या गरीब घरच्या आदरातिथ्यांनी ती दोघे मनोमन सुखावली. अण्णांच्या पत्नीने पटकन भात चुलीवर चढवला, एका चुलीवर कुळथाचे पिठले करायला घेतले. तिची आई मुलांना खेळवू लागली. पंधरा मिनिटांत तिने त्या दोघांना पिठलं भाताचे गरम गरम जेवण वाढले. ती दोघं या गरीब घराने दाखविलेल्या आदरातिथ्य आणि माणुसकीच्या दर्शनाने अगदी सुखावून गेली.
अण्णा देवधर जेमतेम ५ वी ६ वी शिकलेला, वयाच्या १५व्या वर्षीच आई बापाचे छत्र हरवलेला, या गावात एका भाडय़ाच्या लहानशा घरात राहात होता. पडेल ते काम करून चार पैसे मिळवून आपला कसाबसा चरितार्थ चालवीत होता. वयाच्या १८व्या वर्षी त्याला तालुक्याच्या ठिकाणी निघालेल्या एका मोठय़ा कारखान्यात कामगार म्हणून नोकरी लागली आणि नोकरीच्या जोरावर लग्न करून त्याने संसार थाटला. आपली कामसू बायको, दोन लहान मुले आणि त्याची सासू अशी चौघं, आपला ओढगस्तीचा संसार कसाबसा चालवीत होती. अचानक एक दिवस कारखाना कायमचा बंद पडला आणि अण्णांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपले कुटुंब जगवायचे कसे त्याला प्रश्न पडला, काही तरी उद्योग करणे भाग होते. त्या गावातले देवीचे देऊळ आता आता बरेच प्रसिद्धी पावत होते, गावोगावचे भाविक तेथे येऊ लागले होते. अण्णांच्या डोक्यात कल्पना आली आणि तो नारळाची टोपली घेऊन देवळाजवळ बसू लागला. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या प्राप्तीवर तो आपला संसार रेटत होता.
अशाच एका कडक उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी, घामाघूम अवस्थेत एक नवीन लग्न झालेले जोडपे देवीचे दर्शन घेऊन अण्णांच्या घरासमोर उभे राहिले. अण्णांच्या पत्नीने त्यांची आस्थेने विचारपूस केली. ते जोडपे इंदूरहून देवी दर्शनाला या गावी आले होते. कुठे दुपारच्या जेवणाची सोय होईल का म्हणून चौकशी करीत होते. अण्णाची पत्नी म्हणाली, ‘अजून तरी गावात जेवणाची सोय झालेली नाही. पण तुम्ही काळजी करू नका. आत या आणि आमच्याबरोबर दोन घास खाऊन घ्या. गोड मानून घ्या आमचा पाहुणचार.’ एवढे म्हणून तिने एक चटई बाहेरच्या खोलीत अंथरली. ती दोघं आत येऊन चटईवर बसली, अण्णांच्या बायकोने पाण्याचा तांब्या आणि पेले समोर ठेवले आणि दोन पुठ्ठय़ाचे पंखे त्यांच्या हातात हवा घेण्यासाठी दिले. या गरीब घरच्या आदरातिथ्यांनी तो दोघे मनोमन सुखावली. अण्णांच्या पत्नीने पटकन भात चुलीवर चढवला, एका चुलीवर कुळथाचे पिठले करायला घेतले. तिची आई मुलांना खेळवू लागली. पंधरा मिनिटांत तिने त्या दोघांना पिठले भाताचे गरम गरम जेवण वाढले आणि तोंडी लावायला फोडणीची मिरची आणि आंब्याचे ताजे लोणचे दिले. ती दोघं या गरीब घराने दाखविलेल्या आदरातिथ्य आणि माणुसकीच्या दर्शनाने अगदी सुखावून गेली. अण्णाचे धाकटे मूल भुकेने कळवळले होते, त्याला अण्णांच्या बायकोने पदराखाली घेतले, त्या जोडप्याने तिचे परत परत आभार मानले आणि जेवणाचे किती पैसे देऊ म्हणून विचारले. ती म्हणाली, ‘‘मी आता जरा अवघडलेली आहे, पैसे नकोत. आत या आणि देव्हारातली हळदी-कुंकवाची कुयरी घेऊन हळद-कुंकू मात्र न विसरता लावून जा. ती तृप्त मनाने आणि चेहऱ्याने आत आली आणि तिने हळदी-कुंकू स्वत:ला लावून घेतले आणि दोन बोटे अण्णांच्या पत्नीच्या कपाळी टेकवली. परत परत त्या घराचे आभार मानत ती दोघं घराबाहेर पडली. अण्णा देवळातून जेवायला घरी आला त्यांनी पाहिले बाहेर दोन खरकटी ताटे जमिनीवर होती. त्यांनी दोन्ही ताटे उचलली, दोन्ही ताटांखाली २० रुपयांची एक एक भगवी नोट त्याला ठेवलेली मिळाली. तो आश्चर्यचकित झाला. त्याची पत्नी बाळाला पाजत होती. तिने झाली हकीगत त्याला सांगितली. अण्णा दोन्ही नोटा घेऊन तसाच बाहेर पडला, जवळजवळ दोन-एक तास तरी तालुक्याला जायला बस नव्हती.. तेव्हा ते जोडपे बस स्टेशनवर निश्चित भेटेल म्हणून तो तेथे पोहोचला. चौकशी केल्यावर त्याला कळले, त्यांना एक खासगी मोटार अनायसे तालुक्याला जाणारी मिळाली, ते त्यातून निघून गेली. अण्णा तसाच परत आला. रात्री झोपताना तो पत्नीला म्हणाला, ‘‘अगं, मला वाटतं, हे पैसे म्हणजे नियतीने आपल्या पदरात घातलेले तिचे दान आहे. कारण तू पैसे मागितले नव्हतेस परंतु त्यांनी ते आपल्याला मिळतील या उद्देशाने तशी योजना करून ठेवली आणि मला ते त्यांना परत करण्याची प्रामाणिक इच्छा असूनही ते पैसे मी त्यांना परत करू शकलो नाही. यातून मला असे वाटते आपल्याला नियतीने एक संकेत दिला आहे. आपण त्या संकेताचा अर्थ जाणून त्याप्रमाणे योग्य ती कृती केली पाहिजे. ते सत्शील कुटुंब नेहमीचे दिवसभराचे कष्ट उपसून रात्री शांतपणे झोपून गेले. पण झोपण्यापूर्वी अण्णांनी मात्र उद्यापासून कशाची सुरुवात करायची याची खूणगाठ मनाशी बांधली होती.
  दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णांनी एक मोठा पुठ्ठा घेतला आणि कोळशाने त्यावर पुढील अक्षरे लिहिली. ‘अन्नपूर्णा प्रसन्न- जेवण तयार आहे’ आणि तो पुठ्ठा घराच्या दारावर लटकावून दिला. त्या दिवसापासून गेली तीस वर्षे अत्यंत विनम्र सेवा, स्वच्छ वागणूक आणि प्रत्येक पदार्थाला अण्णांच्या पत्नीच्या सुगरण हाताने आलेली अपूर्व चव आणि स्वाद यांनी कमाल केली. देवी दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक आवर्जून अण्णा देवधरांच्या खानावळीमधून तृप्त होऊन जात असे. गावातल्या जागृत देवीची कृपा महती आणि अण्णा देवधरांच्या चविष्ट खानपान सेवेची महती आणि माहिती कर्णोपकर्णी सर्व दूर पसरत गेली. एके काळी घरगुती असलेला व्यवसाय आता चांगला खानावळ या स्वरूपात विस्तारत गेला होता.
गेली तीस वर्षे अण्णाने या व्यवसायात सचोटी आणि अपार मेहनत घेताना एका मोठय़ा हॉटेलचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी गेले सहा महिने अण्णा आणि त्याची दोन्ही तरुण मुले अहोरात्र मेहनत घेत होते. हॉटेलसाठी जागा, त्याचे खरेदी व्यवहार, पैशाची जमवाजमव, त्यासाठी लागणारे परवाने आणि दोन मजली हॉटेलचे बांधकाम. सर्व सोपस्कार व्यवस्थित पूर्ण करून अण्णा देवधरांचे ‘अन्नपूर्णा हॉटेल’ लोकांच्या सेवेसाठी तयार झाले होते. काल त्याच्या उद्घाटनाला, पालक मंत्री, खासदार, शासकीय अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आले होते. उद्यापासून हॉटेल व्यवसायाला त्या वास्तूतून सुरुवात होणार होती. त्याची सर्व पूर्वतयारी करण्यात रात्रीचे १२ वाजून गेले होते. अण्णा आणि कुटुंबीय अपूर्व अशा मानसिक समाधानात त्या रात्री भविष्याची स्वप्ने घेऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून अण्णांनी शुचिर्भूत होऊन देवांची पूजा केली आणि आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन नवीन हॉटेलमध्ये सकाळी हजर झाला. त्यांनी नवीन गल्ल्याची भक्तिभावाने पूजा केली, देवीच्या देवळात जाऊन तिचे आशीर्वाद घेतले. अगदी सकाळी सकाळी एक नवीन लग्न झालेलं जोडपे हॉटेलच्या पायऱ्या चढून वर आले. अण्णांनाच त्यांनी विचारले येथे अण्णा देवधरांचे घर कुठे आहे? आम्ही इंदूरहून आलो, तीस एक वर्षांपूर्वी माझे आई-वडील या गावात देवदर्शनाला आले होते त्यांनी आम्हाला त्यांची आवर्जून भेट घेण्यास बजावले आहे. अण्णांनी आपल्या मुलाला गल्ल्यावर बसविले आणि त्या तरुण जोडप्याला म्हणाले, चला दाखवतो या माझ्या बरोबर. ते जोडपे त्यांच्या बरोबर त्याच्या घरी पोहोचले. ते आता साधे घर राहिले नव्हते. एका सुखवस्तू माणसाचा बंगला झाले होते. अण्णाने आपल्या पत्नीला हाक मारून नुकत्याच लग्न झालेल्या मुलीची ओटी भरायला सांगितले. अण्णा देवधरांनी आणि त्याच्या पत्नीने सर्व कहाणी त्या नवविवाहित जोडप्याला सांगितल्यावर हा योगायोग ऐकून सारी मंडळी अचंबित झाली. त्या काळी एका नवविवाहित जोडप्याच्या हातून नियतीने जे दान अण्णा देवधरांच्या पदरात टाकले होते. त्याचे हे अचंबित करणारे ऐश्वर्यसंपन्न रूप पाहून सर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. अण्णा त्या जोडप्याला म्हणाले, देवदर्शन घेऊन या आणि जेवायला मात्र इतर कुठेही न जाता येथेच या.
निघताना अण्णांनी त्या तरुण जोडप्याच्या हातात आशीर्वाद म्हणून एक-एक बंद पाकीट दिले. ‘पुन्हा आई-वडिलांबरोबर दर्शनाला या’ म्हणून आग्रहाचे निमंत्रण दिले. इंदूरला गेल्या गेल्या त्या नवविवाहित तरुणीने ते बंद पाकीट उघडून पाहिले त्यात एक एक हजाराच्या पाच नोटा होत्या. तिने काही तरी मनाशी निश्चित केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर एक फलक लावून टाकला-तो होता-‘आशीर्वाद ब्युटिपार्लर’.