manपीएमएस स्त्रीच्या मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. ती लक्षणं स्त्रीच्या दैनंदिन जीवनावरही नकारात्मक प्रभाव टाकतात. त्या दृष्टीतून पीएमएस हा वैद्यकीय आजार आहे असे म्हणायला हवे. त्यावर वेळीच उपाय हवा.

स्त्रीला पाळी येणे, ती नियमित असणे हे स्त्री म्हणून तिच्या आरोग्याचे खास लक्षण मानले जाते. म्हणजे मुलगी वयात येणे ही एक महत्त्वाची बाब आहेच. अनेक सामाजिक ठिकाणी स्त्रीची पहिली पाळी केव्हा आली, याचाही आढावा घेतला जातो. कारण तिच्या नियमित येणाऱ्या पाळीमुळे तिला विवाहानंतर मूल होईल याची खातरजमा केली जाते. अर्थात, पाळी येणं ही एक नसíगक प्रक्रिया असल्यानं ती एक आरोग्यदायी गोष्ट निश्चितच आहे, असं आपण समजतो. परंतु बऱ्याच वेळा मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे म्हणा, कधी लवकर येण्याने किंवा कधी खूप उशिरा येण्याने बऱ्याच वैद्यकीय समस्या निर्माण होतात. अनेकदा आपण वयात आलेल्या मुलींना पाळी यायच्या काही दिवस आधी चिडताना, रागावताना किंवा उगाचच अस्वस्थ झालेल्या पाहतो. हे असे का होते, हे त्या मुलीला तर कळत नाहीच पण तिच्या आईलाही कळत नाही.
 माझ्या माहितीतील अनुजा नावाची एक सोळा वर्षीय युवती मासिक पाळी यायच्या काही दिवस आधी विक्षिप्त वागत असे. अस्वस्थ होत असे. तिची आई तिला अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात चिडलेली, संतापलेली पाहून स्वत:च गोंधळून जायची आणि तिची मुलीबरोबर या काळात भांडणं व्हायची. तिच्या आईला कळायचेच नाही की, एरवी व्यवस्थित वागणारी ही शहाणी मुलगी पाळी यायच्या काही दिवस आधी अशी का घाबरते? अशी सुन्न का होते, एकटीच घरामध्ये का बसते? तिचा चेहरा घाबराघुबरा का होतो, तिच्या मनात भीतीची उगाचच आवर्तने उठायची. विचारले तर तिला काय सांगायचे सुचत नसे. पाळी तर तिची दर महिन्याला यायची. पण हा असा विचित्र अनुभवसुद्धा तिला यायचा. आतून तिला खूप घाबरल्यासारखे, दडपण आल्यासारखे वाटायचे. जीव उगाचच कासावीस व्हायचा. खाणे-पिणे सुचायचे नाही. कॉलेजला जाणे ती टाळायची. अभ्यास करायची नाही. डोळे सदा भरून आलेले. काही चांगला सल्ला द्यावा तर ती चिडचिड करायची. आरडाओरडा करायची. बऱ्याच वेळा तिच्या मनात या काळात आत्महत्या करावी असे विचारही उगाचच येत असत. असे विचार येतात म्हणून ती आणखी भयभीत होत असे. हा खरेच एक विचित्र आणि सहन न होणारा अनुभव आहे.
  अनेक स्त्रियांना अशा प्रकारच्या अनुभवातून अगदी पाळीची सुरुवात होण्यापासून ते पाळी थांबेपर्यंत जावे लागते. पूर्वी या लक्षणाला नक्की काय म्हणावे हे कुणाला कळत नसे. पण आता याला प्रिमेन्सस्ट्रयल सिन्ड्रोम किंवा ‘पीएमएस’ असे म्हणतात. साध्या शब्दात हा मासिक पाळीपूर्वी येणारा आजार, असे म्हणावे लागेल. कधी कधी पाळी यायच्यापूर्वी महिलेला काहीसे नरमगरम वाटते. पण काही विशिष्ट लक्षणे सातत्याने पाळीपूर्वी दिसू लागली तर हा पाळीपूर्वी येणारा आजार असे ओळखले पाहिजे. पीएमएस हा मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही लक्षणे अगदी साधारण असतात. पण ती प्रत्येक पाळीपूर्वी येतात आणि ती येणार आहेत हे स्त्रियांना कळते. मध्यम किंवा तीव्र स्वरूपात पाळीपूर्वी येणारी ही शारीरिक वा मानसिक लक्षणे स्त्रीच्या दैनंदिन जीवनावरही नकारात्मक प्रभाव टाकतात. त्या दृष्टीतून पीएमएस हा वैद्यकीय आजार आहे असे म्हणायला हवे.
पीएमएस नक्की कशामुळे होतो व का होतो, हे तसे सांगता येत नाही. पण स्त्रीची येणारी पाळी ही दर महिन्याला येते आणि त्यानुसार तिच्या शरीरात हार्मोन्सचे बदल चक्रांकित पद्धतीने होत असतात. इस्ट्रोजेन व प्रोजेसस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बदलत राहते आणि त्यावर पीएमएस होतो. या हार्मोन्सच्या बदलत्या पातळीनुसार मासिक पाळी येण्याअगोदरच्या सिन्ड्रोममध्ये, स्त्रीमध्ये भावनिक, शारीरिक आणि वर्तणुकीमध्ये बदल झालेले दिसतात. सामान्य शरीर-विज्ञान शास्त्राच्या दृष्टीनं स्त्रियांच्या बीजकोषातनं बाहेर पडणाऱ्या स्त्रीबीजाच्या दरम्यानच्या काळात हे बदल स्त्रीमध्ये दिसतात. पाळी येण्याच्या कमीतकमी दोन आठवडे अगोदर स्त्रियांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. तिची पाळी सुरू झाली की ही लक्षणे पाळी संपेपर्यंत कमी होऊ लागतात. साधारणत: मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांमध्ये होणारे भावनिक बदल हे ग्रीक संस्कृतीमध्येही ओळखले गेलेले आहेत. बऱ्याच वेळा पीएमएस हे स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वामुळे होते की काय असे लोकांना वाटते. म्हणजे या स्त्रियांना चिडचिडायची व रागवायची सवय आहे, त्यामुळे अशी समस्या होते, असे लेबल लावून टाकले जाते. पण ते तसे नाही. खरे तर स्त्रीच्या स्वभावात किंवा भावनेत होणारा बदल हा तिच्या हार्मोन्समुळेच होत असतो. बऱ्याच वेळा हार्मोन्सबरोबर मेंदूतील सीरोटोनीन हे केमिकलसुद्धा पीएमएससाठी जबाबदार आहेत.
स्त्रियांमधील पीएमएसची लक्षणे ही विविध प्रकारची आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये ती वेगवेगळ्या प्रकाराने दिसू शकतात. त्यांची तीव्रता आणि स्वरूप हे प्रत्येक मासिक पाळीत बदलूही शकते. पण सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये पीएमएसच्या अनुषंगाने शारीरिक व मानसिक लक्षणे मुख्यत्वे करून दिसून येतात. शारीरिक लक्षणांमध्ये शरीर जड वाटणे, शरीर फुगल्यासारखे वाटणे, डोके जड झाल्यासारखे वाटणे किंवा डोके दुखत राहणे, पाठीत दुखणे, ओटीपोटीतून वेदना येणे. बऱ्याच वेळा काही मुली सांगतात की, त्या चक्क ओरडत असतात. जमिनीवर गडाबडा लोळतही असतात. पायांच्या स्नायूत गोळे येतात. अत्यंत थकल्यासारखे वाटते. उलटी झाल्यासारखे वाटते. अ‍ॅसिडिटी झाल्यासारखे वाटते. स्तनांमध्ये दुखरेपणा जाणवतो. भूक लागत नाही किंवा खूप खावेसे वाटते. कधी कधी काही स्त्रियांना या काळामध्ये मायग्रेन जाणवतो. डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही. पूर्ण शरीरामध्ये ताण जाणवतो. किंवा वेदना आल्यासारखी वाटते. तर मानसिक लक्षणांमध्ये लक्ष लागत नाही. चिडचिड झाल्यासारखी वाटते. खूप राग येतो. हळवेपणा वाटतो. उगाचच नराश्य जाणवते. ऊर भरून येतो. खूप रडावेसे वाटते. चिंता वाटते. मोठय़ाने ओरडून बोलावेसे वाटते. झोप येत नाही किंवा फक्त झोपून राहावेसे वाटते. अनेकदा पीएमएसची लक्षणे ही इतर मानसिक आजारांसारखी वाटतात. जसे की, उदासीनता, चिंता आणि त्यामुळे पाळीआधीच्या या लक्षणांचा काळ जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उदासीनता किंवा पाळी जायच्या अगोदर येणारी वा चिंतेची लक्षणे ही सातत्याने येत असतात आणि दीर्घ काळ चालतात. त्या लक्षणांचा मासिक पाळीशी संबंध नसतो. तरीसुद्धा पीएमएसमुळे जर उदासीनता किंवा चिंतेसारखा आजार असेल किंवा मायग्रेन, अस्थमा आणि अ‍ॅलर्जीसारखे शारीरिक आजार असतील तर ते आजार अधिक बळावू शकतात. एका मुलीमध्ये पाळी येण्यापूर्वी तिचा फिट येण्याचा आजार बळावत असे. आणि हे चिंताजनक आहे म्हणून पीएमएस ओळखणे खूप आवश्यक आहे. ८० टक्के महिलांमध्ये मासिक पाळी येण्याअगोदर काही सामान्य लक्षणे स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी जाणवू शकतात. पण २० ते ३० टक्के महिलांना पीएमएसचा मध्यम स्वरूपाचा आजार दिसून येऊ शकतो असा अंदाज आहे. तर साधारणत: ५ ते ८ टक्के स्त्रियांमध्ये पीएमएस खूप गंभीर स्वरूपातही दिसू शकतो. स्त्रियांचे शिक्षण, वैवाहिक स्थिती व आíथक स्थिती यांसारख्या घटकांचा पीएमएसशी तसा शास्त्रीय संबंध दिसत नाही. साधारणत: ज्या स्त्रियांमध्ये पीएमएसची लक्षणे आढळतात त्या स्त्रियांनी त्याचे निदान डॉक्टरकडून करून घेणे आवश्यक आहे. पीएमएसचे व्यवस्थित निदान करणे हे शास्त्रीयदृष्टय़ा आवश्यक आहे. त्यामुळे काय काळजी घ्यावी हे सांगता येते. जर पीएमएसची लक्षणे ही गंभीर स्वरूपाची नसतील तर जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. या बदलांमुळे पीएमएस काबूत ठेवता येतो. उदाहरणार्थ, जेवणामध्ये फरक करणे, मीठ कमी खाणे, तेलकट-तुपकट कमी खाणे, उत्तेजक द्रव्यांचे सेवन कमी करणे, या दरम्यान साखरेचे प्रमाणही कमी करणे आणि आजकालच्या आधुनिक युगात स्त्रियांनी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेणे. फळे, भाज्या तसेच पोषक जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करणे. साधारणत: अर्धा तास शारीरिक व्यायाम करणे. अगदी बागेत वॉक घेणं म्हणा किंवा आपल्या मत्रिणींबरोबर जिममध्ये व्यायाम करणे यामुळे मन प्रसन्न राहीलच आणि चांगली संप्रेरके निर्माण होतील. याव्यतिरिक्त योगाभ्यास करणे, प्राणायाम करणे खूप लाभदायी ठरू शकते.
मेडिटेशन किंवा ध्यानधारणा शिकले तर त्याचा उपयोग पीएमएसमध्ये प्रभावी ठरू शकतो. यामुळे या लक्षणांवरचा आपला मानसिक कंट्रोल वाढू शकतो. मन प्रसन्न ठेवण्यासही मदत होते.
 पीएमएस हा तसा मानसिक समतोलपणाला आव्हान देणारा आजार असल्याने कौटुंबिक आधार खूप महत्त्वाचा आहे. या काळात स्त्रीला समजून घेणे, विशेषत: तिच्यात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना समजून घेणे आवश्यक आहे. तिचा तणाव कमी करणे. या दरम्यान तिच्याबरोबर सुसंवाद साधणे. तिचे मन प्रसन्न करण्यास मदत करणे आवश्यक आहे. जेव्हा लक्षणे तीव्र असतात तेव्हा डॉक्टर्स विविध प्रकारची औषधेही देतात. ज्यामध्ये वेदनाशामक गोळ्या आहेत. उदासीनतेची औषधे आहेत. यामुळे स्त्रीला तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमधून बऱ्यापकी सुटका मिळू शकते. पण तरीही जीवनशैलीमध्ये बदल घडवून मानसिक क्षमता वाढविल्याने पीएमएसवर काबू मिळविता आला तर ते उत्तमच आहे. या काळात विधायक गोष्टींमध्ये मन रमविणे अत्यंत फायद्याचे ठरते.    

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती