‘‘मी जे पिकवतोय ते कुणी तरी खाणार आहे, हे भान जरी प्रत्येकाला आलं तरी कीटकनाशकांचा उपयोग थांबू शकेल. परस्परपूरक नीतीच आपल्याला विनाशापासून वाचवू शकेल.’’ असं मानणारे आणि रवाळा गावात गेल्या       ३५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे अनेक प्रयोग करणाऱ्या फुटाणे कुटुंबांच्या उपक्रमाविषयी.  

फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, चिप्स हे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक आहेत. त्याऐवजी ताजी फळं, हिरव्या भाज्या खा,’ असा सल्ला आहारतज्ज्ञ वेळोवेळी देत असतात. पण ताज्या म्हणवल्या जाणाऱ्या ज्या भाज्या वा फळं आपण खातो, तीसुद्धा खरंच किती सुरक्षित आहेत हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? आणि पडला असला तरी आपण तो गांभीर्याने घेतो आहोत का? कारण या संदर्भात काही मुद्दे सतत पुढे येत आहेत.
* भाज्यांना कीड लागू नये म्हणून त्यावर कीटकनाशकांनी फवारणी केली जाते. या भाज्या घरी आणून स्वच्छ धुतल्यानंतरही काही प्रमाणात ती आपल्या पोटात जातातच.
*केळी आणि इतर फळं कार्बाईडमध्ये टाकून पिकवली जातात, तर सफरचंदाला वरून वॅक्स कोटिंग दिलं जातं. ते आपल्या थेट पोटात जाते.
* टोमॅटो, काकडी, गाजर, फुलकोबी एकेकाळी मोसमी भाज्या होत्या. आज त्या वर्षभर बाजारात उपलब्ध असतात (बिगरहंगामी फळं/भाज्या या आरोग्यास अपायकारक असतात असे आहारतज्ज्ञ मानतात.)
*एकीकडे सोयाबीनपासून बनणाऱ्या तयार पॅक उत्पादनांनी अक्षरश मॉल्स तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे यामध्ये असणाऱ्या ट्रिपसिन या विषारी घटकामुळे स्त्रियांमधील एस्ट्रोजिनचे संतुलन बिघडत असल्याचे सांगितले जाते.
* गायींनी दूध जास्त द्यावे म्हणून त्यांना हार्मोन्सची इन्जेक्शन्स दिली जातात. असे दूध पोटात गेल्याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असे संशोधन सांगते.    
    हे सगळं ऐकलं, वाचलं की वाटतं आता आपण नेमकं खायचं तरी काय? या सगळय़ा पाश्र्वभूमीवर ‘रवाळा’सारख्या छोटय़ाशा गावात गेल्या ३५ वर्षांपासून रासायनिक खते व कीटकनाशके न वापरता सेंद्रिय शेतीचे अनेक प्रयोग करत जमीन-पाणी-हवा दूषित होऊ नये हा ध्यास घेतलेले वसंतराव आणि करुणा फुटाणे यांच्या कार्याची दखल घ्यायला भाग पडतं. आणि विविध ठिकाणी होणारे असे प्रयोग अधिक मोठय़ा प्रमाणात व्हायला हवेत, याचं भान देतं.
    कृषी पदवीधर असलेल्या वसंतराव फुटाणे यांच्या शेतीविषयक प्रयोगांना १९७७ पासून सुरुवात झाली. ज्यावेळी त्यांनी आपली वडिलोपार्जति शेती स्वतच्या हातात घेतली. सुंदरलाल बहुगुणांचे पट्टशिष्य असलेले वसंतराव विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणाविषयी सजग तर होतेच. शिवाय त्यांच्यावर विनोबा भावे, बाबा आमटे यांच्या कामाचा, विचारसरणीचा प्रभाव होता. अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभागही होता. लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय हे माहिती होतं, फक्त दिशा ठरत नव्हती. पण शेतीला सुरुवात झाली आणि मार्ग मिळाला. त्यांच्या या कार्याला सुयोग्य साथ मिळाली ती पत्नी करुणाताई यांची.
     आजच्या शेतकऱ्यांची महत्त्वाची समस्या ही आहे की त्यांच्या मुलांमध्ये शेतीबद्दल अनास्था आहे. शहरी जीवनशैलीचं आकर्षण वाढल्याने नवीन पिढीला शेती आणि संबंधित व्यवसायामध्ये रुची नाही. करुणाताईंची दोन्ही मुलं विनय व चिन्मय यांनी मात्र ठरवून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेती व्यवसायाला उपयुक्त अशी अनेक कौशल्ये ते स्वतच शिकले. ‘रवाळा’सारख्या ठिकाणी राहूनही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते मुळीच मागे नाहीत. कंप्युटर प्रोग्रािमग असो, व्हिडीयो एडिटिंग वा डबिंग यांचा उपयोग करून सेंद्रीय शेती संदर्भातील वेगवेगळे प्रयोग ते शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करीत आहेत.
    आज सर्वत्र विकासाच्या नावाखाली अधिकधिक उत्पन्न देणारी, कमी वेळात तयार होणारी पिके घेतली जातात. त्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाण्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. सध्याच्या सर्व नसíगक आपत्ती-कोपासाठी माणसाचा अतिलोभ, हव्यासच जबाबदार आहे, हे स्पष्ट झालंय. या दृष्टचक्रातून फुटाणे कुटुंबाने स्वीकारलेली जीवनशैलीच वाचवू शकणार आहे. ही जीवनशैली निसर्गाशी फटकून वागत नाही, निसर्गाकडून ओरबडून घेत नाही; तर हवा, पाणी, ऊर्जा याचं योग्य नियोजन करते.          
 सेंद्रिय शेती, बायोगॅस, मातीचं घर, विजेचा कमीत कमी उपयोग असे कितीतरी ‘वेडे’ वाटतील असे निर्णय वसंतराव आणि करुणाताईंनी घेतले, जे पुढे काळाच्या कसोटीवर खरे उतरले. कारण, ते निर्णय त्यांनी शासनाच्या बदललेल्या धोरणानुसार घेतलेले नव्हते, तर पूर्वापार चालत आलेले शहाणपण, विज्ञाननिष्ठा, जगात विविध पातळीवर होणारे बदल त्यानुसार तज्ज्ञांशी केलेल्या चर्चा, शास्त्रीय पुस्तकांचा अभ्यास या सगळय़ांचा तो परिपाक आहे.
  सेंद्रिय शेती जाणीवपूर्वक करणारे लोक तसे कमीच. रासायनिक खतांचा वापर करून जसे भरपूर उत्पन्न घेता येते तसे सेंद्रिय शेती करणाऱ्याला मिळत नाही. शिवाय अजूनही शेतकरी जे कष्ट घेतो त्यामानाने शेतमालाला योग्य भाव मिळतच नाही. त्यात आपल्याकडील विसंगती अशी की रासायनिक शेती करणाऱ्यांना रसायनांवर सबसिडी मिळते. पण सेंद्रिय शेती करणाऱ्यांना काहीच मिळत नाही. शेतीसाठी जी संसाधने वापरली जातात, जसं की गुरं, विहिरीचं पाणी या सगळय़ाचा खर्च कुठेच धरला जात नाही. याशिवाय जमिनीला अधिक कस देण्यासाठी जो बायोमास (जैवभार) वापरला जातो त्याचं महत्त्व निर्विवाद असूनही हा जैवभार शेतापर्यंत नेण्यासाठी साधने उपलब्ध नाही.
   या आणि यासारख्या अनेक अडचणी सेंद्रिय शेती करताना येतात हे ओळखून वसंतराव व करुणाताईंनी त्या दृष्टीने अनेक प्रयोगांना सुरुवात केली. सगळय़ात महत्त्वाचा उपाय हा की शेतीला जोडून काही प्रक्रिया उद्योग व काही नगदी पिके जसे आंबा, संत्र, तूर, ज्वारी, हळद, मोहरी आदीचे उत्पादन व विक्रीला सुरुवात केली. त्यातही हा शेतमाल व्यापाऱ्यांकडे न जाता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्याला योग्य भाव मिळतोय व ग्राहकालाही कमी पशात माल मिळू लागला.
    त्यातही संत्र्यांसारखं नगदी पीक घ्यायचं तर ते जमिनीतील फार पाणी शोषून घेतंय, म्हणून कमी पाणी लागणारं निसर्गाला अनुकूल असं आंबा, बांबू, तूर, ज्वारी, हळद, मोहरी या नगदी पिकांचं उत्पादन वाढविण्याला फुटाणे कुटुंबांनी पसंती दिली. आंब्याच्या नावाजलेल्या जाती जसे केसर, रत्ना, चवसा, राजापुरी, लंगडा, दशहरी या तर त्यांच्याकडे आहेतच; याव्यतिरिक्त गावराणी जातींच्या संकरातून काही वैशिष्टय़पूर्ण नव्या जाती त्यांच्याकडे निर्माण झाल्या आहेत. काही वर्षांतच हे आंबे इतके प्रसिद्ध झालेत की ते घेण्यासाठी गिऱ्हाईक आज स्वतहून येऊ लागलेत. याशिवाय आंब्याचे लोणचे, आमचुर व साखरआंबा हे प्रक्रिया उद्योगही सोबतीला सुरू झाले आहेत.
   करुणाताई अभिमानाने सांगतात की, आमचा बांबू व्यापाऱ्याला विकण्याची वेळच येत नाही, कारण संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी घर बांधताना, छपरासाठी लागणारा उत्तम प्रतीचा बांबू त्यांच्याकडूनच घेऊन जातात. हे दांपत्य सेंद्रिय शेतीचा प्रयोग शाश्वत जीवनशैलीला अनुसरून करीत असल्याने, मुख्यत्वे स्वतच्या जास्तीत जास्त गरजा या शेतीतूनच कशा पूर्ण होतील यावर त्यांचा भर असतो. आज जवळजवळ ७० प्रकारचे उत्पादन त्यांच्या शेतीतून होत आहे. जसे २५-३० प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन ते घेताहेत, २०-२५ प्रकारची फळे- ज्यात आंबे, संत्र्यासोबत िबंब, बेल, कवठ, पेरू, जांभुळ, बोरं, करवंद, िलबू, रामफळ, सीताफळ यांसारख्या फळांचा उल्लेख करता येईल.
   शिवाय मसूर, मटकी, कुळीथ, ज्वारी, धान, मूग, मका, तीळ, गहू, शेंगदाणासारखे ११ धान्यप्रकार ते पिकविताहेत. शिवाय मसाला प्रकार व बांबू, शिरीश, बहावा, साग, शिवन, कडुिनब यांसारखे काही औषधी वनस्पतींचे उत्पादन याच शेतीतून ते करीत आहेत. फक्त मीठ, साखर, गूळ, जिरे, पोहे यांसारख्या मोजक्याच गोष्टी त्यांना बाजारातून आणाव्या लागतात.
    हे सगळे सतत प्रयोग करत, चुकांमधून शिकत राहिल्याने शक्य झाल्याचे वसंतरावांना वाटते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी ‘सेंद्रिय शेती कशी कराल?’ अशी पुस्तिका लिहिली आहे. शिवाय त्यांनी स्वत: पलीकडे समाज या आपल्या मोठय़ा कुटुंबाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली.
  त्यासाठी त्यांनी सुरुवात केली ती आपल्या गावातून. ते राहात असलेल्या ‘रवाळा’ परिसरात ७५ टक्के आदिवासी आहेत. निरक्षरतेचं प्रमाण जास्त आणि शैक्षणिक सुविधांची दुर्दशा म्हणूनच लोकांमध्ये जनजागृती आणणे, आदिवासींमधील अनिष्ट प्रथा आणि व्यसनांसंदर्भात लोकशिक्षण, अयोग्य सरकारी धोरणं, योजनांविषयी निषेध नोंदवणे, शेतकऱ्यांना त्यासंदर्भात माहिती देणे, महिलांना एकत्रित करून गावामध्ये दारूबंदी करणे आणि जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊ नये, म्हणून वॉटरशेड डेव्हलपमेंट कार्यक्रम, ऊर्जेसाठी बायोगॅस व सौरऊर्जेचा प्रसार अशा अनेक गोष्टी ते करत आहेत.  शेतकऱ्याला मदत करणारी, त्यांच्या हिताचा विचार करणारी, त्यांचा हक्क आणि मागण्यांसाठी शासनाला जाब विचारणारी ‘संवाद’ ही संस्था शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्श ठेवते.
   येथे १९७४ पासून  शिक्षण आणि व्यवहार याची प्रत्यक्ष सांगड घालण्याचा प्रयत्न ‘जीवनशाळा’च्या माध्यमातून केला जातोय.  आसपासच्या पाच-सहा गावांमधूनही हा उपक्रम राबवला जातो. अगदी सगळय़ांनी शेती करावी असं नाही, पण शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन असलेल्या गावांमधील शाळांमध्ये तरी ‘शेतीबद्दल प्राथमिक ज्ञान असणं, ते कृषि-साक्षर’ असणं आवश्यक आहे. शाळांमधून हे होणार नाही. हे जाणून ‘जीवनशाळा’मध्ये ‘शेती’ हा मध्यवर्ती विषय ठेवण्यात आला आहे. त्याच्या जोडीला भाषा, गणित व विज्ञानाची सांगड घातली गेली आहे. या सोबतच आपले अधिकार, आपली कर्तव्ये, अवतीभोवतीचं जग, त्यात रोज होणारे शेकडो प्रयोग, संशोधने, प्रश्न, नसíगक संकटे, जमीन, हवा, पाणी, मातीचे प्रकार ऊर्जेची साधने, औजारे, औषधोपचार, रोगराई- त्यावरील उपचार इ. विषयांची प्राथमिक ओळख दिली जाते. ‘जीवनशिक्षण’ ही ‘रवाळा’मधील मुलांसाठी आनंददायी शिक्षणाची एक भन्नाट प्रयोगशाळाच आहे.
   आपल्या देशात शेती महत्त्वाच्याच भूमिकेत आहे. मात्र त्याकडे फक्त व्यवसाय वा स्वत:चा फायदा म्हणून न बघता विधायक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. तेच मानवजातीच्या कल्याणाचे आहे.
स्नेहा दामले -damlesneha@yahoo.com

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
5 home remedies to get rid from mosquitoes how to get rid from mosquito home
डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणंही कठीण? मग किचनमधील ‘या’ ५ गोष्टींचा करा वापर, डास होतील गायब
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ