वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं होतं. पण आम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी. काय करावं? मग ठरलं जेवायला बाहेर जायचं आणि सिनेमा बघून यायचं. पण मग कुठला सिनेमा बघायचा, यावरून सुरू झालेली चर्चा घरंगळतच गेली..
आमच्या कुटुंबाचं खरं म्हणजे भावंडांचं गेट टुगेदर होतं! सहा भावंडांपैकी सर्वात लहान, ज्याला आम्ही आजही ‘बाळ’ म्हणतो, साठीला आलेला आणि सर्वात मोठा दादा ७८ वर्षांचा! त्यामध्ये एक भाऊ आणि तीन बहिणी. आम्ही सगळेच ज्येष्ठ नागरिक! स्नेहसंमेलन सर्वात मोठय़ा दादांकडे होतं. त्या नंतरचा भाऊ, ताई, माई, अक्का, साठीचा बाळ आणि त्याची अर्धागिनी मी. आम्ही आपापली मुलं घरीच ठेवून आलो होतो या सेलिब्रेशनसाठी! दादांची दोन्ही नातवंडं जरी अमेरिकेत असली तरी त्यांचे चाळिशी ओलांडलेले मुलगा-सून घरीच होते. आणि आम्हाला आमच्या ‘हाल’ वर सोडून नोकरीचं कर्तव्य पार पाडायला गेले होते.
 दादांच्या सहस्रचंद्रदर्शनाला अजून अवकाश होता, पण पुन्हा सगळ्यांचं जमेल, न जमेल म्हणून आताच त्यांच्याकडून मस्त पार्टी उकळावी, या मताचे सगळे होते आणि त्याचेच प्लॅनिंग सुरू होते. सेलिब्रेशनच्या स्वरूपाबद्दल काही मतभेद असले तरी एका गोष्टीवर मात्र एकमत होतं की जे काय करायचं ते बाहेर जाऊन, घरात बसायचं नाही. मग बाहेर जाऊन करायचं काय, तर जेवण आणि सिनेमा.
इथूनच खऱ्या मतभेदांना सुरुवात झाली. सिनेमा पाह्य़चा खरा, पण कुठला? दादांनी या चर्चेतून अंग काढून घेतलं होतं, ‘तुम्ही ठरवाल तो, माझा फक्त खिसा! बाळला ‘गॉडझिला’ बघायचा होता. मुंबईतच खरं त्याला बघायचा होता, पण त्याची बायको या सिनेमाला यायला तयार नव्हती. त्याला वाटलं होतं, मोठय़ा भावंडांना आपण सहज घेऊन जाऊ. पण मोठी भावंडं त्याच्या बारशाला जेवलेली होती. तसे सगळे सुशिक्षित होते. इंग्रजी सिनेमा टी.व्ही.वर समजत होता. कारण त्याला उप-शीर्षके असायची. थिएटरमध्ये त्यांचे उच्चार समजून सिनेमा कळणं अवघड. हिंदी सिनेमा बघायला फारसं उत्सुक कोणी नव्हतं, कारण ते महिन्या-दोन महिन्यात टी.व्ही.वर येतात. त्यापेक्षा मराठी सिनेमा बघावा यावर एकमत झालं. मराठीच्या चळवळीला आपल्याकडून तेवढाच हातभार! मग सुरू झालं मराठी वृत्तपत्रामध्ये सिनेमाच्या जाहिराती बघणं. स्त्रियांच्या मते, त्या उच्च अभिरुचीच्या होत्या. त्यांना पांचट, विनोदी सिनेमा नको होता; तर पुरुषांचं म्हणणं, मजा करायला जमायचं आणि गंभीर, विचारप्रवर्तक कशाला बघायचं? दोन्ही या मध्ये एक चांगला मराठी सिनेमा सापडला. ‘तो पांचटही नाही आणि विचारप्रवर्तक तर नाहीच नाही?’ मोठय़ा वहिनीची बहुमूल्य सूचना, मग कुठे लागलाय, कितीचा शो आहे? यावर चर्चा.
‘कोथरूडच्या ‘सिटी’ मध्ये..  दुपारी तीनला..’
‘चांगलं आहे की, दिवसाउजेडी घरी परत येऊ ..
‘अगं, दिवसाउजेडी काय, बाहेर जेवायचंय ना आपल्याला? मधला वेळ कुठे काढायचा?’ एक मौलिक शंका.
‘तेही खरंच म्हणा. पण मग आपण असं करू, ‘अर्जुन डायनिंग हॉल’मध्ये थाळी खाऊ आणि मग सिनेमा बघू, तीच वेळ होईल आणि जवळही आहे.’
‘छे, छे, हा फारच लांबलचक प्रोग्राम होईल. बाणेरला ट्रेनने जायचं म्हणजे बाराला घर सोडायचं आणि परतायला सात. मला नाही जमायचं, इतका वेळ बसून गुडघे दुखतील.’ इति पंच्याहत्तरीची ताई.
आता खरं म्हणजे हीच ताई काही महिन्यांपूर्वी मुंबई-न्यूयॉर्क नॉनस्टॉपने मुलाकडे जाऊन आली होती. पण तिच्या वयाकडे बघून बाकीचे गप्प बसले.
‘मग आपण ‘सी-स्क्वेअर’मध्ये बघू या काय आहे ते.’ इति माई.
‘अगं, तिथे नाहीये मराठी सिनेमा’ कुणीतरी.
‘आणि तसंही जेवण आणि सिनेमा जरा मोठाच होतो प्रोग्राम.’ आता वहिनींनी चर्चेत भाग घेतला, मग कोणी काही म्हणायच्या आत घाईघाईने म्हणाल्या, ‘म्हणजे करू या सगळंच आपण, पण जरा आपल्या स्पीडने.’
‘आता वाजताहेत बारा. स्वयंपाक होतच आलाय, मग आज घरीच जेवू आणि तीनच्या सिनेमाला जाऊ.’ एक सूचना.
‘नाही बाई, जेवल्या-जेवल्या बाहेर पडायला नाही जमत मला. तास-दीड तास तरी आडवं व्हायलाच हवं.’ इति माई.
‘पण तीनचा सिनेमा बघायचा तर जेवल्याबरोबर बाहेर पडावंच लागणार की.’ आता अक्का.
‘पण मग इतर वेळी नाहीये का शो?’ दादांचा सारासारविचार.
‘आहे. सकाळी दहाला आहे.’ आता बाळने तोंड उघडलं.
‘पण थंडीच्या दिवसांत सगळ्यांच्या आंघोळी, नाश्ता होऊन कसं जमणार हे? बाथरूमही दोनच आहेत.’ यजमानीणबाईंना प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिसला.
‘हो आणि ताईला आंघोळीला वेळही फार लागतो.’ एक शंका.
‘वेळ लागतो म्हणजे काय?’ ताई उसळून म्हणाली, ‘तुमच्यासारखे सगळे कपडे मशीनमध्ये टाकून देत नाही मी. अजून जमतंय मला स्वत:चे कपडे स्वत: धुवायला.’
‘अगं, पण एक दिवस आटप की लवकर आणि वहिनी. नाश्त्याला ब्रेड बटर ठेवा.’ एक व्यावहारिक सूचना.
‘नाही हं, मला ब्रेडनी गॅसेस होतात, वाटेल ते सांगू नकोस.’
‘अगं पण कधीतरी..’
आता हे डिस्कशन जास्तच वैयक्तिक पातळीवर येत असलेलं पाहून भाऊ मध्ये पडले. ‘हे बघा, ही चर्चा दिशाहीन चालली आहे. आपली वयं, त्याबरोबर आलेल्या इतर समस्या बघता आपण डी.व्ही.डी. आणून घरीच सिनेमा बघू. मधून उठता येईल, वाटलं तर चहा घेता येईल आणि कंटाळा आला तर थोडा वेळ थांबता येईल आणि जेवणाचं म्हणाल तर घरीच पिझ्झा ऑर्डर करू. ‘थाळी’तली पोळी-भाजी काय रोजचीच आहे. मला वाटतं याला कोणाचीही हरकत नसावी.’
‘पण पिझ्झामध्येही खूप प्रकार असतात. नक्की काय मागवायचं आपण.’ पुन्हा एक शंका.
‘मला चीझ नको हं.’ ‘आणि मला कॅप्सिकमची अ‍ॅलर्जी आहे.’ ‘मी तर हल्लीच दोन दात काढलेत, पिझ्झासारखा प्रकार खाणं जरा कठीणच.’ प्रत्येकाने आपली मते मांडली.
‘आता आली का पुन्हा पंचाईत!’ एवढय़ात बाळने मोबाइलचा वापर करून त्या मराठी सिनेमाची डी.व्ही.डी. उपलब्ध नाही, ही महत्त्वाची अनाऊन्समेंट केली.
आता दादांनी सूत्रं हातात घेतली. ‘पु.लं. कोणा-कोणाला आवडतात?’ आता हा काय प्रश्न झाला? सगळेच बुचकळ्यात.
‘आपण निवडक पु. ल.’ची सी.डी. लावू या आणि..’ ‘खिचडी, कढी, पापड हा बेत करू या.’ वहिनींनी दादाचं वाक्य पूर्ण केलं.
मनातून सगळे सुखावले. स्वीट डिश म्हणून बाळकडून ‘नेचर’चं आइस्क्रीम ठरलं.
संध्याकाळी आपण कामावरून परतू तेव्हा घरात कोणीच नसेल या विचारात आलेले दादांचे मुलगा-सून दारातच थबकले..
हातात खिचडीच्या बश्या घेऊन पु. लं.ना खदखदून हसत दाद देणारी ज्येष्ठ मंडळी त्यांना दिसली. एका सेलिब्रेशनची कहाणी सुफळ संपूण झाली होती.