पूर्वी कुटुंब- विशेषत: लग्न व्यावहारिक पायावर जास्त अवलंबून होतं, पसा, नाती, वंश चालणे इत्यादी. पती -पत्नींचं एकमेकांवर प्रेम असणं अनिवार्य नव्हतं. पण आज अशा नात्यातून भावनिक ओलाव्याची अपेक्षा आणि गरज दोन्ही जास्त आहे.

सुमित्रा नुकतीच एका मोठय़ा दुखण्यातून उठली होती. गेली अनेक वष्रे नवऱ्याच्या बदल्यांच्या नोकरीमुळे मूळ गावापासून लांब राहायला लागत असूनही तिनं आवर्जून सर्व नातलगांशी, मित्रपरिवाराशी नाती जपली होती. पत्रं पाठवून, आठवणीनं फोन करून, सुट्टीत मुलांना मुद्दाम भेटायला पाठवून, छोटय़ा छोटय़ा सुख-दु:खाच्या प्रसंगांची वाटेकरी होऊन तिनं हा नात्याचा गोफ सुरेख विणला होता. प्रकाशला- तिच्या नवऱ्याला याचा फारसा सोस नव्हता, किंबहुना त्याला एकलकोंडेपणाच बरा वाटायचा. पण सुमित्राच्या आजारपणात त्याला तिनं उभं केलेल्या स्नेहजाळ्याचं जवळून दर्शन झालं. सतत कुणी ना कुणी मदतीला होतंच. रोज अनेक फोन, दवाखान्यात भेटणाऱ्यांची रीघ, पत्रं, ईमेल्स, कितीतरी..! प्रकाशला वाटलं, ‘खरंच कसं जमलं असेल हिला सगळं? आपण तर तिच्याशीपण किती कोरडेपणानं, जेवढय़ास तेवढं वागतो. विचारलं पाहिजे तिला एकदा, कसं काय जमवते ही सगळं?’
सुमित्राच्या मनात त्या प्रश्नाचं उत्तर तयारच होतं. तिच्या दृष्टीनं ‘नाती’ हा निखळ आनंदाचा झरा होता. कधी न आटणारा! उन्हाळ्यात ओल देणारा, तर हिवाळ्यात नजरबंदी करणारा! नाती ही मनाला उभारी देणारी, आनंदात न्हाऊन काढणारी असतात, तशीच कमालीची वेदना देणारीही ठरू शकतात. सी अíचन नावाच्या एका अत्यंत देखण्या समुद्र जीवाला नुसता स्पर्श झाला तरी प्राणांतिक वेदना होतात, तसंच नाती नीट हाताळता आली नाहीत तर जीवघेण्या जखमा करू शकतात.
अनेक संशोधनांमधून असं दिसलं आहे की, ‘जिवलग नाती निर्माण करणं’ हे एकूण जगण्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपकी एक मानलं जातं, जगण्याला अर्थ देणारा घटक समजला जातो, इतकंच नाही तर अडचणी-आव्हानांच्या काळात ज्यावर विसंबून राहता येतं असा भक्कम आधारवडही असतो. मनावरची ओझी उतरवून ठेवण्याचं ते एक हक्काचं ठिकाण असतं. नात्यामधून मिळणाऱ्या या समाधानाला जैविक आधाराची ही बारीकशी किनार आहे. नवजात बाळाला जेव्हा आई स्तनपान करते तेव्हा त्या नात्याच्या उबेची, भूक भागण्याच्या आनंदाची भावना मेंदूपर्यंत आपोआप पोचत असते, त्यातून त्या नात्याची जाणीव बळकट होते. तशीच भावना नंतरही अगदी जवळच्या व्यक्तींच्या स्पर्शातून अनुभवता येतात आणि आपली सुरक्षिततेची, उबेची गरज भागवते.
प्रियाला लग्नानंतर एक नवाच शोध लागला. तिच्या काही गरजा किंवा आवडी-नावडी तिला कळायच्या आतच नीरजला- तिच्या नवऱ्याला- कळायच्या, तिच्यातल्या काही गुणांचा पत्ता तर त्यानं दाखवून देईपर्यंत तिला लागलाच नव्हता. तिला जात्याच लय-तालाची गोडी होती, पण ती फार कधी लक्षातच आली नव्हती. संगीत ऐकताना आपोआप थिरकणारी तिची बोटं बघून नीरजलाच ते लक्षात आलं. त्याच्या प्रोत्साहनामुळं तिनं विशारदचा अभ्यास केला आणि चक्क पहिली आली. नीरजवरचा तिचा विश्वास अजून बळकट झाला.
जिवलग नात्यांचा रोजच्या जगण्यामध्ये भरपूर विधायक उपयोग होऊ शकतो. पण केव्हा? जेव्हा एकमेकांबद्दलची पुरेशी समज, गाढ विश्वास, एकमेकांची काळजी घेणं, आवश्यक तिथे मदत करणं-घेणं, आणि नातं अबाधित राहण्यासाठीची निष्ठा पुरेशा प्रमाणात असते तेव्हा! एकमेकांना बघितल्यावर, भेटल्यावर मुद्दाम प्रयत्न न करता आपल्या चेहऱ्यावर जर प्रसन्नतेचा शिडकावा होत असेल तर ते नातं आपले ‘आरोग्यवर्धक’ (ळल्ल्रू) नातं आहे, असं खुशाल समजावं. अर्थातच अशी नाती ही मोजकीच राहणार हे उघड आहे. आणि म्हणून ती जपण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, नाही का?
निकटची नाती जपताना कुठल्या गोष्टी किती ताणायच्या आणि सल सोडायच्या ही खूप विचारपूर्वक, शांतपणे समजून घेण्याची गरज असते. हे थोडंसं योगासनासारखं आहे. त्यात शरीराला लवचीक ठेवण्यासाठी ताण द्यावाच लागतो. जर अजिबात ताण दिला नाही तर शरीर टणक, आखडलेलं बनतं आणि अवास्तव ताणलं तर एखादी नस, स्नायू, अवयव कायमचा दुखावला जाऊ शकतो. नात्याचंही असंच आहे. विनयला त्याच्या मुलाच्या काही सवयी अजिबात आवडायच्या नाहीत. उदाहरणार्थ- सतत कानाला चिकटलेला मोबाइल, जेवताना अतिचोखंदळ असणं, व्यक्तिगत आयुष्यातील बेशिस्त वगरे. एकदा त्यानं ‘एक हजार अकराव्यांदा तुला सांगतोय- माझ्या घरात हे असलं चालणार नाही’ अशी तंबी दिली. इतकंच नाही तर मुलांचं सगळं सामान व्हारांडय़ात आणून टाकलं. त्यामुळे घडलं इतकंच की त्याच्या आईने त्याला पाठीशी घातलं, त्याचं वागणं तसंच चालू राहिलं, पण वडिलांशी बोलणं पूर्ण बंद झालं. यातून विनयनं काय मिळवलं? वागण्यात बदल तर झाला नाहीच, पण नात्यात कायमची एक गाठ तयार झाली.
दुसऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन, त्यांना योग्य तो प्रतिसाद देणं म्हणजे जणू कोवळ्या रोपाची निगराणी करण्यासारखं आहे. विद्याला तिच्या पन्नास एक मित्रमत्रिणींचे वाढदिवस पाठ असतात. एक वेळ घरातले लोक विसरतील, पण विद्याचा फोन जाणारच! चाळिशीतल्या कल्पेशचं आई-अण्णांबरोबर रोजचं किमान ५-१० मिनिटांचं गप्पाष्टक कधी चुकणार नाही. एरवी दिवसभर नोकरीची वणवण आहेच, पण आई-अण्णा घरी आपली वाट पाहत असतात, हे त्याला चांगलं ठाऊक आहे. सुमित्राच्या हाताखालच्या लोकांनी मुद्दाम दांडी मारण्याचा प्रसंगच येत नाही. त्यांच्या गरजेच्या वेळी सुमित्राकडून त्यांना बिनशर्त रजा मिळालेली असते. विद्या, कल्पेश, सुमित्रासारखी मंडळी त्यांच्या या स्वभावातून इतरांना न दिसणारे धागे बांधत जातात. नात्यातली प्रसन्नता टिकवून धरतात.
काही नाती ‘देवघेवी’ या व्यवहारातून घडतात, तर काही त्यापलीकडे ‘मनाने जवळीक’ असण्याला जास्त महत्त्व देतात. थोडक्यात, काही ‘कर्तव्या’ला सांभाळतात, तर काही ‘सौंदर्याला’! मनाला समाधान देणारी नाती मात्र दोन्हीचा मिलाफ साधतात. म्हणजेच ‘बांधीलकी’ जपतात. ‘मनानं फार जवळ आहोत तरी चांगल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं पाहिजे.’ ‘एकमेकांसाठी रोजच्या कामातल्या मदतीला वेळ काढला पाहिजे, जिथे दुसरा कमी पडेल तिथे अवघड वाटलं तरी धावून गेलं पाहिजे.’ याला बांधून घेणं म्हणतात. ‘सर्व खाचखळग्यांत आपण सोबत आहोत’ ही नात्यातली अनुभूती मनाला प्रचंड उभारी आणते यात शंका नाही.
जेव्हा आयुष्य उलटे फासे टाकत असते तेव्हा अशी नाती जणू पडणाऱ्या माणसाला सावरणारी जाळी बनतात. जेव्हा आयुष्य सरधोपट चालू असतं तेव्हा हीच नाती आपल्याला अजून समृद्ध बनायला मदत करतात. त्यांच्यासोबतचे हास्यविनोदाचे, मजेचे क्षण अवघड काळात आपलं मनोधर्य टिकवायचं निमित्त ठरतात. एकमेकांच्या सवयी, लकबी, फजितीचे प्रसंग यावर (दुखावण्याचा हेतू न ठेवता) केलेल्या कोटय़ा, व्यक्तींना अधिक जवळ आणतात. उत्तम सहजीवनाची ती ठळक खूण आहे, बरं का!
सॉक्रेटिस या महान तत्त्ववेत्त्याला त्याच्या एका शिष्यानं उत्तम/परफेक्ट बायको शोधण्याबद्दल सल्ला मागितला. तेव्हा तो स्मित करून म्हणाला, परफेक्ट ही गोष्टच चांगल्या नात्यात अस्तित्वात नाही. तुला चांगली पत्नी मिळाली तर तू बराच सुखी होशील आणि नाही मिळाली तर तत्त्वज्ञ होशील! (हे अर्थात उभयपक्षी खरं आहे) ज्या जोडप्यांच्या लग्नाचे सुवर्णमहोत्सव (नुसती वर्षे न मोजता) खऱ्या अर्थानं होतात, त्यांत शारीरिक ओढीच्या पलीकडे जपलेल्या एकमेकांप्रती असलेल्या विनोदबुद्धीचा मोठा वाटा असतो, असं संशोधन सांगतं.
आयुष्याच्या संध्याकाळी तर ही जिवलग नातीच माणसाचा दुसरा प्राणवायू असतात. प्रत्यक्ष सहवास, तो नसेल तर फोनवरचं संभाषण, स्काईपवरच्या गप्पा, कौटुंबिक कार्यक्रमात झालेल्या भेटीगाठी, एकमेकांच्या खुशाली हीच जणू जगण्याची उद्दिष्टं बनतात. रोजच्या जगण्याच्या धावपळीत गुंतलेल्या तरुणाईला कधी कधी ते उमजत नाही. त्यामुळे ताण निर्माण होतात. पण केव्हातरी त्यांचीही संध्याकाळ येणार असतेच ना! तेव्हा ही अपरिहार्यता समजून घेणं महत्त्वाचं आहे.
काही नाती आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर वाटतात. फार सुखावह वाटत नाहीत, पण तरीही ती एका टप्प्यापर्यंत जपणं आवश्यक असतं. त्यातून आपल्या जवळच्या इतर काही जणांच्या मन:स्वास्थ्याला आपण हातभार लावत असतो.
पूर्वी कुटुंब-विशेषत: लग्न हे जास्त व्यावहारिक पायावर अवलंबून होतं (पसा, नाती, वंश चालणे इ.) पती-पत्नींचं एकमेकांवर प्रेम असणं अनिवार्य नव्हतं. पण आज अशा नात्यातून भावनिक ओलाव्याची अपेक्षा आणि गरज दोन्ही जास्त आहे. एक कवी म्हणतो तसं, ‘वाट पाहणारं कुणी असेल तरच उशीर करण्यात अर्थ आहे, सावरणारा हात असेल तेव्हाच धप्कन पडण्यात गंमत आहे!’
असं उशीर करायला, पडायला, ही नाजूक पण प्रसंगी दणकट बनणारी नाती तुम्हा-आम्हा सर्वाना मिळोत, निर्माण करता येवोत, अशी मनापासून शुभेच्छा! 
डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!