ch12स्त्रीच्या समानतेचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा पुरुषांच्या तरी समान जगण्याचा विचार होतो का? स्त्रीला समान वागणूक दिली जात नाही, असं म्हणत असताना समाजाने पुरुषाला तरी कुठे समान जगण्याची मुभा दिली आहे? तो पुरुष आहे म्हणजे त्याने ‘पुरुषी’च वागलं पािहजे हे गृहीतक त्याला इतकं घट्ट चिकटलं आहे की मुक्तपणे श्वास घेणं तोही विसरलाच आहे. माणूस असणं त्यानेही हरवलंच आहे की अनेकदा!

२०-२१ वर्षांपूर्वी मैत्रिणीला मुलगा झाला म्हणून त्याला बघायला गेले होते. बोलता बोलता तिचा नवरा बाळाकडे बघत गंभीर झाला. विचारलं तर म्हणाला, ‘हा पुरुष म्हणून जन्माला आलाय. म्हणजे काही गोष्टीतून त्याची सुटका नाहीच. तो वंशाचा दिवा असणार आहे, त्याला आयुष्यभर नोकरी-व्यवसाय करावाच लागणार आहे, आपल्या बायको- मुलांची सगळी जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार आहे, आणि म्हाताऱ्या आई-वडिलांची काळजीही त्यालाच घ्यावी लागणार आहे. कारण हे गृहीतच आहे.’
त्यावेळी हे प्रकर्षांने जाणवलं की, अपवाद असतील पण पुरुष तरी कु ठे आपल्या मर्जीचे राजे आहेत. समाजाने त्याच्यावर लादलेल्या या जबाबदाऱ्याच आहेत. ज्या पिढय़ा न् पिढय़ा अनेक पुरुष पेलत आलेले आहेत. पुरुष असणं हे त्यांचं प्राक्तन आहे. आणि ते सटवाई त्यांच्या भाळावर जन्माच्या वेळीच लिहून जाते. मग त्यांची सुटका नसतेच.
पुरुष म्हणून लादलेली किती तरी गृहीतकं मग त्याच्या स्वभावाचा भाग होऊन जातात. कारण कर्त्यां पुरुषाला, कुटुंबप्रमुखाला खंबीर, कणखर असावंच लागतं किंवा दाखवावं लागतं. आलेल्या स्वामित्व भावनेमुळे अहंकारी, बेदरकार, आक्रमक असणं अंगभूत होऊन जातं, त्यासाठी शरीर कमवावंच लागतं, भावनांचा अतिरेक झाला तरी मोकळेपणाने कुणाजवळ बोलता येत नाही, ते त्याला कमीपणाचं वाटतं (म्हणूनच स्त्रियांच्या तुलनेत चौपट पुरुष आत्महत्या करतात, अगदी जगभरात.) पुरुषीपणाचा मुखवटा त्याला अनेकदा त्याच्या मनािवरुद्धही घालावाच लागतो. पुरुषीपणाचा हा सतत स्वतच्याच खांद्यावर वाहावा लागणारा क्रूस पुरुषाला कधी अवजड होत नसेल का? त्याला तो कधीच खाली ठेवता येणार नाही का?
नक्कीच ठेवता येईल.. फक्त त्यासाठी त्याला काही गोष्टीचा त्याग करावा लागेल. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. कुटुंबातल्या स्त्रीलाही समान जगण्याचा हक्क द्यावा लागेल. कारण तिचं सक्षम होत जाणं त्याला ‘पुरुषीपणा’च्या बंधनातून मुक्त करणार आहे. आणि त्यातूनच स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांवर लादलेली गृहीतकं आपोआप गळून पडणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पुरुषाने स्त्रीसाठी उभं राहायला हवं, ‘ही फॉर शी’ ही जगभरात सुरू असलेली कॅम्पेन हेच सांगतं…
आरती कदम