काळानुरूप बदलणाऱ्या, अवजड इंजिनांच्या बदलत्या स्वरूपाला तोंड द्यायला नरसू कुटुंबीयांची पाचवी पिढी सज्ज झाली आहे. गावाच्या औद्योगिक प्रगतीच्या सीमा या पिढीला नाहीत. ही ‘ग्लोबल मार्केटिंग’ करणारी पिढी आहे. त्यांना नवी क्षितिजं खुणावत आहेत. समान आहे ती एकच गोष्ट.. यंत्राची कुरकुर ऐकण्याची क्षमता आणि उपचार करण्याची ओढ. यंत्रांची देखभाल करण्याची आवड आणि आस्था. जी वंशपरंपरेनं चालत आली आहे..
लोकांना ध्यानीमनी नसलेल्या एखाद्या गोष्टीची गरज उत्पन्न करायची, अगदी वेड लावायचं त्याचं आणि मग तीच गोष्ट पुरवून आपला व्यवसाय यशस्वी करायचा. मार्केटिंगची ही कल्पना, ही व्याख्या हा खुल्या अर्थव्यवस्थेचा परवलीचा मंत्र आहे. पण तुमचा विश्वास नाही बसणार.. बरोबर १०० वर्षांपूर्वी, म्हणजे १९१३ साली एका अर्धशिक्षित चक्कीवाल्यानं ही कल्पना राबवली होती आणि एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा व्यवसाय सुरू केला.
गोष्ट आहे अमरावती गावातल्या ‘दत्तात्रय वर्कशॉपची.’ धर्माजी नरसूअण्णांची. अण्णांनी आपल्या दोन भावांसोबत मध्य प्रदेशातल्या खांडवा इथं एक वर्कशॉप काढलं. पण थोडय़ाच दिवसांत मतभेद झाले. अण्णा अमरावतीला आले आणि तिथं त्यांनी जागा घेऊन एक पत्र्याची शेड बांधली. १० हॉर्स पॉवरचं इंजिन आयात केलं आणि पिठाची गिरणी सुरू केली. अमरावतीतली इंजिनवर चालणारी ही पहिली चक्की. इंग्लंडहून बोटीनं हे इंजिन भारतात आणायला महिनाभर लागे.
सुरुवातीला हे इंजिन साऱ्या परिसराचं आकर्षण बनलं. कारण याला दोन प्रचंड फ्लाय व्हील्स होती. सहा फूट व्यासाची. हे इंजिन चालू करायचं म्हणजे २-३ माणसं सहज लागत. अशा यंत्राची काम करण्याची शक्तीही जबरदस्त. पण अण्णांच्या चक्कीवर दळणांची रांग लागे. अल्पावधीतच चक्की चांगली चालू लागली. अण्णांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळू लागला. त्यांना स्वस्थ बसवेना. काही तरी नवीन करायला हवं. तेव्हा अमरावतीत ‘इंद्रभुवन’ थिएटरमध्ये बालगंधर्वाची नाटकं चालत आणि मूकपटांनी आपलं गारूड करायला नुकतीच सुरुवात केली होती. चक्कीवाल्या अण्णांनी ठरवलं.. हे मूकपट आपण गावात आणायचे. लोकांना त्याची गोडी लावायची.
एकदा ठरल्यावर बाकी सारं पद्धतशीर! अण्णा मुंबईला गेले. थिएटरपासून ते प्रोजेक्ट जनरेटर, काळे पडदे.. फिल्म तुटली तर काय करायचं.. रिळं कशी हाताळायची, सारं नीट पाहून घेतलं. जागेचा प्रश्नच नव्हता. चक्कीसाठी मोठी जागा घेतलेली होतीच. झालं! रिळाचं थिएटर तयार केलं. त्यांनी मोठे दिवे लावले. दिवसा धडाडणाऱ्या चक्कीचं रूपांतर रात्री प्रशस्त थिएटरमध्ये होत असे. अण्णांच्या या थिएटरनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. एवढंच नाही तर खुद्द बालगंधर्वानाही हे थिएटर फार आवडलं. प्रशस्त मोकळं, भरपूर प्रकाशाची सोय असणारं! एकदा नाटक कंपनी आली की दोन महिने मुक्काम पडायचा. अण्णांना साऱ्या कलाकारांचा स्नेह लाभला. नाटक कंपनी गेली की मूक-चित्रपट सुरू. अण्णांची ही चक्की कम थिएटर म्हणजे मला तरी चित्रपटसृष्टीचं मूर्तिमंत प्रतीक वाटतं. उजेडात सारी यंत्रं आणि जीवनकलह आणि रात्र झाली की सारी मोहक मायावी स्वप्नसृष्टी. बस्स, प्रोजेक्टर सुरू व्हायचाच अवकाश! साऱ्या प्रेक्षकांना जणू पंख फुटायचे.. एका अद्भुत दुनियेत विहार सुरू व्हायचा.
एकीकडे पिठा-मिठाचा घास देणारे आणि दुसरीकडे स्वप्निल दुनियेत नेणारे हे नरसू कुटुंब साऱ्या जनतेत लोकप्रिय न होते तरच नवल. थिएटरचा हा सिलसिला १९३० पर्यंत जोमाने चालला. नंतर दुर्दैवानं तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन माणसांच्या भांडणात एकाचा जीव गेला. पोलीस-केस, कोर्ट-कचेऱ्या झाल्या अन् अण्णांनी थिएटर बंद करून टाकलं.
अण्णांचे चिरंजीव बाबूराव. बाबूराव नरसूंनाही इंजिन.. यंत्र.. दुरुस्ती यांच्यात विलक्षण गती होती. विदर्भ परिसरात कोणत्याही मशीनचं काही तुटलं.. फुटलं.. अडलं तर सारी ‘रुग्ण-यंत्र’ ट्रकवर घालून दत्तात्रय वर्कशॉपमध्ये येत. यंत्रांना बरं करण्याचाच ध्यास होता बापलेकांना. त्यात त्यांना विलक्षण समाधान लाभायचं.
बाबूराव नरसूंची आणखी एक खासियत होती. मूकपट किंवा बोलपटांची प्रोजेक्टर-दुरुस्ती. यात ते इतके तज्ज्ञ होते, की महाराष्ट्र-मध्य प्रदेशात सर्वत्र त्यांना मागणी असे. त्या काळी त्यांनी दिवसाला ५०० रुपये मागितले तरी थिएटर-मालक आनंदात देत. कारण बाबूरावांचा हात लागला की प्रोजेक्टर सुतासारखा सरळ, मऊसूत चालू लागे. जेव्हा सोनं ५० रुपये तोळा होतं, त्या दिवसातली गोष्ट आहे ही. यंत्रांशी दोस्ती, यंत्राच्या आवाजावरून त्याची प्रकृती ओळखण्याचं कसब या घराण्याच्या रक्तातच आहे बहुधा.
दत्तात्रय वर्कशॉप, फौंड्री आणि समोरच असलेलं लिमयांचं इलेक्ट्रिकल वेल्डिंगचं श्रीराम वेल्डिंग वर्क्‍स..बाबूरावांनी या ठिकाणी अनेक कारागीर घडवले. सोनाराच्या कुशलतेनं इथं धातूजोडणीपासून सोल्डरिंगपर्यंत सारं अचूक व्हायचं. ट्रक-ट्रेलरसारख्या वाहनांपासून कारखान्यापर्यंत साऱ्यांची इंजिन दुरुस्ती इथं व्हायची. एवढंच नाही तर मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमधून काही यंत्रसामग्री अमरावतीपर्यंत पोहोचली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाबूरावांनी रात्रं-दिवस राबून ते काम पूर्ण केलं. सोबत आलेले अधिकारी म्हणाले, ‘‘खरंच, जागेवर बसलं की चालेल ना मशीन’’ बाबूरावांचा आत्मविश्वास जबरदस्त. आपले काळे हात फडक्याला पुसत बाबूराव म्हणाले, ‘‘बिनधास्त घेऊन जा.’’ आणि त्यानंतर वैद्यकीय उपकरणंही दत्तात्रय वर्कशॉपमध्ये येऊ लागली.
बाबूरावांचे दोन्ही मुलगे सुधीरभाऊ आणि किशोरभाऊ यांनाही लहानपणापासूनच इंजिन यंत्रांमध्ये रुची होती. रिवायंडिंग, ऑल्ट्रेशन रिपेअर्स या कामांबरोबरच त्यांनी मेंटेनन्सची कंत्राटं घ्यायला सुरुवात केली आणि व्यवसायाचा विस्तार खूपच झाला.
शासकीय कारखान्यातली मशिनरी, जड वाहनं, ट्रक इंजिन्स या साऱ्यांसाठी दत्तात्रय वर्कशॉप ही विश्वासाची जागा ठरली. इंजिनीअरिंगचं औपचारिक शिक्षण न घेताच नरसू कुटुंब विदर्भातल्या अनेक कारखान्यांचं सल्लागार बनलं ते अनुभवाच्या बळावर. रोजच्या कामातून जे शिकायला मिळतं, तेच पुरलं त्यांना. एवढंच नाही तर सामाजिक.. सांस्कृतिक जीवनातही त्यांचं कुटुंब अग्रेसर राहिलं.
अमरावतीच्या एका गृहस्थांनी सांगितलेली एक आठवण.. किशोर नरसू जेव्हा नगरपालिकेवर निवडून गेले.. त्यांच्या प्रचार फलकावर लिहिलेलं होतं.. ‘अण्णा चक्कीवाल्यांचा नातू’ .. बस्स! तेवढंच पुरलं.
किशोरभाऊंना दोन्ही मुली.. त्या उत्तम शिकल्या. पण लग्न झाल्यावर पुण्यात राहिल्या. सुधीरभाऊंचे दोन्ही मुलगे स्वेच्छेनं वर्कशॉपमध्ये आले. त्यांनी मशिनरी वाढवली. राजेशजी सांगतात, ‘‘आता कुणाला थांबायला वेळ नसतो. मशिनवरचा पहिला जॉब उतरवून लगेच आमचं काम करा म्हणतात. त्यामुळे आता ३ युनिट काढली.’’
राजेश-दिनेश म्हणजे नरसूंची चौथी पिढीही गेली २५ वर्षे याच व्यवसायात आहे. त्या दोघांनी काळानुरूप जेसीबी, क्रेन्स, रस्तेबांधणीतली मशिन्स यांच्या दुरुस्ती-देखभालीवर लक्ष केंद्रित केलं. कारखाने बदलले, तसं काळाबरोबर वर्कशॉपचं कामही बदललं. अ‍ॅडव्हान्स मशिनरी आणली. तत्पर सेवा पुरवली. पण गंमत सांगायची म्हणजे बाह्य़ांग किती बदललं, तरी इंजिनची कुरकुर ऐकण्याचं कौशल्य साऱ्या कुटुंबानं टिकवून ठेवलं.
नरसूंची पाचवी पिढी करण, राजेश आणि अमन व राजेश उच्चशिक्षित आहेत. अमन नेटवर्किंग हार्डवेअरमध्ये पुण्यात काम करतोय. पण करण मात्र इंग्लंडहून मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. करून आलाय. पुन्हा घरच्याच व्यवसायात परतला आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ एम.आय.डी.सी.चा पूर्ण मेंटेनन्स हातात घेऊ पाहत आहे. गावात मिळणारे १० हजार रुपये शहरातल्या २० हजारांइतक्याच किमतीला पडतात, याची त्याला जाणीव आहे.
एखाद्या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत का नाही गेलास असं विचारल्यावर तो सांगतो, ‘‘ती कंपनीही कुणी तरी कष्टानं उभारली, वाढवली.. त्यांच्यासाठी राबायचं त्यापेक्षा माझ्या वाडवडिलांनी जे उभारलं.. देशभरात नाव कमावलं.. ते वाढवण्यासाठी मी खूप कष्ट करीन. आता एजन्सी आणि वितरणात शिरायला हवं. ते आम्ही अजमावू पाहत आहोत.’’
करणचं म्हणणं आणखी खरं ठरवलंय ते ‘दत्तात्रय वर्कशॉप’ मधून अनुभव घेऊन विदर्भात पसरलेल्या कारागिरांनी. इथून जो बाहेर पडला, त्या जवळजवळ प्रत्येकानं स्वत:चा छोटा-मोठा स्वतंत्र धंदा सुरू केला. हा आत्मविश्वास त्यांना बाबूरावांच्या हाताखाली काम करूनच कमावता आला.
करणची पत्नी पूनम ही हॉटेल मॅनेजमेंट करून एका मोठय़ा कंपनीत स्टॉक मेंटेनन्स बघत होती. तिनं ‘दत्तात्रय वर्कशॉप’च्या वाढत्या व्यापात लक्ष घालायला सुरुवात केली अन् वेळ वाचवणाऱ्या अनेक नव्या प्रणाली आता अनुभवी कामगारांच्या जोडीला आल्या. त्यानं कामाचा वेग वाढला, तसाच प्रगतीचाही.
काळानुरूप बदलणाऱ्या, अवजड इंजिनांच्या बदलत्या स्वरूपाला तोंड द्यायला आता नरसू कुटुंबीयांची पाचवी पिढी सज्ज आहे. गावाच्या औद्योगिक प्रगतीच्या सीमा या पिढीला नाहीत. ही ‘ग्लोबल मार्केटिंग’ करणारी पिढी आहे. त्यांना नवी क्षितिजं खुणावत आहेत. समान आहे ती एकच गोष्ट.. यंत्राची कुरकुर ऐकण्याची क्षमता आणि उपचार करण्याची ओढ. यंत्रांची देखभाल करण्याची आवड आणि आस्था; जी वंशपरंपरेनं चालत आली आहे.
पिढय़ान्पिढय़ांच्या अनुभवाचं सार आहे ते!