मासिक पाळी हाच आपल्याकडे गुप्ततेचा विषय, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब, पण एका पुरुषाच्या, अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषत: खेडय़ातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत कटू, कठीण अनुभवांना सामोरे जात त्यांनी तयार केलेली ही मशीन्स आज परदेशातही नावाजली जात आहेत. स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या या सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीचा हा प्रेरणादायी प्रवास.

भारतात खेडय़ांचे प्रमाण जास्त आहे. तिथे असलेला शिक्षणाचा अभाव आणि स्त्रियांना असलेल्या दुय्यम दर्जामुळे पाळीतील स्वच्छता हा कायम दुर्लक्षिलेला भाग. ए. सी. निल्सन या अत्यंत प्रसिद्ध अशा डाटा रिसर्च कंपनीचा २०११ चा एक अहवाल असे सांगतो की, भारतात ८८ टक्के स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या वेळी जुने फडके, वर्तमानपत्र, चिखल लावून वाळवलेली झाडांची पाने अशांसारख्या साधनांचा उपयोग केला जातो. यामध्ये स्वच्छतेचा-हायजिनचा अभाव असतो. परिणामी जवळजवळ ७० टक्के स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. शिवाय हा विषय अत्यंत खासगी असल्याने त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यासंबंधी मुलींना शिकवले जाते. याचा उघड परिणाम म्हणजे संकोचामुळे वयात आलेल्या बऱ्याच मुलींचे शाळेत जाणे थांबते.
गेल्या पाच-सहा वर्षांपर्यंत हे असेच चालू होते. परंतु एका व्यक्तीला- एका पुरुषाला- या सर्व भयानक प्रकाराची जाणीव झाली. त्याच्यातला संशोधक जागा झाला व त्यासंबंधी ठोस पावलं टाकून घरच्या घरी अत्यंत स्वस्तात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणारे मशीन तयार केले व तरुण मुलींना, स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि मुख्य म्हणजे या सर्व स्त्रीसुलभ प्रकाराकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवले. या व्यक्तीचे नाव अरुणाचलम् मुरुगानंदम्! मुरुगानंदम् यांच्या या शोधाचा प्रवास खूपच खाचखळग्यांचा, मानहानीचा, अफाट मेहनतीचा, चिकाटीचा आणि न ढळणाऱ्या आत्मविश्वासाचा आहे.
मुरुगानंदम् हे मूळचे तामिळनाडूतील कोईमतूरचे. सध्या ते पन्नाशीचे आहेत. चौदा वर्षांचे असताना पित्याचे छत्र हरपले. घरची गरिबी. त्यामुळे आईने व मुरुगानंदम् यांनी जेवणाचे डबे तयार करण्याचा छोटेखानी धंदा सुरू केला, पण काही कारणांनी तो बंद करावा लागला. त्यांचे शिक्षणही नववीपर्यंत झाले, पण दहावीत शाळा सोडून द्यावी लागली. (ते स्वत:चा उल्लेख ‘स्कूल ड्रॉप आऊट’ करतात). त्यानंतर त्यांनी वेल्डिंग कंपनीत काम सुरू केले. व पोटापाण्याची व्यवस्था झाली. कालानुरूप १९९८ मध्ये मुरुगानंदम् यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नांव शांती. आई आणि नव्या पत्नीच्या सहवासात दिवस व्यवस्थित चाललेत असे वाटत असतानाच ‘तो’ दिवस उजाडला आणि मुरुगानंदम् यांच्यातला संशोधक जागा झाला.
एके दिवशी शांती त्यांच्यापासून काही तरी लपवत चालली आहे, असे मुरुगानंदमांना दिसून आले. त्यांनी त्याबद्दल तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘हे तुम्हाला सांगण्यासारखे नाही. ही बायकांची खासगी गोष्ट आहे.’ मुरुगानंदमांचंकुतूहल जागे झाले आणि त्यांनी ‘तो’ कपडा पाहिला व त्यांना अत्यंत किळस वाटली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘असा कपडा मी स्कूटर पुसायलाही वापरला नसता!’ चौकशी केल्यावर त्यांना समजलं की मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणारा तो कपडा होता. बाजारात काही मिळते का, या प्रश्नावर शांतीने सांगितले, ‘होय, सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट मिळते.’ लगेचच मुरुगानंदम् केमिस्टकडे गेले व त्यांनी सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट मागितले. तेव्हा त्या केमिस्टने कोणीही बघत नाहीसे पाहून पटकन एक सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट कपाटातून बाहेर काढले व लगेचच वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या हातात दिले. मुरुगानंदम् हा प्रकार पाहून चाटच पडले. जणू काही एखादी बॅन केलेली गोष्ट असावी, अशा त्याच्या हालचाली होत्या. घरी आल्या आल्या त्यांनी पत्नीला ते पॅकेट दिले आणि म्हटलं, हे वापरत जा. ते पाहिल्यावर शांती एवढंच म्हणाली, जर मी आणि तुमच्या दोन बहिणींनी दर महिन्याला हे वापरायचे ठरवले तर आपल्याला रोजचे दूध बंद करावे लागेल, कारण महिन्यांच्या दुधाच्या बिलाचे पैसे यामध्ये खर्च होतील. त्या वेळी एका नॅपकिनची किंमत सुमारे चार रुपये होती.
मुरुगानंदम् यांचे कुतूहल जागे झाले. त्यांनी त्या पॅकेटमधला एक नवा कोरा नॅपकिन हातात धरला व त्याचे वजन अजमावले. साधारणपणे दहा ग्रॅम वजन होते. मग त्यांनी तो नॅपकिन फाडला तेव्हा त्यांना आतमध्ये कापसासारखा पदार्थ दिसला. मुरुगानंदम् हे कोईमतूर येथे राहत असल्याने कॉटन इंडस्ट्रीबद्दल त्यांना बऱ्यापैकी माहिती होती. (शिवाय त्यांचे वडीलही हातमाग कामगार होते). दहा ग्रॅम कापसासाठी दहा पैसे लागतात, हे त्यांच्या लक्षात आले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यासाठी चार रुपये म्हणजे चाळीसपट जास्त किंमत दिलेली होती. किमतीतला हा अवाढव्य फरक पाहून तिथल्या तिथे त्यांनी स्वस्तात परंतु चांगल्या दर्जाचा सॅनिटरी नॅपकिन (पॅड्स) बनवायचा निश्चय केला.
ठरल्याप्रमाणे मुरुगानंदम् यांनी लगेचच कापसाचा एक सॅनिटरी नॅपकिन तयार केला व हक्काच्या व्यक्तीच्या-शांतीच्या हातात ठेवून अभिप्राय मागितला. त्यांच्या नजरेत कुतूहल होते पण शांतीकडून उत्तर आले, ‘अत्यंत निरुपयोगी असा नॅपकिन आहे हा. हे वापरण्यापेक्षा मी पूर्वीप्रमाणे जुना कपडा वापरणे पसंत करीन.’ हे ऐकल्यावर त्यांना धक्का बसला, पण त्यांना नवीन जोमाने प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे केवळ शांतीवर अवलंबून राहणे योग्य नव्हते, कारण त्यासाठी महिना महिना थांबावे लागणार होते. त्यांना खूप मोठय़ा संख्येने ‘व्हॉलेंटियर’ची गरज होती. म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा त्यांच्या दोन (लग्न झालेल्या) बहिणींकडे वळवला. पण दोघींनीही मुरुगानंदम् यांची ‘मागणी’ धुडकावून लावली. त्यांनी आजूबाजूला चौकस बुद्धीने पाहिले व त्यांच्या लक्षात आले की त्या वेळी (१९९८-९९ मध्ये) शहरामध्येही सॅनिटरी नॅपकिनचा वापर क्वचितच होत होता.
शहराची ही स्थिती मग खेडय़ाची गोष्टच सोडा. तिथे अत्यंत अस्वच्छ कपडा नॅपकिन म्हणून वापरल्यावर कसा तरी धुतला जायचा व एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी वाळवला जायचा. म्हणजे कडक सूर्यप्रकाशापासून वंचित राहिल्याने त्यातील जंतुनाश व्हायचा नाही. असा हा अस्वच्छ कपडा सतत वापरल्याने स्त्रिया (७० टक्के) जननसंस्थेच्या रोगांना बळी पडायच्या. हे कटुसत्य मुरुगानंदम् यांच्या लक्षात आले. या परिस्थितीत व्हॉलेंटियर मिळवायचे कसे, हा विचार त्यांना सतावू लागला. बऱ्याच विचाराअंती त्यांना जाणवले की मेडिकल कॉलेजमधल्या मुली त्यांच्या या प्रयोगाबद्दल सकारात्मक विचार करतील व योग्य असे साहाय्य करतील. पण मुख्य प्रश्न असा की मेडिकल कॉलेजांतल्या मुलींपर्यंत पोहोचायचे कसे? कारण त्या वेळी तिथल्या कॉलेजांतल्या मुलींशी साधे बोलणे, संवाद करणे शक्य नव्हते. पण हरतील तर ते मुरुगानंदम् कसले? अजिबात खचून न जाता त्यांनी बरेच नॅपकिन बनवले व कोणाच्या तरी मदतीने मेडिकल कॉलेजातल्या वीस मुलींना ते पॅड्स दिले. सोबत प्रत्येकीसाठी एकेक फॉर्म दिला. यामध्ये डाव्या बाजूला मुरुगानंद यांनी प्रश्न लिहिले होते व उजव्या बाजूला रिकामी जागा अभिप्रायासाठी सोडली होती. काही दिवसांनी ते फॉर्म परत आणण्यासाठी कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांना एक चमत्कारिक दृश्य दिसले. वीसपैकी केवळ दोनच मुली सर्व वीस जणींचे (मनानेच) फॉर्म भरत होत्या. हे पाहून मात्र मुरुगानंदम् निराश झाले. कारण या मुलींच्या अभिप्रायावर त्यांनी भरवसा ठेवला होता, पण आता तोही नाहीसा झाला. आता काय करायचे? अवलंबून राहण्यासारखे आता कोणीच नव्हते.
मुरुगानंदमांना एक अचाट कल्पना सुचली, जी जगातल्या कोणत्याही पुरुषाला सुचली नसेल. ही कल्पना म्हणजे त्यांनी स्वत:च व्हॉलेंटियर व्हायचे ठरवले. स्वत: बनवलेले पॅड स्वत:च वापरून त्याचे निष्कर्ष काढायचे. पण कसे? हे सत्यात उतरवण्यासाठी त्यांना त्यांच्या खाटीक मित्राची मदत घ्यावी लागली. त्यांच्या प्रयोगासाठी त्या मित्राने बकरीचे रक्त पुरवण्याचे मान्य केले. गर्भाशयासारखी पिशवी तयार करण्यासाठी एक फुटबॉल फाडून त्याच्या आतल्या फुग्याचा वापर केला. या फुग्यामध्ये त्यांनी ते रक्त भरले व त्यातून दाबले असता रक्त बाहेर पडण्यासाठी एक नळी बसवली. मुरुगानंदम् स्वत: त्यांनी बनवलेले सॅनिटरी पॅड परिधान करीत असत व सायकलवरून जात असताना मधून मधून फुग्याला हलका दाब देऊन त्यातील रक्त पॅडमध्ये पंप करीत असत. घरी आल्यावर अशी अनेक पॅड्स ते उघडून पाहत व त्यांचे निरीक्षण करीत. पण त्यांचे समाधान होईना, कारण ते वापरत असलेले रक्त बकरीचे होते. त्यांनी पुन्हा मोर्चा मेडिकल कॉलेजातील मुलींकडे वळवला. पण त्या वेळी त्यांना लेखी अभिप्राय नको होता तर मुलींकडून पॅड्ससंबंधीचा अनुभव हवा होता. यासाठी त्यांनी त्या मुलींना स्वत: बनवलेली अनेक पॅड्स दिली व प्रत्येक पॅडसोबत एकेक प्लॅस्टिकची पिशवी दिली. प्रत्येक पॅड वापरून झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत बंद करून एका ठरावीक जागी ठेवण्याची विनंती केली. त्यांची ही युक्ती लागू पडली. कारण त्यांना वापरलेल्या पॅड्सचा पुरवठा होऊ लागला.
मुरुगानंदम् आता जोमाने अभ्यास आणि संशोधन करू लागले. घराच्या मागे असलेल्या एका छोटय़ा खोलीत ते मेडिकलच्या मुलींकडून वापरण्यात आलेली पॅड्स उघडून पाहू लागले. सोबत त्यांनी स्वत: वापरलेली पॅड्सही उघडून पाहू लागले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर त्या वेळी त्या खोलीत इतकी दरुगधी पसरलेली असायची की आजही तो दरुगध आठवला की किळस वाटते. एकदा असेच पॅड्सचे बारकाईने निरीक्षण करण्यात दंग असताना त्यांची आई अचानक आली. त्या एकूणच प्रकाराची तिला इतकी भीती आणि किळस वाटली की परिणामस्वरूप तिने गाठोडे गुंडाळले आणि घर सोडले.
मुरुगानंदमांचे हे प्रयोग आजूबाजूच्या सर्वानाच कळले व त्याचे भयंकर परिणामही त्यांना भोगावे लागले. सर्वात मोठा फटका म्हणजे दीड वर्षांतच त्यांची पत्नी शांती घर सोडून माहेरी निघून गेली. मुरुगानंदमांचा या स्त्रीसुलभ खासगी विषयातला ‘इंटरेस्ट’ तिला नकोसा वाटला. शिवाय अनेक परक्या स्त्रियांशी, विद्यार्थिनींशी मुरुगानंदमांचे या विषयाचे बोलणे तिला लज्जास्पद वाटले. तिने थेट घटस्फोटाची नोटीसच मुरुगानंदमांना पाठवली. आई बायकोपाठोपाठ दोघी बहिणींचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद झाले. त्यांचे हे वर्तन पाहून गावातल्या लोकांना मुरुगानंदम् यांना भूतबाधा झाल्याची खात्री पटली. त्यांनी एका मांत्रिकाला बोलावले. मुरुगानंदम् यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी गाव सोडले.
आता ते एकटे पडले. मात्र त्यांनी जास्तीत जास्त वेळ या प्रयोगाला द्यायचे ठरवले. स्वत: तयार केलेल्या नॅपकिनमध्ये त्यांना जाणवलेली त्रुटी म्हणजे त्या नॅपकिनमध्ये बाजारात मिळणाऱ्या नॅपकिनइतकी शोषणशक्ती त्यात नव्हती. याचाच अर्थ बाजारातल्या नॅपकिनमध्ये कापसासारखा दिसणारा वेगळाच काही तरी पदार्थ असावा. तो कळण्यासाठी त्यांना एक कल्पना सुचली.
बाजारातील नॅपकिन बनवणारी कंपनी ही मल्टीनॅशनल कंपनी होती. त्याच कंपनीकडून नॅपकिनबद्दल माहिती मिळवली तर? पण कशी? मुरुगानंदम् यांनी कॉलेजमधल्या एका प्रोफेसरची मदत घेऊन त्या कंपनीला पत्र लिहिले व सॅनिटरी नॅपकिन बनवायची इच्छा व्यक्त केली. त्या कंपनीला वरचेवर फोनकॉल्स करण्यात त्यांचे जवळ जवळ सात हजार रुपये खर्च झाले. शेवटी त्या कंपनीकडून त्यांना स्वत:बद्दल अधिक माहिती सांगण्याची विचारणा झाली. तेव्हा मुरुगानंदांनी बिनधास्तपणे सांगितले की ते एका टेक्स्टाइल मिलचे मालक असून ‘त्या’ परदेशी कंपनीच्या मदतीने सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा त्यांचा मानस आहे.
हे सर्व ऐकल्यावर ‘त्या’ कंपनीला त्यांच्याबद्दल खात्री वाटली असावी, कारण काही दिवसांतच मुरुगानंदम् यांच्या घरी त्या कंपनीकडून काही ‘हार्डबोर्ड्स’ येऊन पडले. ते बोर्ड्स पाइनवूडच्या सालीमध्ये जे सेल्युलोज (cellulose) असते त्याचे होते. मुरुगानंदम् यांनी सॅनिटरी नॅपकिन बनवण्याच्या प्रयोगांना आता सव्वा दोन वर्षे होऊन गेली होती आणि आत्तापर्यंत काहीच दिशा दिसत नव्हती. परंतु अचानक हे हार्डबोर्ड्स पहिल्यावर त्यांना खूपच उत्सुकता वाटली पण प्रथम काही कळेचना. मग त्यांनी ते बोर्ड्स तोडले. त्याचे विघटन केले आणि मग त्यांना हवे तसे कापसासारखे नॅपकिनचे मटेरियल तयार झाले. वा! काय आनंद झाला असेल मुरुगानंदम् यांना!
बोर्डस्च्या सोबतच सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनचे प्रचंडकाय चित्र, त्याची माहिती आणि किंमत दर्शविणारी कागदपत्रे होती. त्या मशीनची किंमत साडेतीन कोटी रुपये होती. मुरुगानंदम् यांच्याकडे इतके पैसे तर नव्हतेच आणि त्यांना अशा मशीनमध्ये इंटरेस्टही नव्हता. पण सेल्युलोज या मटेरियलचा शोध लागल्याबरोबर मुरुगानंदम् पाइनवूडची साले शोधण्याच्या मागे लागले. सुदैवाने त्यांना ते मिळण्यास अजिबात अडचण आली नाही आणि ते कमालीचे स्वस्तही होते. आता पाइनवूड बार्कपासून सेल्युलोज तयार करणाऱ्या मशीनचा विचार सुरू झाला आणि साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर असे मशीन बनवण्यात त्यांना यश आले. हे मशीन स्वयंपाकघरातल्या ग्राइंडरसारखे चार टप्प्यांत काम करते व झाडाच्या कठीण कडक सालीचे रूपांतर मऊ कापसासारख्या सेल्युलोजमध्ये होते. हा सेल्युलोज मग वजन करून एक आयताकृती पेटीत घातला जातो व त्यावर विशिष्ट दाब दिला जातो. याला ‘केक’ म्हणतात. हा केक मग एका कापडात गुंडाळून मग जंतुनाशकासाठी अल्ट्रा व्हायोलेट मशीनमध्ये ठेवला जातो. अशी सॅनिटरी पॅड बनवण्याची प्रक्रिया असते.
हे सर्व वाचल्यावर ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे असे वाटेल पण कोणाही व्यक्तीला हे सर्व प्रशिक्षण एका तासात घेता येते, असे मुरुगानंदम् यांचे मत आहे. या नॅपकिनमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीतील स्वच्छतेबरोबरच मुरुगानंदम् यांना स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्य तसेच स्वावलंबनाचीही ताकद लक्षात आली.
२००६ साल उजाडले. सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन करणारी मशीन त्यांना आता खेडेगावात पोहोचवायची होती. यासाठीच त्यांनी कोणत्याही स्त्रीला सहज वापरता येण्यासारखे अगदी साधे मशीन बनवले. शिवाय त्याची देखभाल करण्याचे काम आयआयटी, मद्रास येथील तंत्रज्ञांना दिले. त्यांना ते मशीन खूपच आवडले पण त्यांच्या मनात शंका आली की, एवढय़ा मोठय़ा मल्टिनॅशनल कंपन्यांशी मुरुगानंदम् यांचे मशीन कशी काय स्पर्धा करू शकणार? पण यावर मुरुगानंदमांकडे उत्तर होते. ते म्हणाले, ‘‘माझे ध्येय अशा मल्टिनॅशनल कंपन्यांशी स्पर्धा करणे हे नाहीच. आपले ध्येय हे एक बाजारपेठ तयार करण्याचे आहे आणि ही मशीन त्या मार्केटकडे जाण्याचा मार्ग आहेत.’’
मुरुगानंदम् यांचा हा आत्मविश्वास पाहून आयआयटी मद्रासचे तंत्रज्ञही अवाक् झाले. त्या वर्षी (२००६ साली) नॅशनल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्डससाठी आयआयटी मद्रासकडून मुरुगानंदम् यांचे मशीन पाठवले. त्यावर्षी या अ‍ॅवॉर्डसाठी ९४३ जणांनी भाग घेतला होता. त्यांचा मशीनला त्या वर्षीचा नॅशनल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड मिळाला.
त्यानंतर काम अधिक वेगाने सुरू झाले. त्यांनी त्या मशीनचे पेटंट घेतले व जोमाने मशीन तयार करू लागले. पुढच्या दीड वर्षांत त्यांनी २५० मशीन बनवली आणि ती त्यांनी बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांतील खेडेगावात नेली. कारण तिथल्या स्त्रियांची अवस्था फारच दयनीय होती. तिथे स्त्रियांना पाणी आणण्यासाठी मैलोन् मैल चालावे लागत असे. मासिक पाळीच्या वेळी उन्हातान्हातून असे चालणे त्यांना किती अवघड जात असेल? याखेरीज मुरुगानंदम् म्हणतात, ‘‘माझा आतला आवाज सांगत होता की जर हे मशीन बिहारमधील खेडेगावात यशस्वी झाले तर ते जगात कुठेही यशस्वी होऊ शकेल.’’
पण अशा प्रकारच्या खेडेगावात जाऊन अशा मशीनसंबंधी एका पुरुषाने तिथल्या स्त्रियांशी बोलणे हे फारच अवघड काम होते. हे साध्य करण्यासाठी मुरुगानंदम् यांनी तिथल्या ‘एनजीओज्’च्या माध्यमातून तिथल्या स्त्रियांच्या वडिलांची किंवा नवऱ्याची परवानगी घ्यावी लागत असे. शिवाय अनेक स्त्रियांशी पडद्याआडून बोलावे लागत असे. मुरुगानंदम् यांचे या संदर्भातले अनुभव खूपच बोलके आहेत. ते सांगतात, ‘‘सॅनिटरी नॅपकिनबद्दल समाजात खूपच गैरसमज होते, सॅनिटरी नॅपकिन वापरल्यास स्त्रीला अंधत्व येऊ शकते, स्त्रीचे लग्न होऊ शकत नाही, तिला मूल होऊ शकत नाही, वगैरे. पण अत्यंत चिकाटीने आणि हळुवारपणे यांनी खेडय़ातल्या स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व सांगून ते वापण्यासाठी प्रवृत्त केले. प्रत्येक मशीन विकताना मुरुगानंदम् यांच्या काही अपेक्षा/अटी होत्या त्या अशा-
* ही मशीन केवळ खेडय़ातल्या स्त्रिया/ गरीब स्त्रियाच वापरतील.
* तयार केलेली सॅनिटरी पॅडस् ही त्वरित वापरासाठी थेट तिथल्याच मुलींना/ स्त्रियांना विकण्यात यावी.
* सॅनिटरी पॅडस्ची किंमत ही तिथल्या लोकांना परवडणारी असावी.
* मशीन ज्यांच्या मालकीचे आहे अशा स्त्रियांकडून आजूबाजूच्या इतर स्त्रियांना/ मुलींना स्वच्छतेची माहिती दिली जाईल आणि त्यामुळे जननसंस्थेच्या रोगांचे प्रमाण कमी होईल.
* सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रीकडे त्यासाठी पैसे नसतील तर तिने कांदे, बटाटे किंवा तिच्या शेतात तयार होणारा कोणताही पदार्थ देऊन त्याच्या बदल्यात सॅनिटरी पॅडस् घ्यायला काहीच हरकत नाही.
मुरुगानंदम् यांना एकदा विचारण्यात आले की, ते टीव्हीद्वारा या नॅपकिनची जाहिरात का करीत नाहीत? तेव्हा ते म्हणाले, ‘‘टीव्हीतील सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात करणाऱ्या स्त्रिया पांढरी स्वच्छ पँट घालून भिंतीवर उडय़ा मारताना दिसतात. त्यामध्ये ‘कम्फर्ट’विषयी बोलले जाते, पण स्त्रियांच्या ‘हायजिन’ या विषयावर काहीच भाष्य नसते आणि माझे उद्दिष्ट तर मुख्यत: हायजिन हेच आहे.’’
मुरुगानंदम् यांची मशीन मुख्यत: वेगवेगळ्या एनजीओज्कडून खरेदी केली जातात. एका मशीनची मूळ किंमत साधारणपणे पंचाहत्तर हजार रुपये इतकी आहे. सेमी ऑटोमॅटिक मशीनची किंमत जरा जास्त असते. एकेक मशीन दहा स्त्रियांना रोजगार देते. त्यावर दररोज दोनशे ते अडीचशे पॅडस् तयार केली जातात. ही पॅडस् दोन ते अडीच रुपयाला एक याप्रमाणे विकली जातात. प्रत्येक पॅडला त्यांचे ब्रॅण्डनेम देण्याची मुभा आहे. त्यानुसार ‘मदर केअर’, ‘सखी’, ‘रिलॅक्स’, ‘सुख-चैन’, ‘निर्मल’ अशा वेगवेगळ्या नावांखाली ही पॅडस् विकली जातात.
मुरुगानंदम् यांची ही एक प्रकारची चळवळ आहे. ते या चळवळीला ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ म्हणतात. शिवाय मुरुगानंदम् खेडय़ातल्या शाळांसोबतही काम करतात. त्यांच्या मते मासिक पाळी सुरू झाल्यावर साधारणपणे तेवीस टक्के मुली शाळा सोडून देतात. हे पाहिल्यावर त्यांनी शाळेतल्या मुलींनाच सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि त्यानंतर मुलींना हसत-खेळत शाळेत जाताना पाहिले.
या त्यांच्या शोधासाठी मुरुगानंदम् यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्या वेळच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांचा सन्मान झाला. त्या वेळी त्यांना विचारण्यात आले की, तो त्यांचा सर्वात अभिमानाचा क्षण होता का? तेव्हा त्यांचे उत्तर असे की, ‘‘नाही. त्यांचा अभिमानाचा क्षण म्हणजे उत्तराखंडमधल्या त्यांच्या मशीनवर तयार केलेले पॅड वापरून एका स्त्रीची मुलगी शाळेत जायला लागली आणि आनंदाने त्या माऊलीने मुरुगानंदम् यांना फोनवरून ही बातमी दिली तो क्षण.’’ गेल्याच वर्षी (२०१४ मध्ये) ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मासिकाने त्यांचा समावेश ‘मोस्ट इन्फ्ल्युएशिअल पीपल’मध्ये केलेला आहे.
हे सर्व झाले. पण मुरुगानंदम् यांच्या खासगी आयुष्याचे काय? ते स्वत:च सांगतात की, त्यांच्या मशीनचा पहिला क्रमांक आल्यानंतर एक दिवस त्यांच्या पत्नीचा -शांतीचा- त्यांना फोन आला. ‘‘माझी आठवण आहे का?’’ तिनं विचारलं. अर्थातच मुरुगानंदम् यांना खूप आनंद झाला व शांती आनंदाने त्यांच्या घरी परत आली. त्यांची आईही घरी परत आली. दोन्हीही बहिणींशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. मुरुगानंदम् यांना एक मुलगी असून त्यांचा संसार व्यवस्थित सुरू आहे. ज्या ग्रामस्थांनी त्यांना गाव सोडून जाण्यास सांगितले त्यांनीच त्यांना सन्मानाने परत बोलावले व त्यांचा सत्कार केला. त्यांची पत्नी शांती त्यांना त्यांच्या या चळवळीत अत्यंत मोलाचे साहाय्य करते. ती स्वत: खेडय़ांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व स्त्रियांना सांगते.
मुरुगानंदम् यांच्या कंपनीचे नाव ‘जयश्री इंडस्ट्रीज’ असे आहे. जयश्री इंडस्ट्रीजतर्फे भारतातल्या २३ राज्यांतील १३०० खेडय़ांत सहाशेच्यावर मशीन कार्यरत असून हजारो स्त्रियांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. शिवाय केनिया, इथिओपिया, श्रीलंका येथून या मशीनना मागणी आहे. दहा लाख स्त्रियांना रोजगार मिळावा इतकी मशीन तयार करण्याचा मुरुगानंदम् यांचा मानस आहे. इतकंच नव्हे भारतातल्या खेडय़ात जिथे फक्त २ टक्के सॅनिटरी नॅपकिन्स वापरली जातात तेथे १०० टक्केवापरली जावीत यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
मुरुगानंदम् यांची पुष्कळ व्याख्याने यू-टय़ूबवर आहेत. त्यांची भाषणे ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो. त्यांची अशी एक बोलण्याची खास शैली आहे. विविध किस्से सांगून ते श्रोत्यांना विशेषत: पुरुषांनाही अंतर्मुख करतात. ते म्हणतात, ‘‘भारतातल्या खेडय़ातल्या स्त्रियांची अशी अवस्था असण्याचे कारण ‘ट्रिपल ए चा अभाव’ हे आहे.
ट्रिपल ए म्हणजे- Affordability, Availability, Awareness मुरुगानंदम् यांची मशीन आणि त्यांचे कार्य या तीनही स्तरांवर काम करतात.
अमित विरमानी यांनी त्यांच्यावर एक माहितीपट तयार केला आहे. त्याचे नाव आहे, ‘मेन्स्ट्रअल मॅन’ त्याला ‘एशिया पॅसिफिक स्क्रीन अ‍ॅवॉर्डस् (२०१३)’ साठी ‘बेस्ट फीचर डॉक्युमेंटरी’चे नामांकन मिळाले. परदेशात हा माहितीपट गाजला.
सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनच्या शोधाची आणि त्या शोधाचे जनक मुरुगानंदम् यांची ही प्रेरणादायी कथा. स्वच्छतेचे महत्त्व अनेक अंगांनी सांगितले जाते, पण स्त्रियांची या बाबतीतली स्वच्छता हा खासगी आणि अत्यंत नाजूक विषय आहे. भारतामध्ये या विषयाचा एका पुरुषाने विचार करणे अशक्य, परंतु अरुणाचलम् मुरुगानंदम् यांनी ठोस पावले उचलून जणू शिवधनुष्यच पेलले.
स्वत:च्या पत्नीला खूश करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचे एका चळवळीत रूपांतर करणाऱ्या या संशोधक समाजसुधारकाला त्यांच्यातल्या उद्योजक सामाजिक कार्यकर्त्यांला शतश: धन्यवाद!
health.myright@gmail.com

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात