२२ वर्षांपूर्वीचे तेच चेहरे. फक्त घट्ट वेण्यातल्या मुलींच्या बाया झालेल्या आणि खाकी हाफ चड्डीतल्या मुलांचे बापे..पण ते दोन-तीन तास आम्ही त्या कॅन्डललाइटच्या मंद प्रकाशातल्या रेस्तराँमध्ये नव्हतोच. आम्ही होतो आमच्या दहावीच्या वर्गात..!
वॉ र्डरोबचे वरचे खण म्हणजे माझ्या मते स्टोरेज कमी आणि आठवणींचेच कप्पे जास्त असतात. ही जागा जेवढी मोठी, तितक्या जास्त आठवणी. साधारणत: तुम्ही वयाची चाळिशी गाठत आलात की हे कप्पे खचाखच साठून जातात.
अशाच एका निवांत दुपारी हे कप्पे आवरताना सर्टिफिकेट्स ठेवलेली ती पिवळ्या रंगाची जुनी फाइल मिळाली. आजच्या मितीस, गुंतवणुकीच्या शेअर्स, एलआयसी, म्युच्युअल फंडसपासून अ‍ॅग्रीमेन्टसच्या अनेक कडक करकरीत फाइल शेल्फमध्ये टेचात उभ्या आहेत. पण ज्यामुळे हे सारं शक्य झाले असेल, ती मूळ शिक्षण आणि पदव्यांची फाइल मात्र कित्येक वर्षे तेच जुने कळकट पिवळे कपडे घालून वर कुठेतरी शांतशी पडून आहे. सुरुवातीला नोकऱ्या बदलताना, मग साफसफाई आणि आजच्यासारखं ‘उगाच’ अशा अनेक कारणाने तिला कितीदा तरी चाचपून, उघडून पाहिलंय. पण तरीही नव्या फाइलच्या वेष्टनात तिला बांधावं असं मात्र कधीच वाटलं नाही. जणू त्या पिवळ्या फाटक्या फाइललाही माझ्या चारदोन आठवणी चिकटल्या असाव्यात, तसं काहीसं!
 तर . त्या दिवशी ‘उगाच’ ती फाइल जमिनीवर उतरवली. अं, उगाच तरी कसं म्हणू. कारणही आहे तसं. गेले काही दिवस फेसबुकवर रोज एकेक करून शाळेतले जुने मित्र आणि मत्रिणी भेटताहेत. काही पाच काही दहा तर काही तब्बल २२ वर्षांनी !! मी तिला – मग ती त्याला- मग तो आणखी कुणाला असं करत, रोज कुणी ना कुणी नवा भेटतोच आहे.
 फेसबुक प्रोफाइलवर काही चेहरे चौकटीत लावलेले. बदललेले.! थोडं प्रौढत्व चेहऱ्यावर मिरवणारे.! काहींचे फोटो नाहीत, ते कसे दिसत असतील अशी उत्सुकता जागवणारे अशातच एकीने चौथीतला ग्रुप फोटो अपलोड केला, म्हणून आणखी कुणी सातवीतला. त्या तीन चार वर्षांतही चेहरे बदललेले. मग आता २२ वर्षांनी कसे असतील. कसे दिसतील म्हणून अंदाज वर्तवण्याची ऑनलाइन स्पर्धा! फोटोतले सर, फोटोतल्या बाई. ओळखा पाहू कॉन्टेस्ट आणि किती किती विषयांचे ऑनलाइन चर्चासत्र!
 मग आता मलाही जुना शाळेतला फोटो शोधायला नको का? हं..! हा काय मिळालाच..अनुराधा नार्वेकर, सहावी ब! चला आताच स्कॅन करून अपलोड करते आणि सगळ्यांना टॅगसुद्धा! मग त्या क्लासटीचर असलेल्या सरांची आठवण! त्याच का? मग प्रत्येक वर्षांचे क्लासटीचर सर आणि बाई आठवण्याची शर्यत!
अशा एकेक आठवणींची मालिका सुरू झाली की थांबत नाही. पण असे किती दिवस फोटो पाहत ऑनलाइनच गप्पा मारणार आपण? आता आपल्याला भेटायलाच हवं दोस्तानो..!
 आणि..असं नुसतं बोलूनच गप्प न राहता..आम्ही चक्क १५ दिवसांत भेटलोसुद्धा!! ती शनिवार संध्याकाळ. फक्त दोनतीन तास. आणि आमच्या बॅचचे तीसेक चेहरे. जितक्यापर्यंत पोहोचता आलं तितकेच! काही मुद्दाम पुण्याहून तर एक नागपूरहून आलेली आणि काही मुंबईतल्या मुंबईत असूनही येऊ न शकलेले!
 ओळख बघू मी कोण? ए चेहरा जाम ओळखीचा वाटतोय..ए आठवलं..अरे तू तो हा! करेक्ट.? बरोब्बर! ओळखलं म्हणजे काय? अजून तसाच आहे मस्तीखोर. मग ओळखणार नाही का. अगं. तू तर अजून उंचीने तितकीच आहेस की. पुन्हा शाळेत बसशील. काय करतोस- कुठे राहातेस. आताचं आडनाव काय गं? आणि तुझी ती..ती गं गोरी गोरी मत्रीण, हं तीच! ती कुठे असते आता?  ए गेल्या वर्षी अमके सर भेटले होते मला. खूप थकलेत आता! तू त्या सरांचं रोजचं गिऱ्हाइक होतास ना. ! तुला किती मुलं ग. ! आईशप्पथ. तू लव्हमॅरेज केलंस? लग्नाला किती वर्षे झाली? ओह. मुलगा दहावीत आहे? वाटत नाही गं तुझ्याकडे पाहून .. या सगळ्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर, मग आम्ही सातवीत असतानाचं त्यावेळचं गाजलेलं गाणं. ते त्या वेळेसारखंच आजही तितकंच अफलातून गाणारा आमचा शाळकरी मित्र. उगाच माझ्याही चारदोन कविता. किती किती किती म्हणून गमती सांगू.??
२२ वर्षांपूर्वीचे तेच चेहरे. फक्त घट्ट वेण्यातल्या मुलींच्या बाया झालेल्या आणि खाकी हाफ चड्डीतल्या मुलांचे बापे.पण ते दोन-तीन तास. आम्ही त्या कॅन्डललाइटच्या मंद प्रकाशातल्या रेस्तराँमध्ये नव्हतोच. आम्ही होतो आमच्या दहावीच्या वर्गातच.! घंटा वाजून शाळेतला पहिला तास सुरू होण्याआधी, वर्गशिक्षिका येण्याआधी चाललेला तो चिवचिवाट! जणू काही कधीही शिपाई घंटा वाजवेल, तास सुरू होईल आणि थांबावं लागेल, अशा घाईच्या आविर्भावातल्या त्या गप्पा संपता संपत नव्हत्या.
 ती मामलेदार रोडच्या गल्लीतली आमची उत्कर्ष मंदिर, मालाड (पश्चिम). ते मदान, दुसऱ्या माळ्यावरला कोपऱ्यातला आमचा वर्ग, आमचा क्रीडामहोत्सव, वार्षकि परीक्षा, आमच्या बाई, आमचे सर आणि वर्षांकाठी शाळेच्या छोटय़ा मदानातला तो ‘ग्रुप फोटो’..! आम्ही त्या दोन तासात शाळेच्या दहाही इयत्तांत पाय ठेवून आलो. आमच्या शाळेत जाऊन आलो..
शिपाई घंटा वाजवणार नसला. तरी घडय़ाळाची घरून येणाऱ्या मोबाइलची घंटा वाजत होतीच ! आता निघायला हवं होतं.! पण तरी दोन तासात ती दहा वर्षे नाही मावली. आता भेटायचं, पुन्हा भेटायचं आणि तेही शाळेतच!! आम्ही पुन्हा एक ग्रुप फोटो काढत. नंबर, ई-मेलची देवघेव करत एकमेकांचा निरोप घेतला. त्यावेळी खरंच शाळा सुटल्यासारखे वेगळे होताना पावलं मात्र जड झाली होती..
 घरी आले आणि शाळेतून आल्यावर माझी मुलं शाळेतल्या गमतीजमती सांगतात, तशी नवऱ्याला अथक तासभर गमती सांगत राहिले.
 दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाच्या शाळेत ग्रुप फोटो काढायचा होता. त्याला शाळेसाठी तयार करताना त्याचे केस दोनदा िवचरले. तो म्हणाला, ‘अगं मम्मा ग्रुप फोटो आहे. कितीदा िवचरशील? त्याला म्हटलं, तुला नाही रे कळणार आता. अजून २० वर्षांनी कळेल.’
 अरेच्चा हे काय..! आज माझा नवरा चक्क काम सोडून फेसबुकवर.? म्हटलं काय रे? तर म्हणे, शोधतोय पाटकर हायस्कूल, वेंगुल्र्याचं कुणी दिसतंय का?