर्डरच्या चिठ्ठय़ा खट-खट-खट किचनमध्ये लावल्या जायच्या व ऑर्डर पुऱ्या करता करता त्याची बिचाऱ्याची दमछाक व्हायची.’’
प्रत्येक उद्योगधंद्याचं हे एक तंत्र आहे ते सांभाळलं की झालं. प्रत्येक माणूस हा एक कलाकार आहे व प्रत्येकाला ईगो असतो हे लक्षात ठेवायचं. ‘आशाज्’मध्ये तंदुरी कबाब, तंदुरी चिकन हे पदार्थ करण्यासाठी सलीम कुरेशी नावाचा एक स्वयंपाकी आहे. मी तिथे गेल्यानंतर सर्वजण मला भेटायला बाहेर आले. पण हा आला नाही, हा आतच बसून राहिला. माझं आयुष्य अशा अहंकारी माणसांमध्येच गेलं होतं. त्यामुळे मला माहीत होतं की समोरचा माणूस जर अहं दाखवत असेल तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं, पण समोरचा माणूस साधा असेल तर त्याच्याशी साधेपणानं वागायला हवं. माझ्या लक्षात आलं, त्याच्या मनात माझ्या नावाची भीतीही आहे, मी आत गेले, त्याला म्हटले, ‘सलीम भाई नमस्ते, आप कैसे हो?’ तो म्हणाला, ‘सलाम आशाजी.’ मी म्हटले, ‘सलीम भाई ये जो सब है वो तो सब आपही का है. आपही ये सब सम्भालानेवाले है. म तो सिंगर हूं, म थोडीही खाना बनानेवाली हूं? बस मेरा खाली नाम है.’ माझं बोलणे ऐकून तो खूश झाला व बाकीच्यांना म्हणाला, ‘देखा, मैंने बोला था ना की ये औरत कितनी अच्छी है, वो बराबर जानती है की मं अच्छा खाना बना सकता हूँ.’ मी त्याची स्तुती केली, तो खूष झाला. पुढे माझ्याशी त्याचं खूप छान जमलं. मी त्यालाही बऱ्याच गोष्टी शिकवल्या. तो स्वत:हून शिकला. मी जर ‘आशा भोसले’ म्हणून गेले असते तर त्यानं बघितलंही नसतं कदाचित. पण मी त्याला मान दिला. धंद्यात माणसे जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते.’’
ch10मी ‘आशाज्’मध्ये आणखी एक काळजी घेतली आहे ती म्हणजे व्हेज, नॉन-व्हेज जेवणासाठी निरनिराळे फ्रायर आहेत. एका फ्रायरवर भाजी, डाळ व एका फ्रायरवर मटण, चिकन शिजतं. शाकाहारी जेवणाबद्दल मी अधिक जागरूक आहे. सर्वसाधारणपणे किचनमध्ये एक मोठं पातेलं असतं, त्यात दहा-बारा चमचे असतात. व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही बनत असतं. एकच चमचा दोन्ही पदार्थासाठी वापरला जातो. ‘आशाज्’मध्ये ‘नॉन-व्हेज’चा चमचा ‘व्हेज’मध्ये जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते.’’
‘‘सूपमध्ये चिकन स्टॉक घालतात, नानमध्ये अंडं घालतात. पण मी ‘आशाज्’मध्ये सांगितले आहे की, जी लोकं आपला धर्म पाळत आहेत त्यांना तो पाळू दे. नाही तर त्यांना आधीच सांगा, नानमध्ये अंडे आहे. त्यांना चपाती बनवून द्या किंवा अंडय़ाशिवाय नान बनवून द्या. पाहुण्यांचा विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे व त्याला तडा जाता कामा नाही. त्यांच्या भावना जपल्या गेल्या पाहिजेत. या विश्वासावर तर ‘आशाज्’चा डोलारा उभा आहे.’’
करिअर करून, संसार सांभाळून हे सगळं करता येईल का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या स्त्रीला मी सांगेन की, नुसतेच करिअर व पशाच्या मागे धावू नका. त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही कोणी तरी आहात, तुम्ही काही करू शकता हे लक्षात ठेवा. मी ‘आशाज्’मध्येही तेच सांगते. तुम्ही जेवण बनवता ते काम उरकून टाकायचं म्हणून, नोकरी म्हणून करू नका तर आवडीनं, प्रेमानं करा. एखादा पदार्थ ढवळतो त्यातसुद्धा प्रेम हवे, आत्मीयता हवी. मग तो पदार्थ चांगला होणारच व ‘आशाज्’च्या यशाचं हे एक रहस्य आहे!’’
आशाताईंना मध्येच थांबवत मी विचारलं, ‘तुम्हाला काय वाटतं रेस्टॉरन्टचे यश कशात आहे आशा भोसले या नावाचं वलय, स्किल, की तेथील जेवण?’ त्या म्हणाल्या, ‘‘प्रथम लोकं आली ती आशा भोसले या नावाच्या वलयामुळे, पण आता परत परत येत आहेत ती जेवणातील स्वादाच्या आशा पूर्ण झाल्यामुळे! जेव्हा एखादा नवीन पदार्थाचा आम्ही मेन्यूत समावेश करतो तेव्हा मी, आनंद, दोन युरोपीय, दोन आशियायी शेफ अशी टीम उपस्थित असते. सर्वजण चव बघतात, काय हवं नको यावर मत सांगतात व अखेर नवीन पदार्थाचा निर्णय सांघिकरीत्या घेतला जातो. शेफची निवड मुंबईत करतो, त्यांना तिथे ट्रेिनग देतो, दोन व्हेज जेवणासाठी व दोन नॉन-व्हेज जेवणासाठी असे चार शेफ प्रत्येक रेस्टॉरन्टमध्ये असतात. बाकी सर्व व्यवस्था आनंदबरोबर सप ऑर्टन ही युरोपीय स्त्री बघते. आनंद जेव्हा मुंबईत असतो तेव्हा रेस्टॉरन्टची जबाबदारी ती घेते.

मी सकाळी साडेनऊ वाजता रेकॉर्डिंगसाठी घराबाहेर पडायची ती रात्री दोन दोन वाजता घरी परत यायची. जाण्यापूर्वी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून जायची. माझ्या उत्साहाचे रहस्य माझ्या कामात दडलेलं आहे. कदाचित आम्ही जुनी माणसे म्हणून असेल पण मला असं वाटतं की, आपण स्वत: बनवलेल्या स्वयंपाकाला अप्रतिम चव असते.

आशाताईंचा आणखी एक स्वभाव म्हणजे त्यांची सौंदर्याची आवड. ‘आशाज्’च्या इंटिरियर डिझायनिंगमध्ये त्याचं प्रतिबिंब पडणार नाही असं शक्य नव्हतं. त्यांचं प्रत्येक रेस्टॉरन्ट देखणं आहे. पण त्याविषयीची एक भावूक आठवण त्यांच्याकडे होती. त्या म्हणाल्या, मुलं लहान असताना मी मण्यांचे पडदे घरात लावले होते. छान दिसायचे ते. ते इतक्या वर्षांनंतर लक्षात ठेवून आनंदने सर्व ‘आशाज्’मध्ये लावलेत.’’ सांगतानासुद्धा आशाताईंना गहिवरून आलं होतं.
विषय बदलावा म्हणून म्हटलं, आशाताई गेली ४० वष्रे आम्ही दुबईत राहात आहोत, भारत जरी आमची जन्मभूमी असली तरी आता दुबई कर्मभूमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच ‘आशाज्’ जेव्हा दुबईत सुरू झाले तेव्हा आपल्या आवडत्या गायिकेचं रेस्टॉरन्ट दुबईत उघडलं म्हणून सर्वाना अभिमान वाटला. पण तरीही मनात प्रश्न राहिलाच की भारतात किंवा मुंबईत पहिलं रेस्टॉरन्ट का उघडलं नाही?
आशाताई म्हणाल्या, ‘‘खरं तर परदेशात कोणताही व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात. तेथील सामाजिक वातावरण, चालीरीती समजून घेत, शून्यातून व्यवसाय उभा करणं खरंच सोपं नसतं. तेथील कायदेकानू वेगळे असतात, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण खरंच सांगते, दुबईत आमचे सर्व व्यवहार अतिशय सुलभतेनं पार पडले. अगदी जागा मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष ‘रेस्टो’ सुरू होईपर्यंत प्रत्येक पायरी सहजगत्या चढत गेलो आणि दुबईमध्ये ‘आशाज्’चं नाव झळकलं. जी गोष्ट दुबईत तीच कुवेत, कतार, बहारीन, अबुधाबी, बर्मिगहॅम येथेही. अतिशय सुलभपणे रेस्टॉरन्ट्स उघडली गेली. पण याउलट मुंबईत अनुभव आला. मुंबईतही आम्ही रेस्टॉरन्ट उघडण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. अनेक अडचणींशी सामना केला. कधी पाण्याची कटकट तर कधी जागेची, कधी मद्य परवाना तर कधी नवनवीन बदलणारे नियम. जोडीला सामाजिक, राजकीय अस्थिर वातावरण. या सर्वाना तोंड देत आजही आम्ही प्रयत्न करीत आहोत, बघू या कधी सुरू होणार ते!’’
‘‘आनंदने जेव्हा रेस्टॉरन्टची कल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा मी त्याला सांगितलं होतं, हा तलाव आहे त्यात उडी मार. एक तर काठापर्यंत पोहोचशील किंवा मध्येच बुडशील! पण पाण्यात उडी मारल्याशिवाय तुला कळणार नाही. थोडासा वेडेपणा जर माणसात असेल व पूर्णत्वाला नेण्याची जिद्द असेल तरच तो काही तरी करू शकतो. जी माणसं नुसती हिशोब करत बसतात ती काहीच करू शकत नाहीत. मी जेव्हा गाण्याच्या व्यवसायात पडले तेव्हा खूप खाचखळगे होते. तऱ्हेतऱ्हेच्या अडचणींना तोंड दिले, पाठीशी खंबीरपणे कोणीही उभं नव्हतं. आनंदला आज सांगितलं आहे, तू करशील त्याला माझा पाठिंबा आहे. मी सदैव तुझ्यासोबत आहे.’’
मी ऐकत होते, मनात विचार आला सूरसम्राज्ञी आता आदर्श मातेच्या भूमिकेतून बोलत आहे. त्यांचे हे विविध पलू जाणून घेतच मी त्यांना विचारले, आशाताई आज गायनाच्या क्षेत्रातील तुमच्या कार्यामुळे तुम्हाला अनेक सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता हॉटेलच्या क्षेत्रातील पुरस्कार ‘आशाज्’ला मिळत आहेत Birmingham UK  वङ येथील अतिशय मानाच्या Michelin Guide  मध्ये २००९ पासून दरवर्षी ‘आशाज्’चा समावेश होत आहे. तसेच त्यांना टाईम आऊट दुबई रेस्टॉरन्ट पुरस्कार दरवर्षी मिळत आहे. ‘आशाज्’ला जेव्हा पुरस्कार जाहीर होतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या दृष्टीने सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे, जेवणानंतर पाहुण्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे तृप्त व समाधानी हास्य!’’
ch13आपल्या कलेद्वारे दुसऱ्यांना आनंद देण्यात इतिकर्तव्यता मानणाऱ्या आशाताईंना मी विचारले, तुम्ही कोणत्या सामाजिक संस्थांशी संलग्न आहात का? त्या म्हणाल्या, ‘‘आपण दान देणं जेव्हढं चांगलं तेव्हढंच ते दान सत्पात्री जातंय ना हे बघणं आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून मी आता ‘आशा भोसले ट्रस्ट’ सुरू करतेय. या ट्रस्टद्वारे गरीब मुलांना शिक्षण व जेवण दिलं जाईल.
‘‘या मंगळवारीच माझा ८२ वा वाढदिवस झाला. या साऱ्या प्रवासातील चांगल्या-वाईट घटनांनी, संकटांनी मला खूप काही शिकवलंय. जीवनाकडे मी सकारात्मक दृष्टीनं बघते व आत्मविश्वासानं जगते. माझा देवावर विश्वास आहे. रोज रात्री झोपताना मी देवाला सांगते, माझी शक्ती, माझा आत्मविश्वास सदैव जागृत ठेव. कोणत्याही दु:खाला सामोरे जाण्याची ताकद दे. उद्या सकाळी उठेन तो माझ्या आयुष्याचा पहिला दिवस असेल. माझा विश्वास आहे, त्यानं जे ललाटी लिहिलं आहे ते होणारच आहे. ते थांबवण्याची ताकद कोणातच नाही. याचाच अर्थ आपल्या हाती काही नाही.. आणि म्हणूनच गेल्या दिवसाचा अफसोस नाही, येणाऱ्या दिवसाची चिंता नाही. फक्त आजचा दिवस आपला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक दिवस माझ्यावर सोड. ‘क्या लेके आया था, क्या लेके जाएगा’ या गोष्टी लक्षात ठेवते.’’
आशाताई तुम्हाला काय म्हणवून घ्यायला आवडेल, आशाताई एक गायिका की आशाताई एक उद्योजिका? मी मध्येच थांबवत विचारलं तर म्हणाल्या, ‘‘एक उत्तम माणूस, एक चांगली स्त्री म्हणवून घ्यायला आवडेल!’’
आशाताईंच्या उत्तराचा विचार करत, मुलाखत आटोपून संध्याकाळी सात वाजता मी त्यांच्या घरून निघाले. मला लिफ्टपर्यंत सोडायला आलेल्या आशाताई निरोप घेताना म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला चारची वेळ दिली होती, पण मी ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं वेळेत येऊ शकले नाही, तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा. तरी मी सकाळी साडेनऊला घराबाहेर पडले होते. जेवणही व्हायचं आहे माझं.’’
मी अवाक् होऊन आशाताईंकडे पाहातच राहिले! दुसऱ्यांच्या वेळेची कदर करणारे, उशीर झाला म्हणून माफी मागून न जेवता मुलाखत देणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यांच्यातल्या ‘चांगलं माणूस’ असण्याचं आणखी वेगळं प्रत्यंतर काय असणार? #
‘‘आणखी एक पदार्थ म्हणजे पसंदा! आज मूळ कृती कोणालाही माहीत नाही. जे करणारे होते, ते सर्व गेले. आज कुठेही पसंदा म्हणजे मटणाचे नुसते छोटे तुकडे देतात. पण पसंदा म्हणजे एक मोठा तुकडा. रात्रभर मसाला लावून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी शिजायला ठेवतात. तो गळून जातो अगदी. चमच्याने वाढून वर कांदा ठेवतात. तो मसाला, ते वाटण-घाटण सर्वाना जमत नाही. मला अनेकदा वाटतं, एखाद्या टी.व्ही.वरच्या रेसिपी शोमध्ये हा करून दाखवावा. जेणेकरून अनेक जण ही कृती बघतील, करून पाहतील व मूळ रेसिपी फुकट जाणार नाही.’’

मेघना वर्तक -meghana.sahitya@gmail.com

(छाया सौजन्यः एशियन एक्स्प्रेस न्यूजपेपरच्या सौजन्याने)