बाकर मेहदी स्वत:ला ‘सरकश’ म्हणजे विद्रोही संबोधित. पण ते होते, उर्दू शायरीचे आधुनिक कवी, विद्रोही नज्म, गजलांचे निर्भीड समीक्षक आणि संपादक, जागतिक वाङ्मय कोळून प्यायलेले, व्यासंगी, विद्वान पण फटकळ, त्यामुळे उर्दू साहित्य जगतात ते प्रियही होते आणि अप्रियही.

भारत आणि पाकिस्तानातील उर्दू साहित्य वर्तुळात तेव्हा एक धारणा दृढ होती, मुंबईत येऊन उर्दू साहित्यकाराने ‘यांना’ न भेटणे म्हणजे आग्रा येथे जाऊन ताजमहाल न पाहता परतणे. ते म्हणजे उर्दू शायरीचे आधुनिक कवी, विद्रोही नज्म, गजलांचे निर्भीड समीक्षक आणि संपादक, जागतिक वाङ्मय कोळून प्यायलेले, फटकळ, व्यासंगी विद्वान बाकर मेहदी.

खरं तर शायरी समीक्षेमुळे नव्हे तर त्यांचे अनाकलनीय वर्तन, प्रकांडपांडित्य, चपखल शाब्दिक शरसंधान, मर्मभेदक टीका इत्यादी गुणावगुणांमुळेच ते उर्दू साहित्य जगतात प्रिय आणि अप्रियही होते. मात्र, बाकर बोलताना त्यांच्या वाणीत जे पांडित्य जाणवत असे ते त्यांच्या लिखाणात प्रतीत होत नसे.

बस मेरा *जिक्र आते ही महफिल उजड गयी

शैतान के बाद दुसरी *शोहरत मिली मुझे

कारण बरेचसे लोक त्यांना घाबरत. बाकर मैफिलीत कोणाची टर उडवतील याचा नेम नसे. ते म्हणतात,

मैं जो बोलू तो हर एक *शख्स खफा

‘‘या जगात आजवर बारा श्रेष्ठ कवी झालेत – पहिला वर्जलि, रघुपती सहाय..’’ फिराक गोरखपुरी यांनी आपली विद्वत्ता व्यक्त करीत नावे घेण्यास सुरुवात केली.. अन् तोच  मेहदी म्हणाले, ‘‘अन् बारावा कवी फिराक गोरखपुरी.’’ मोठ्ठे डोळे करत फिराक उद्गारले, ‘‘आदमी*जहीन मालुम होते हो.’’

बाकर फोर्ट परिसरातून जात असता समोरून संगीतकार खय्याम आले. त्यांनी यांना सलाम केला. ‘‘अब आप के हालात इतने खराब हो गये कि आप मुझे सलाम करने लगे?’’, बाकर मेहदी यांनी प्रश्न केला.

बाकर मेहदी यांना एकाने ख्वाजा अहमद अब्बासच्या लिखाणाबद्दल मत विचारले असता ते उत्तरले, ‘‘मैं सिर्फ एक अखबार नहीं पढता और वो है ब्लिट्ज’’ ब्लिट्जमधील ‘लास्टपेज’ हा स्तंभ अब्बास लिहीत असत.

बाकर मेहदी यगाना चंगेजीचे अनुसरण करणारे विद्रोही कवी होते. बाकर स्वत:ला ‘सरकश’ म्हणजे विद्रोही संबोधित असत.

*सरकश अब भी बाकी है  मत कह ये मुर्दा बस्ती है

राख नगर में चिंगारी तक लोग छिपाकर रखते हैं

सवालों के *जहन्नुम से भरा है कहीं फेंक आये सर अपना

सरकश रह कर बरसें पढकर बस इतना ही समझा मैं

हद *कूचा है कूचा-ए-*कातिल जख्मी होकर समझा मैं

प्रतीकांद्वारे आधुनिक जीवनातील विरोधाभास, दुष्प्रवृत्ती,  अन्याय, अत्याचार इत्यादींवर ते लेखणी उचलतात.

लहरों को ढूंढती है निगाहें *सराब में

काली घटों का *अक्स कहाँ पानियो में हैं?

कितने सीनों में मचलती है *कयामत कोई

सिर्फ एक चीख ने *तहरीक की *बुनियाद रख्खी

कहाँ तक कोई खुद को छिपा छिपा कर रखे

कि *खौफ ढूँढ रहा है घरों के अन्दर भी

किसी ने रेत पर दास्तान लिखी होगी

किसी ने तेज हवाओं को भी पढा होगा

वर्तमान कवींना ते बजावतात –

पुराने शेर में उम्मीद के ख्वाबों का *मंजर था

नये शायर की इतनी भूल ख्वाबों का जगा देना

शहरातील मुशायऱ्यात पेश होणाऱ्या शायरीचा खालावलेला दर्जा पाहून बाकर स्वत:लाच म्हणतात,

बाकर किसी खामोश *जंजीरे में जा बसो

कव्वालियों के शहर में क्या शायरी चले?

बाकर मेहदी यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. शहरे आशोब, काले कागजों की नज्में, १९६७, टूटे शीशे की आखरी नज्में, १९७३, आणि सिहाय-सिहाय, १९९३. याव्यतिरिक्त समीक्षेचे दोन संग्रह. फुजल जाफरीसह बाकर मेहदींनी ‘इजहार’ नावाचे वार्षकिदेखील संपादित केले.

उर्दूच्या एका साहित्यिक संमेलनात एक मुस्लीम केंद्रीय मंत्री अध्यक्ष होते. त्यांनी भाषणात एक शेर नमूद करताना मीर तकी मीर या शायराचा म्हणून सांगितला. श्रोत्यातून बाकर मेहदी तडक उठले अन् म्हणाले, ‘गलत..ये शेर अनिस या शायरचा आहे.’ मंत्रिमहाशयोपल्या मतावर ठाम होते. बाकर त्यांना भाषणच करू देत नव्हते. खूप वेळ वाद झाल्याने मंत्री वैतागून स्टेज सोडून तडक निघून गेले. समारंभाचे तीन तेरा वाजले. बाकर मात्र म्हणत राहिले शेर अनिसचाच आहे.

घरबार, शहर, मुल्क, *हदे तोड देखिये

*तखरीज सी *कशीश किसी *तामीर में नहीं

एक दिन ऐसा हो यारों हम सब एक कहानी हों

सुननेवाले हैरत में डूब के पानी-पानी हों

एक कयामत नगर नगर में ढोल बजाती फिरती है

हम अंधे-बहरे सब चुप है, जैसे *कैदे जबानी हो

इश्तहारी जिंदगी *फनकार को खा जायेगी

शोहरतों के शोर में *रुस्वाइयाँ रह जायेगी

वह चाह थे जो तोड के *सहरा निकल गये

इक काफिला-सा *दश्ते-रिवायात ही में था

भायखळा येथील उर्दू पुस्तकाच्या मक्तबा दुकानात      साहिर लुधियानवी आले. दुकानात शायरीची पुस्तके चाळताना ते व्यवस्थापक शाहिद यांना म्हणाले, ‘‘शाहिद साहब, शायरी की कोई अच्छी किताब नजर नहीं आती.’’ तेथे बसलेल्या साहित्यिकातील बाकर लगेच म्हणाले, ‘‘साहब, शायरी की अच्छी किताबें तो बहुत हैं मगर पहले आप परछाइयाँ से बाहर आये तो..’’ (‘परछाइयाँ’ साहिरच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे) तेव्हा साहिर चरफडत दुकानातून ताडताड निघून गेले, परंतु त्यानंतरच्या ज्या मुशायऱ्यात साहिर असे त्यात बाकर मेहदींना अंतर्भूत केले जात नसे. बाकर नेहमी साहिरच्या मूळ नावाचाच उल्लेख करीत असत (अब्दुल हयी हे त्यांचं नाव होतं)

बाकर मेहदींच्या विविध रंगांचे आणखी काही शेर ऐका –

कैसे कहें दुष्मने जाँ से कोई यारी नहीं

बेवफा सी मोहिनी सूरत किसे प्यारी नहीं

धडकन बना के तुम को लहू में छुपा लिया

खुशबू बसा के कैसे चुरा लें गयी हवा

मरूँगा *मिस्ले यगाना हंसी खुशी बाकर

मैं अपना नाम मगर जाँनिसार क्यूं रखना

मेरी जलती हुई आँखों में कोई *नम क्यों हो?

कुछ न करने का जमाने में मुझे गम क्यों हो?

आप बिछडे हुए मिले मुझसे

फूल मुर्झा के फिर खिला साहब

कहकहों की गुंज अश्कों में बदलती जायेगी

दिल की धडकन के लिये *सरगोशियाँ गा जायेगी

बाकर बुझे चिराग से किरनों की आरजू

क्या *तीरगी का खौफ अभी तक *रगों में हैं?

फर्सुदा हूँ मैं यगाना के शेर मुझ को सुना असं म्हणणाऱ्या बाकर मेहदीत ईर्षां, हट्टीपणा होता. ईर्षां म्हणजे त्यांच्या मनाला महत्त्व न देता अन्य कवीला श्रेष्ठत्व का देण्यात आलंय? मग ते त्याच्या काव्यातील त्रुटी दाखवीत फिरणार- मग जरी ते स्वत: त्याच्या काव्याचे प्रशंसक व चाहते असोत. गालिब, यगाना राजेंद्र सिंध बेदी, जाँनिसार अख्तर ही त्यांची श्रद्धास्थाने.

कोणाला सिगरेट ऑफर करताना ते म्हणत, लीजिये मजबुरी पीजिये. पटनाचा एक तरुण      एम. ए. झाल्यावर त्यांना म्हणाला,

‘‘मैं आप पर रिसर्च करना चाहता हूँ’’

‘‘वक्त काटने के लिये कोई दूसरा काम नहीं हैं आप के पास?’’ बाकर मेहदीने विचारले.

बाकर मेहदीने नोकरी किंवा व्यवसाय केला नाही. त्यांची पत्नी प्राध्यापक होती. यांच्या साहित्यापेक्षा यांच्या व्यासंग, शेरबाजी, व्यक्तिमत्त्वाचीच चर्चा अधिक होत असे. पण यगाना संप्रदायाचा हा शायर खरोखरच लक्षणीय आहे. त्यांची कलंदर वृत्ती, निर्भीड, सडेतोड, हजरजबाबी स्वभाव व संवेदनशील, प्रेमळ वर्तन आज ही आठवतोय.

सर पर *फलक न पर के नीचे जमीन है

बाकर बना सका न कोई *आशियाना क्या

असं तरी असलं तरी ते म्हणतात तेच खरंय.

एक ठिकाना हो तो कहें

बाकर तो घर घर रहते हैं

उर्दू साहित्यिकांच्या घराघरांत वेळोवेळी त्यांचा या ना त्या कारणाने उल्लेख होत असतोच.

—————-

तामीर : निर्माण करणे, तखरीज : नष्ट करणे, बरबाद करणे, दश्ते रिवायत : परंपरेचे जंगल, जिक्र : उल्लेख, शख्स : व्यक्ती, जहीन : तलबुद्धी, सरकश : विद्रोही, बंडखोर, जहन्नुम : नरक, कूचा : गल्ली, कातिल : वध करणारा, सराब : मृगजळ, अक्स : प्रतििबब, कयामत : अंतिम दिवस, आपत्ती, तहरीक : लिखाण, बुनियाद : पाया, ख़ौफ : भय, मंजर : दृष्य, जज़्‍ाीरा : टापू, हदे : सीमा, तखरीरा : काढून टाकणे, कशीश : ओढ, आकर्षण,

कैदे-जबानी : बोलण्यावर प्रतिबंध, इश्तहारी : जाहिराती, फनकार : कलाकार, शोहरत : प्रसिद्धी, रुस्वाई : बदनामी, सहरा : वाळवंट, अरण्य, दश्त : अरण्य, रिवायत : परंपरा, मिस्ले : च्याप्रमाणे, नम : ओल, सरगोशी : कानगोष्टी,

तीरगी : काळोख, रगों में : नसांत, फलक : आभाळ, आशियाना : घरटं
-डॉ. राम पंडित   -dr.rampandit@gmail.com