पोलियो झाला म्हणून खुर्चीला खिळून राहिलेलं शरीर त्यांनी अपंगांसाठी ‘उभं’ केलं आणि आपल्यातील गाण्याचा सुप्त गुण वाढवत नेला. पुणे, गोवा, दिल्ली, नागपूर, इंदौर केंद्रांवर कार्यक्रम केल्यावर ‘रेडिओस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीताईंची अचानक भेट झाली ती अपंग नसीमा हुरजूक यांच्याशी आणि दोघींनी मिळून आपल्यातलं आईपण त्या कामी लावलं. ‘हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड’ ही संस्था सुरू केली. अनेक अपंगांना आत्मविश्वास दिला, त्यांच्यासाठी वधू-वर सूचक मंडळ सुरू केलं. अनेक अपंगांना अपंग मानसिकतेतून बाहेर काढलं. पण त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला तो समाजातल्या रोगी मनस्थितीविरुद्ध. त्या रजनी करकरे-देशपांडे या दुर्गेविषयी..

माणसांच्या आयुष्यात दु:ख, पराभव आला की माणसे स्वत:च्या दु:खातच गुरफटून जातात, सतत आपल्या दु:खाबद्दल बोलत राहतात. काही माणसे मात्र आपल्याला काही दु:ख आहे हेच जणू विसरून जातात, आपल्या उणिवांना खिजगणतीतही न धरता आयुष्यात आनंद शोधतात आणि इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरतात. कोल्हापूरच्या रजनी करकरे-देशपांडे हे व्यक्तिमत्त्व असंच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा कधी ढळत नाही, अंतरीचा स्वर लावून गाणं गायचं असो की ‘हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड’ या आपल्या संस्थेच्या कामाचा ताण असो रजनीताई नेहमी हसतमुख!
रजनीताई अवघ्या चार वर्षांच्या असताना १५ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री त्यांना सणकून ताप भरला आणि त्यांचा डावा पाय आणि उजवा हात पोलिओमुळे लुळा पडला. सगळीकडे दुडूदुडू धावणारी, नाचणारी छोटी मुलगी पोलिओग्रस्त झाली होती. त्यावेळी करकरे कुटुंब कोकणात तुरळ या गावी राहात होते. रजनीताईंना तीन भावंडं. त्यांनी कधीही रजनीताईंना एकटेपणा जाणवूच दिला नाही. आईवडिलांनी कधीही न्यूनगंड निर्माण होऊच दिला नाही. पुढे हे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झालं. रजनीताईंना त्यांचे वडील सायकलवर बसवून फिरवून आणीत. त्यांच्या घरी वामन नावाचा गडी होता, ते रजनीताईंना उचलून सगळीकडे घेऊन जात असे, अगदी काशीयात्रासुद्धा रजनीताई करून आल्या होत्या. रजनीताईंचं तिसऱ्या इयत्तेपर्यंतचं शिक्षण घरीच झालं. माळवणकर गुरुजी घरीच येऊन शिकवत. रजनीताईंच्या पायाचं ऑपरेशनही झालं आणि अगदी पूर्ण पायाला घट्ट बसणारे बूट त्यांना मिळाले. मग त्या ते बूट घालून शाळेत जायला लागल्या.  
 रजनीताईंना आपण गाऊ शकतो हे लक्षात आलं जेव्हा त्या चौथीत होत्या. घरीच रेकॉर्ड ऐकून ‘विठ्ठल तो आला आला’ हे गाणं म्हणू लागल्या. गाण्याची आवड निर्माण झाली. सारंग मास्तर, बाकरे गुरुजी गाणं शिकवत असत. नववीत असताना रजनीताईंचं पोलिओचं दुसरं ऑपरेशन झालं. त्याकाळात सात-आठ महिने त्या घरीच होत्या. शाळेतील प्रवेशाविषयी रजनीताई सांगतात, ‘राजमाता जिजामाता हायस्कूल’ ही शाळा गरीब मुलींना मोफत प्रवेश देत असे. रजनीताई गरीब नाहीत म्हणून त्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला. पण ही शाळा घराजवळ होती. रजनीताईंनी शाळेला सांगितलं की मी पूर्ण फी भरते. तरीही मुख्याध्यापक मानेनात. शिक्षणाधिकारी म्हणाले, ‘चालून दाखवा बघू, खरंच किती अपंग आहात? रजनीताईंनी भांडून शाळेत प्रवेश मिळवला. आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, हे बीज रजनीताईंच्या आत कुठेतरी असणारच, त्याला धुमारे फुटायला लागले. मॅट्रिक झाल्यावर रजनीताईंनी गोखले महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतला. टांग्यातून त्या महाविद्यालयात जात. गोखलेचे प्राचार्य एम.आर. देसाईंनी रजनीताई ज्या वर्षांला असतील त्या वर्षांचे तास तळमजल्यावरच होतील अशी व्यवस्था केली. रजनीताईंचे गाणे सुरूच होते. नामदेव राव यांच्याकडे त्या शास्त्रीय गाणं शिकत होत्या. नूतनगंधर्व अप्पासाहेब देशपांडेंकडे नाटय़संगीताचं शिक्षण घेतलं, आझमबाईंकडे ठुमरी शिकल्या. पं. सुधाकरबुवा डिग्रजकर, पं. विश्वनाथबुवा पोतदार यांच्याकडे काही काळ शिक्षण झालं. संगीतकार दिनकर पोवार यांच्याकडे सुगम संगीताचे शिक्षण सुरू झाले. रजनीताईंना रेडिओवर गायची संधी मिळाली. साधारण १९६७ सालापासून त्यांनी रेडिओवर स्वतंत्रपणे बक्षिसे मिळवत होत्याच. आता गायिका म्हणून रेडिओवर स्वतंत्र ओळख मिळाली. रेडिओची बी हाय ग्रेडही मिळाली. रेडिओवर कवितांची स्वत: निवड करून चाल लावून गायला लागायचं. रजनीताईंनी हेही आव्हान पेललं. पुणे, गोवा, दिल्ली, नागपूर, इंदौर केंद्रांवर कार्यक्रम केले. लोक त्यांना ‘रेडिओस्टार’ म्हणून ओळखायला लागले. रजनीताईंनी गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमाचे १००० प्रयोग केले आणि १००० वा प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी मंदिरला केला. ‘श्रावणधारा’ या कार्यक्रमाचेही खूप प्रयोग केले. कार्यक्रमात नेहमी सोबत आई, बहीण मीरा असत.
रजनीताई स्पेशल मराठी विषय घेऊन बी. ए. झाल्या आणि गोखले महाविद्यालयातील ग्रंथालयात नोकरी करू लागल्या, तो काळ होता १९७०-७५. एक दिवस त्यांच्याकडे एक मुलगा त्यांना शोधत आला आणि सांगू लागला की त्यांच्या बहिणीला पॅराप्लेजिया झालाय, हसती-खेळती बहीण अंथरुणाला खिळली आहे आणि खूप निराश झाली आहे. अगदी जीव देण्याच्या गोष्टी करते आहे. तुम्ही घरी येऊन माझ्या बहिणीशी बोलाल का? अर्थातच रजनीताईंनी होकार दिला आणि त्या मुलीला भेटायला गेल्या. या भेटीतून त्यांची मैत्री बहरत गेली. त्या मुलीचं नाव नसीमा हुरजूक. नसीमादीदी आणि रजनीताई यांच्या भेटीतून एक निरपेक्ष मैत्र तर फुललंच पण याचबरोबर आपल्यासारख्याच अपंगांसाठी काहीतरी केलं पाहिजे या दिशेने त्यांची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला दोघीजणी एका संस्थेत काम करत होत्या, पण तिथे असणाऱ्या इतरांना काम करण्यापेक्षा इतर फायदे लुटण्यात रस होता. हे लक्षात आल्यावर रजनीताई आणि नसीमादीदी या संस्थेतून बाहेर पडल्या. दोघींनी कोल्हापुरातील अपंगांचं सव्‍‌र्हेक्षण करायचं ठरवलं. घरोघरी फिरून दोघी कुठल्या घरात कोण अपंग आहे का, याची माहिती घेऊ लागल्या. लोक माहिती नीट देत नसत. आपल्या घरात कुणी अपंग आहे हे सांगायला लोकांना लाज वाटत असे. रजनीताई आणि नसीमादीदी दोघी मिळून रिक्षात बसून सगळीकडे फिरत. कधी कधी तर रिक्षातच बसून डबा खात. दोघींच्या समोर बाबूकाका दिवाणांचा आदर्श होता. अपंगांनी अपंगांसाठी काम केलं पाहिजे आणि त्यासाठी आईपण घेता आलं पाहिजे. ही बाबूकाकांची शिकवण मनात होती.
 रजनीताईंनी अपंगांसाठी खडू प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. रजनीताई, नसीमादीदी अपंगांच्या घरी जात, त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार करत. अपंगांच्या घरच्यांना यासाठी तयार करणं कठीण असायचं. रजनीताईंना आठवतं, विजयमाला नावाची अपंग मुलगी होती, तिच्या बहिणीला बघायला आल्यावर घरच्यांनी विजयमालाला गोठय़ात बसायला लावलं होतं. हे कळल्यावर रजनीताई चिडल्या, ‘तू तयारच कशी झालीस गोठय़ात बसायला? सरळ नाही बसणार म्हणून सांगायचं.’ विजयमालामध्ये स्वाभिमानाचे बीज त्यांनी पेरले. अपंग असणं म्हणजे गुन्हा केला आहे का? विजयमाला पुढे बास्केट विणायला शिकली, ट्रायसिकल घेऊन बाहेर जायला लागली. छोटसं दुकान तिने सुरू केलं. तिच्या हाताखाली दहाजणी काम करायला लागल्या, पण घरच्यांना हे आवडत नव्हतं. तिची आई रोज रात्री तिच्या ट्रायसिकलमधली हवा काढून टाकत असे. अपंगांना मिळणाऱ्या या दुजाभावामुळे रजनीताई अस्वस्थ होत.
 नसीमादीदीना सेंट्रल एक्साइजमध्ये नोकरी लागली होती आणि त्यांच्या क्वार्टर्समध्ये दोघींनी आपलं काम वाढवायला सुरुवात केली होती. दोघींनी मिळून सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या मदतीने १९८२ साली ‘हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड’ ही संस्था सुरू केली. मनोहर देशभ्रतार यांनी संस्थेच्या उभारणीत खूप मदत केली. संस्थेच्या मदतीसाठी स्मरणिका काढायचं ठरलं. रजनीताई, नसीमादीदी जाहिराती गोळा करू लागल्या. एका आमदारांनी एकावन्न रुपये देऊन आपल्या दातृत्वाची (?) प्रचीती दिली असे दोन-चार वाईट अनुभव सोडल्यास सर्वानी मदतच केली.
 रजनीताईंचा अपंगांसाठी काही करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात एक आनंदाचे पर्व सुरू झाले. रजनीताईंच्या भावाचे मित्र प्रमोद ऊर्फ पी.डी. देशपांडे यांच्याशी रजनीताईंची ओळख झाली. ते युनायटेड वेस्टर्न बँकेत अधिकारी होते. पी.डीं.नी रजनीताईंना लग्नाविषयी विचारले आणि स्वत:च्या घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी अत्यंत साधेपणाने रजनीताईंशी विवाह केला. पी.डीं.नी फक्त रजनीताईंशी जन्मगाठ बांधली नाही तर ‘हेल्पर्स’सोबतही ते एकरूप झाले. आज ‘हेल्पर्स’मध्ये ते सर्वार्थाने सक्रिय आहेत.
‘हेल्पर्स’चे काम सुरू असतानाच रजनीताईंनी ठरवलं की आपण अपंग मित्रांना घेऊन दिल्ली पाहायला जायचं. तीन व्हीलचेअरवरचे, दोघे तिघे पोलिओ झालेले, काहीजण सोबत असा. तो प्रवास सुरू झाला. अनेक अडचणींना, छोटय़ा दुखापतींना तोंड देत अगदी यशस्वीपणे हा दिल्ली दौरा पार पडला. लोकांनी मदत केली, काहीजण म्हणाले, ‘हवा कशाला हा उपद्व्याप, अपंग काय करणार दिल्ली पाहून.’ पण या सगळय़ाकडे दुर्लक्ष करून प्रवास झाला. आजतागायत ‘हेल्पर्स’ची ही ट्रीप सुरू आहे आणि अनेकांना जग अनुभवण्याचा आनंद देते आहे. चांदण्यात न्हायलेला ताजमहाल पाहण्याचा आनंद दरवर्षी ‘हेल्पर्स’ची मुलं घेतात. रजनीताईंना आठवतं की सुरुवातीला अपंगांना घेऊन त्या सिनेमा पाहायला जात तेव्हा ही लोक नावं ठेवत, पण एखादे व्यंग माणसात असले तर माणसे काय निकामी होतात? अपंगांनाही माणूस म्हणून सर्व प्रकारचा आनंद उपभोगण्याचा हक्क आहे, हा ठाम विचार घेऊन रजनीताईंनी आपल्या कामाला दिशा दिली आहे. ‘हेल्पर्स’ला आता स्वत:ची जागा हवी आहे असं जाणवू लागलं तेव्हा पी.डी. देशपांडेंनी शासनाशी पत्रव्यवहार सुरू केला. संस्थेला उंचगाव येथे दोन एकर जागा मिळाली. तिथे ‘घरोंदा’ हे अपंगांसाठी होस्टेल सुरू झालं.
 ‘हेल्पर्स’ला गॅस एजन्सी मिळाली. संस्थेसाठी तो मोठा अर्थिक आधार होता. पण गॅस एजन्सी चालवताना अनेक ठिकाणी लाच मागण्यात आली, पण रजनीताई, नसीमादीदी ठाम होत्या की आमचं काम नाही झालं तरी चालेल, पण आम्ही लाच देणार नाही. काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला, नियमांचा जाच केला पण कुणी मागे हटलं नाही. सात लाख रुपये भरायचे होते तर प्रत्येकाने एकेक लाखाची जबाबदारी घेतली आणि सुरुवातीचे पैसे उभे केले. ‘हेल्पर्स’च्या या सगळय़ा प्रवासात रजनीताई नसीमादीदींसोबत सावलीसारख्या राहिल्या.
रजनीताईंनी अस्थिव्यंग असणाऱ्या अपंगांसाठी वधू-वर सुचक मंडळ सुरू केलं. स्वत:च्या विवाहाचा अनुभव त्यांच्याकडे होता. एक रजिस्टर घालून नावनोंदणी करून घेतली. फक्त स्थळं सुचवून त्या थांबल्या नाहीत तर वधू-वरांनी एकमेकांना भेटण्याचा कार्यक्रम स्वत:च्याच घरी ठेवायच्या भावनेच्या भरात विवाह बंधनात न अडकता व्यावहारिक खाचखळगे लक्षात घेऊन विचारपूर्वक विवाहाचा निर्णय दोघांनीही घ्यावा असं रजनीताईंचं सुरुवातीपासून आग्रही मत राहिलं. त्यामुळे रजनीताईंच्यावतीने ठरलेल्या विवाहांची संख्या ४० इतकी असली तरी सगळेच्या सगळे विवाह मात्र यशस्वी झाले आहेत.
रजनीताईंनी आपला गायनप्रवास सुरूच ठेवला. शिवाजी विद्यापीठाच्या ललितकला विभागात त्या ७-८ वर्षे अध्यापन करत होत्या. गेली चौदा-वर्षे त्यांची मैत्रीण सुचित्रा मार्डेकर यांच्यासह ‘कलांजली’ या संस्थेच्या माध्यमातून त्या सुगम संगीताचे शिक्षण देत आहेत. घरीही शिकायला येणारे पुष्कळ आहेत. झोपून कधी व्हीलचेअरमध्ये बसून काम करणं सुरूच असतं. ‘हेल्पर्स’च्या कामाची मोठी जबाबदारी पी.डी. देशपांडेंनी निवृत्ती घेऊन पेलली आहे. सहवेदनेचा, सह-अनुभूतीचा सुरेल स्वर मनात घेऊन रजनीताईंचं जीवन एक सुंदर गाणं बनलं आहे.
संपर्क-  pd@hohk.org.in     दूरध्वनी- ०२३१ -२६३०४९३

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश