‘खरा हिरा कधीही गरम होत नाही, काच मात्र गरम होऊन तडकतेसुद्धा. पण हिरा मात्र तसाच राहतो, शीतल! म्हणूनच तर तो अनमोल असतो.’ तुमचं आयुष्य तुम्हाला अनमोल हिऱ्यासारखं जपायचं असेल, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर हिऱ्यासारखी शीतलता स्वत:मध्ये रुजवायला हवी.
राग किंवा क्रोध हा एक मनोविकार आहे. एक नकारात्मक भाव आहे. ही एक आक्रमक प्रतिक्रिया आहे. तरी ती स्वाभाविक असल्याची आपल्या सर्वाची मानसिकता झाली आहे. राग येणे स्वाभाविक आहे असेच आपल्याला वाटते. पण रागामुळे काय होतं? विज्ञानाच्या दृष्टीने तुमचा तीव्र राग ५ मिनिटं टिकला तर २ तासांचे काम करण्याची क्षमता कमी होते व त्याची नकारात्मक रासायनिक प्रतिक्रिया आपल्या शरीरातील सर्व स्नायूंवर ७२ तासांपर्यंत टिकते. मस्तकाला रक्त पोहोचवणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ लागतात.
आपण म्हणतोदेखील राग खरंच चांगला नाही. रागावणं सोडलं पाहिजे. काहींबद्दल तर असंही बोललं जातं, ‘एक वेळ विस्तव हातात धरता येईल, पण यांचा स्वभाव मात्र..’ राग येणं ही प्रतिक्रिया आहे, ज्यावर ताबा मिळवणं सहज शक्य आहे. पण कुणी तरी सांगून, त्यासाठी दबाव टाकून हे घडणं शक्य नाही. त्यासाठी स्वत:मध्ये ती इच्छा निर्माण व्हायला हवी. मनापासून तसे वाटायला हवे. याला संस्कार म्हणतात. म्हणून म्हटले जाते की शिक्षण व संस्कार यात फार मोठे अंतर आहे.
भारताला ऋषीपरंपरा आहे. त्यात दुर्वास, जमदग्नी, विश्वमित्र, वसिष्ठ यांची चरित्रे आपणास माहीत आहेत. विश्वमित्र व वसिष्ठ यांच्यामध्ये राजर्षि व ब्रह्मर्षि यांबाबत वाद होता. त्यासंबंधीची एक कथा प्रसिद्ध आहे. वसिष्ठांना ब्रह्मर्षि म्हटलं जाई कारण ते ऋषींमध्ये मानाने श्रेष्ठ तर होतेच, पण त्यांचे संस्कारदेखील उच्च दर्जाचे होते. वसिष्ठ विश्वमित्रांना राजर्षि म्हणून संबोधत असत. पण विश्वमित्रांना वाटे की वसिष्ठांनी आपल्याला ब्रह्मर्षि म्हणावे. पण ते त्यांना ब्रह्मर्षि म्हणत नसत. त्याचा राग येऊन ते एके रात्री हाती खड्ग घेऊन वसिष्ठांना मारण्याच्या इराद्याने त्यांच्या आश्रमाकडे निघाले. मनात राग धुमसत होताच. ते आश्रमाच्या दारात पोहोचताच त्यांना वसिष्ठ व त्यांची पत्नी अरुंधती यांचं आपसातलं बोलणं कानी पडलं. तेव्हा ते बाहेरच थांबले व त्यांचा संवाद ऐकू लागले.
अरुंधती- आपण विश्वमित्रांना बह्मर्षि न म्हणता राजर्षि का म्हणता?
वसिष्ठ- विश्वमित्रांकडे तपश्चर्येने प्राप्त शक्ती माझ्यापेक्षाही अधिक आहे, परंतु त्यांचे संस्कार सात्त्विक नाहीत. दुराग्रही वृत्तीमुळे आजदेखील त्यांचे आपल्या मनोविकारांसमवेत युद्ध चालू आहे. अशा हट्टी, हेकेखोर, क्रोधी व्यक्तीला ब्रह्मर्षि कसं बरं म्हणता येईल?
अरुंधती – मग ते ब्रह्मर्षि कधीच बनणार नाहीत का?
वसिष्ठ – का नाही बनणार? त्यांचे संस्कार ज्या वेळी परिवर्तित होऊन सात्त्विक बनतील, त्या वेळी मी त्यांना ब्रह्मर्षि म्हणून संबोधीन व माझ्यापेक्षाही उच्च स्थानी बसवून त्यांचा सत्कार करीन.
हे संभाषण ऐकून विश्वमित्रांचे हृदयपरिवर्तन झाले. वसिष्ठ आपल्याला स्वत:पेक्षाही महान तपस्वी समजतात. आपले संस्कार सात्त्विक नसल्याने ते आपल्याला ब्रह्मर्षि म्हणत नाहीत, हेदेखील त्यांनी जाणले. त्यांच्या डोळय़ांत अश्रू आले. खड्ग टाकून त्यांनी वसिष्ठांचे पाय धरले व क्षमा याचना केली. रागाच्या भरात केवढा मोठा अविचार केला होता त्यांनी. तेव्हा वसिष्ठ म्हणाले, ‘ब्रह्मर्षि विश्वमित्र उठा.’ पश्चात्तापाच्या अग्नीत विश्वमित्रांच्या स्वभाव-संस्कारातील त्रुटी नाहीशा झाल्या व त्यांचा स्वभाव, संस्कार सात्त्विक बनले आणि ते ब्रह्मर्षि झाले.
साधारण प्रकाशात आपण सहज वावरत असतो. पण कोणी जर का आपल्या डोळय़ांसमोर विजेरी चमकवली तर आपण लागलीच डोळे बंद करून घेतो. तसंच जेव्हा एखादी व्यक्ती साधारण आवाजात आपल्याशी संवाद साधते तेव्हा आपणही तितक्याच सहजतेने त्याला प्रतिसाद देत असतो, पण याउलट जेव्हा ती व्यक्ती मोठ-मोठय़ाने रागवून बोलू लागते तेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या सर्व जाणिवा बंद करून टाकतो. क्रेडिट कार्डची विक्री करणारे नेहमी फोन करत असतात. अगदी छानपैकी हसत, वाणीत गोडवा आणत, पण आपण व्यग्र असताना त्यांचा फोन आला तर आपण हमखास चिडतोच चिडतो. ‘कितनी बार बोला आपको हमे नही चाहिए!’ म्हणून संतापून आपण फोन बंद करू लागतो तरीही ते म्हणतात, ‘धन्यवाद. हॅव अ नाइस डे.’ एखादा सेल्समन भलत्यावेळी घरी येतो तेव्हा त्याला पाहून चक्क दरवाजा आपटला जातो, तरीही तो ‘धन्यवाद’ म्हणतो. तो रागावत नाही. चिडत नाही. चिडला असला तरी तो दाखवत नक्कीच नाही. त्याला रागावून कसं चालेल? कुठल्या तरी कंपनीत जेव्हा आपण जातो तेव्हा तेथील स्वागतिका अतिशय प्रेमाने, हसत आपलं स्वागत करते. आपल्याला सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती देते. त्यांना या सर्वही गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं. कारण तो त्यांच्या कामाचा भाग असतो. जर का ते रागावून बोलले तर त्यांची नोकरी जाईल. त्यांना याच कामासाठी नोकरीवर ठेवलेले असते. जर पगारासाठी हे सर्वजण न चिडता, न रागवता स्वत:ची सहनशक्तीची ताकद वापरू शकतात, तर रोजच्या व्यवहारातही आपण तसे वागायला काय हरकत आहे. आपण यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो का?
अनेक जण घरी आपल्या बायकोवर किंवा नवऱ्यावर डाफरत असतात. नाही तर मुलांवर राग काढतात. तशाच पद्धतीने आपण ऑफिसमध्ये रागावू शकतो का? कारण घरच्या लोकांना जसे तुम्ही गृहीत धरले आहे, तसे तुम्ही ऑफिसमधल्या सगळ्याच लोकांना गृहीत धरू शकत नाहीत. जर तुम्ही ऊठसूट कोणावरही रागवायला लागलात तर ते तुम्हालाही ऐकवायला मागेपुढे पाहणार नाहीत. पण घरी मुलं तुम्हाला उलट उत्तर करणार नाहीत याची तुम्हाला खात्री असते म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागावता. याचा अर्थ तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या रागावर नियंत्रण मिळवता येतो. तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ती त्या व्यक्तीवर राग असला तरी जर शांतपणे सांगू शकत असाल तर मग तुम्ही घरी तसेच का वागू शकत नाही. कारण तुमच्या ते लक्षातच येत नाही. रागावून आपण आपलंच, आपल्याच शरीराचं तर नुकसान करतोच, पण घरातलं वातावरणही बिघडवतो, म्हणूनच आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर आपणही असं प्रत्येक क्षणी जागरूक राहून आपलं जीवन सुखमय, निरामय, आनंदी व दीर्घायुषी करण्यासाठी आपल्या मनाची ताकद वापरू शकतो.
एकदा एका राजाने आपल्या राज्यातील लोकांना दोन हिरे दाखवले आणि त्यातला खरा हिरा कोणता हे ओळखावयास सांगितले. पण कोणालाच ते सांगता येईना. शेवटी एक अंध व्यक्ती तिथे आला व म्हणाला, ‘मी सांगतो तुम्हाला त्यातील खरा हिरा कोणता तो.’ अंध व्यक्ती ते दोन्ही हिरे बाहेर घेऊन आला. त्याने ते दोन्ही हिरे थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवले व नंतर तो ते दोन्ही हिरे घेऊन राजाकडे आला व त्याला खरा हिरा दाखवला. राजा आश्चर्यचकित झाला, कारण अंध व्यक्तीनं योग्य हिरा ओळखला होता, त्या वेळी त्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले, ‘जो खरा हिरा असतो तो कधीही गरम होत नाही, काच मात्र गरम होते. गरम होऊन ती तडकतेसुद्धा. पण हिरा मात्र तसाच राहतो. म्हणूनच तर तो अनमोल असतो.’ म्हणून तुमचं अनमोल हिऱ्यासारखं आयुष्य जपायचं असेल तर तुम्हीही हिऱ्यासारखी शीतलता स्वत:मध्ये रुजवायला हवी. त्यासाठी दृढता आणा, दृष्टिकोन बदला, काचेपासून हिरा बनण्याची तयारी करा. कारण निश्चयबुद्धि विजयन्ति!
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद.)

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या