विभक्त देशातला पाकिस्तान हा देश त्यांनी आपला कधीच मानला नाही. त्यांना हवा व ते वातावरण मानवत नव्हते. शेवटी आपली तब्येत ठीक राहत नाही, हे कारण सांगून आपल्याला भारतात व मुंबईच्या जन्मभूतीतच मरायचे आहे, असे ठरवून त्या भारतात परतल्या. वयाच्या अवघ्या सेहेचाळिसाव्या वर्षी, ९६१ साली मुंबईतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. १९३४ मध्ये मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाची पूर्ण तयारी काँग्रेस सेविका दलाची प्रमुख म्हणून सोपविण्यात आलेल्या सफिया खानची ही दास्तान..
मुंबईमधील न्यायाधीश सोमजी हे प्रागतिक विचारांचे खोजा मुसलमान होते. सफिया ही सोमजींची मुलगी. तिचा जन्म १९१६ मध्ये मुंबईमध्येच झाला होता. न्यायाधीश सोमजी हे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे होते. त्या काळचे मुंबईतील प्रसिद्ध न्यायमूर्ती तय्यबजी यांच्याप्रमाणे सोमजीनीही आपल्या मुलींना कॉन्व्हेण्ट शाळेत शिक्षण दिले. ही गोरीगोमटी देखणी मुलगी शिकून पुढे कोणीतरी ‘मोठी’ होईल असे सोमजींना वाटे.
    १९३० साली सुरू झालेली दांडीयात्रा व त्यानंतर सुरू झालेला मिठाचा सत्याग्रह ही शाळकरी मुलगी पाहत होती. मुंबईमधील स्त्रियांनी केलेला मिठाचा सत्याग्रह व कमलादेवी चट्टोपाध्याय, लीलावती मुन्शी, अवंतिकाबाई गोखले वगैरे महिला नेत्यांची भाषणे ऐकली होती. महिलांचे मोठाले मोर्चे, १९३२ साली महिलांच्या मोर्चावर घोडेस्वारांनी केलेला हल्ला या सर्वाचा परिणाम सफियाच्या संवेदनशील मनावर होत होता.
मुंबईतील स्त्रीपुरुष आबालवृद्धांची, सत्याग्रहींची कामगिरी पाहून आपणही काहीतरी केले पाहिजे या विचाराने सफियाचे मन झपाटले. सज्ञान झाल्यावर तिने स्वत:ला सविनय कायदेभंगाच्या चळवळीत झोकून द्यावयाचे ठरविले. तिचे वडील सरकारी नोकर असले तरी तिने निवडलेल्या मार्गावर चालायचे तिचे स्वातंत्र्य ते हिरावून घेणार नव्हते याबद्दल तिला खात्री होती. सफियाने दारूच्या दुकानांवर निदर्शने, परदेशी वस्तूंच्या दुकानांवर निदर्शने, परदेशी कपडय़ांच्या होळय़ा करणे अशा कार्यक्रमात तडाख्याने भाग घ्यायला सुरवात केली. एका दारूच्या दुकानावर निदर्शने करीत आत प्रवेश करणाऱ्यांना अडवत असताना सफिया पकडली गेली व तिला तीन महिन्यांची साधी कैद झाली. सफियाची रवानगी मुंबईहून येरवडय़ाला झाली.
शिक्षा भोगून मुंबईला परत गेल्यावर काँग्रेसच्या चळवळीत अधिकच वेगाने काम करायचे सफियाने ठरवले. शिक्षणाला रामराम ठोकणे प्राप्त होते. काँग्रेस-सेवा-दल नावाची काँग्रेसची एक स्वयंसेवक संघटना होती. या संघटनेत स्त्री-पुरुष दोघेही स्वयंसेवक असत. वय वर्षे ७ पासूनच्या मुली, तरुणी, स्त्रिया, वृद्धा या सर्व काँग्रेसच्या झेंडय़ाखाली एकत्र आल्यामुळे काँग्रेस-सेवा-दलाचा स्त्रीविभाग स्वतंत्र होता. ही संघटना काँग्रेसची. त्यामुळे काँग्रेसचे धोरण व ध्येयच काँग्रेस सेवा-दलाचे ध्येय धोरण होते. तिचा भर संघटना बांधण्यावर होता. खादी प्रसार व विक्री, साक्षरता प्रसार, हिंदी भाषा प्रसार, सभेच्या वेळी शांतता व इतर व्यवस्था बघणं, पत्रके पोहोचविणे, सभांच्या वेळी काँग्रेसचे स्वयंसेवक म्हणून काम करणे, सत्याग्रह करणे, सत्याग्रहींना मदत करणे ही व अशा प्रकारची विधायक कामे प्रसंगानुरूप करणे हे काँग्रेस सेवा दलाचे उद्दिष्ट होते. स.का. पाटील, पुरुषोत्तमदास टंडन, युसुफ मेहरअल्ली वगैरे त्यावेळचे तरुण नेते काँग्रेस-सेवा-दलाचे नेतृत्व करणारे होते. सफिया काँग्रेस-सेवा-दलात जाऊ लागल्यावर तिची तडफ, कामाविषयीची तळमळ व निष्ठा पाहून सफियाची काँग्रेस सेविका-दलांची प्रमुख म्हणून मुंबई काँग्रेस कमिटीतच नियुक्ती केली गेली. १९३४ मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाची पूर्ण तयारी सफियावर काँग्रेस सेविका दलाची प्रमुख म्हणून सोपविली गेली. लोकांना आपल्या कामाकडे ओढून घेण्याची विलक्षण ताकद सफियामध्ये होती. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, अत्यंत शिस्त या सफियाच्या गुणांमुळे अधिवेशन यशस्वी झाले. सफियावर व तिच्या स्वयंसेविकांवर अभिनंदनाचा वर्षांव झाला नसता तरच नवल!
मुंबईमध्ये पेरीन कॅप्टन, किसन घुमटकर यांच्या सहयोगाने देशसेविका संघ स्थापन झाला होता. सफिया खानने या काँग्रेस सेवा दलास स्वातंत्र्य लढय़ासाठी योग्य आकार दिला. तो कालखंड होता, १९३२ ते १९४२ ही दहा वर्षे. काँग्रेस सेविका दलाची प्रमुख म्हणून सूत्रे हातात घेतल्यावर त्यांनी महिलांची शिबिरे घ्यायला सुरवात केली. या शिबिरात कवायतीचे महत्त्व, नेत्यांच्या आज्ञापालनाचे महत्त्व हा भाग होताच, पण विशेष भार मुलींचा धीटपणा वाढेल यावर होता. सेविकांना गर्दी थोपविण्याचे कसब, मोठय़ा सभांना व अधिवेशनांना उपस्थित होणाऱ्या नेत्यांचे व बुजुर्गाचे अदबीने स्वागत करणे, त्यांना सलामी देणे, सभेत शांतता राखणे, स्वत: शांतचित्त राहून समुदायावर नियंत्रण कसे ठेवावे याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाई. या बरोबरच अशा शिबिरांतून सूतकताई, सुताचे पेळू तयार करणे, तयार सुताच्या लडी बांधणे, खादीच्या कापडांचे गठ्ठे बांधणे व ग्रामोद्योग वस्तूंची प्रदशने कशी भरवावी, त्याची विक्री व्यवस्था कशी करावी असे सर्व प्रकारचे शिक्षण या शिबिरांतून दिले जाई. सर्वधर्मसमभाव असलेली राष्ट्रीय वृत्ती जोपासणे व वाढीला लावणे याचेही शिक्षण या शिबिरातून होई.
सफिया सोमजीचा विवाह सरहद्द गांधी- खान अब्दुल गफार खान यांच्या भावाचा मुलगा सादुल्ला खान यांच्याबरोबर झाला. सरहद्द गांधींचा सादुल्ला खान हा सख्खा पुतण्या. त्यामुळे खान घराण्याची सून होण्यात सफियाला अत्यंत आनंद व अभिमान वाटला. सफियाला शमिन व अन्वर असे दोन मुलगे झाले. १९४२ चा लढा सुरू झाला तेव्हा शमिन दोन वर्षांचा होता व अन्वर अगदी तान्हा होता.
१९४२ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर भरणार होते. या अधिवेशनात व यापूर्वी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात फरक होता. काँग्रेसच्या स्थापनेला ५० वर्षे उलटून गेली होती. सत्याग्रह, उपवास, मोर्चे, वाटाघाटी यांनी काही सिद्ध होत नव्हते. या अधिवेशनात गांधीजी ब्रिटिश सरकारला भारत सोडून जाण्यासाठी निर्वाणीचा इशारा देणार होते. एप्रिल १९४२ पासून त्याची जोरदार तयारी चालू होती. अधिवेशन महत्त्वाचे असल्यामुळे सर्व हिंदुस्थानातून लाखो लोक येणार होते. शिवाय स्थानिक लोक होतेच. या अधिवेशनात प्रचंड गर्दी होणार होती. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवून शांतता राखण्याची जबाबदारी काँग्रेस-सेवा-दलाची होती. शिवाय नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहणे, प्रतिनिधींच्या बैठकीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, काही जुजबी व जरुरीच्या वस्तूंचे गाळे, खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, पुस्तक विक्री यांची मांडणी करणे ही सर्व कामे सफियाने अंगावर घेतली. कवायत, सलामी, व्यायाम, संचलन, एकमेकींना संदेश देणे इत्यादीचे प्रशिक्षण सफियाने सुरू केले. नेत्यांचे स्वागत करून त्यांना लष्करी पद्धतीने मानवंदना देण्याची तालीम अगदी कसून होई. सफियाबेन सकाळीच डबा घेऊन घराबाहेर पडत. घरी दोन वर्षांंचा शमीम व ४ / ५ महिन्याचा तान्हा अन्वर रात्री घरी आई परत येईपर्यंत पेंगुळलेले नाही तर झोपलेले असत.
अधिवेशनाची एकूण सर्वच व्यवस्था पाहण्यासाठी असलेल्या समितीवर स.का.पाटील, युसूफ मेहर अली, वाडीभाई पांचाल व सफिया खान हे महत्त्वाचे सदस्य होते. दिवसभराचे सर्व काम संपले की प्रत्येक समिती सदस्याला आपल्या कामाचा लिखित अहवाल द्यावा लागे. दुसऱ्या दिवशीच्या कामाची आखणी केली जाई, त्यानंतर रोजच्या रोज हिशेबनीस जयाबेनला हिशेब देऊन मगच सफिया खान बाहेर पडत. आजच्यासारखी त्यावेळी स्वयंसेविकता येण्याजाण्यावर खर्च व जेवणाखाणाची मोफत व्यवस्था नसे. स.का.पाटील, युसूफ मेहर अली, सफियाबेनसकट सर्वच आपापले डबे घेऊन येत. मात्र अधिवेशनाच्या काळातील ५/६ दिवस सर्वाना हा खर्च मिळे. त्यावेळी त्या जातीने प्रत्येकीला जेवण मिळाले की नाही याची गटागटातून फिरून चौकशी करीत. लोभस व्यक्तिमत्त्व, मृदू भाषण, हसतमुख स्वभाव व त्याच जोडीला कडक शिस्त लावणाऱ्या सफियाबेन सर्वाच्याच गळय़ातील ताईत होत्या. (ही माहिती काँग्रेस सेविका दलात स्वयंसेविका असलेल्या व वयाची नव्वदी उलटून गेलेल्या श्रीमती चिरगुटकर यांनी दिली.)
अधिवेशन समितीची जय्यत तयारी चालू होती. आणि सरकारही काही गप्प बसले नव्हते. त्यांच्याही पोलीस तुकडय़ा सज्ज होत्याच. प्रमुख नेते व मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते यांची पोलिसांनी एक काळी यादी बनवली होती. त्यात सफिया खान यांचे नाव अग्रणी होते. ८ ऑगस्ट १९४२ ला रात्री वरिष्ठ नेत्यांची धडपड झाली. त्यात सफिया खानसहित त्यांची सर्व समितीच पकडली गेली. सफिया खानला येरवडा जेलमध्ये ठेवले होते. त्यांच्या जेलमधील कार्याबद्दल व इतर राजबंदी व कैदी महिला यांच्याशी त्यांचे संबंध याबद्दलची माहिती डॉ. कमला अष्टपुत्रे, अनसूया लिमये यांच्या चरित्रातून व पद्मविभूषण डॉ. उषा मेहता यांच्या आठवणीतून मिळते. डॉ. कमलाबाई अष्टपुत्रे ऊर्फ बाई लिहितात, ‘सफिया खान या फार मोठय़ा खानदानाची सून असूनही अगदी साध्या होत्या. त्या थोडेच पण मार्मिक बोलत. त्यांची विनोदबुद्धी तीव्र होती. त्यांचा त्यांच्या भावनावरचा जबरदस्त ताबा होता. सफियाबेन सर्वाच्या आवडत्या होत्या, कारण त्यांना सर्व वयोगटातील स्त्रियांशी जमवून घेणे उत्तम जमे.’
सफियाबेन इस्लामधर्मी असल्या तरी त्यांना कुराण वाचायला येत नसे. श्रीमती तय्यबजी यांच्याकडे त्या कुराण वाचायला शिकल्या. जेलमध्ये त्यांनी रोजेही पाळले. रमजानच्या महिन्यामध्ये त्यांना फळांच्या करंडय़ा सर्व नातेवाइकांकडून भेट येत. गरीब हिंदू गुन्हेगार बायकांचे सोमवार, गुरुवार, शनिवार असे उपास असत. या फळांच्या करंडय़ा त्यांच्यासाठी रिकाम्या होत. याचबरोबर जेलमध्ये साजरे होणारे गणपती व नवरात्रोत्सव, दिवाळी, गुढी पाडवा या सणांच्या उत्साहातही त्यांचा पुढाकार असे. १९४४ च्या रमझानमध्ये त्यांचा मोठा मुलगा शमीन खूपच आजारी पडला. तो अत्यवस्थ आहे म्हणून तार आली. त्यांना घेऊन जायला मुंबईहून बहीण गाडी घेऊन आली. जेलरने सफियाबेनला सशर्त सुटकेचा अर्ज भरून द्यायला सांगितले. अत्यवस्थ झालेला मुलगा, की स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपण स्वीकारलेली मूल्ये हा पेच समोर असताना मुलाचे पाहायला आपले कुटुंब आहे, पण आपली मूल्ये आपणच जपली पाहिजेत असे त्यांनी ठरविले. प्रौढ व वयस्क नेत्या प्रेमाताई कंटक, किसन घुमटकर यांनी त्यांना समजाविले, ‘तू आधी बाहेर पडून मुलाकडे जा. मातृभूमीप्रमाणेच तू जन्म दिलेल्या मुलाचा जीव वाचवणे हेही तुझे परम कर्तव्य आहे’, असे परोपरीने सांगितले. जेलच्या बाहेर सफियाबेनची बहीण वाट पाहत बसली होती. संध्याकाळी सर्वांबरोबर सफियांनी प्रार्थना केली. मुलांसाठी सर्वाच्या शुभेच्छा घेऊन त्या जेलबाहेर पडल्या, त्यावेळी रात्र झाली होती.
१९४६ साली हिंदी स्वातंत्र्याचा कायदा झाला. हिंदुस्थानचे हिंदुस्थान व पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. खान परिवार हा सरहद्दीवरील पेशावरचा. घरदार, नातेवाईक हे सर्व तिकडेच होते. पुढे या दोन देशांत कटुताच नव्हे तर शत्रुत्व निर्माण होईल, असे कुणालाच वाटत नव्हते. सरहद्द गांधींच्या कुटुंबाला तर नव्हतेच नव्हते. त्यामुळे सर्व कुटुंब पाकिस्तानात गेले. अपवाद सफियांचा. मुले व नवराही मुंबई सोडून गेले. त्यांच्यानंतर काही दिवसांनी आपल्या मुलांसाठी त्यांना प्राणप्रिय असलेला भारत व मुंबई सोडून सासरी पाकिस्तानात जावेच लागले. त्यांनी पाकिस्तान हा देश आपला कधीच मानला नाही. त्यांना हवा व ते वातावरण मानवत नव्हते. शेवटी आपली तब्येत ठीक राहत नाही. आपल्याला भारतात व मुंबईच्या जन्मभूतीतच मरायचे आहे, असे ठरवून त्या भारतात परतल्या. वयाच्या अवघ्या सेहेचाळिसाव्या वर्षी त्यांनी १९६१ साली मुंबईतच शेवटचा श्वास घेतला.
एका निष्ठावंत स्वातंत्र्यसैनिकेला मुंबई शहराने अखेरचा सलाम केला.    
gawankar.rohini@gmail.com