पूर्वीच्या स्त्रियांचे अख्खे जगणेच तसे पारंपरिक गाथेने तोलून धरल्याचे मला दिसत होते. बालपण खेडय़ात गेले. सभोवती बघत असताना पुरुषप्रधान संस्कृतीने पिचलेल्या स्त्रीवर्गाला मानसिक आधार आणि एकमेव विरंगुळा या गाथांचा आहे, हेही जाणवत होते. मी स्वत: लिहायला लागल्यावर या आगळ्या धनाची मौलिकता तर मला कळलीच, पण त्यांची मार्गदर्शकाची भूमिकाही माझ्या ध्यानात आली. आपल्या अस्मितेची वाट या गाथांच्या आधारे शोधणाऱ्या पूर्वीच्या स्त्रीला हे लोकधन सांभाळल्याबद्दल धन्यवाद द्यायलाच हवेत. कारण त्यामुळेच स्त्रीच्या जगण्याचे, संस्कृतीचे दर्शन घडू शकते. तिच्या जगण्याला श्वास आणि विश्वास देणाऱ्या या लोकगाथा गीतेसारख्याच नित्यनूतन आहेत. त्या व्यक्तिपरत्वे बदलतात आणि कालानुरूप कूस पालटतात, म्हणूनच त्या र्सवकष सार्वत्रिक आणि चिरंतन ठरतात. अनेक स्त्री-प्रतिभांचा स्पर्श झाल्यामुळे त्या मुक्त, लवचीक आणि लययुक्त तर होतातच, पण स्त्री-जीवनाची लय पकडतात.
लोकगाथांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व भावनिक स्थित्यंतरे तर कळतातच, पण स्त्रियांच्या जगण्याची निरनिराळी रूपेही प्रतिबिंबित होतात. एखादी स्त्री लोकगीतातून स्वत:च्या भावभावना जरी मांडत असली तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक ऐक्याशी जोडून टाकते, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एकच लोकगीत वेगवेगळ्या भाषेत आढळून येते. कधी कधी ते जागतिक ठरते. लोकगीतांद्वारा स्त्री-जीवनाचा आलेख मांडता येतो, हे फार महत्त्वाचे आहे. कारण लोकगाथा स्वाभाविक, सामूहिक आणि प्रामाणिक असतात. त्यामुळेच त्याआधारे बदलत्या परंपरा, बदलती संस्कृती आणि बदलते भावजीवन याचाही आढावा घेता येतो. तसेच पूर्वीच्या स्त्री-विश्वाचा कानोसाही घेता येतो.
लोकगाथेतील स्त्रीला शेजारणीबद्दल इतका विश्वास वाटतो की, तीच परंपरा बनते. या स्त्रिया एकमेकींना घेऊन वाटचाल करतात. स्त्रीत्वाला तोलून धरतात. त्याचबरोबर स्त्रीऋणातूनही मुक्त होतात. हे फारच महत्त्वाचे आहे.
‘‘पऱ्हाटीचे बोंड येचतो लाई लाई
आमच्या गावात हुंडय़ाची बोली नाई’’
असे ठणकावून सांगताना ही स्त्री स्वत:पुरते पाहत नाही, तर संपूर्ण गावाचा विचार करते. आपल्याबरोबर आपल्या गावातील सर्वच स्त्रियांना एक पाऊल पुढे नेते. कष्ट करून पोट भरण्याची हिंमत आणि कुवत आमच्या ठायी आहे, असे सर्वाच्या वतीने सांगताना ती सर्वच स्त्रियांना समान सूत्रात ओवते. त्यांना सख्या मानते. म्हणूनच आज नव्याने या लोकगाथेतील स्त्री-अस्मितेच्या पाऊलखुणा शोधल्या तर आजच्या स्त्रीची पाऊलवाट ठरतील, असे वाटल्यावरून ‘पारंपरिक स्त्री गाथा’ लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यानिमित्ताने अनेक लोकसाहित्याचा अनमोल ठेवा हाती लागला. लेखिका पुस्तक प्रकाशन प्रकल्पाने तो प्रकाशित केला आहे. आजच्या भांबावलेल्या स्त्रीला घरातील मायेच्या आजीगत त्या धीर देतीलच, पण त्याच वेळी नव्या वाटेवर चालताना बळही देतील. त्यामुळेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या व काळाच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या कोनातून नव्याने विचार या पुस्तकातून केला आहे. हा खरा तर कस्तुरीमृगाचा शोध आहे. आपल्याच सुवासाची कुपी आपल्याच जवळ असताना आपण मात्र कसला शोध चालू केला आहे? तेव्हा या कुपीलाच हस्तगत करण्याचा हा उद्योग आहे. सैरभैर मन त्यामुळेच नक्कीच ताळ्यावर येईल, सावरेल हा विश्वास आहे. तेच या पुस्तकात केले आहे.

कथेमागची कथा
पुस्तकांनी मनावर लहाणपणी जे गारुड केलं, ते कायमचंच. पुस्तकच फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड, ट्रॅक्विलायझर म्हणून वेळोवेळी मदतीला धावून आली आणि एकदम कधीतरी- आपण आता लोकांचं म्हणणं खूप वाचलं; आता आपल्याला काहीतरी सांगायचंय, ते सांगू या असं वाटलं. मग आपण आर्ट्सचं शिक्षण घेतलेलं नाही ही भावना दूर सारून लिहायला सुरुवात केली. कथा लिहून झाल्यावर एकदम मोकळं वाटलं. एखादी खोली नीट आवरली की, मोठी वाटायला लागते, तसं मेंदूत नवीन विचारांना जागा मिळाली. हा अनुभव छान होता. मनात येणाऱ्या वेगवेगळय़ा विचारांतून कथा आकाराला येऊ लागल्या.
तंबोरा अगदी सुरात लागला की, त्यातून गंधार ऐकू येतो, तसं आपल्या मेंदूतील कुठलीतरी शक्ती एकाएकी जागृत झाली आणि तिनं विश्वातल्या सुराशी संवाद साधला तर? अशा कल्पनेतून पहिलीच ‘सुसंवाद’ ही कथा लिहिली. एक स्कॉलरली बुद्धिमान आणि एक प्रतिभावंत बुद्धिमान व्यक्ती लग्नबंधनात एकत्र आल्या तर दोघेही सिन्सिअर असूनही काय होईल, अशा कल्पनेतून ‘मॅनिप्युलेशन’ लिहिली.
मनस्ताप घडवणाऱ्या दोन-तीन घटना लागोपाठ घडल्या आणि ते विचार मनातून जाता जाईनात. तेव्हा मला एक स्वप्न पडलं. त्यात माझ्या हातावर, कपडय़ांवर घट्ट नांगी रोवलेले किडे आहेत आणि त्यांना मी झटकायचा, सुरीनं काढायचा प्रयत्न करते आहे असं काहीतरी. आणि मग माहितीतल्याच एका सधन घरातल्या सुशिक्षित मुलीची दु:खद कहाणी ऐकली. तिला किती मनस्ताप झाला असेल या विचारानं मन अस्वस्थ झालं. त्याच सुमारास रस्त्यातून हातवारे करत पुटपुटत जाणारी व्यक्ती बघितली. वाटलं, हा माणूस त्रासदायक आठवणींचे किडे झटकत जातोय की काय? त्यातून ‘किडे’ ही गोष्ट लिहिली.
मला वेगवेगळय़ा तऱ्हेची पुस्तकं वाचायला आवडतात. त्यामुळं मी लिहिलेल्या गोष्टीदेखील जे जे प्रकार मला वाचायला आवडतात, साधारण त्याच प्रकारच्या आहेत. उदा. अद्भुतकथा, गूढ, मनोविश्लेषणात्मक, रहस्यकथा, सामाजिक वगैरे.
कथेची पटकथा कशी होते, याचं मला फार कुतूहल होतं. त्यासाठी मी पटकथालेखनाचा एक कोर्स केला. त्यातून पटकथालेखन, त्याचं चित्रीकरण यांची एक अद्भुतनगरीच आहे हे कळलं. त्या वेळी होमवर्क म्हणून दहा मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी पटकथा लिहिण्यासाठी विषय दिला ‘भेसळ’. तेव्हा विचार करताना वाटलं, भेसळीचा राक्षस साक्षात देव आला तरी आवरणं कठीण. प्रत्यक्ष देवालाच त्याचा अनुभव आल्याशिवाय भेसळीची तीव्रता कळणार नाही. त्याच वेळी पेट्रोलभेसळीतून सरकारी अधिकाऱ्याला जाळल्याच्या घटनेचा आधार घेऊन ‘स्वर्गात भेसळ’ ही कथा लिहिली. त्याचप्रमाणे तीनचार मोठी माणसे आणि दोनतीन लहान मुलांना घेऊन एक गोष्ट लिहा. या होमवर्कसाठी ‘काकर’ ही रिलेटिव्हिटीतल्या ‘टाइम डायलेशन’वर आधारित थोडीशी गमतीदार गोष्ट लिहिली.
‘सुचेतानंत’ प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं नाव ‘परा पिंगलिका’ आहे असं सांगितल्यावर काही जणांना ते आध्यत्मिक आहे की काय, असं वाटलं. तेव्हा हा गैरसमज दूर करण्यासाठी पुस्तकावर ‘करमणूकप्रधान’ कथांचा संग्रह असल्याचं आवर्जून छापलं. कारण ‘परा पिंगलिका’ म्हणजे ‘परी’चा परा. तोदेखील भविष्य जाणणाऱ्या पिंगळा या पक्ष्याच्या जन्मात असलेला. थोडी गमतीची, थोडी गंभीर अशी कथा आहे.
मला वाटतं की, जे सांगायचं आहे ते थोडं विनोदाच्या, गमतीच्या रूपात सांगितलं तर जास्त पटेल. लोक आधीच खूप त्रासलेले असतात. त्यातून हल्ली वाचतो कोण? मग अगदीच अस्ताव्यस्त भरकटणाऱ्या टी.व्ही. सीरियलपेक्षा थोडी चांगली करमणूक करेल आणि थोडा विचारही करायला लावेल अशी गोष्ट सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.
कधी वाटतं की, कुणी सांगितलाय हा लिहिण्याचा उपद्व्याप? कुणाला काय पडलंय त्याचं? पण मग एखादा प्रसंग मेंदूत शिरतो. काही काळ घर करतो. पाण्याला उकळी येऊन बुडबुडे फुटावेत, तशी शब्दांचीच उकळी फुटते. मग लिहिलं की बरं वाटतं. अखेर कमीअधिक प्रमाणात, बरं वाईट, कसंही असो, लिहिणं ही लेखकाची गरज आहे हे पटतं.

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

‘आस्वादक’ समीक्षा
अनेक वर्षांपासून स्त्रियांचं जगणं, त्यांचं आरोग्य, अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा, पुरुषांवर असलेलं परावलंबित्व या साऱ्या गोष्टी आपणही नित्यनियमानं पाहत आहोत. या संदर्भात अनेकांनी लिहीलंही आहे; पण महानोरांच्या भावसंवेदना अधिक जागृत झालेल्या मला ‘तिची कहाणी’ या काव्यसंग्रहातून दिसून आल्या.
समाजातील अत्याचाराचं प्रत्येक कवितेतील वेदनेचं एक वेगळं रूप वाचून मन व्यथित झालं. या साऱ्या कवितांनी माझ्या मनात विचारांचा, क्रोधांचा, वेदनेचा कल्लोळ माजवला. यावर आपणही काहीतरी लिहावं, महानोरांची ही पीडित, अत्याचारित स्त्रियांबद्दल वाटणारी तळमळ आपण आपल्या परीनं वाचकांपर्यंत पोहोचवावी, असा विचार मनात सतत घोळत राहिला, आणि मी या काव्यसंग्रहावर लिहायचं ठरवलं. काव्यसंग्रहाचा विषय समाजामध्ये घडणाऱ्या वास्तव घटनांवर आधारित असल्यामुळं चिंतन करायला लावणारा होता. त्यामुळं घटनांची वास्तविकता तर वाचकांपर्यंत पोहोचवायची होती. त्याचबरोबर काव्य, त्यातील प्रसंग, घटना आणि कवी या साऱ्यांच्या मिश्रणातून हे पुस्तक घडायला हवं होतं आणि ते खरं माझ्यासाठी आव्हान होतं.
आणखी एक दुसरं आव्हान असं होतं की महानोरांच्या कवितेची भाषिक आणि प्रतिमा संलग्न वैशिष्टय़ या कवितांमध्ये रुजली होती त्या रुजलेपणामुळं त्यातील आशयही अभिव्यक्त होत होता आणि त्या भाषेत आणि प्रतिमात तो आशय सामावून घेण्याचं सामथ्र्य आहे हेही जाणवत होतं. हे एका काव्यात्म आव्हान होतं आणि महानोरांनी ते फार सहजपणे स्वीकारलं आहे. मग माझ्यापुढे आव्हान असं होतं की, एक नवी प्रतिमा आणि एक नवी भाषा त्याच कवितांवर निर्माण करण्याची, ती करत असताना ती काव्यात्मकताही समजून घ्यावी लागली आणि त्याचसोबत स्त्रियांची जीवनजाणीव समजून घेणाऱ्या कवितांना आणि सामाजिक वास्तवाला नजरेसमोर ठेवून त्याचं अनुरोधानं आस्वादकाच्या पातळीवर उतरून त्याची समीक्षा करावी लागली. हे लिखाण करत असताना मला साठोत्तरी कवयित्रींच्या कविता, परंपरेची कविता, साम्यवादी कविता, नीरक्षीर विवेकबुद्धीनं स्वीकार करून नावीन्याचाही विचार करत लिहिलेली भावकविता आणि स्त्रियांचे खास प्रश्न हाताळणारी स्त्रीवादी कविता असे विविध काव्यप्रवाह अभ्यासावे लागले. यात स्त्रियांनी स्त्रियांच्या वेदनेचा घेतलेला शोध आणि एक पुरुष कवी असून महानोरांनी घेतलेला शोध, त्यात त्यांचं असणारं वेगळेपण मला दिसून आलं आणि ते प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यासाठी मला आनषंगिक वाचनही खूप करावं लागलं. काव्यसंग्रहातील स्त्रियांची भावसंवेदनशीलता, ग्रामीण स्त्रियांचं जगणं, त्या स्त्रियांचं शब्दांशीच नव्हे तर मौनाशीही असलेलं नातं मला उलगडून पाहता आलं. तिची कहाणी या काव्यसंग्रहातून महानोरांनी पीडित, अत्याचारित स्त्री तर उभी केलीच आहे, त्याही पलीकडे जाऊन म्हणजे फक्त अशा ग्रामीण स्त्रियांचीच नव्हे तर सद्यस्थितीतल्या समाजातल्या मानसिकतेची, समाज मनाच्या अवस्थेची, समाज परिवर्तनाच्या आंदोलनाची ही कहाणी आहे.
ती कहाणी माझ्या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. जनशक्ती वाचक चळवळीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणाऱ्या या कवितांना नुसती दाद नको आहे तर ज्या समाज परिवर्तनासाठी त्यांनी या कविता लिहिल्या ते परिवर्तन प्रत्यक्षात समाजात दिसावं ही त्यांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा मी माझ्या पुस्तकातून माझ्या परीनं वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. स्त्रियांच्या जीवनातील व्यथांचं दर्शन घडवताना समाजात परिवर्तन घडून यावं हा महानोरांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास मला वाटतो, तरच आस्वादकाच्या पातळीवर जाऊन या काव्यसंग्रहाची केलेली समीक्षा ही समाजमनाच्या परिवर्तनाची एक प्राथमिक गरज मी  पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, असे मला वाटते.